कोलाड ९ मे (शरद जाधव)
रोहा तालुक्यातील जामगाव हद्दीत बेसुमार माती मुरूम चे उत्खन करण्यात आल्याची धक्का दायक बाब उघडकिस आली आहे. मात्र सदर झालेल्या उत्खननांमध्ये महसूल खात्याचे दुर्लक्ष झाले असल्याची चर्चा सुतारवाडी नाक्यावर सुरू आहे.
जामगाव पहूर भाला परिसरात मुंबई दिल्ली कॉरिडॉर दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र याकरता शेतकरी वर्गाच्या जमिनी गेल्या आहेत. एमआयडीसी जमिनी घेत आहे. आपल्याला काही मिळणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने जमिनी विकल्या. परंतु त्यानंतर ज्या वर्गाने जमिनी घेतल्या त्या धनदांडग्यांना 18 लाख रुपये एकरी भाव मिळाला. याचा फायदा फार कमी शेतकऱ्यांना झाला.
दिल्ली कॉरिडोर साठी गेलेल्या जमिनीतून जामगाव येथे बेसुमार उत्खनन झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिक यांनी पत्रकारांना दिली. तर सदर उत्खनना कडे संबंधित महसूल खात्याने दुर्लक्ष केले असल्याची चर्चा आहे. एकंदरीत प्रकरण काय याचा खुलासा अधिकारी वर्गाने करावा व खरोखरच माती चोरी झाले असेल तर संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.















