konkandhara.com

कोकणची बातमी

konkandhara 2026 05 11T165530.472

वृक्ष संवर्धन व जतन ही काळाची गरज : आ. दीपक केसरकर

कुडाळमध्ये ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन उत्साहात सिंधुदुर्ग : वृक्ष लागवड करून थांबून चालणार नाही, तर वृक्ष संवर्धन आणि जतन ही काळाची गरज आहे. केवळ फोटोसाठी वृक्षारोपण न करता प्रत्येकाने लावलेले झाड जगवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले. कुडाळ येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आयोजित ‘५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडले. ‘जय वासुदेवानंद हॉल’ येथे झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, देवगड सभापती तन्वी चांदोस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आदर्श महाराष्ट्र भूषण सन्मानित सुयोग धस होते. यावेळी बोलताना आ. केसरकर म्हणाले की, हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून निसर्गाचे चक्र विस्कळीत होत आहे. यावर मात करण्यासाठी शाश्वत विकास आणि पर्यावरण रक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड दत्तक घेऊन ते मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन करावे, तरच भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरण निर्माण होईल. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही वाढते प्रदूषण आणि हवामान बदल यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असल्याची खंत व्यक्त केली. निसर्ग टिकला तरच मानव टिकेल, त्यामुळे वृक्ष लागवड, पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रदूषण रोखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाची सुरुवात सकाळी ‘वृक्षदिंडी’ने झाली. कुडाळ पोलीस स्टेशन ते संमेलन स्थळ अशी ही दिंडी काढण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व वृक्षपूजन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अंतरीय गड किल्ले संवर्धन समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांच्या शिवकालीन साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मालवण येथील पिटर शेरॉन यांच्या गडकिल्ले तैलचित्र प्रदर्शनासह प्रकाश कदम यांच्या निसर्ग फोटो गॅलरीचेही उद्घाटन झाले. ऋतुजा गवस यांनी तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनात सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे, कार्मिस अल्मेडा, ज्ञानेश्वर रेडकर तसेच रक्तचळवळीत योगदान दिल्याबद्दल श्यामल मांजरेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या संमेलनात पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि हवामान बदल या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ : कुडाळ येथे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलनात आ. दीपक केसरकर यांचा संस्थेचे अध्यक्ष सुयोग धस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आशिया रिजवी, बादल बेले, जोवेल डिसिल्व्हा, बापू परब, संजय पिळणकर आदी उपस्थित होते.

वृक्ष संवर्धन व जतन ही काळाची गरज : आ. दीपक केसरकर Read More »

konkandhara 2026 05 11T113048.953

सह्याद्रि शिक्षण संस्थेचा दहावी परीक्षेत ९७ टक्के निकाल

१४७० पैकी १४२७ विद्यार्थी उत्तीर्ण; २९८ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य सावर्डे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (एसएससी) मार्च २०२६ च्या निकालात सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे संचलित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेच्या ३६ शाळांचा एकूण निकाल ९७ टक्के लागला असून गुणवत्तेची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे. संस्थेच्या मराठी माध्यमाच्या ३३ व इंग्रजी माध्यमाच्या ३ शाळांमधून एकूण १४७० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. स्वरा महेश खातू हिने ९८.२० टक्के गुण मिळवत संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच विद्यालयातील कु. शौर्य सुनील टाकसाळे याने ९७ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच कु. तेजस अमित राऊत आणि धोंडीराम शेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल, खेर्डी-चिंचघरी (सती) येथील कु. हर्षवर्धन सोमनाथ भिंगे यांनी प्रत्येकी ९६ टक्के गुण मिळवत संयुक्त तृतीय क्रमांक प्राप्त केला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी २९८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली असून ५५० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४४८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १३१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. केवळ ४३ विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले आहेत. ग्रामीण भागात कार्यरत असतानाही संस्थेच्या शाळांनी सातत्याने दर्जेदार शिक्षण देत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि संस्थेचे नियोजन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच उपाध्यक्ष प्रशांत निकम, सौ. युगंधरा प्रकाश राजेशिर्के, डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध शेखर निकम, सेक्रेटरी महेश मनोहर महाडिक, सर्व विश्वस्त, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सह्याद्रि शिक्षण संस्थेचा दहावी परीक्षेत ९७ टक्के निकाल Read More »

konkandhara 2026 05 11T110743.893

आपलं चिपळूण संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर

चिपळूण, ता. ११ : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी ओळखली जाणारी आपलं चिपळूण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेंड येथील स्प्रिंग क्लिनिकमधील संस्थेच्या कार्यालयात पार पडली. यावेळी पुढील पाच वर्षांसाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. २०१२ पासून कार्यरत असलेल्या या संस्थेने प्रसिद्धीपासून दूर राहून निःस्वार्थ भावनेने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य शिबिरे, निराधारांना मदत, निसर्ग संवर्धन, प्राणी-पक्षी संरक्षण, शहर सुशोभीकरण तसेच दुर्गम भागातील विद्यार्थी आणि निराधार वृद्धांना सहाय्य अशा अनेक क्षेत्रांत संस्थेचे योगदान राहिले आहे. सभेत आगामी वर्षासाठी विविध उपक्रमांचा सविस्तर आराखडा निश्चित करण्यात आला. चिपळूण शहराच्या विकासासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि नदी-नाले संवर्धन कार्यकर्त्यांसोबत चर्चासत्र आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोकणातील परंपरा आणि संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, पुस्तक रोटेशन योजना, गुणवंत विद्यार्थ्यांमार्फत मार्गदर्शन शिबिरे, गड-किल्ले भ्रमंती, पशु-पक्षी निरीक्षण, वृक्षलागवड, कार्बन क्रेडिट योजनेबाबत जनजागृती तसेच आरोग्य, ध्यान, मनःशांती आणि निसर्गोपचार विषयक उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या शेवटी गेल्या १४ वर्षांपासून कार्यभार सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. मावळते अध्यक्ष उदय ओतारी यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ. यतिन जाधव, कार्याध्यक्षपदी संतोष देशमुख, उपाध्यक्षपदी प्रशांत पाटेकर व मनोज जाधव, सचिवपदी उदय ओतारी, सहसचिवपदी प्रशांत देवळेकर, खजिनदारपदी फैय्याज देसाई, सहखजिनदारपदी राजू दरेकर यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून जितेंद्र सुर्वे, निहार जोशी, मंगेश गोंधळेकर, प्रसन्न आवले आणि विशाल जानवलकर यांचा समावेश करण्यात आला. ही संस्था महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असून लवकरच महिला व पुरुष सर्वसाधारण सभासदांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती विद्यमान सचिव उदय ओतारी यांनी दिली.

आपलं चिपळूण संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर Read More »

konkandhara 2026 05 10T213556.554

राजापुरात गोवा बनावटीच्या दारूवर उत्पादन शुल्क विभागाचा छापा

९ लाखांचा मुद्देमाल जप्त; मोटारसह अवैध मद्य ताब्यात राजापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मद्यविक्रीविरोधातील विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने राजापूर तालुक्यात मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या अवैध दारूसह सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजापूर तालुक्यातील साखरतरवाडी येथे शुक्रवारी दुपारी साडेदोनच्या सुमारास उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान उभ्या असलेल्या एका मोटारीची तपासणी करण्यात आली. तपासणीत गाडीत गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स आढळून आले. या कारवाईत २ लाख ८ हजार ३२० रुपये किमतीची अवैध दारू तसेच ७ लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण ९ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गाडीचा मालक अक्षय अरविंद खटावकर याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त राजापूर येथील परवानाधारक मद्यविक्रेत्यांनी अवैध दारूविक्रीविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले होते. निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, राजापूरसह रत्नागिरी शहर परिसरातील भाटीमिऱ्या, चवडेवठार, तेली आळी, एमआयडीसी, सैतवडे आणि वाटद परिसरातही अवैध दारूविक्रीविरोधात मोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.

राजापुरात गोवा बनावटीच्या दारूवर उत्पादन शुल्क विभागाचा छापा Read More »

konkandhara 2026 05 10T212507.510

कोळथरे येथील सुशील सूर्यकांत सावंत यांची दापोली राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी निवड…

दापोली :- दापोली तालुक्यातील जयभवानी मराठा समाज कोळथरे येथील गुणी, कार्यक्षम आणि समाजकार्यात सक्रिय असलेले युवा कार्यकर्ते सुशील सूर्यकांत सावंत यांची श्री. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दापोली तालुका युवक अध्यक्षपदी निवड झाल्याने कोळथरे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जयभवानी मराठा समाजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सुशील सावंत यांनी सामाजिक, शैक्षणिक तसेच युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. युवकांना संघटित करून पक्ष बळकटीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी समाजातील मान्यवर, पदाधिकारी, महिला वर्ग तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सुशीलकुमार सावंत यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.“ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच युवकांच्या न्याय्य प्रश्नांसाठी सातत्याने काम करणार आहे,” असे मनोगत सुशील सावंत यांनी व्यक्त केले.

कोळथरे येथील सुशील सूर्यकांत सावंत यांची दापोली राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी निवड… Read More »

konkandhara 2026 05 10T211447.027

वादळी पावसामुळे लांजा-राजापूरमध्ये मोठे नुकसान; आमदार किरण सामंतांची घटनास्थळी पाहणी

लांजा: रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने धुमाकूळ घालत लांजा आणि राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली, झाडे कोसळली, वीजवाहिन्या तुटल्या तर शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध भागांची पाहणी केली. वादळी पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून थेट फिल्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. गावोगावी भेट देत त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांना धीर दिला. अनेक ठिकाणी कोसळलेली झाडे, उडालेली घरांची छपरे आणि बाधित वीजपुरवठ्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आमदार किरण सामंत यांनी लांजा आणि राजापूर तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्तांना शासनाची मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी महसूल विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वादळी पावसामुळे शेती, घरांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान शासन दरबारी प्रभावीपणे मांडून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार किरण सामंत यांनी सांगितले. तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. दरम्यान, आमदार किरण सामंत स्वतः फिल्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेत असल्याने नुकसानग्रस्त नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनही तातडीने कामाला लागल्याने पंचनामे आणि मदत प्रक्रिया जलद गतीने सुरू झाली आहे. यावेळी लांजा नगराध्यक्ष सावली कुरूप, तहसीलदार प्रियंका ढोले, नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी, राजू कुरूप, मुन्ना खामकर, बाबाशेठ भिंगार्डे, नगरसेवक वैभव जोईल, सचिन डोंगरकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

वादळी पावसामुळे लांजा-राजापूरमध्ये मोठे नुकसान; आमदार किरण सामंतांची घटनास्थळी पाहणी Read More »

konkandhara 2026 05 10T210123.290

बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

दापोलीः- अनुसुचित जमातींचे 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध प्रकरणी कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा रत्नागिरीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन तहसिलदार दापोली यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्य महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार, अमोल पावरा, दत्तात्रय वाघमारे यांचयासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या स्थापनेपासून नोव्हेंबर 2023 पर्यत प्रमाणपत्र तपासणीसाठी तब्बल 7 लाख 11 हजार 652 दावे जात दाखल झाले. यापैकी 6 लाख 26 हजार 200 जात प्रमाणपत्रे वैध ठरली, तर 37 हजार 599 अवैध ठरली आहेत. समित्यांनी इतर कारणाने निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या 30 हजार 750 आहे. नोंव्हेंबर 2023 पर्यंत जातपडताळणी समित्यांनी एकूण निकाली काढलेली प्रकरणे 6 लाख 94 हजार 550 आहेत, तर प्रलंबित जात प्रमाणपत्र दाव्यांची संख्या 17 हजार 102 आहे. समाज कल्याण विभागातून सन 1983 मध्ये आदिवासी विकास विभाग वेगळा झाल्यानंतर अनुसुचित जमातीच्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी तपासणी समिती स्थापन करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरूध्द अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे या प्रकरणात ठाकूर, कोळी, महादेव, हलबा, गोंड, माना, मन्नेरवारलू, टोकरे कोळी, ठाकर या जमातीत सर्वांधिक घुसखोरी आहे तर ऑरॉन, कोया, डोंगर कोळी, कोळी डोर, टाकणकार, पारधी, छत्री, कवर, कमार, ओझा, नायकपोड, अराख, बिझवार, भुजीया, पावरा, तडवीभील या जमातींचेही जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले आहे. परंतु, त्याचे प्रमाण नगण्य आहे. या जमातीत कमी घुसखोरी आहे. केलेल्या सूचना विचारात घेऊन राज्य शासनाने जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे अधिनियम 2000 व नियम 2003 तयार केले आहेत. जमातींचे प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी आतापर्यंत राज्यात पुणे, ठाणे, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, गडचिरोली, पालघर, किनवट, यवतमाळ, चंद्रपूर, गोदिंया, धुळे व नाशिक -2 अशा 15 तपासणी समित्यासुध्दा स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यात अनुसूचित जमातीमध्ये पूर्वी प्रमुखजमाती 47 होत्या. त्यातील दोन जमाती वगUण्यात आल्या असून आता 45 जमाती आहे. या 45 जमातींमध्ये मोठया प्रमाणात मूळजमातींच्या नामसाधर्म्याचा गैरफायदा लाटण्यासाठी घुसखोरी झाल्याचे घेऊन आदिवासींच्या सवलती चित्र आहे. बोगस जात प्रमाणपत्राला आळा बसावा म्हणून महाराष्ट्र शासनाने अधिनियम 2000 पारित केला आहे, परंतु, खोटे जात प्रमाणपत्र घेणारे व देणाऱ्यांवर शासन कारवाई करीत नाही. म्हणून अनुसूचित जमातींचे 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध प्रकरणी कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्य भर आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी Read More »

konkandhara 2026 05 10T204447.649

थोर कीर्तनकार व समाज प्रबोधनकार वैकुंठवासी ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांना मरणोत्तर राष्ट्रीय आध्यात्मिक पुरस्कार जाहीर.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुटुंबीय स्वीकारणार पुरस्कार. कोलाड :(शरद जाधव) महाराष्ट्र ही संतांची भूमी.या भूमीत संत जन्मलाआले. आजही त्यांच्या संत कार्याचा गौरव होतो. समाजात ज्या काही चांगल्या व्यक्ती जन्माला येतात त्या व्यक्तीच मरणानंतर सुद्धा नाव कायम समाजात राहते .असे एक वारकरी परंपरेतील व चळवळीतील थोर कीर्तनकार समाज सुधारक ह भ प वैकुंठवासी पुरुषोत्तम महाराज पाटील यांना मरणोत्तर राष्ट्रीय अध्यात्मिक पुरस्कार जाहीर झाला आहे. आज समाजातून निघून गेलेल्या थोर विभूतीची आठवण ठेवून त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान होत असल्याने वारकरी सांप्रदायाने आयोजकांचे आभार मानले आहेत.रायगड जिल्हा आगरी समाजातर्फे आगरी समाजातील काही महनिय व्यक्तींना सांस्कृतिक अध्यात्मिक परंपरेला नवीन ऊर्जा देणाऱ्या 20 महंतांचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. सदर संमेलन सोहळा शुक्रवार दिनांक 15 मे रोजी पेन नगरपालिका मैदान येथे होणार आहे. आगरी समाजाची देखील आध्यात्मिक ओळख देशपातळीवर पोहोचवण्याकरता या संमेलनाचा उद्देश असल्याचे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे मूळ गाव पेण तालुक्यातील आहे नोकरी निमित्त अनेक वर्ष घाटाव गावामध्ये वास्तव्यास होते. अध्यात्माची ओढ व वारकरी सांप्रदायिक असल्याने रोहा तालुक्यात वारकरी संप्रदायात समरस झाले. व कधी पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे पुरुषोत्तम महाराज धाटावकर झाले हे कळले नाही एवढा प्रचंड नावलौकिक त्यांनी मिळवला. वारकरी संप्रदाय जो जगद्गुरु तुकोबारायाचा ,ज्ञानेश्वर माऊलींचा, सावता माळी ,संत नामदेवांचा , जनाबाई ,मुक्ताई चा वारकरी सांप्रदाय . बापूंनी खऱ्या अर्थाने रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात रुजविला. आज असंख्य तरुण माळकरी होऊन वारकरी परंपरेला जोडलेले दिसत आहेत .पुरुषोत्तम महाराज उर्फ बापू म्हणजे एक जिव्हाळा होता.संसारात रंजले गांजलेल्या व व्यसनाधीन झालेल्या अनेक कुटुंबीयांना त्यांनी वारकरी सेवेत आणून सुधारले होते. समाजातील चांगली माणसे देवाला आवडतात त्याप्रमाणे ते इहलोक लोक सोडून गेले . परंतु आज त्यांच्या पश्चात त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते त्यांचे कुटुंबीय पुरस्कार स्वीकारणार आहेत. तरी सर्व वारकरी संप्रदायिक व आगरी समाज बांधवांनी या भव्य दिव्य सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन रोहा तालुका आगरी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत रोठ गावचे तंटामुक्त गाव कमेटी अध्यक्ष. व आगरी समाज चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ते किशोर मोरे उपस्थित होते.

थोर कीर्तनकार व समाज प्रबोधनकार वैकुंठवासी ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांना मरणोत्तर राष्ट्रीय आध्यात्मिक पुरस्कार जाहीर. Read More »

konkandhara 2026 05 10T203950.898

स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग आघाडीवर

वेंगुर्ल्यातील मूठ गाव ठरले राज्यातील पहिले १०० टक्के स्वगणना पूर्ण करणारे महसुली गाव सिंधुदुर्गनगरी : भूषण सावंत :स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करत राज्यातील पहिले महसुली गाव म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हे यश प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ गावांमध्ये सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण झाली असून, जिल्ह्याने राज्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्यामुळे मोहिमेला अभूतपूर्व यश मिळाले. गावागावांत महसूल यंत्रणा, ग्रामपंचायत पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि स्थानिक स्वयंसेवक यांनी संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवली. नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवत स्वगणना प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे अल्पावधीतच अनेक गावांतील सर्व कुटुंबांची स्व गणना पूर्ण झाली आहे.सामूहिक सहभाग, जबाबदारीची जाणीव आणि प्रभावी नियोजन यांच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, हे या मोहिमेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. तालुकानिहाय स्वगणना पूर्ण झालेल्या गावांची संख्या पुढीलप्रमाणे : कुडाळ तालुका – कांडरगावकणकवली तालुका – उपनगर व नवानगर, वेंगुर्ला तालुका – मूठ,वैभववाडी तालुका –ग्रामपंचायत निमअरुळे (निमअरुळे, माईंनकरवाडी, कुंभारवाडी व बौध्दवाडी),दोडामार्ग तालुका – फोंड्ये,देवगड तालुका – शेरिघेराकामते,मोरवे,सावंतवाडी तालुका – पडवे, उडेली, दाभील ,मालवण तालुका – कोळंब, मसुरे, पेंडुर, पोइप, आचरे आणि श्रावण या गावांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही यशस्वी वाटचाल राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भारत सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना होत आहे. याद्वारे सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने अधिकृत se.census.gov.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे.सिंधुदुर्गचा आदर्श घेत इतर जिल्ह्यांनी देखील गावांची १००% स्व-गणना पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील इतर गावांनी देखील स्व-गणना पूर्ण करावी, असे आवाहन आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग आघाडीवर Read More »

konkandhara 2026 05 10T202139.482

बालभवन इब्रामपुरच्या गुणदर्शन कार्यक्रमात बालकलाकारांचा रंगला सुरेल जल्लोष !

दोडामार्ग : भूषण सावंत : इब्रामपुर येथील बालभवन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराच्या गुणदर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालकलाकारांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकत संपूर्ण वातावरण कला, संगीत आणि उत्साहाने भारावून गेले. या कार्यक्रमासाठी इब्रापूर गावचे सरपंच अशोक धाऊसकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर बालभवन पणजीचे रिसोर्स पर्सन कमलाकांत गवस, ग्रामपंचायत सदस्य स्मिता गवस, उर्मिला परब, अजित शेटकर आणि गोविंद सावंत हे सन्मानित पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालभवन केंद्राच्या केंद्रप्रमुख रूपा नाईक होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी संवादिनी वादन, तबला वादन, नृत्य, गायन अशा विविध कलाविष्कारांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांकडून भरभरून दाद मिळवली. छोट्या कलाकारांचा आत्मविश्वास, कलागुण आणि सादरीकरणातील सफाई पाहून उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी प्रांजल नाईक आणि नित्या गवस यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण शैलीत केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी रूपा नाईक यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी बालभवन केंद्राचे शिक्षक पुनेश राणे, रामा गवस, अशोक केणी, समीक्षा गवस आणि रितिक शेटये उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि कलाप्रेमींनी उपस्थित राहून बालकलाकारांना उत्स्फूर्त प्रोत्साहन दिले.

बालभवन इब्रामपुरच्या गुणदर्शन कार्यक्रमात बालकलाकारांचा रंगला सुरेल जल्लोष ! Read More »