दोडामार्ग : भूषण सावंत : अज्ञान आणि भीतीवर आधारलेल्या अंधश्रद्धा आजही समाजाच्या मुळावर घाव घालत असून, आर्थिक व शारीरिक शोषणाला खतपाणी घालत आहेत. काळी जादू, जादूटोणा, भूत-प्रेत, अनिष्ट रूढी यांसारख्या प्रथांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा घातक प्रवृत्तींपासून मुक्त होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, असे ठाम प्रतिपादन डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा २०१३ असूनही पुरेशी जनजागृती न झाल्याने अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या टिकून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मांजर आडवे जाणे, कावळ्याच्या ओरडण्यावरून संकेत काढणे, रात्री नखे कापणे टाळणे, लिंबू-मिरची लटकवणे, नागाला दूध पाजणे किंवा महिलांना मंदिरात मज्जाव करणे यांसारख्या प्रथांवर त्यांनी कठोर टीका केली.
डॉ. रा. धो. खानोलकर मठ येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत अंधश्रद्धेविरोधात जोरदार प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमात कार्याध्यक्ष विजय चौकेकर यांनी विविध शास्त्रीय प्रयोग सादर करून अंधश्रद्धा कशी निर्माण केली जाते, हे प्रत्यक्ष दाखवून दिले. त्यांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. यावेळी शालेय वाचनालयासाठी काही महत्त्वाची पुस्तकेही भेट देण्यात आली.
कवी भाऊसाहेब गोसावी यांनी आपल्या प्रभावी कवितांमधून अंधश्रद्धेविरोधात समाजजागृतीची ठिणगी पेटवली. त्यांच्या ओजस्वी सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळेच धारदार स्वरूप प्राप्त झाले.
या कार्यक्रमास हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव, शिक्षिका स्वप्नाली कांबळी, शिक्षक जी. एम. गोसावी, योगेश वराडकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जी. एम. गोसावी यांनी केले, तर आभारप्रदर्शन स्वप्नाली कांबळी यांनी केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडून विज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्याची गरज अधोरेखित करत हा उपक्रम समाजासाठी एक दिशादर्शक ठरला.















