konkandhara.com

कोकणची बातमी

konkandhara 2026 05 10T201135.139

रोहे शहरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी येणार. फुलांचे शहर बनवण्यासाठी नगरपालिकेची धावपळ.

कोलाड १० मे (शरद जाधव) रोहे शहरांमध्ये सुमारे पंधरा कोटीच्या विकास कामांच्या निधीच्या भूमिपूजन सोहळ्याकरता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार येणार आहेत. त्यामुळे रोहे शहराच्या मुख्य रस्त्यावर फुलांची झाडे लावून. रोहा फुलांचे शहर बनवण्याकरता नगरपालिकेची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. दिवंगत लोकनेते अजित दादा पवार रोह्यात वारंवार विकास कामांच्या सोहळ्या करता येत असत. परंतु त्यांना रोहे शहर हे झाडा फुलांचे शहर कधी दिसले नाही. आणि आता सुनेत्रा वहिनी पहिल्यांदाच रोहे शहरात विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी येत असल्याने फुलांच्या झाडामुळे थोडाफार का होईना बारामती लुक त्यांना वाटला पाहिजे याकरता रोहा नगरपालिकेची झाडे लावण्याकरता धावपळ उडाली असल्याचे. दिसून येते. रोहा नगरपालिकेवर वनश्री शेडगे नगराध्यक्षपदी विराजमान होताच विकास कामांना सुरुवात झाली आहे. रोहे शहरातील काही प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न होत आहे. शहराच्या सांडपाण्याने कुंडलिका प्रदूषित होते असा आवाज संघर्ष समिती दिलीप वडके यांनी उठविला होता. याची दखल घेत नदीचे संवर्धन करण्याकरता खूप मोठा निधी सुनील तटकरे यांनी आणला आहे. आज ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके यांच्यासारखी चळवळीतली माणसे समाजात काम करीत असल्याने लोकप्रतिनिधी व सत्ताधाऱ्यांवर अंकुश आहे. उद्या सुनेत्रा वहिनी येणार म्हणून घाई घाईत झाडे लावण्याची गरज नव्हती. लावत असलेली झाडे ही येणाऱ्या पाहुण्यांना दाखवण्यासाठी लावण्यात येत आहेत अशी शंका रोहेकर व्यक्त करीत आहेत. आजच्या दिवसात झाडे सर्व लावली जातील व निश्चितच फुलांचे शहर म्हणून सुमित्रा वहिनींना आनंद वाटेल परंतु आता लावलेली झाडे जगवण्याचे काम रोहा नगरपालिकेने प्रामाणिक करावे. नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांचे रोहे शहरातील विविध विकास कामांवर जातीने लक्ष असल्याने त्या निश्चित फुलांचे शहर म्हणून ही झाडे जगवतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला.

रोहे शहरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी येणार. फुलांचे शहर बनवण्यासाठी नगरपालिकेची धावपळ. Read More »

konkandhara 2026 05 09T231406.170

चारही बाजूंनी पाणी असलेल्या पाणखोल जुवा बेटावर पोहचले महसूल प्रशासन स्व-गणनेत गावाने घडवला आदर्श !

सर्व कुटुंबांची स्व-गणना पूर्ण; महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून मोहिमेला अभूतपूर्व यश सिंधुदुर्ग : भूषण सावंत चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरणाऱ्या मालवण तालुक्यातील जुवा पाणखोल गावाने स्व-गणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रशासनासमोर आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, बेटासारख्या दुर्गम भागात प्रत्यक्ष पोहोचून महसूल प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील सर्व कुटुंबांची स्व-गणना यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून हे प्रेरणादायी यश साकार झाले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात स्व-गणना मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी स्वतःहून डिजिटल माध्यमातून आपली माहिती ऑनलाइन नोंदवावी, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. जुवा गावातील ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोहिमेला सकारात्मक साथ दिली.जुवा गावात एकूण २७ घरे असून ३२ कुटुंबे वास्तव्यास आहेत. गावाची एकूण लोकसंख्या ११९ इतकी आहे. या सर्व कुटुंबांनी स्व-गणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत तालुक्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी मोहिमेचे नियोजन काटेकोरपणे करत प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात प्रभावी समन्वय साधला. बेटावरील नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांना स्व-गणनेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि मदतही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि संपूर्ण गावाने निर्धारित कालावधीत स्व-गणना पूर्ण केली. शासनाच्या निर्देशानुसार दि. १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना ही माहिती se.census.gov.in या संकेतस्थळावर भरता येत असल्याची माहिती तहसीलदार श्री. लव्हे यांनी दिली. या मोहिमेत कोळंब मंडळ अधिकारी मिनल चव्हाण, सर्व ग्राम महसूल अधिकारी, सरपंच तसेच पोलिस पाटील यांनी सक्रिय सहकार्य केले.

चारही बाजूंनी पाणी असलेल्या पाणखोल जुवा बेटावर पोहचले महसूल प्रशासन स्व-गणनेत गावाने घडवला आदर्श ! Read More »

konkandhara 2026 05 09T230356.826

रोहा तांबडी रस्त्याबाबत आमदार खासदारांची उदासीनता.प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास.

कोलाड ९ मे (शरद जाधव) रोहा तांबडी रस्त्याला साईट पट्टीच नाहीत. रस्ता अरुंद व खराब याकडे सार्वजनिक बांधकाम खाते कित्येक वर्ष डोळेझाक करीत आहे. मात्र येथील आमदार खासदार या रस्त्याबाबत उदासीन असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने. परिसरातील नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. रोहा तांबडी रस्त्याला प्रचंड वर्दळ असते. या रस्त्याला लागून अनेक फार्म हाऊस आहेत. पुढे याच रस्त्याने प्रवास होतो त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो .परंतु गेले कित्येक वर्ष या रस्त्याची परिस्थिती इतकी भयानक आहे .की कधीही या ठिकाणी अपघात होऊ शकतो. मुळात रस्ता खराब व अरुंद आणि त्यातच साईट पट्ट्या नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या मोठ्या गाड्या पास होत नाहीत. आणि अशावेळी मोटर सायकल चालवणाऱ्या व्यक्तीला कसरत करावी लागते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडले आहेत. परंतु या रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही. खराब रस्त्याचा त्रास मात्र सामान्य माणसाला होत आहे. गरीब माणूस नोकरीसाठी, खरेदीसाठी, शालेय विद्यार्थी ,याच रस्त्यावरून प्रवास करतात अपघात झाला तर जीव गरीबाचा जातो श्रीवर्धन मतदारसंघातला हा रस्ता आहे .मंत्री आदिती तटकरे त्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. मग यांचे विकासाचे कोट्यावधीची आकडे पाहता हा रस्ता का होत नाही. हा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे. काही दिवसापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर नजीक मंत्री महोदया ट्रॅफिक मध्ये अडकल्या होत्या. प्रचंड वैतागल्या. गाड्या फेकून टाका ही भाषा. मग गेली सतरा वर्ष रस्ता होत नाही प्रवाशांचे काय हाल होत असतील याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे. रोहा तांबडी रस्ता करता येत नाही. की आमदार खासदार जाणून बुजून दुर्लक्ष करतात. हा प्रश्न सामान्य ना पडला आहे. विकास केला नाही तरी पाच वर्षांनी प्रचंड मताधिक्य मिळते हेच फावत. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा वाली कोण राहिला नाही. हेच या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेवरून दिसून येत आहे.

रोहा तांबडी रस्त्याबाबत आमदार खासदारांची उदासीनता.प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास. Read More »

konkandhara 2026 05 09T225539.963

जामगाव हद्दीत बेसुमार माती उत्खनन. महसूल खात्याचे दुर्लक्ष

कोलाड ९ मे (शरद जाधव) रोहा तालुक्यातील जामगाव हद्दीत बेसुमार माती मुरूम चे उत्खन करण्यात आल्याची धक्का दायक बाब उघडकिस आली आहे. मात्र सदर झालेल्या उत्खननांमध्ये महसूल खात्याचे दुर्लक्ष झाले असल्याची चर्चा सुतारवाडी नाक्यावर सुरू आहे. जामगाव पहूर भाला परिसरात मुंबई दिल्ली कॉरिडॉर दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र याकरता शेतकरी वर्गाच्या जमिनी गेल्या आहेत. एमआयडीसी जमिनी घेत आहे. आपल्याला काही मिळणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने जमिनी विकल्या. परंतु त्यानंतर ज्या वर्गाने जमिनी घेतल्या त्या धनदांडग्यांना 18 लाख रुपये एकरी भाव मिळाला. याचा फायदा फार कमी शेतकऱ्यांना झाला. दिल्ली कॉरिडोर साठी गेलेल्या जमिनीतून जामगाव येथे बेसुमार उत्खनन झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिक यांनी पत्रकारांना दिली. तर सदर उत्खनना कडे संबंधित महसूल खात्याने दुर्लक्ष केले असल्याची चर्चा आहे. एकंदरीत प्रकरण काय याचा खुलासा अधिकारी वर्गाने करावा व खरोखरच माती चोरी झाले असेल तर संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जामगाव हद्दीत बेसुमार माती उत्खनन. महसूल खात्याचे दुर्लक्ष Read More »

konkandhara 2026 05 09T225019.327

कामगारांसाठी पाकळे फाऊंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

आमदार चषक 2026 मध्ये 300 कूपनचा लकी ड्रॉ; कंपनीला लागलेली मोटारसायकल कामगारांना अर्पणचिपळूण :संदिप घागशेखर निकम प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2026 स्पर्धेनिमित्त उद्योगपती सचिन पाकळे यांनी 300 कूपन खरेदी करून लकी ड्रॉमध्ये सहभाग घेतला होता. या सोडतीत त्यांच्या कंपनीच्या नावावर मोटारसायकल लागली. मात्र, ही मोटारसायकल स्वतःकडे न ठेवता कामगारांना देण्याचा निर्णय घेत त्यांनी कंपनीतील कामगारांमधून स्वतंत्र लकी ड्रॉ काढत सामाजिक बांधिलकी जपली.चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या हस्ते ही सोडत पार पडली. सुभाष पाकळे फाऊंडेशनच्या माध्यमातून सचिन कात कंपनी व तिरुपती कात कंपनी, तसेच सचिन पाकळे व संजय पाकळे यांनी हा कामगाराभिमुख उपक्रम राबविला.कामगारांमधून काढलेल्या या विशेष लकी ड्रॉमध्ये एका भाग्यवान कामगाराला मोटारसायकल प्रदान करण्यात आली. याशिवाय मिक्सर, कुकर, हॉटपॉट, स्टील डबे, पाण्याच्या टाक्या, टॉर्च, इस्त्री, ब्लूटूथ स्पीकर, गॅस शेगडी, सिलिंग फॅन आदी वस्तूंचेही वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास पूनम पाकळे, इरा डेव्हलपमेंटचे सुरेश सावर्डेकर, महावितरणचे निवृत्त अधिकारी अशोक काजरोळकर, शेखर निकम प्रतिष्ठानचे देवराज गरगरटे, सतीश सावर्डेकर, राजेश सुर्वे, विकास भंडारी, सुमित भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार शेखर निकम, उद्योगपती सचिन पाकळे तसेच सचिन कात व तिरुपती कात कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदिप घाग, सचिन गुरव, बाळा सावंत, सुयोग खेडेकर, सुरेश सूर्यवंशी, शरद चव्हाण, प्रणय चव्हाण, सुगंधा घाणेकर, सुरक्षा घाग, प्रणय साबळे, अनुराग चव्हाण, प्रणय मोरे, महेश सावंत, अमित म्हापार्ले, राहुल पवार, सुमित, सुजित बिजितकर आदींनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.कामगारांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कामगारांसाठी पाकळे फाऊंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम Read More »

konkandhara 2026 05 09T115708.210

सिंधुदुर्गनगरी येथेअस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ

प्राधिकरण क्षेत्राला मिळाली हक्काची बाजारपेठ; शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला चालना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग : भूषण सावंतसिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून येथे वास्तव्यास असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी स्थानिक स्तरावर दर्जेदार आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होणे काळाची गरज होती. ओरोस एस.टी. स्टँड परिसरात सुरू करण्यात आलेल्या “अस्सल गावठी आठवडा बाजारामुळे” आता प्राधिकरण क्षेत्राला स्वतःची हक्काची बाजारपेठ मिळाली असून नागरिकांना ताज्या भाज्या, फळे आणि स्थानिक सेंद्रीय शेतीमाल सहज उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा प्राधिकरण अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांनी केले. ओरोस येथील एस.टी. स्टँड परिसरात आज अस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साहिल, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, प्राधिकरण सदस्य प्रभाकर सावंत, ओरोसचे उपसरपंच पाडूरंग मालवणकर, रानबांबूळीचे सरपंच परशुराम परब, ग्रामपंचायत सदस्य राजश्री नाईक, संतोष वालावलकर यांच्यासह नागरिक, शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, गावठी बाजार सुरू करण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिकांनी घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. या बाजारामुळे आता प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांना भाज्या आणि शेतीमाल सिंधुदुर्ग नगरी येथेच चांगल्या प्रतीचा आणि ताजा माल उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनाही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.” त्यांनी पुढे सांगितले की, प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून भविष्यात प्राधिकरण क्षेत्रातील मूलभूत सुविधा, बाजार व्यवस्था आणि नागरिकांच्या गरजांनुसार आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शुभारंभानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बाजारातील प्रत्येक स्टॉलला भेट देत विक्रीसाठी ठेवलेल्या विविध भाज्या, फळे आणि सेंद्रीय उत्पादनांची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. तसेच या उपक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या शेतकरी आणि विक्रेत्यांचे अभिनंदनही त्यांनी केले.हा “अस्सल गावठी आठवडा बाजार” दर शनिवारी सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत भरविण्यात येणार असून येथे स्थानिक सेंद्रीय शेतीमालाचे “शेतकरी ते ग्राहक” थेट विक्री केंद्र कार्यरत राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ताजा आणि नैसर्गिक शेतीमाल मिळण्यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांनाही हक्काची विक्रीची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राधिकरण सदस्य प्रभाकर सावंत यांनी मानले.

सिंधुदुर्गनगरी येथेअस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ Read More »

konkandhara 2026 05 09T114701.330

सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा; पर्यटन हंगामात तुटवड्याची समस्या तीव्र

रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यात पर्यटन हंगामाला वेग आल्याने शहरासह किनारी तालुक्यांतील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः सुट्यांच्या दिवसांत सीएनजीची उपलब्धता वाढविण्याची गरज असल्याची मागणी वाहनचालक आणि रिक्षा व्यावसायिकांकडून होत आहे. आखाती देशांमधील युद्धानंतर देशभरात इंधनटंचाई निर्माण झाली होती. त्या काळात प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे वाहनांच्या रांगा टाळण्यात यश आले होते. मात्र सध्या पर्यटन हंगामाच्या ऐन काळातच सीएनजीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहरासह समुद्रकिनारी असलेल्या तालुक्यांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सीएनजी पंपांबाहेर रिक्षा तसेच पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होत आहे. वाहनांना गॅस भरण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने पर्यटकांचा वेळ वाया जात आहे. तसेच रिक्षा व्यावसायिकांच्या दैनंदिन उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. सुट्यांच्या कालावधीत सीएनजीचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून देत वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा; पर्यटन हंगामात तुटवड्याची समस्या तीव्र Read More »

konkandhara 2026 05 09T113856.734

रोहा तालुक्यात अनेक वर्ष योजना राबविल्या. पाणी टंचाई मात्र कायम.

कोलाड ८. मे (शरद जाधव) सध्या उन्हाला वाढत असल्याने उष्णतेचा पारा चढत आहे. अशावेळी शासकीय यंत्र नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहेत .अशातच रोहा तालुक्यात प्रत्येक गावात गेले अनेक वर्ष दोन-चार योजना राबविल्या गेले आहेत. तरीदेखील पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याने रोहा तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात उदंड झाल्या पाणी योजना टंचाई मात्र कायम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रोहा तालुक्यावर खासदार सुनील तटकरेंचे अनेक वर्ष राजकीय वर्चस्व आहे. सर्वच ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली आहेत. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची फळी आहे .मात्र गेली कित्येक वर्ष ग्रामीण भागासाठी आणलेल्या निधीचा दुरुपयोग झाला आहे. निधीतून गावचा विकास झाला की कुणाचा हे सुद्धा नागरिकांना समजले आहे .केवळ फक्त ग्रामपंचायत राष्ट्रवादी पक्षाच्या अधिपत्त्याखाली ठेवून मतदान मिळवून राजकीय कारभार चालवला गेला असा आरोप होत आहे. प्रत्येक गावाला विकासासाठी काय हवंय .चांगला रस्ता, शुद्ध पाणी, आणि वीज ,परंतु या देखील सुविधा कमी अधिक प्रमाणात पोहचल्या आहेत. गावचा तालुक्याचा विकासाचा ध्यास न घेता वर्षानुवर्ष आपल्या घराण्याकडे सत्ता कशी राहील याचा ध्यास घेतल्याने विकास झाला नाही .परिणामी आज असंख्य जावे पाणीटंचाई कृती आराखडा आहेत. असे बोलले जाते. प्रत्येक गावात भारत निर्माण व पायलट योजना अशा योजना राबवल्या गेल्या आहेत. नंतर सध्या सुरू असलेली जलजीवन मिशन योजनेची माहिती घेतली असता प्रचंड गोंधळ सुरू आहे नियोजन नाही. त्यामुळे या योजना जर फेल गेल्या तर भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल याकरता स्थानिक गावकऱ्यांनी जातीने लक्ष घालून आपल्या गावाच्या पाणी योजनेचे काम दर्जेदार होते का हे पाहिले पाहिजे नाहीतर अधिकारी हे बाहेरचे आहेत बदली होऊन जातील ठेकेदार बीड पुण्याचे ते पण निघून जातील पाणी मात्र आपल्या गावासाठी आहे याचा विचार करून गावातील तरुणांनी या पाणी योजना संदर्भात जागरूक राहून लक्ष दिले पाहिजे.

रोहा तालुक्यात अनेक वर्ष योजना राबविल्या. पाणी टंचाई मात्र कायम. Read More »

konkandhara 2026 05 09T113031.227

दापोलीत महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन; एस.टी. कर्मचाऱ्याचे निलंबन

दापोली : महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी एस.टी.च्या वाहक-कम-चालक कर्मचाऱ्याविरोधात अखेर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी एस.टी. प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे लेखी आदेश जारी केले. या प्रकरणी दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी शुक्रवारी दुपारी दापोली आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे यांची भेट घेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. “आमच्या आया-बहिणींची अब्रू इतकी स्वस्त नाही. संबंधित विकृत मनोवृत्तीच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू,” असा इशारा ऋषिकेश गुजर यांनी दिला होता. यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची कारवाई केली. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

दापोलीत महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन; एस.टी. कर्मचाऱ्याचे निलंबन Read More »

konkandhara 2026 05 08T153543.800

“सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा !” — आरोग्यमंत्री बैठकीत मोठे निर्णय ; सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्थेला मिळणार नवे बळ

दोडामार्ग: भूषण सावंत : मुंबईतील आरोग्य भवनात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित आरोग्य प्रश्नांवर अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांच्या मागणीनुसार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील आरोग्य सुविधांबाबत मोठे निर्णय घेण्यात आले. सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, महात्मा फुले आरोग्य योजनेतील अडथळे, पंचकर्म केंद्रे, आयुष वेलनेस क्लिनिक आणि आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी निधी अशा विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. बैठकीला आमदार दीपक केसरकर यांच्यासह जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले, कुमार भोगले, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सात वर्षांपासून रखडलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला अखेर गती सावंतवाडीतील बहुचर्चित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीचा प्रश्न यावेळी केंद्रस्थानी होता. जागेचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. मात्र बैठकीत राजघराण्याच्या प्रतिनिधींनी हॉस्पिटल उभारणीस कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट करत लवकरात लवकर न्यायालयात ना हरकत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सहमती दर्शवली. यामुळे सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीचा मार्ग आता जवळपास मोकळा झाल्याचे मानले जात आहे. तब्बल सात वर्षे प्रकल्प रखडल्याने नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रस्तावित हॉस्पिटललगत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला दोन मजली विस्तार देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. रिक्त डॉक्टर पदांवर महिनाभरात भरतीचे आदेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा बैठकीत जोरदारपणे मांडण्यात आला. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीची दखल घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे येत्या महिनाभरात भरण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. परिचारिकांच्या रिक्त पदांमुळे निर्माण झालेल्या अडचणींवरही गंभीर चर्चा झाली असून त्यावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले. गोवा व बेळगावमधील महात्मा फुले योजनेची सेवा पुन्हा सुरू होणार ? सिंधुदुर्गातील रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेज आणि के.एल.ई. हॉस्पिटल बेळगाव येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार मिळत होते. मात्र पोर्टलवरील कोड बंद झाल्यामुळे ही सुविधा थांबवण्यात आली असून त्यामुळे सीमाभागातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. हा गंभीर प्रश्न आमदार दीपक केसरकर यांनी बैठकीत आक्रमकपणे मांडला. त्यावर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी लवकरात लवकर ही सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले. रेडी, आंबोली आणि आचरा येथे पंचकर्म केंद्र उभारणीला गती पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गमध्ये आयुर्वेद, योग, पंचकर्म आणि नेचरोपॅथी सेवांसाठी मोठी मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर रेडी, आंबोली आणि आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पंचकर्म सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी ही मागणी लावून धरल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी संबंधित प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष वेलनेस सेंटर सुरू करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. आरोग्य सुविधांबाबत सरकार गंभीर ; सिंधुदुर्गला दिलासा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या इमारती, कर्मचारी भरती, आधुनिक आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर या बैठकीत व्यापक चर्चा झाली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील आरोग्य समस्यांवर लवकरात लवकर ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

“सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा !” — आरोग्यमंत्री बैठकीत मोठे निर्णय ; सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्थेला मिळणार नवे बळ Read More »