konkandhara.com

कोकणची बातमी

ए.जी. विद्यालयाची विद्यार्थिनी रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिने SSC परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

ए.जी.ची रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण 100 टक्के गुण मिळवून दापोली तालुक्यात प्रथम

दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूलची कुमारी रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिने नुकत्याच लागलेल्या एसएससी परीक्षेत दापोली तालुक्यात 100 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त करून यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयतून एकूण 262 विद्यार्थी परीक्षेत बसले होते पैकी 255 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल 97.32% इतका लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण 100 टक्के, द्वितीय क्रमांक नीळ उदय फडके 96.20 टक्के, तृतीय क्रमांक क्रांति विरेंद्र केळस्कर 95.40 टक्के, चौथा क्रमांक पल्लवी विजय भुवड 94.80 टक्के तर पाचवा क्रमांक सई आशिष शिगवण 94.60 टक्के गुण मिळवून विद्यालयामध्ये अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले आहेत. तर 80% च्या वरती तब्बल 48 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर, कार्यवाह डॉ. विनोद जोशी, सर्व संचालक मंडळ, शालेय समिती चेअरमन श्री. रवींद्र कालेकर, सदस्य श्रीकांत निजामपूरकर, सदस्या सौ.स्मिता सुर्वे,मुख्याध्यापक एस.एम. कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन घुले, पर्यवेक्षक श्री. अनिल पेठकर, श्री. मगदूम एस.आय. सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी विशेष कौतुक केले आहे.

ए.जी.ची रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण 100 टक्के गुण मिळवून दापोली तालुक्यात प्रथम Read More »

konkandhara 2026 05 08T152454.098

कोकण दहावीतही अव्वल ! ९७.६२ टक्के निकाल; मुलींची सरशी

रत्नागिरी । प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वी (SSC) चा निकाल ०८ मे २०२६ रोजी जाहीर केला असून, यामध्ये कोकण विभागीय मंडळाने पुन्हा एकदा राज्यात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ही माहिती कोकण बोर्डाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी दिली. यावर्षी राज्याचा एकूण नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९२.०९ टक्के लागला असताना, कोकण विभागाचा निकाल ९७.६२ टक्के इतका लागून तो राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक ठरला आहे. कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९७.३७ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.१३ टक्के इतका नोंदवला गेला आहे. या परीक्षेत नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून, राज्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ आहे, जी मुलांच्या ८९.५६ टक्क्यांपेक्षा ५.४० टक्क्यांनी अधिक आहे. कोकण विभागाचा विचार करता मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.५५ टक्के असून मुलांचे प्रमाण ९६.७३ टक्के इतके आहे.शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी ‘कॉपीमुक्त अभियान’ अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आले, ज्याचा सकारात्मक परिणाम निकालावर दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कोकण विभागातील सर्व ११४ परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरे अनिवार्य करण्यात आल्यामुळे परीक्षा कालावधीत एकही गैरप्रकार घडला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ४१२ माध्यमिक विद्यालये आणि ७३ परीक्षा केंद्रे होती, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२८ विद्यालये आणि ४१ परीक्षा केंद्रे होती. संपूर्ण राज्यातून सुमारे १५.५५ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ६,६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच, ६४ विषयांपैकी २० विषयांचा निकाल १०० टक्के लागला असून ४.२२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी मिळवली आहे.निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांच्यासाठी मंडळाने ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गुणपडताळणीसाठी ९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. तसेच, उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै २०२६ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार आहे, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी यावर्षी परीक्षेच्या वेळापत्रकात प्रमुख विषयांच्या पेपरमध्ये सुट्टी देण्यात आली होती आणि १० समुपदेशकांची नियुक्तीही करण्यात आली होती. कोकण विभागाने सन २०१२ पासून आपले प्रथम स्थान सातत्याने टिकवून ठेवल्याबद्दल मंडळाने सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.

कोकण दहावीतही अव्वल ! ९७.६२ टक्के निकाल; मुलींची सरशी Read More »

konkandhara 2026 05 06T152951.520

‘कुंभार्ली घाटाचा राजा 2026’ ईश्वर पाटील तर ‘कुंभार्ली घाटाची राणी 2026’ श्रावणी परिट

‘किंग ऑफ कुंभार्ली 2026’ राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद चिपळूण : सह्याद्रीच्या कुशीत रंगलेल्या प्रतिष्ठेच्या आणि रोमहर्षक ‘किंग ऑफ कुंभार्ली 2026’ राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत यंदा देशभरातून जवळपास ४०० स्पर्धक सहभागी झाले होते. चिपळूण सायकलिंग क्लब आयोजित या स्पर्धेच्या पाचव्या आवृत्तीत पुरुष गटात धाराशिवच्या ईश्वर पाटील याने अवघ्या १ तास १ मिनिट १३ सेकंद या विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करत ‘कुंभार्ली घाटाचा राजा 2026’ हा मानाचा किताब पटकावला. तर महिलांच्या गटात पुण्याच्या श्रावणी परिट हिने १ तास २६ मिनिटे ३४ सेकंदात स्पर्धा पूर्ण करत ‘कुंभार्ली घाटाची राणी 2026’ बनण्याचा मान मिळवला. यंदाच्या स्पर्धेत प्रत्येक गटात तुफान चुरस पाहायला मिळाली. अनेक गटांमध्ये अवघ्या काही मिलीसेकंदांच्या फरकाने विजेते निश्चित झाले. स्पर्धेची सुरुवात सकाळी सहा वाजता सावरकर मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून करण्यात आली. साहिल डेव्हलपर्स चिपळूणचे सचिन कदम आणि रत्नागिरी ट्रायथलीट क्लबचे संस्थापक अमित कवितके यांच्या हस्ते स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कुंभार्ली घाट माथ्यावर स्पर्धेचा समारोप झाला. त्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समारंभात अनिरुद्ध निकम, जयेंद्रशेठ खताते, दशरथ दाभोळकर, नितीन ठसाळे, मंगेश पेढांबकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रमुख देणगीदार सचिन कदम, विनती ऑरगॅनिक्सचे प्रतिनिधी सुमेर तारे, कृष्णा केमिकल्सचे प्रतिनिधी सुयोग चव्हाण, सारस्वत बँकेचे प्रतिनिधी कल्पेश महाडीक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार शेखर निकम यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल चिपळूण सायकलिंग क्लब आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले. अल्पावधीत राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झालेल्या या स्पर्धेसाठी स्थानिक उद्योग आणि नेत्यांनी अधिक सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. महिला मास्टर गटात अंजली भलिंगे (पुणे) प्रथम, रुपाली गिरमकर (पिंपरी-पुणे) द्वितीय तर ब्लांशे थेमुडो (गोवा) तृतीय ठरल्या. महिला एलिट गटात श्रावणी कृष्णात परिट (पुणे) प्रथम, योगेश्वरी महादेव कदम (सांगली) द्वितीय आणि श्रावणी उमेश घोडेस्वार (कोल्हापूर) तृतीय ठरली. पुरुष किड्स गटात आर्यन सुनील मालगे (कोल्हापूर) प्रथम, आर्यन संदीप जाधव (पलूस) द्वितीय तर साईराज तुषार भोईते (सातारा) तृतीय आला. पुरुष ज्येष्ठ गटात महेश किणी (ठाणे) प्रथम, प्रशांत तिडके (पुणे) द्वितीय आणि संतोष पवार (पुणे) तृतीय ठरले. पुरुष मास्टर गटात अनुप पवार (मुंबई) प्रथम, संजीव कुमार शर्मा (दिल्ली) द्वितीय तर श्रधीर सागर शिरझेम (नोएडा) तृतीय ठरले. पुरुष खुल्या गटात ईश्वर पाटील (धाराशिव) प्रथम, निहाल नदाफ (सांगली) द्वितीय आणि सिद्धेश पाटील (कोल्हापूर) तृतीय आला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पोफळी वीज मंडळ, राष्ट्रीय महामार्ग विभाग, विविध रुग्णालयांची वैद्यकीय पथके, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याबद्दल चिपळूण सायकलिंग क्लबने कृतज्ञता व्यक्त केली.

‘कुंभार्ली घाटाचा राजा 2026’ ईश्वर पाटील तर ‘कुंभार्ली घाटाची राणी 2026’ श्रावणी परिट Read More »

konkandhara 2026 05 06T151651.404

चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील अतिक्रमणे हटवली

रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई; ८० बांधकामे जमीनदोस्त रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी नगर परिषदेने बुधवारी शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील बहुचर्चित अतिक्रमणांवर मोठी कारवाई करत तब्बल ८० अनधिकृत बांधकामे हटवली. सकाळपासून सुरू झालेल्या या मोहिमेत नगरपालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील अनधिकृत दुकाने आणि पक्की बांधकामे जमीनदोस्त केली. चर्मालय ते कोकणनगर हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मुख्य मार्ग असून, रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. तसेच, ११ केव्ही भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनी टाकण्याचे महत्त्वाचे कामही या अतिक्रमणांमुळे रखडले होते. ही कारवाई काही दिवसांपूर्वीच होणार होती. मात्र, सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन प्रशासनाने ती तात्पुरती पुढे ढकलली होती. त्यावेळी संबंधित दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवण्यासाठी मुदत मागितली होती. प्रशासनाने दिलेल्या मुदतीनंतरही अतिक्रमणे कायम असल्याने अखेर नगर परिषदेला कठोर पावले उचलावी लागली. बुधवारी सकाळी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, जेसीबी मशीन आणि आवश्यक फौजफाट्यासह चर्मालय-कोकणनगर परिसरात दाखल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू झालेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये एकच धावपळ उडाली. या कारवाईमुळे आता ११ केव्ही भूमिगत विद्युत वाहिनीचे काम वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून, रस्ता रुंदीकरणाचाही मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील अतिक्रमणे हटवली Read More »

konkandhara 2026 05 06T131417.499

बिनविरोध निवडीनंतर आमदार प्रमोद जठार यांचा सिंधुदुर्ग दौरा ठरला ; दोन दिवसांत आठही तालुक्यांमध्ये धडाकेबाज भेटी !

दोडामार्ग : भूषण सावंत : विधानपरिषद आमदार म्हणून प्रमोद जठार यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर संबंधित आमदारांचा ७ व ८ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा निश्चित झाला असून, या दौऱ्यात ते जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, पक्ष संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 👉 ७ मे रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे :सकाळी १० वाजता दोडामार्ग भाजप कार्यालयात भेट, त्यानंतर सकाळी ११:३० वाजता सावंतवाडी येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद. दुपारी २ वाजता वेंगुर्ला येथे बैठक होणार असून, सायंकाळी ४ वाजता कुडाळ आणि सायंकाळी ६ वाजता मालवण येथे दौऱ्याचा पुढील टप्पा पार पडणार आहे. 👉 ८ मे रोजीचा दौरा :सकाळी १०:३० वाजता देवगड येथे सुरुवात होऊन, सकाळी ११:३० वाजता पडेल येथे भेट दिली जाणार आहे. दुपारी १ वाजता वैभववाडी येथे कार्यकर्त्यांशी चर्चा होणार असून, सायंकाळी ३:३० वाजता कणकवली ग्रामीण भागात, सायंकाळी ५ वाजता कणकवली शहरात बैठक पार पडेल. दौऱ्याचा समारोप सायंकाळी ६:३० वाजता तळेरे येथे गावकऱ्यांच्या सत्काराने होणार आहे. ⚡ संघटन मजबूत करण्यावर भरया दौऱ्यात स्थानिक पातळीवरील प्रश्न, संघटनात्मक अडचणी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती यावर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचा स्पष्ट प्रयत्न या दौऱ्यातून दिसून येत आहे. 📌 राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेलादोन दिवसांच्या या तुफानी दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, विविध ठिकाणी होणाऱ्या बैठका आणि संवादामुळे राजकीय समीकरणांमध्ये हालचाली वेगाने घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बिनविरोध निवडीनंतर आमदार प्रमोद जठार यांचा सिंधुदुर्ग दौरा ठरला ; दोन दिवसांत आठही तालुक्यांमध्ये धडाकेबाज भेटी ! Read More »

konkandhara 2026 05 06T065535.012

धाडसी पुढाकार ! माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांचे सरसावले पाऊल ; रस्त्यांवर कोसळलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत

दोडामार्ग / भूषण सावंत : दोडामार्ग शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात अचानक रस्त्यावर कोसळलेल्या फणसाच्या झाडामुळे नागरिक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. अंधारातच वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला आणि अपघाताचा धोका निर्माण झाला होता. मात्र, या गंभीर परिस्थितीत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी तात्काळ पुढाकार घेत परिस्थिती हाताळत नागरिकांना मोठा दिलासा दिला. हातात कुऱ्हाड घेत संतोष नानचे स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने झाड कापण्याचे काम हाती घेतले. कोणतीही यंत्रणा येण्याची वाट न पाहता त्यांनी तातडीने कृती करत रस्त्यावर पडलेले झाड हटवले आणि काही वेळातच रस्ता पूर्णपणे मोकळा केला. यामुळे अडकलेल्या वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या कामात ओंकार पेडणेकर, शिवम पांचाळ, लक्ष्मण परब, महेश रवार, फोंडू हडीकर आणि चिन्मय प्रसादी आदी तरुणांनी सक्रिय सहभाग घेत मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला. स्थानिक नागरिकांकडून संतोष नानचे आणि सहकार्य करणाऱ्या तरुणांचे कौतुक होत असून, प्रशासनानेही अशा प्रसंगी तात्काळ प्रतिसाद देण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही घटना म्हणजे जनतेसाठी पुढे सरसावणाऱ्या नेतृत्वाचा आदर्श ठरली आहे.

धाडसी पुढाकार ! माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांचे सरसावले पाऊल ; रस्त्यांवर कोसळलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत Read More »

konkandhara 2026 05 05T222036.402

“अंधश्रद्धेच्या विळख्यात समाज; विज्ञानाचा दिवा पेटवण्याची गरज!” – सिंधुदुर्गात जागृतीची हाक

दोडामार्ग : भूषण सावंत : अज्ञान आणि भीतीवर आधारलेल्या अंधश्रद्धा आजही समाजाच्या मुळावर घाव घालत असून, आर्थिक व शारीरिक शोषणाला खतपाणी घालत आहेत. काळी जादू, जादूटोणा, भूत-प्रेत, अनिष्ट रूढी यांसारख्या प्रथांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा घातक प्रवृत्तींपासून मुक्त होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, असे ठाम प्रतिपादन डॉ. संजीव लिंगवत यांनी केले. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा २०१३ असूनही पुरेशी जनजागृती न झाल्याने अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या टिकून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मांजर आडवे जाणे, कावळ्याच्या ओरडण्यावरून संकेत काढणे, रात्री नखे कापणे टाळणे, लिंबू-मिरची लटकवणे, नागाला दूध पाजणे किंवा महिलांना मंदिरात मज्जाव करणे यांसारख्या प्रथांवर त्यांनी कठोर टीका केली. डॉ. रा. धो. खानोलकर मठ येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत अंधश्रद्धेविरोधात जोरदार प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमात कार्याध्यक्ष विजय चौकेकर यांनी विविध शास्त्रीय प्रयोग सादर करून अंधश्रद्धा कशी निर्माण केली जाते, हे प्रत्यक्ष दाखवून दिले. त्यांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. यावेळी शालेय वाचनालयासाठी काही महत्त्वाची पुस्तकेही भेट देण्यात आली. कवी भाऊसाहेब गोसावी यांनी आपल्या प्रभावी कवितांमधून अंधश्रद्धेविरोधात समाजजागृतीची ठिणगी पेटवली. त्यांच्या ओजस्वी सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळेच धारदार स्वरूप प्राप्त झाले. या कार्यक्रमास हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव, शिक्षिका स्वप्नाली कांबळी, शिक्षक जी. एम. गोसावी, योगेश वराडकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जी. एम. गोसावी यांनी केले, तर आभारप्रदर्शन स्वप्नाली कांबळी यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडून विज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्याची गरज अधोरेखित करत हा उपक्रम समाजासाठी एक दिशादर्शक ठरला.

“अंधश्रद्धेच्या विळख्यात समाज; विज्ञानाचा दिवा पेटवण्याची गरज!” – सिंधुदुर्गात जागृतीची हाक Read More »

konkandhara 2026 05 05T221638.904

अमृतवेल सोशल फाउंडेशनच्या सहभागातून पिंगळसई शाळेचा कायापाल.

डागडुजी व रंगकामाने शाळेला आले नवे रूप कोलाड दि.५ मे (शरद जाधव) ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या पिंगळसई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्थेत असलेल्या या शाळेची नुकतीच अमृतवेल सोशल फाउंडेशनच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली असून,आकर्षक रंगकामामुळे ही शाळा आता खासगी शाळांच्या तोडीस तोड दिसू लागली आहे.शाळेच्या इमारतिचे छतातून पाणी गळन्याची किरकोळ कामे,भिंतींवरील जुना प्लास्टर काढून नवीन सिमेंटचे अस्तर लावून तडे बुजवण्यात आले आणि खिडक्यांची तावदाने फुटणे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या.यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.ही बाब लक्षात घेऊन अमृतवेल सोशल फाउंडेशन यांनी एकत्र येत शाळेच्या नूतनीकरणाचा विडा उचलला.शाळेच्या बाह्य भिंतींना प्रसन्न देणारा पीवळा आणि पांढरा रंग देण्यात आला आहे, तर आतील भिंतींवर अभ्यासाशी संबंधित चित्रे रेखाटण्यात आली आहेत.भिंतीवर सुविचार,सूचना फलक आणि फळ्यांचे रंगकाम असे सर्व काम करून घेण्यात आले.या ‘बोलक्या भिंतींमुळे’ विद्यार्थ्यांना खेळता-खेळता शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. या उपक्रमासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष सौरभ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कमिटी अध्यक्ष सचिन मोरे,शिक्षण विभाग अध्यक्ष सूरज तुळवे यांसह सहकारी वर्गाने श्रमदान आणि आर्थिक मदत केली.”शाळेचे रूप पालटल्यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होईल,”असा विश्वास मुख्याध्यापकांनी व्यक्त केला आहे.तर शाळेला दिलेल्या रंगाचे ध्येय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रंग यावे आणि त्यांनीही भविष्यात सुजाण नागरिक होऊन देशाचे चांगले भविष्य घडवावे असे मत कमिटी अध्यक्ष सचिन मोरे,शिक्षण विभागाचे सूरज तुळवे यांनी व्यक्त केले.या कामांचे सर्वत्र कौतुक होत असून,ही शाळा आता पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे.

अमृतवेल सोशल फाउंडेशनच्या सहभागातून पिंगळसई शाळेचा कायापाल. Read More »

konkandhara 2026 05 05T221240.052

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चमत्कार; चार गरजू महिलांवर ‘थायरॉईड’ची यशस्वी व मोफत शस्त्रक्रिया

रत्नागिरी: प्रतिनिधीशासकीय रुग्णालये ही केवळ गरिबांचा आधार नसून, तिथेही तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात, याचा प्रत्यय रत्नागिरीकरांना आला आहे. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कान-नाक-घसा (ENT) विभागात चार महिलांच्या अत्यंत क्लिष्ट अशा थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया येथे पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या रुग्णांमध्ये श्रीमती प्राची गुरव (गणेशगुळे), श्रीमती जानकी गुप्ता (एमआयडीसी), श्रीमती चंदादेवी शहा (कारवांची वाडी) आणि श्रीमती दिपश्री गोताड (जाकादेवी) यांचा समावेश आहे. या सर्व महिला गेल्या काही महिन्यांपासून गळ्यातील सूज, श्वास घेण्यास त्रास आणि अन्न गिळताना होणाऱ्या अडचणींमुळे त्रस्त होत्या. तपासणीअंती त्यांच्या थायरॉईड ग्रंथीमध्ये मोठ्या गाठी असल्याचे निदान झाले होते. आर्थिक स्थिती बेताची असल्याने महागडे उपचार करणे या कुटुंबांना अशक्य होते, मात्र डॉ. सुनिता बागे यांच्या पुढाकारामुळे त्यांना नवीन आयुष्य मिळाले आहे. ENT विभाग प्रमुख डॉ. सुनिता बागे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जटिल प्रक्रिया पार पडली. या यशस्वी मोहिमेत भूलतज्ज्ञ डॉ. जमशीर शेख, डॉ. प्रियांका साळुंखे, शस्त्रक्रिया विभाग प्रभारी परिसेविका सुमन कोलापते आणि परिचारिका भावना कुलकर्णी यांनी मोलाची भूमिका बजावली. “योग्य वेळी निदान झाल्यास अशा आजारांवर मात करणे शक्य आहे,” असा विश्वास डॉ. बागे यांनी यावेळी व्यक्त केला.वरिष्ठांकडून कौतुकाची थापया उल्लेखनीय कामगिरीबद्दल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. बागे आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “अशा कठीण शस्त्रक्रिया शांतपणे आणि कौशल्याने पार पाडणे हे डॉ. बागे यांच्या वैद्यकीय क्षमतेचे द्योतक आहे. त्यांच्यामुळे रुग्णालयाचा दर्जा आणि रुग्णांचा विश्वास अधिक उंचावला आहे.”तसेच, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाचे आणि सहकार्याचेही डॉ. बागे यांनी आभार मानले. प्रशासकीय पाठबळ आणि आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असल्यामुळेच अशा शस्त्रक्रिया आता रत्नागिरीत स्थानिक पातळीवर शक्य होत आहेत. “आम्ही शस्त्रक्रियेच्या खर्चाला घाबरलो होतो, पण सरकारी रुग्णालयात आम्हाला इतकी चांगली सेवा मिळेल असे वाटले नव्हते,” अशा भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या. या यशस्वी शस्त्रक्रियांमुळे आता रत्नागिरीतील सामान्य रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चमत्कार; चार गरजू महिलांवर ‘थायरॉईड’ची यशस्वी व मोफत शस्त्रक्रिया Read More »

konkandhara 2026 05 05T220040.741

“अधिकाऱ्यांचा बेपत्ता कारभार उघड ; दोडामार्ग पंचायत समितीत सदस्यांचा संताप उसळला !”

दोडामार्ग : भूषण सावंत : पंचायत समितीची मासिक सभा सभापती पार्वती गवस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. मात्र या सभेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विविध विभागांची रखडलेली कामे, वारंवार सूचना देऊनही कोणतीच ठोस हालचाल न झाल्याने सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला. विशेष म्हणजे अनेक महत्त्वाच्या खात्यांचे प्रमुख अधिकारी बैठकीला गैरहजर राहिल्याने संताप आणखी वाढला. “जनतेच्या प्रश्नांकडे इतकी बेफिकिरी का?” असा थेट सवाल करत सदस्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले. रखडलेल्या कामांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना संबंधित अधिकारी मात्र जबाबदारीपासून पळ काढत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या बैठकीत उपसभापती गणेशप्रसाद गवस, सदस्य संजय सातार्डेकर, स्नेहा गवस, सायली निंबाळकर, सोनिया कुबल तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस उपस्थित होते. सदस्यांनी एकमुखाने प्रशासनाला इशारा देत, “यापुढे कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही,” असा ठाम इशारा दिला. सभागृहात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी संबंधित विभाग जागे होणार का, की जनतेचा संताप आणखी भडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“अधिकाऱ्यांचा बेपत्ता कारभार उघड ; दोडामार्ग पंचायत समितीत सदस्यांचा संताप उसळला !” Read More »