कोलाड २६ मे (शरद जाधव)
कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणारे दीपक फाउंडेशन आणि येथील शेतकरी व तरुण वर्ग यांच्या सहकार्यातून निवी गाव परिसरात पाणलोट बंधारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात निवी गाव आणि परिसर पाणीदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
रोहा तालुक्याला बारामाही वाहणाऱ्या कुंडलिका नदीचे वरदान लाभले असले तरी येथील सत्ताधारी राजकारण्यांच्या मानसिकतेमुळे पाण्याचे नियोजन झाले नसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. शेतकरी वर्गाचे हित जपण्यापेक्षा तालुक्यातील ग्रामपंचायतींवर पकड कशी राहील यावरच अधिक भर दिला गेल्याने रोहा तालुक्यातील शेती ओस पडली आणि विकली गेली. मात्र नेत्यांच्या बागायती हजारो झाडांनी फुलल्याचे चित्र असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
रोहा तालुक्यात विशेषतः लांढर, निवी आणि बोरघर परिसरातील तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांचे पाणी नसल्याने डोळे उघडले. त्यांनी कालव्याच्या पाण्यासाठी बळीराजा संघटनेच्या माध्यमातून लढा दिला. त्यातून काही प्रमाणात यश मिळाले आणि पाणी सुरू झाले.
रोहा तालुक्याच्या हरितक्रांतीच्या विकासाला गती मिळण्यासाठी येथील शेतकरी जागा होणे आवश्यक असल्याचेही स्थानिकांकडून सांगितले जात आहे. निवी परिसरात “पाणी आडवा, पाणी जिरवा” या संकल्पनेतून डोंगरातील पाणी अडवण्याचे काम केले जाणार आहे. दीपक फाउंडेशन आणि स्थानिकांच्या सहकार्यातून पाच बंधाऱ्यांची निर्मिती केली जाणार आहे.
या उपक्रमामुळे परिसर पाणीदार होणार असून, रोहा तालुक्यातील तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा आदर्श घेऊन आपल्या परिसरातही अशा प्रकारचे बंधारे उभारावेत, अशी मागणी होत आहे.
परिसर सुजलाम-सुफलाम व्हावा आणि या पाणीस्त्रोताचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा, हा पाणलोट बंधारे उभारण्यामागील उद्देश असल्याची माहिती दीपक फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक अनिकेत निकम यांनी दिली.















