चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील गोवळकोट येथील स्वयंभू श्री गणेश मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
कै. विठोबा बाळा बुरटे यांच्या कृपाआशीर्वादाने आयोजित या सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ९ या वेळेत श्रींवर अभिषेक होणार असून, सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा व सार्वजनिक आरती पार पडणार आहे.
सायंकाळी ४ ते ५ या वेळेत गणेश मित्र मंडळाकडून भजन, ६ ते ७ या वेळेत सार्वजनिक हरिपाठ, तर ७ ते ९ या वेळेत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९.३० ते १०.३० या वेळेत महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
याच दिवशी स्वयंभू श्री गणेश मंदिर व राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत मंदिर पटांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदानाद्वारे सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन सोहळ्याचा लाभ घ्यावा, अशी विनंती स्वयंभू श्री गणेश मंदिर कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष जीवन बांद्रे, विश्वस्थ मंडळ तसेच गोवळकोट ग्रामस्थांनी केली आहे.















