चिपळूण (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे गणेश मित्र मंडळ, पेठमाप गणेशवाडी (ता. चिपळूण) यांच्या वतीने सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी श्री गणेश अर्चा महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवाच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये श्री गणेशाची पूजा-अर्चा, भजन-कीर्तन तसेच सत्यनारायण महापूजेचा समावेश होता. या धार्मिक विधींमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने सहभाग नोंदवला. संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमानिमित्त आयोजित सत्यनारायण पूजेस नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ, बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेवक विकी लवेकर, नगरसेवक संजय गोताड तसेच शिवसैनिक यतीन कानडे यांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि गणेश मित्र मंडळाच्या सुयोग्य नियोजनामुळे महोत्सव अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. शेवटी उपस्थितांनी प्रसादाचा लाभ घेतला.















