konkandhara.com

कोकणची बातमी

konkandhara 2026 05 05T011549.468

आंजर्ले-मुर्डीत रस्ते दुरुस्तीसाठी ८ मे रोजी जनआंदोलन; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आक्रमक

दापोली: प्रतिनिधी,आंजर्ले आणि मुर्डी गावातील रस्त्यांची महावितरणच्या कामामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दाद देत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या शुक्रवार, दिनांक ८ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून आंजर्ले खाडी पूल ते वाकडा आंबा परिसरात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे रस्त्यांची चाळण आणि प्रशासनाची उदासीनतामिळालेल्या माहितीनुसार, आंजर्ले आणि मुर्डी गावांमध्ये महावितरणमार्फत भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, हे काम झाल्यानंतर रस्त्यांची डागडुजी न केल्याने रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग (दापोली) आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे ग्रामस्थांनी अनेकदा लेखी तक्रारी केल्या, तसेच तोंडी पाठपुरावाही केला. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.आंदोलनाचा इशाराप्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे. दररोजच्या प्रवासात होणारा त्रास आणि संभाव्य अपघात लक्षात घेता, ‘आता नाही तर कधीच नाही’ असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, दापोली यांना देण्यात आले आहे. आंदोलनाचे तपशील:दिनांक: ८ मे २०२६ (शुक्रवार)वेळ: सकाळी ९:०० वाजल्यापासूनठिकाण: आंजर्ले खाडी पूल ते वाकडा आंबा“आम्ही वारंवार विनंती करूनही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. जोपर्यंत रस्ते दुरुस्तीचे ठोस आश्वासन आणि काम सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भावना अंजली आणि मुरली येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनात भास्कर जोशी, मंगेश महाडिक, शशी पेंडसे, भालचंद्र कोकणे, स्वानंद जोशी, श्रावण दांडेकर, व तसेच दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

आंजर्ले-मुर्डीत रस्ते दुरुस्तीसाठी ८ मे रोजी जनआंदोलन; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आक्रमक Read More »

konkandhara 2026 05 05T011147.876

“४ दिवसांत दोडामार्ग- बांदा मार्गावर खड्डे बुजवा, नाहीतर ऑफिसला टाळे !” – शिवसेनेचे भिवा गवस यांचा इशारा

दोडामार्ग | भूषण सावंत : दोडामार्ग–बांदा राज्य मार्गावरील मणेरी, हेदुस, सासोली आणि कळणे परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आता नागरिकांच्या सहनशक्तीपलीकडे गेली असून, प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मणेरी जिल्हा परिषद विभागप्रमुख भिवा गवस यांनी थेट इशारा देत सार्वजनिक बांधकाम विभागाला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. “येत्या ४ दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय दोडामार्गला टाळे ठोकू!” असा आक्रमक इशारा गवस यांनी दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. 🔥 रस्त्यांची दुरवस्था ; अपघातांचा धोका वाढला मणेरी, हेदुस, सासोली आणि कळणे या मार्गावरील रस्त्यांवर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे खड्डे अधिकच धोकादायक बनले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी लहान-मोठे अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ⚠️ प्रशासनाचे दुर्लक्ष ; जनतेत संताप वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “केवळ आश्वासनांची पोकळ फुंकर देऊन प्रशासन हात झटकत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. 🚫 आंदोलनाचा इशारा भिवा गवस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर चार दिवसांत काम सुरू झाले नाही, तर शिवसेना शैलीत आंदोलन छेडले जाईल. कार्यालयाला टाळे ठोकून प्रशासनाला जागे केले जाईल.” 🛑 जबाबदारी कोणाची ? रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे जीव धोक्यात असताना संबंधित विभाग मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे. आता प्रशासनाने तातडीने जागे होऊन खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले नाही, तर परिस्थिती अधिक चिघळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. 👉 दोडामार्ग-बांदा मार्गावरील हा संताप प्रशासनाला जाग आणणार का, की पुन्हा एकदा आश्वासनांचीच बरसात होणार? असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.

“४ दिवसांत दोडामार्ग- बांदा मार्गावर खड्डे बुजवा, नाहीतर ऑफिसला टाळे !” – शिवसेनेचे भिवा गवस यांचा इशारा Read More »

konkandhara 2026 05 05T010140.646

रोहा तालुक्यात करोडोच्या पाणी योजनांच्या कामांच्या दर्जाबाबत शंका.

इथल्या नेत्यांचेच तालुक्याच्या बाबतीत नियोजन नसल्याने आजही रोहा तहानलेला. कोलाड ४ एप्रिल (शरद जाधव) नागरिकांच्या मूलभूत सोयी मध्ये पाणी हे महत्त्वाचे आहे. भविष्याचा काळात पाणीटंचाई होऊ नये म्हणून अनेक पाणी योजना शासन राबवत असतात. रोहा तालुक्यात अनेक गावागावात करोडच्या पाणी योजना राबविल्या जात आहेत. मात्र योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत असून सत्ताधारी नेत्यांचे आपल्या तालुक्यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे नियोजन नसल्याने आजही रोहा तहानलेलाच अशी खंत व्यक्त होताना दिसत आहे. रोहा तालुक्याला कुंडलिका नदीचे वरदान मिळाले आहे. त्यामुळे नदीतून असंख्य गावांच्या पाणी योजना चालू आहेत. शासनाने प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर पाणी गेले पाहिजे. हे उद्दिष्ट ठेवूनच अनेक पाणी योजना अमलात आणल्या. यामध्ये भारत निर्माण, पायलट योजना ,व सध्या मोदी सरकारच्या काळात सुरू असलेली जल जीवन मिशन योजना . रोहा तालुक्यात प्रत्येक गावात या योजना राबविल्या गेल्या आहेत. परंतु नियोजन नसल्याने आजही रोहा तालुक्यात अनेक गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. गेली अनेक वर्षे इथले नेते सत्ताधारी आहेत. परंतु रोहा तालुक्यात कुठला गाव दाखवा की त्या ठिकाणी खराखुरा शाश्वत विकास पोहोचला आहे .कार्यकर्त्यांना ठेकेदारी चा तुकडा त्यातूनच मतांचे राजकारण आणि सत्ता हेच गणित त्यामुळे गावे सुधारली नाही मात्र साहेबांची परिस्थिती चांगलीच सुधारली. गावात कुठलाही विकास काम असेल बाहेरील ठेकेदार, कोनी कामा बाबतीत बोलायचं नाही. हेच धोरण त्यामुळे निधी आला पण तो वाया गेला. नेत्यांनी फक्त खुर्ची टिकवली परंतु गावागावात बारामती पॅटर्न राबवता आला नाही.आज रोहा तालुक्यातील पाणी योजनेत प्रचंड गोंधळ सुरू आहे. बीड नाशिकचे ठेकेदार चुना लावून गेलेत. अधिकाऱ्यांची फक्त पोपटपंची. कामावर लक्ष नाही. शासनाचा निधी आहे. योजना काही सारख्या सारख्या होत नाहीत .भविष्यात गावाला पाणी मिळणार आहे .याच त्यांना काही नाही. अभियंता गांगुर्डे तर पाणी योजनात गांगारलेलेत वाटते .व्यवस्थित बोलतच नाहीत. तर कुलम अधिकारी हे कुलभूमिकेत. अशा वेळेस स्थानिक आमदार खासदार यांनी लक्ष घालणं गरजेचे आहे. मात्र गावागावात वर्षानुवर्ष मतांची परफेक्ट बांधणी त्यामुळे सत्ता कायम. त्यांना काही फरक पडत नाही त्यामुळे सामान्य नागरिकांचे मात्र भविष्याच्या काळात खूप नुकसान होणार आहे रोहा तालुक्यात कालव्याला पाणी मिळावे. शेती वाचावी याकरता शेतकरी जागृत झाले आहेत. अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येऊन कालव्याला पाणी सुटले. त्यामुळे आपला विकास आता आपणच करायला पाहिजे. याकरता गावातील तरुणांनी, जागरूक नागरिकांनी, गावच्या विकासाकरता पुढे आले पाहिजे. तरच गावचा शाश्वत विकास होईल. अन्यथा येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती राहील. पूगाव ग्रामपंचायत मध्ये नवीन योजना कार्यन्वित झाली. तेव्हापासून दुरुस्तीची कामे. मग योजनेची गुणवत्ता काय. कोलाड सारखे ग्रामपंचायत मध्ये करोडची पाणी योजना सर्वच बट्ट्या बोल , नवीन विहीर कलंडली. मातीचा आधार देऊन उभी. अधिकाऱ्यांकडे चौकशी केली तर काही नाही झाले. खोटे उत्तर. मुळात आपण शासनाची चाकरी कशाला करतो हेच अधिकारी वर्गाला समजत नाही. देवकाने ग्रामपंचायत मध्ये पाणी योजना पूर्ण, मात्र महिला वर्ग आजही डोक्यावर हंडा भरून पाणी नेतात. काय चाललय काय ते समजत नाही? घोसाळे गावात पाणी योजना पूर्ण परंतु भीषण पाणीटंचाई. जलजीवन मिशनमध्ये ठेकेदारांचे पैसे अडकले हे खरे असले तरी मात्र झालेले काम हे निकृष्ट दाजी झाले आहेत. ज्या काही अडीअडचणी असतील त्या अधिकारी वर्गाने गावांना भेटी देऊन सोडवल्या पाहिजे. अन्यथा पाणी योजनांचा पूर्णता बोजवारा व करोडोच्या योजना राबवून रोहा तहानलेल्या राहीलव. इथल्या नेत्यांची सत्तेची तहान भागत राहील परंतु जे वर्षानुवर्ष इमाने इतबारे मतदान करतात त्या तहानलेल्या कोरड्या घशांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

रोहा तालुक्यात करोडोच्या पाणी योजनांच्या कामांच्या दर्जाबाबत शंका. Read More »

konkandhara 2026 05 05T005536.717

रत्नागिरी जिल्ह बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत महत्वाचे निर्णय

मतदार संघात बदल; भागभांडवल वाढवणार रत्‍नागिरी :रत्‍नागिरी जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा पोटनियमांच्‍या दुरुस्‍तीसाठी पार पडली. यात बँकेचे भागभांडवल 75 कोटीवरुन 125 कोटी करण्‍यावर संमती देण्‍यात आली. त्‍याचप्रमाणे बँकेच्‍या संचालक मंडळावर असणार्‍या 21 संचालकांच्‍या जागांमध्‍ये वाढ करताना भविष्‍यात 25 जागा करण्‍यावरही सर्व सभासदांनी संमती दिली असून याबाबत प्रस्‍ताव सहकार खात्‍याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. जिल्‍हा बँकेचे अध्‍यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली विशेष साधारण सभा मराठा मंडळाच्‍या सभागृहात आयोजित करण्‍यात आली होती. 11 वा. या सभेला सुरुवात झाली. सभेच्‍या पटलावर ठेवलेले विषय अवघ्‍या पंधरा मिनिटात सभासदांनी मंजूर केले.शासनाच्‍या सहकार खात्‍याच्‍या नवीन धोरणानुसार बँकेच्‍या पोटनियमांमध्‍ये दुरुस्‍त्‍या सुचवण्‍यात आलेल्‍या आहेत. यानुसार भागभांडवल 75 कोटीवरुन 125 कोटी करण्‍याचा निर्णयावर शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले. याला सभासदांनी मंजुरी दिली. यातील दुसरा महत्‍वाचा बदल म्‍हणजे भविष्‍यात होणार्‍या बँकेच्‍या निवडणुकांमध्‍ये संचालकांच्‍या मतदारसंघात वाढ करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. सद्यस्‍थितीत 21 संचालक असून ही संख्‍या आता 25 करण्‍याबाबत पोटनियमात दुरुस्‍ती करण्‍यात आली. काही मतदार संघ दोन करण्‍याचा निर्णय घैण्‍यात आला आहे. यात सध्‍या कृषि पणन, शेतील माल प्रक्रिया संस्‍था व व्‍यक्‍ती असा जिल्‍हा करिता एक मतदार संघ होता. तो आता कृषि पणन, शेतील माल प्रक्रिया संस्‍था असा एक आणि सर्वसाधारण व व्‍यक्‍ती असा दुसरा मतदार संघ जिल्‍ह्यासाठी केला जाणार आहे.गृहनिर्माण, गृहतारण सहकारी संस्‍था व पगारदार नोकरांच्‍या संस्‍था असा जिल्‍ह्यासाठी एक मतदार संघ होता. यात बदल करुन गृहनिर्माण व गृहतारण सहकारी संस्‍थांसाठी एक आणि पगारदार नोकरांच्‍या संस्‍थांसाठी एक असे संपूर्ण जिल्‍ह्यासाठ दोन मतदार संघ वेगळे केले जाणार आहेत. मजूर संस्‍था, स्‍वयंरोजगार, बेरोजगार व हमाल कामगार सहकारी संस्‍था असा जिल्‍ह्यासाठी एक मतदार संघ होता. त्‍यात बदल करुन मंजूर संस्‍थांसाठी एक आणि स्‍वयंरोजगार, बेरोजगार व हमाल कामगार संस्‍थांसाठी एक असे जिल्‍ह्याकरीता मतदार संघाची मागणी केली जात आहे.औद्योगिक वाहतूक व्‍यवसाय, देखरेख उत्‍पादक सहकारी संस्‍था व मच्‍छीमार सहकारी संस्‍था व अन्‍य सहकारी संस्‍था यांचा जिल्‍ह्यासाठी एक मतदार संघ होता. यात बदल करुन औद्योगिक वाहतूक व्‍यवसाय, देखरेक उत्‍पादक सहकारी संस्‍थांसाठी एक आणि मच्‍छीमार सहकारी संस्‍था व अन्‍य सहकारी संस्‍थांसाठी एक संपूर्ण जिल्‍ह्यासाठी एक मतदार संघ असणार आहे. या पोटनियमांच्‍या दुरुस्‍तीलाही सभासदांनी संमंती दिली. संचालक मंडळाच्‍या निवडणुकीसाठी ज्‍या संस्‍थेतून उमेदवार प्रतिनिधीत्‍व करीत असेल त्‍या संस्‍थेचे बँकेकडे एक लाखाचे भागभांडवल आवश्‍यक आहे. त्‍याचप्रमाणे संस्‍थेचा बँकेशी तीन वर्ष सलग कर्जव्‍यवहार असणे आवश्‍यक आहे. सर्वसाधारण संघातून निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराचे बँकेत एक लाखाच्‍या ठेवी असणे आवश्‍यक आहेत. त्‍याचप्रमाणे निवडणुकीला उभे राहणार्‍या उमेदवारांनी किमान तीन दिवसांचे सहकार प्रशिक्षण मान्‍यता प्राप्‍त संस्‍थेकडून घेतलेले आवश्‍यक ठरणार आहे.सोने-चांदी दागिण्‍यांवर यापूर्वी बँकेत 10 लाखापर्यंत कर्ज दिले जात होते. ती मर्यादा 20 लाखापर्यंत वाढवण्‍याबाबतही संमंती देण्‍यात आली. याबाबत बँकेच्‍या सध्‍याच्‍या पोटनियमात दुरुस्‍ती करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव सहकार खात्‍याकडे मंजुरीसाठी पाठवण्‍यात येणार असल्‍याचे बँकेचे अध्‍यक्ष डॉ. चोरगे यांनी सांगितले. यावेळी सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

रत्नागिरी जिल्ह बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत महत्वाचे निर्णय Read More »

konkandhara 2026 05 05T005052.156

र. ए. सोसायटीला प्रयोगशाळेसाठी एक कोटी रूपये

मंत्री उदय सामंत; अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव रत्नागिरी, ता. ४ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नावीन्यपूर्ण प्रयोगशाळेसाठी (फूड टेस्टिंग लॅब) पुढच्या दोन महिन्यांत एक कोटी रूपये देऊ, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे केली. संस्थेच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सोमवारी सकाळी खातू नाट्यमंदिरात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले की, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होतो तेव्हा रत्नागिरी हे शैक्षणिक हब होण्यासाठी प्रयत्न केले. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी कॉलेज, कौशल्य विकास केंद्र, संस्कृत विद्यापीठ आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. महाराष्ट्रात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था नाही, हे मी अभिमानाने सांगेल. मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी असल्याचे मी गर्वाने सांगतो. संस्थेने शासनासोबत सामंजस्य करार केल्यास कौशल्य विकासाचे नवनवे अभ्यासक्रम चालू करता येतील. संस्थेला त्यासाठी पैसे खर्च करायला लागणार नाहीत. महाविद्यालयाच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याशी संस्थेने संपर्क साधावा, त्यातून संस्थेची दुप्पट प्रगती होईल. हजारो विद्यार्थ्यांनी परदेशात नाव कमावले आहे. हे सर्व विद्यार्थ्यांचे आयडॉल झाले पाहिजेत. तसेच प्रामाणिकपणा माझा आयडॉल आहे, असे विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवावे. आजचा कार्यक्रम भावनिक आहे कारण खातू नाट्यमंदिर व महाविद्यालयासोबत माझ्या आठवणी जाग्या झाल्या. कार्यक्रमात मंचावर नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद जोशी, अॅड. विलास पाटणे, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देसाई, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, देणगीदार प्रतिनिधी आनंद अभ्यंकर आणि निरंजन कुळकर्णी, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक आणि नियामक मंडळ सदस्य मनोज पाटणकर, भरत ओसवाल, डॉ. चंद्रशेखर केळकर, राजन मलुष्टे, प्राची जोशी, जि. प. सदस्य बाबू म्हाप व माजी विद्यार्थी प्रतिनिधी बिपीन बंदरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थापक बाबुराव जोशी व मालतीबाई जोशी यांना अभिवादन करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. इशस्तवन आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये आनंद देसाई म्हणाले की, बाबुराव जोशी व मालतीबाई जोशी यांच्या पुण्याईने संस्था भारतात नावारूपाला येत आहे. २२ घटकसंस्थांचा नावलौकिक वाढत आहे. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. संस्था आता नवीन प्रयोगशाळा चालू करत आहे. यामध्ये अल्प दरामध्ये शेतकरी आंबा बागायतदारांना व व्यावसायिकांना खाद्यपदार्थ चाचणी करण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्याकरिता सामंत यांनी एक कोटी रुपये द्यावेत. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. अॅड. पाटणे यांनी निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र निर्माण करण्याची मागणी पालकमंत्री सामंत यांच्याकडे केली. डॉ. मुकुंद जोशी यांनी मनोगतामध्ये बाबुराव जोशी यांच्या आठवणी सांगितल्या. शिवछत्रपती पुरस्कार विजेती माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या सावंत, नगराध्यक्ष सुर्वे, प्रमुख देणगीदार श्री. कुळकर्णी आणि श्री. अभ्यंकर यांचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या आठवणींच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांनी केले. अध्यक्षीय भाषणात शिल्पाताई पटवर्धन यांनी संस्था दर्जात्मक सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. वैभव कानिटकर यांनी केले. आभार उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी केले. वेदा वाटवे हिने पसायदान सादर केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

र. ए. सोसायटीला प्रयोगशाळेसाठी एक कोटी रूपये Read More »

konkandhara 2026 05 02T172611.675

महाराष्ट्र दिनी दापोलीत ‘जनगणना २०२७’ला भव्य सुरुवात; स्व-गणना ते घरभेटीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया सुरू

दापोली (प्रतिनिधी) – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे ‘जनगणना २०२७’ मोहिमेला आज भव्य सुरुवात होत आहे. राज्यात प्रथमच ही जनगणना पूर्णपणे डिजिटल व नागरिक-केंद्रित पद्धतीने राबवली जात असून, नागरिकांना स्व-गणनेची सुविधा उपलब्ध होत आहे. यावेळी दापोली येथे प्रांताधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना घोलप, नगराध्यक्ष कृपा घाग तसेच सभापती उमेश राजे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पोर्टलवर स्व-गणना करून मोहिमेचा औपचारिक शुभारंभ केला जात आहे. मान्यवरांनी नागरिकांना या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे दरम्यान नागरिकांना मोबाईल अ‍ॅप व ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वतःची माहिती नोंदवता येत आहे. दुसऱ्या टप्प्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत अधिकृत गणकांकडून घरभेटी देत माहिती संकलित केली जाणार आहे. “आपला सहभाग म्हणजे देशाच्या भविष्यासाठी योगदान” हा संदेश देत प्रशासनाकडून व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. डिजिटल सुविधा, QR कोड व सोपी नोंदणी प्रक्रिया यामुळे जनगणना अधिक सुलभ व पारदर्शक होत आहे.तहसीलदार कार्यालय, दापोली यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अचूक व प्रामाणिक माहिती देऊन या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे. जनगणना ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचे भक्कम आधारस्तंभ असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र दिनी दापोलीत ‘जनगणना २०२७’ला भव्य सुरुवात; स्व-गणना ते घरभेटीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया सुरू Read More »

konkandhara 2026 05 02T171949.520

हवामान बदलाचा महासमुद्र आणि कोकणच्या अर्थकारणांची धगधगती चिंता

योगेश बांगरडे कोकणाच्या मातीतील नैसर्गिक मुबलकतेने जे वरदान दिले आहे, ते केवळ डोळ्यांना सुखावणारे सौंदर्य नाही, तर तेथल्या लाखो कुटुंबांच्या जगण्याचे साधन आहे. पण गेल्या काही वर्षांत वातावरणात झालेल्या बदलांचा थेट परिणाम कोकणातील पारंपरिक अर्थकारणावर होताना दिसतो आहे. हापूस आंबा, काजू आणि नारळ यांसारख्या पिकांवर कोकणाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. परंतु बदलत्या हवामानामुळे या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत असून शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षांत तापमानात झालेली वाढ, पावसाच्या पॅटर्नमधील बदल, तसेच अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. विशेषतः आंबा आणि काजूच्या फुलोऱ्यावर तापमानातील चढ-उतारांचा मोठा परिणाम होत असून उत्पादन घटण्याची शक्यता वाढली आहे. कोकणातील कृषी अर्थव्यवस्थेचे केंद्रबिंदू असलेला हापूस आंबा हा केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणावर मागणी असलेला उत्पादन आहे. मात्र, हवामान बदलामुळे त्याच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर परिणाम होत आहे. याशिवाय, किनारपट्टीवरील मत्स्य व्यवसायावरही हवामान बदलाचा परिणाम दिसून येत आहे. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे माशांच्या स्थलांतराच्या पॅटर्नमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे मच्छीमारांना अपेक्षित प्रमाणात मासेमारी मिळत नाही. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढत आहे, ज्यामुळे जलसाठ्यांवर परिणाम होत आहे. याचा थेट परिणाम शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेवर होत आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील अर्थकारणावर गंभीर परिणाम होत असून यासाठी योग्य नियोजन आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बदलत्या परिस्थितीला सामोरे जाणे गरजेचे आहे. तसेच शासनानेही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा आणि मदत पुरवणे गरजेचे आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील संकट टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा, कोकणच्या अर्थव्यवस्थेवर याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.

हवामान बदलाचा महासमुद्र आणि कोकणच्या अर्थकारणांची धगधगती चिंता Read More »

konkandhara 2026 05 02T170002.044

रोहा नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्याकडून भर उन्हात नालेसफाईची पाहणी.

कोलाड २मे (शरद जाधव) मे महिना बघता बघता संपेल आणि मान्सूनला सुरुवात होईल त्याआधीच रोहा नगरपालिकेने नालेसफाई ची मोहीम हाती घेतली असून स्वतः नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी भर उन्हात नाले सफाईची पाहणी केली. केवल थातुर माथूर कामे चालणार नाहीत. असा इशारा ठेकेदारांना वनश्री शेडगे यांनी दिला असल्याचे बोलले जाते. रोहा शहराच्या एका बाजूला डोंगर असल्याने अचानक पावसाळ्यात कधीतरी डोंगराचे पाणी रोहे शहरात घुसते. रोहे शहराला पुराच्या पाण्याचा तडाका बसतो. जर पावसाळ्यापूर्वी उघडे गटारे नाले यांची साफसफाई झाली. तर पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. याकरता वनश्री शेडगे यांनी कार्यतत्परता दाखवत. पावसाळ्यात रोहेकरांना पाण्याचा त्रास होऊ नये याकरता लवकरच नाले सफाईची मोहीम हाती घेतली आहे.केवल नालेसफाई थातूरमातूर न होता चांगली झाली पाहिजे याकरता भर उन्हात त्या स्वतः नालेसफाईची कामाची पाहणी करत होत्या यावेळी नगरसेवक महेश दादा कोलटकर समाधान शिंदे अन्य नगरसेवक सभापती उपस्थित होते. वनश्री शेडगे या उच्चशिक्षित आहेत आर्किटेक इंजिनियर आहेत अभ्यासू आहेत .कमी वयात प्रभावी बोलतात. त्यामुळे शहराचा कायापालट त्या निश्चित करतील. रोहे शहराला निधी आणण्याकरता खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे. अनिकेत तटकरे यांचे सहकार्य त्यांना मिळत आहे. स्वतः वनश्री शेडगे त्यांचे सर्व नगरसेवक व त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे हे सर्व रोहे शहरातील नागरिकांनाभेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्न सोडवण्या करता सज्ज झाले आहेत.

रोहा नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्याकडून भर उन्हात नालेसफाईची पाहणी. Read More »

konkandhara 2026 05 01T225517.056

कोकणातील परीट (धोबी)मडवळ समाजाचा राज्यस्तरीय मेळावा ३ मे रोजी रोह्यात

कोलाड दिनांक १ एप्रिल ( शरद जाधव) महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी) मंडळ समाज संघ यांच्या वतीने कोकणाचा १ ला भव्य मेळावा (राज्यस्तरीय) आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता रोहा येथील डॉ. सि. डि. देशमुख शहर सभागृह, रोहा नगरपरिषद समोर, मु. पो. रोहा, जि. रायगड येथे पार पडणार आहे. समाज संघटनेच्या बळकटीसाठी, विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तसेच कोकणातील परीट समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. शांताराम (भाऊ) सहदेव कदम भूषविणार असून ते महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी) मंडळ समाज संघाचे अध्यक्ष आहेत. तसेच कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मेळाव्याद्वारे समाजातील शिक्षण, रोजगार, सामाजिक ऐक्य, युवकांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या सहभागाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच विविध तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली आहे. मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कोकण खजिनदार नंदकिशोर राक्षे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र कान्हेकर, रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक कदम व संघटक संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणातील परीट (धोबी)मडवळ समाजाचा राज्यस्तरीय मेळावा ३ मे रोजी रोह्यात Read More »

konkandhara 2026 05 01T223925.706

गोवा दारुच्या तस्करी विरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण :

१ मे महाराष्ट्र दिनी रत्नागिरी जिल्ह्यातील परमिट रूम परवानाधारक आणि सरकारमान्य देशी मद्य विक्री परवानाधारक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जयस्तंभ येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.५४ वर्षे व्यवसाय करून शासनाला महसूल मिळवून देत असताना गेली ५ वर्षे गोवा बनावटीच्या बोगस दारू तस्करी मुळे शासकीय महसूल पूर्णपणे बुडाला आहे. लायसन्स फी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सरकारी परवानाधारक अडचणीत सापडले आहेत. पूर्वी महाराष्ट्र सरकारचा रोड टॅक्स गोव्याच्या रोड टॅक्स पेक्षा कितीतरी पट अधिक असल्यामुळे महाराष्ट्रातील लोकं गोव्यातून गाड्या खरेदी करत होते हे महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आल्यावर महाराष्ट्र शासनाने गोव्याच्या धर्तीवर रोड टॅक्स केल्यावर गोव्यातून गाडी खरेदी बंद झाली आणि महाराष्ट्रातून गाड्या खरेदी वाढली. पर्यायाने महाराष्ट्राचा महसूल वाढला. तोच निकष अबकारी करावर लावल्यास महाराष्ट्रlचा राज्य उत्पादन शुल्क कर पाच पटीने वाढेल. ४० हजार कोटी मिळणारा उत्पादन शुल्क व व्हॅट महसूल दिड लाख कोटी वर जाईल. शासनाच्या विविध रखडलेल्या लाडकी बहीण सारख्या योजना, रखडलेली पेन्शन, ठेकेदारांची रखडलेली बिले गोवा दारू बंदी मुळे सुरळीत होऊ शकतात.महाराष्ट्रात २१०/- रु मध्ये मिळणारी व्हिस्कीची क्वार्टर गोव्यात ३०/- रु मध्ये मिळते. अनेक शाळांमधील विद्यार्थी खाऊला दिलेले पैसे एकत्र करून गोव्याची दारू पीत आहेत आणि आपले जीवन अंधःकारमय करत आहे. शाळांच्या जवळ मिळणाऱ्या गोव्याच्या दारू विरोधात मुख्याध्यापक तक्रार देत आहेत. तरीही प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. परवानाधारकांनी आपल्या मागण्या मांडताना अवैध गोवा दारू विक्रीवर पोलीस खाते, एक्सlईज, पोलीस पाटील, महिला बचत गट, होमगार्ड यांची संयुक्त कारवाई करून ज्या जागेत गोवा दारूचा साठा मिळेल त्या जागेच्या मालकावर गुन्हा दाखल करावा. ज्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात अवैध गोवा दारू विक्री आढलेल त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं. अवैध गोवा दारू विक्रीत्यांचे आयकर विवरण पत्रावरील माहिती वरुन उत्पन्न बाह्य संप्पतीची चौकशी करून मलमत्ता जप्त करण्यात यावी तसेच अवैध गोवा दारू विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक, रा उ शु अधीक्षक, जिल्हापरिषद सीईओ आणि सरकारमान्य मद्य विक्री संघटना प्रतिनिधी यांची कमिटी स्थापन करून दर महिना बैठक आयोजीत करून आढावा घेण्यात यावा. राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन गोवा अवैध दारुवर कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले यावेळी उपोषणकर्त्यांमध्ये जयेंद्र कोठारकर, अनिश भाटकर राजापूर संतोष जंगम चिपळूण, स्वप्नील आंबोलकर साटवली, राजीव कीर रत्नागिरी, सुहास भोसले चिपळूण, विजय कदम चिपळूण, समीर तिवरेकर रत्नागिरी, सुदीप चव्हाण गुहागर, सचिन वाघधरे लांजा, प्रशांत पवार राजापूर, प्रशांत रमेश शिंदे राजापूर, विनय गुरव राजापूर, सचिन आखाडे जैतापूर, सतीश घाडी जैतापूर, सनी करंगुटकर जैतापूर, रविंद्र गुरव आडीवरे, संजय ओगले राजापूर, संजय काणेकर राजापूर आदी उपस्थित होते

गोवा दारुच्या तस्करी विरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण : Read More »