१४७० पैकी १४२७ विद्यार्थी उत्तीर्ण; २९८ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य
सावर्डे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (एसएससी) मार्च २०२६ च्या निकालात सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे संचलित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेच्या ३६ शाळांचा एकूण निकाल ९७ टक्के लागला असून गुणवत्तेची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.
संस्थेच्या मराठी माध्यमाच्या ३३ व इंग्रजी माध्यमाच्या ३ शाळांमधून एकूण १४७० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. स्वरा महेश खातू हिने ९८.२० टक्के गुण मिळवत संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच विद्यालयातील कु. शौर्य सुनील टाकसाळे याने ९७ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच कु. तेजस अमित राऊत आणि धोंडीराम शेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल, खेर्डी-चिंचघरी (सती) येथील कु. हर्षवर्धन सोमनाथ भिंगे यांनी प्रत्येकी ९६ टक्के गुण मिळवत संयुक्त तृतीय क्रमांक प्राप्त केला.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी २९८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली असून ५५० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४४८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १३१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. केवळ ४३ विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले आहेत.
ग्रामीण भागात कार्यरत असतानाही संस्थेच्या शाळांनी सातत्याने दर्जेदार शिक्षण देत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि संस्थेचे नियोजन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच उपाध्यक्ष प्रशांत निकम, सौ. युगंधरा प्रकाश राजेशिर्के, डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध शेखर निकम, सेक्रेटरी महेश मनोहर महाडिक, सर्व विश्वस्त, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.















