रत्नागिरी: प्रतिनिधी
शासकीय रुग्णालये ही केवळ गरिबांचा आधार नसून, तिथेही तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात, याचा प्रत्यय रत्नागिरीकरांना आला आहे. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कान-नाक-घसा (ENT) विभागात चार महिलांच्या अत्यंत क्लिष्ट अशा थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया येथे पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत.
या शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या रुग्णांमध्ये श्रीमती प्राची गुरव (गणेशगुळे), श्रीमती जानकी गुप्ता (एमआयडीसी), श्रीमती चंदादेवी शहा (कारवांची वाडी) आणि श्रीमती दिपश्री गोताड (जाकादेवी) यांचा समावेश आहे. या सर्व महिला गेल्या काही महिन्यांपासून गळ्यातील सूज, श्वास घेण्यास त्रास आणि अन्न गिळताना होणाऱ्या अडचणींमुळे त्रस्त होत्या. तपासणीअंती त्यांच्या थायरॉईड ग्रंथीमध्ये मोठ्या गाठी असल्याचे निदान झाले होते. आर्थिक स्थिती बेताची असल्याने महागडे उपचार करणे या कुटुंबांना अशक्य होते, मात्र डॉ. सुनिता बागे यांच्या पुढाकारामुळे त्यांना नवीन आयुष्य मिळाले आहे.
ENT विभाग प्रमुख डॉ. सुनिता बागे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जटिल प्रक्रिया पार पडली. या यशस्वी मोहिमेत भूलतज्ज्ञ डॉ. जमशीर शेख, डॉ. प्रियांका साळुंखे, शस्त्रक्रिया विभाग प्रभारी परिसेविका सुमन कोलापते आणि परिचारिका भावना कुलकर्णी यांनी मोलाची भूमिका बजावली. “योग्य वेळी निदान झाल्यास अशा आजारांवर मात करणे शक्य आहे,” असा विश्वास डॉ. बागे यांनी यावेळी व्यक्त केला.
वरिष्ठांकडून कौतुकाची थाप
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. बागे आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “अशा कठीण शस्त्रक्रिया शांतपणे आणि कौशल्याने पार पाडणे हे डॉ. बागे यांच्या वैद्यकीय क्षमतेचे द्योतक आहे. त्यांच्यामुळे रुग्णालयाचा दर्जा आणि रुग्णांचा विश्वास अधिक उंचावला आहे.”
तसेच, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाचे आणि सहकार्याचेही डॉ. बागे यांनी आभार मानले. प्रशासकीय पाठबळ आणि आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असल्यामुळेच अशा शस्त्रक्रिया आता रत्नागिरीत स्थानिक पातळीवर शक्य होत आहेत.
“आम्ही शस्त्रक्रियेच्या खर्चाला घाबरलो होतो, पण सरकारी रुग्णालयात आम्हाला इतकी चांगली सेवा मिळेल असे वाटले नव्हते,” अशा भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या. या यशस्वी शस्त्रक्रियांमुळे आता रत्नागिरीतील सामान्य रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.















