सिंधुदुर्ग : भूषण सावंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ६० पेट्रोलपंपांपैकी ८ पेट्रोलपंपांवर इंधन उपलब्धतेसंदर्भात अडचणी निर्माण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ६ पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांचा तात्पुरता तुटवडा आहे. तसेच २ पेट्रोलपंपांपैकी एका पंपावर केवळ पेट्रोल उपलब्ध असून डिझेल उपलब्ध नाही, तर दुसऱ्या पंपावर डिझेल उपलब्ध असून पेट्रोल उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ड्राय असलेल्या पेट्रोलपंपांचे टँकर लोड करण्यात आले असून उद्यापर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल, अशी माहिती कंपन्यांचे विक्रय प्रतिनिधी आणि डेपो व्यवस्थापकांनी प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी इंधनासंदर्भात भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उर्वरित बहुतांश पेट्रोलपंप सुरळीत सुरू असून संबंधित कंपन्यांच्या पुरवठ्यानुसार आणि डेपोमधील मागणीनुसार इंधन वितरण सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून इंधनाचा अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने Hindustan Petroleum (HPCL), Indian Oil Corporation (IOCL) आणि Bharat Petroleum (BPCL) या कंपन्यांच्या डेपो व्यवस्थापक आणि विक्री प्रतिनिधींशी सातत्याने संपर्क ठेवला आहे.
याशिवाय, कृत्रिम दरवाढ किंवा इंधन साठेबाजीचे प्रकार रोखण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथके सक्रिय करण्यात आली आहेत. पेट्रोलपंपांची तपासणी आणि छापे टाकण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.















