सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला नोटीस; आमदार-खासदारांच्या राजीनाम्यांद्वारे अपात्रता टाळण्याच्या प्रकारावर प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली : देशातील राजकीय पक्षांतर, आमदार-खासदारांचे राजीनामे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सत्तांतराच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. या मागणीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, भारतीय निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला नोटीस बजावली असून, या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
गेल्या काही वर्षांत देशाच्या राजकारणात पक्षफुटी आणि सत्तांतराच्या अनेक घडामोडी घडल्या आहेत. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींमधून पळवाट काढत काही लोकप्रतिनिधींनी स्वतंत्र गट स्थापन करणे, मूळ पक्षावर दावा सांगणे किंवा राजीनाम्याचा मार्ग स्वीकारून अपात्रतेची कारवाई टाळण्याचे प्रकार समोर आले आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आणि त्यातील त्रुटींबाबत देशभरात चर्चा झाली होती. याच पार्श्वभूमीवर पक्षांतरबंदी कायद्याचा मूळ उद्देश प्रभावीपणे साध्य व्हावा आणि लोकप्रतिनिधींना कायद्यातील पळवाटांचा वापर करता येऊ नये, यासाठी व्यापक सुधारणा करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
ए. सेथू यांनी ही जनहित याचिका दाखल केली असून, याचिकाकर्त्यांच्या वतीने आर. सतीश कुमार आणि जतीन यांनी न्यायालयात बाजू मांडली. याचिकेत उपस्थित करण्यात आलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, एखाद्या आमदार किंवा खासदाराविरोधात पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेची तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींकडून निर्णय होण्यापूर्वीच राजीनामा देतात. त्यानंतर दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करून पुन्हा निवडणूक लढविण्याचा मार्ग स्वीकारला जातो. अशा प्रकारे राजीनाम्याचा वापर अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी केला जात असल्यास पक्षांतरबंदी कायद्याचा मूळ हेतूच निष्प्रभ ठरू शकतो, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे.
राजीनाम्याच्या प्रक्रियेवर नियंत्रणाची मागणी
याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीविरोधात अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना त्याने राजीनामा दिल्यास केवळ त्या राजीनाम्यामुळे अपात्रतेची प्रक्रिया आपोआप संपुष्टात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित लोकप्रतिनिधीने दिलेला राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला आहे की त्यामागे राजकीय दबाव अथवा काही राजकीय लाभ मिळविण्याचा हेतू आहे, याचीही तपासणी व्हावी, असे याचिकेत म्हटले आहे.
याशिवाय राजीनामा आणि अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर निश्चित कालमर्यादेत निर्णय घेण्याची व्यवस्था असावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती यांच्याकडे असलेल्या अपात्रतेच्या निर्णयप्रक्रियेचे संस्थात्मक पुनरावलोकन करण्याची गरजही याचिकाकर्त्यांनी अधोरेखित केली आहे. लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय अनिश्चित काळ प्रलंबित राहिल्यास त्याचा राजकीय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रक्रियेला अधिक निश्चित आणि परिणामकारक स्वरूप देण्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.
बहुमत चाचणीच्या प्रक्रियेवरही प्रश्न
पक्षांतरबंदी कायद्यातील सुधारणांबरोबरच त्रिशंकू विधानसभेच्या परिस्थितीत सरकार स्थापनेच्या प्रक्रियेबाबतही याचिकेत महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. केवळ सभागृहाबाहेर सादर केलेली समर्थनपत्रे किंवा शक्तिप्रदर्शनाच्या आधारे सरकार स्थापनेचा दावा मान्य करू नये, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी पूर्ण होऊन विधिवत सभागृह स्थापन झाल्यानंतरच बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी संविधानातील अनुच्छेद १८८ चा संदर्भ देण्यात आला आहे.
या याचिकेमुळे देशातील पक्षांतरबंदी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आणि त्यातील संभाव्य त्रुटींबाबत पुन्हा एकदा घटनात्मक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला नोटीस बजावली असली, तरी याचिकेतील मागण्यांवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. संबंधित संस्थांची भूमिका आणि पुढील सुनावणीत न्यायालय काय निरीक्षण नोंदवते, याकडे राजकीय तसेच घटनात्मक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील अलीकडील पक्षफुटी आणि सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.















