konkandhara.com

21 अप्रैल 2026

मुंढे येथे श्री केदारनाथ त्रैवार्षिक यात्रोत्सव २९ एप्रिलपासून; बैलगाडा शर्यत व पालखी सोहळा

श्री केदारनाथ त्रैवार्षिक यात्रोत्सव २९ एप्रिलपासून सुरू; मुंढे गावात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंढे गावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ यांच्या त्रैवार्षिक यात्रोत्सव (समा) २०२६ निमित्त २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत गावात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा भव्य संगम अनुभवायला मिळणार आहे. या सोहळ्याबाबत ग्रामस्थ व भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, मंदिर परिसर सजविणे, स्वागताची तयारी आणि विविध कार्यक्रमांची आखणी जोरात सुरू आहे. श्री केदारनाथांवरील श्रद्धेपोटी दूरदूरवरून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. बुधवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीने यात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. “श्री केदारनाथ केसरी” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित बैलगाडा चालक सहभागी होणार असून, प्रथम क्रमांकासाठी १,०१,००१ रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. इतर क्रमांकांसाठीही आकर्षक रोख पारितोषिके व मानचिन्हे देण्यात येणार आहेत. गुरुवार, ३० एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत लाटेचे पूजन व भव्य मिरवणूक सोहळा पार पडणार आहे. मुंढे वरचीवाडी ते ग्रामदैवत मंदिर असा मार्गक्रमण करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात आणि जयघोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवार, १ मे रोजी मुख्य यात्रोत्सव साजरा होणार आहे. सकाळी ११ वाजता ग्रामदैवत तळसर पालखीचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता पालखी भेट सोहळा होणार असून, हा कार्यक्रम भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता लाट फिरवणे व पालखी नाचविण्याचा पारंपरिक कार्यक्रम होणार आहे. रात्री १० ते ११ या वेळेत करमणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर “वैभव म्युझिकल नाईट, कोल्हापूर” या ऑर्केस्ट्राचे सादरीकरण होणार आहे. या तीन दिवसीय यात्रोत्सवातून धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

श्री केदारनाथ त्रैवार्षिक यात्रोत्सव २९ एप्रिलपासून सुरू; मुंढे गावात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम Read More »

konkandhara 79

चिपळूणमध्ये भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे जय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने संस्थेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवार, २३ एप्रिल रोजी भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गोवळकोट येथे प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा होत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्पर्धा रात्री ९ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण, शिंदेवाडी (गोवळकोट) येथे रंगणार आहे. जिल्ह्यातील विविध नामांकित नृत्यसंघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात सादर होणारे जोशपूर्ण पालखी नृत्य, आकर्षक वेशभूषा आणि सादरीकरणातील समन्वय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. पालखी नृत्य ही आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख जपणारी लोककला असून, या स्पर्धेद्वारे या कलेचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि युवकांमध्ये पारंपरिक कलेविषयी आवड निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. जय हिंद क्रीडा मंडळ गेली अनेक वर्षे सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असून, या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचा सन्मान करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या अनोख्या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी, कला रसिकांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गोवळकोटमध्ये प्रथमच होणारी ही पालखी नृत्य स्पर्धा उत्साह, परंपरा आणि कलात्मकतेचा संगम ठरणार आहे.

चिपळूणमध्ये भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन Read More »

माणगावातील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

माणगावमधील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित तरुणाचा शोध सुरू

​रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या लोणेरे भागात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजिंगमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासानुसार, एका तरुणाने या तरुणीला लॉजवर आणले होते आणि बंद खोलीत तिच्यावर जीवघेणा हल्ला करून तिची हत्या केली. ​घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने त्वरित पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमने घटनास्थळी पोहोचून सखोल तपास सुरू केला. पोलिसांनी कायदेशीर पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत तरुणीची ओळख पटली असून, ती लोणेरे परिसरातीलच स्थानिक रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. ​तरुणीसोबत लॉजवर आलेला संशयित तरुण हा रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची महत्त्वपूर्ण माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. या घटनेनंतर तो तातडीने पसार झाला. त्याला बेड्या ठोकण्यासाठी रायगड पोलिसांकडून विशेष शोधपथकांची स्थापना करण्यात आली असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. आरोपीच्या मागावर राहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, तसेच लॉजवरील कर्मचारी व उपस्थित साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. ​हत्येमागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रेमप्रकरणातून झालेला वाद, वैयक्तिक कारण की आणखी वेगळा उद्देश, या सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या प्रकरणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, फरार आरोपीला लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा स्पष्ट विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

माणगावमधील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित तरुणाचा शोध सुरू Read More »

चिपळूणमध्ये गणेश मित्र मंडळाचा श्री गणेश अर्चा महोत्सव उत्साहात संपन्न

चिपळूणमध्ये गणेश मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेश अर्चा महोत्सव उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे गणेश मित्र मंडळ, पेठमाप गणेशवाडी (ता. चिपळूण) यांच्या वतीने सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी श्री गणेश अर्चा महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये श्री गणेशाची पूजा-अर्चा, भजन-कीर्तन तसेच सत्यनारायण महापूजेचा समावेश होता. या धार्मिक विधींमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने सहभाग नोंदवला. संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमानिमित्त आयोजित सत्यनारायण पूजेस नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ, बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेवक विकी लवेकर, नगरसेवक संजय गोताड तसेच शिवसैनिक यतीन कानडे यांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि गणेश मित्र मंडळाच्या सुयोग्य नियोजनामुळे महोत्सव अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. शेवटी उपस्थितांनी प्रसादाचा लाभ घेतला.

चिपळूणमध्ये गणेश मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेश अर्चा महोत्सव उत्साहात Read More »

गोवळकोट स्वयंभू श्री गणेश मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात

गोवळकोट येथील स्वयंभू श्री गणेश मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील गोवळकोट येथील स्वयंभू श्री गणेश मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. कै. विठोबा बाळा बुरटे यांच्या कृपाआशीर्वादाने आयोजित या सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ९ या वेळेत श्रींवर अभिषेक होणार असून, सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा व सार्वजनिक आरती पार पडणार आहे. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत गणेश मित्र मंडळाकडून भजन, ६ ते ७ या वेळेत सार्वजनिक हरिपाठ, तर ७ ते ९ या वेळेत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९.३० ते १०.३० या वेळेत महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. याच दिवशी स्वयंभू श्री गणेश मंदिर व राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत मंदिर पटांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदानाद्वारे सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन सोहळ्याचा लाभ घ्यावा, अशी विनंती स्वयंभू श्री गणेश मंदिर कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष जीवन बांद्रे, विश्वस्थ मंडळ तसेच गोवळकोट ग्रामस्थांनी केली आहे.

गोवळकोट येथील स्वयंभू श्री गणेश मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार Read More »

खेडमध्ये अज्ञात वाहनाची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे नवभारत हायस्कूलसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्री घडली. अमित सूर्यकांत फावरे (वय ३७, रा. लोटे-माळवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अमित फावरे हे महामार्ग ओलांडत असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी अवस्थेतील फावरे यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने कार भरधाव वेगाने चिपळूणच्या दिशेने पळवून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही तरुणांनी तत्काळ आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. खेड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अपघात करून पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध सुरू आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू Read More »

लांज्यात विनापरवाना बंदूक बनवणाऱ्यास अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी

विनापरवाना बंदूक बनवणाऱ्यास अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी

लांजा (प्रतिनिधी) : शहरातील देवराई परिसरात शिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेली बंदूक विनापरवाना असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ती तयार करून देणाऱ्या पाचल येथील व्यक्तीला लांजा पोलिसांनी अटक केली आहे. अनिल सीताराम गुरव (वय ४३) असे आरोपीचे नाव असून, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी (दि. १५) देवराई परिसरात शिकारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या अरुण नारायण चौगुले व शैलेश दिलीप मेस्त्री या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. अरुण चौगुले याच्याकडे १२ बोअरची बंदूक व तीन जिवंत काडतुसे आढळून आली होती. तपासात या बंदुकीचे कोणतेही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता ही बंदूक राजापूर तालुक्यातील तळवडे पाचल येथील अनिल गुरव याच्याकडून बनवून घेतल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोद सरंगले यांनी पथकासह पाचल येथे धाड टाकून शुक्रवारी गुरव याला ताब्यात घेतले व अटक केली. यानंतर तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोद सरंगले करत आहेत.

विनापरवाना बंदूक बनवणाऱ्यास अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी Read More »

रत्नागिरीत बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला शिवसेना विरोध; जनसुनावणी रद्द करण्याची मागणी

बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध; जनसुनावणी रद्द करण्याची मागणी

रत्नागिरी (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील कुंभवडे, सागवे आणि नाणार परिसरात प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, शिवसेना (ठाकरे गट)ने या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवला आहे. कोकणच्या पर्यावरणाशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा पक्षाने दिला आहे. सुमारे १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित या प्रकल्पातून दरवर्षी ०.९ दशलक्ष टन बॉक्साईट उत्खननाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र या उत्खननामुळे भूजल पातळी घटणे, जैवविविधतेचा ऱ्हास होणे तसेच धूळ प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंबा व काजू बागायतींचे मोठे नुकसान होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसेल, असा दावा शिवसेनेने केला आहे. उत्खननामुळे नैसर्गिक जलस्रोत बाधित होऊन पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, वनक्षेत्राचे नुकसान, मृदा धूप, धूळ प्रदूषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे कोकणचा निसर्ग धोक्यात येईल, असेही पक्षाने म्हटले आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोकणातील डोंगराळ भाग व मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे भूस्खलन व नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या प्रकल्पासंदर्भात २० मे २०२६ रोजी प्रस्तावित जनसुनावणी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने सुनावणी पुढे रेटल्यास स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या जोरावर ती उधळून लावली जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस आणि तालुका प्रमुख कमलाकर कदम यांनी दिला आहे. रिफायनरी प्रकल्पाविरोधातील लढ्याप्रमाणेच या बॉक्साईट प्रकल्पाविरोधातही व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला असून, “कोणत्याही परिस्थितीत कोकणच्या निसर्गाचा आणि जनतेच्या हक्कांचा बळी देणारा प्रकल्प होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.

बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध; जनसुनावणी रद्द करण्याची मागणी Read More »

संगमेश्वरात पाणी पाइपलाईन वादातून मारहाण; सात जणांवर गुन्हा

पाणी पाइपलाईन वादातून मारहाण; सात जणांवर गुन्हा

संगमेश्वर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथे पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनवरून सुरू असलेल्या जुन्या वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सात संशयितांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर भागोजी येडगे (वय ५५, रा. कुटगिरी येडगेवाडी, सध्या रा. नवी मुंबई) आणि आरोपी हे एकाच वाडीतील रहिवासी असून, त्यांच्यात पाण्याच्या पाइपलाईन तोडण्याच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू होता. १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता या जुन्या वादाच्या रागातून संशयितांनी फिर्यादीला गाठले. यावेळी सुरेश बाबू येडगे व पांडुरंग बाबू येडगे यांनी लाकडी काठीने मानेवर व पाठीत मारहाण केली. तसेच सुरेश धोंडीबा येडगे, तुकाराम विठ्ठल येडगे, जनार्दन धोंडीबा येडगे व इतर दोन-तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. मारहाणीच्या वेळी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर शंकर येडगे यांच्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी संशयितांविरोधात बीएनएस कलम १८९ (२), १९०, १९१(२), ११८(१), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस. एस. कोलगे करत आहेत.

पाणी पाइपलाईन वादातून मारहाण; सात जणांवर गुन्हा Read More »

कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर; ५२ एकर जमीन लाटली, खंडणीची धमकी

कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर; ५२ एकर जमीन लाटून खंडणीची धमकी

मंडणगड (प्रतिनिधी) : जमीन मालकाने दिलेल्या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करून जमिनी परस्पर आपल्या नावे करून घेत, मालकाकडे खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरोधात मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीप सुनील दरिपकर व सुनील दत्तात्रय दरिपकर (दोघेही रा. घनसोली, मुंबई) अशी आरोपींची नावे असून, १७ एप्रिल रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथील महेश चामरिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १४ जुलै २०१४ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत मंडणगड तालुक्यातील बामणघर येथे जमीन खरेदी व्यवहारादरम्यान हा प्रकार घडला. आरोपींपैकी एक जण फिर्यादीकडे सुमारे १५ वर्षे फॅक्टरी मॅनेजर म्हणून कार्यरत होता, तर दुसरा गेल्या चार वर्षांपासून दापोली परिसरात जमीन खरेदी व्यवहार पाहत होता. विश्वास संपादन केल्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीस कुलमुखत्यारपत्र दिले होते. मात्र या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करत आरोपींनी फिर्यादी यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या जमिनी त्यांच्या नावावर न करता स्वतःच्या व इतर नातेवाईकांच्या नावे करून घेतल्याचा आरोप आहे. याबाबत विचारणा केल्यावर आरोपींनी फिर्यादीकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागून न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी मंडणगड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमारे ४१ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीच्या ५२ एकर जमिनीची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर; ५२ एकर जमीन लाटून खंडणीची धमकी Read More »