चिपळूण (प्रतिनिधी) : मुंढे गावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ यांच्या त्रैवार्षिक यात्रोत्सव (समा) २०२६ निमित्त २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत गावात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा भव्य संगम अनुभवायला मिळणार आहे. या सोहळ्याबाबत ग्रामस्थ व भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, मंदिर परिसर सजविणे, स्वागताची तयारी आणि विविध कार्यक्रमांची आखणी जोरात सुरू आहे. श्री केदारनाथांवरील श्रद्धेपोटी दूरदूरवरून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
बुधवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीने यात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. “श्री केदारनाथ केसरी” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित बैलगाडा चालक सहभागी होणार असून, प्रथम क्रमांकासाठी १,०१,००१ रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. इतर क्रमांकांसाठीही आकर्षक रोख पारितोषिके व मानचिन्हे देण्यात येणार आहेत.
गुरुवार, ३० एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत लाटेचे पूजन व भव्य मिरवणूक सोहळा पार पडणार आहे. मुंढे वरचीवाडी ते ग्रामदैवत मंदिर असा मार्गक्रमण करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात आणि जयघोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शुक्रवार, १ मे रोजी मुख्य यात्रोत्सव साजरा होणार आहे. सकाळी ११ वाजता ग्रामदैवत तळसर पालखीचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता पालखी भेट सोहळा होणार असून, हा कार्यक्रम भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ४ वाजता लाट फिरवणे व पालखी नाचविण्याचा पारंपरिक कार्यक्रम होणार आहे. रात्री १० ते ११ या वेळेत करमणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर “वैभव म्युझिकल नाईट, कोल्हापूर” या ऑर्केस्ट्राचे सादरीकरण होणार आहे.
या तीन दिवसीय यात्रोत्सवातून धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.















