शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका; पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन एकत्र लढल्यास आंदोलनाची ताकद वाढेल
सातारा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातूनच विरोध होत असल्याच्या चर्चांना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. रोहित पवार यांच्या आंदोलनाला पक्षाचा कोणताही विरोध नसून, त्यांनी पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन सामूहिकरीत्या आंदोलन केल्यास त्याची ताकद अधिक वाढेल, अशी स्पष्ट भूमिका शिंदे यांनी मांडली. सातारा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षातील कथित मतभेदांच्या चर्चांचे खंडन करत रोहित पवार यांच्या आंदोलनाला पक्षातील सर्व नेत्यांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
रोहित पवार यांच्या शेतकरी आंदोलनाबाबत पक्षातील नेत्यांना विरोध करण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. २६ तारखेच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत दिलेल्या निरोपाचा काही जणांनी वेगळाच अर्थ काढला आणि त्यातून गैरसमज निर्माण झाले, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. या संदर्भातील चर्चांमध्ये ‘ध चा मा’ करण्यात आल्याचे नमूद करत त्यांनी पक्षांतर्गत विरोधाच्या बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट केले.
यापूर्वी रोहित पवार यांनी नाशिकसह राज्यातील विविध ठिकाणी आंदोलने केली, तेव्हा स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील प्रमुख नेते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते, याची आठवणही शिंदे यांनी करून दिली. त्यामुळे सध्याच्या आंदोलनाबाबत पक्षात विरोधाची भूमिका असल्याचे चित्र योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
हा शरद पवारांचा पक्ष असून पक्षाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय सामूहिक चर्चेतूनच घेतले गेले पाहिजेत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. सध्या रोहित पवार यांचा ट्रॅक्टर मोर्चा दुष्काळ आणि टँकरच्या प्रश्नांवर केंद्रित असला, तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांचाही त्यामध्ये समावेश केल्यास आंदोलनाची व्याप्ती आणि तीव्रता वाढू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. रोहित पवार यांनी शरद पवार आणि पक्षातील अन्य नेत्यांशी चर्चा करून पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन मोर्चा काढल्यास पक्षाचे सर्व नेते शंभर टक्के त्यांच्या सोबत आंदोलनात उतरतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पक्षाच्या मान्यतेने आणि परस्पर चर्चेतून पक्षाच्या चिन्हावर आंदोलन करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, पक्षाचे चिन्ह न वापरता स्वतंत्रपणे आंदोलन करण्याचा निर्णय रोहित पवार यांचा वैयक्तिक असल्याचेही त्यांनी नमूद केले. यापूर्वी मुख्यमंत्री किंवा अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात रोहित पवार यांनी काही भूमिका स्वतंत्रपणे मांडल्या होत्या. त्यांना वैयक्तिक पातळीवर काम करण्याचे स्वातंत्र्य असून त्यांच्यावर पक्षाच्या भूमिकेचे बंधन असू नये, असेही शिंदे म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारकडून आंदोलनासंदर्भात चर्चेचे निमंत्रण आले असल्यास रोहित पवार यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असा सल्लाही शशिकांत शिंदे यांनी दिला. आंदोलनासंदर्भातील समितीचे प्रमुख म्हणून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चेसाठी निमंत्रित केले असेल, तर सरकारशी संवाद साधण्यात काहीही गैर नाही. रोहित पवार यांनी बैठकीला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडाव्यात. सरकारने या मागण्यांच्या पूर्ततेबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास आंदोलनाच्या पुढील भूमिकेचा फेरविचार करावा, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाची धार कायम ठेवण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न असताना, दुसरीकडे पक्षाच्या सामूहिक सहभागातून आंदोलन अधिक व्यापक करण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मांडली आहे. त्यामुळे आगामी काळात रोहित पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व यांच्यात यासंदर्भात काय चर्चा होते, तसेच ट्रॅक्टर मोर्चाला पक्षाचे अधिकृत स्वरूप मिळते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















