konkandhara.com

21 अप्रैल 2026

रत्नागिरीत ऑनलाईन बँकिंग फसवणूक; ₹4.82 लाख प्रकरणी दोघे मुंबईतील दहिसरमधून अटकेत

ऑनलाईन बँकिंग फसवणूक प्रकरणी दोघे मुंबईतून अटकेत

रत्नागिरी (प्रतिनिधी) : ऑनलाईन बँकिंगद्वारे ४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना रत्नागिरी पोलिसांनी मुंबईतील दहीसर येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साखरी बौद्धवाडी येथील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२६ या कालावधीत भामट्यांनी ही रक्कम काढून घेतली होती. या प्रकरणी २१ मार्च रोजी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुर्गेश चम्मण रॉय (वय ४८) आणि अर्जुन रामसुंदर चौहान (वय ३८) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक अभय तेली व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत धागेदोरे मुंबईतील दहीसर परिसरात असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार सापळा रचून दहीसर (पूर्व) येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत दोघांनी फिर्यादीच्या खात्यातून रक्कम काढल्याची कबुली दिल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, अंमलदार संदेश मोंडे आणि सायबर पोलिस ठाण्याच्या दुर्वा शेटे यांनी केली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ऑनलाईन बँकिंग फसवणूक प्रकरणी दोघे मुंबईतून अटकेत Read More »

मंडणगडमध्ये दुचाकी अपघात; झोपेच्या डुलकीमुळे एकाचा मृत्यू, एक जखमी

झोपेची डुलकी ठरली जीवघेणी; दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी

मंडणगड (प्रतिनिधी) : पालघर ते कुंबळे दरम्यानच्या राज्यमार्गावर १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडे आठ वाजता झालेल्या भीषण अपघातात कल्पेश प्रकाश आदावडे (वय ३५, मूळ रा. चिखलगाव, ता. दापोली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विलास पांडुरंग मोहिते (वय ४८, रा. मंडणगड) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी जखमी विलास मोहिते यांनी मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित दुचाकी (एमएच ०८ एबी ४४२२) चालक कल्पेश आदावडे याला झोपेची डुलकी लागल्याने त्याने वाहनावरचे नियंत्रण गमावले. रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता अतिवेगाने व बेदरकारपणे दुचाकी चालवल्यामुळे वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन खड्ड्यात कोसळले आणि अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार आदावडे यांचा मृत्यू झाला असून ते स्वतःच्या मृत्यूस तसेच फिर्यादीच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर मंडणगड पोलीस स्थानकात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झोपेची डुलकी ठरली जीवघेणी; दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी Read More »

chiplun-market-encroachment-removal-drive-municipal-action

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम; रस्ते मोकळे करण्यासाठी कारवाई

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील मुख्य व अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जोरदार कारवाई केली. रस्त्यालगतच्या गटारांवर दुकानातील माल रचणे तसेच फेरीवाल्यांनी तेथेच दुकाने थाटल्यामुळे ही मोहीम राबविण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर दुकानातील साहित्य व विविध माल रचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नगरपरिषद ते पानगल्ली या मार्गावर अतिक्रमणाचे प्रमाण वाढल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. गटारांवर फळे, कांदे, बटाटे, प्लास्टिक साहित्य, चप्पल आदी वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच ग्रामीण भागातील काही महिला रस्त्यावरच भाजी व फळ विक्री करत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. काही ठिकाणी तर गटाराबाहेर थेट रस्त्यावरच माल मांडण्यात येत होता. याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने मुख्याधिकारी संजय जाधव यांनी याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नगरपरिषदेच्या बांधकाम विभागासह अतिक्रमण हटाव पथकाने संयुक्त मोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान गटारांवरील व रस्त्यालगतचा माल हटविण्यात आला. यापुढे अशा प्रकारे अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद ते पानगल्ली दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली असून, पुढील काळात संपूर्ण बाजारपेठेत दररोज अशी कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख संदेश टोपरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम; रस्ते मोकळे करण्यासाठी कारवाई Read More »

गुहागरमध्ये बेकायदेशीर मच्छीविक्रीवर कारवाईची मागणी | ग्रामपंचायतीचे पोलिसांना पत्र

बेकायदेशीर मच्छीविक्रीविरोधात कारवाईची मागणी

गुहागर (प्रतिनिधी) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतसमोर मच्छी विक्रीसाठी सुसज्ज मार्केट उभारण्यात आले असतानाही काही महिला विक्रेत्या नियम झुगारून शृंगारतळी मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर बसून बेकायदेशीरपणे मच्छीविक्री करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीने वेळोवेळी सूचना देऊन तसेच कारवाई करूनही संबंधित महिला वर्दळीच्या ठिकाणी उघड्यावरच मच्छी विक्री करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, या बेकायदेशीर मच्छीविक्रेत्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पादचारी व व्यापाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलांना अधिकृत मच्छीमार्केटमध्ये बसण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मान्य करण्यास नकार देत सार्वजनिक ठिकाणीच विक्री सुरू ठेवली आहे. याशिवाय, मासे साफ करताना टाकलेली खवले आणि सांडलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित महिलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

बेकायदेशीर मच्छीविक्रीविरोधात कारवाईची मागणी Read More »

संगमेश्वरमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कारवाई | हातभट्टीवर पोलिसांचा छापा

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांसह हातभट्टीवर पोलिसांची कारवाई

संगमेश्वर (प्रतिनिधी) : देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी अवैध दारू विक्री व सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया केल्या. पहाटे सुमारे १:३० वाजता कांजिवरा ते रत्नागिरी रोडवरील ओजी बिअरशॉपीसमोर सिमेंटच्या बाकावर बसून विनापरवाना बिअर पिणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अभिजीत अनंत जाधव (वय ३०) व नईम मुनवर पटेल (वय २४) अशी त्यांची नावे असून, त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०५ वाजता देवरुख खालची आळी येथील मच्छीमार्केटच्या पाठीमागे, गणेश घाटाजवळील नदीकिनारी पोलिसांनी हातभट्टीवर कारवाई केली. यावेळी निलेश बाळकृष्ण निवळकर (वय ३९) हा गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्याकडून ८ लिटर गावठी दारू व अन्य साहित्य असा एकूण ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या कारवायांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांसह हातभट्टीवर पोलिसांची कारवाई Read More »

हापूसचा आक्रसलेला हंगाम: निसर्गाची वक्रदृष्टी आणि बागायतदारांची सत्त्वपरीक्षा!

हापूसचा आक्रसलेला हंगाम आणि बागायतदारांची सत्त्वपरीक्षा

कोकणचा निसर्ग आणि तिथल्या लाल मातीचा गंध ज्या फळामध्ये एकवटला आहे, तो म्हणजे जगप्रसिद्ध हापूस आंबा. केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर भारताचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ‘फळांच्या राजा’वर यंदा निसर्गाची वक्रदृष्टी पडली आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत बाजारपेठेत चैतन्य निर्माण करणारा हापूस यंदा मात्र अस्मानी संकटांच्या फेऱ्यात अडकला असून, त्याच्या चवीचा आनंद घेण्यापूर्वीच हा हंगाम आटपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामानातील लहरीपणा, अवकाळी पावसाचा तडाखा आणि वाढते तापमान यांमुळे यंदा कोकणातील हापूसच्या उत्पादनात ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. केवळ २५ टक्केच उत्पन्न हाती आल्याने बागायतदार हवालदिल झाला असून, यंदाचा हंगाम १० मेच्या सुमारास, म्हणजेच अपेक्षेपेक्षा खूपच लवकर संपण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही केवळ एका हंगामाची घट नसून, कोकणच्या आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या आंबा व्यवसायापुढील मोठे अस्तित्वाचे संकट आहे. यंदाच्या हंगामाचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की, सुरुवातीपासूनच हापूसच्या वाटेत अडचणींचे डोंगर उभे होते. कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे १ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड झाली आहे. या अफाट क्षेत्रातून दरवर्षी साधारणपणे ३ लाख ८ हजार ४८० टन इतके विक्रमी उत्पादन अपेक्षित असते. सर्वसाधारण परिस्थितीत मोहर येण्यापासून ते काढणीपर्यंत नैसर्गिक कारणांमुळे ३० ते ४० टक्के नुकसान गृहीत धरले जाते. मात्र, यंदा हे चित्र अत्यंत भयावह आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे चक्क ८० ते ८५ टक्के पीक नष्ट झाले असून, सरासरी उत्पादनाच्या केवळ १० ते १५ टक्केच उत्पन्न प्रत्यक्षात बाजारात पोहोचण्याची शक्यता आहे. हे नुकसान ऐतिहासिक आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर पीक हातचे जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकार सांगत आहेत. या संकटाचे मूळ कारण शोधले तर ‘हवामान बदल’ (क्लायमेट चेंज) हे वास्तव अंगावर काटा आणणारे आहे. थंडीचा अभाव आणि त्यानंतर पडलेले भीषण धुके यांनी आंब्याच्या मोहराचे अस्तित्वच संपवून टाकले. परागीकरणासाठी आवश्यक असलेल्या मधमाश्या आणि इतर कीटकांना धुक्यामुळे उडणे कठीण झाले, ज्यामुळे फळधारणेची नैसर्गिक प्रक्रियाच खंडित झाली. त्यातच तुडतुडे, फुलकिडे आणि फळमाशी यांच्या वाढत्या प्रादुर्भावाने उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फेरले. विशेष म्हणजे, धुक्यामुळे करपणाऱ्या मोहराचे संरक्षण करण्यासाठी आजही बाजारात ठोस बुरशीनाशके उपलब्ध नाहीत, ही मोठी खेदाची बाब आहे. कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे निसर्गचक्रातील मधमाश्यांचे प्रमाण कमी झाले असून, त्याचे गंभीर परिणाम आता फळधारणेवर दिसू लागले आहेत. उत्पादनातील या तुटीचा थेट परिणाम मुंबईच्या एपीएमसी बाजारातील आवकवर दिसून येत आहे. दरवर्षी या दिवसांत साधारणपणे एक लाख हापूसच्या पेट्यांची दैनंदिन आवक होत असते, परंतु सध्या हे प्रमाण अवघ्या ४० हजारांवर स्थिरावले आहे. आगामी दिवसांत ते ५०-५५ हजारांपर्यंत जाईल असे वाटत असले, तरी दक्षिण भारतातून येणाऱ्या आंब्याच्या घुसखोरीने ही आकडेवारी फुगलेली दिसत आहे. कोकणातील देवगड आणि सिंधुदुर्गचा आंबा मे महिन्याच्या पहिल्या दशकातच निरोप घेणार असून, रत्नागिरीचा आंबा २५ मेपर्यंत कसाबसा तग धरेल, अशी चिन्हे आहेत. त्यानंतर गुजरात आणि जुन्नरच्या आंब्याची आवक सुरू होईल, पण कोकणच्या अस्सल हापूसची जागा कोणतीही दुसरी जात घेऊ शकणार नाही.एकीकडे उत्पादनाचा प्रश्न असतानाच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय हापूसला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आखाती देशांमध्ये सध्या असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी मार्गाने होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. सागरी वाहतूक विस्कळीत झाल्याने भारताचा हा सर्वात मोठा निर्यात बाजार यंदा हातून निसटला आहे. पर्यायी मार्ग म्हणून हवाई वाहतुकीचा विचार केला तर तिथे वाढलेल्या इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. अमेरिकेसाठी प्रति किलो ६०० रुपये आणि युरोपसाठी ४०० रुपये असा अव्वाच्या सव्वा वाहतूक खर्च असल्याने निर्यातदारांनी हात टेकले आहेत. परिणामी, दरवर्षी ६००० कोटी रुपयांची उलाढाल करणारा हापूसचा ब्रँड जागतिक बाजारपेठेत आपली चमक टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे. या सर्व गोंधळात ग्राहकांची होणारी फसवणूक ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे. कोकणातील हापूसला ‘जीआय’ (Geographical Indication) मानांकन मिळाले आहे, ज्यामुळे त्याचे वेगळेपण सिद्ध होते. मात्र, बाजारात कर्नाटकी आंबा आणि इतर राज्यांतील आंबे सर्रासपणे ‘देवगड’ किंवा ‘रत्नागिरी’ हापूसच्या नावाने विकले जात आहेत. ही भेसळ इतकी शिस्तबद्ध आहे की, परराज्यातील आंब्यांच्या पेटीत मराठी वृत्तपत्रांची रद्दी आणि कोकणच्या नावाचे छापील बॉक्स वापरून ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. अस्सल हापूसची चव न ओळखणारा सामान्य ग्राहक यामुळे फसला जात असून, निकृष्ट दर्जाचा आंबा खाल्ल्यामुळे कोकणच्या हापूसच्या जागतिक प्रतिमेला तडे जात आहेत. क्युआर कोडची व्यवस्था असली, तरी ती अजून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली नाही, ही वस्तुस्थिती प्रशासनाचे अपयश अधोरेखित करते. आज कोकणातील आंबा बागायतदार मोठ्या विवंचनेत आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, वर्षभर बागेसाठी राबणाऱ्या कामगारांचा पगार कसा द्यायचा आणि पुढच्या हंगामासाठी भांडवल कुठून उभे करायचे, असे यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभे आहेत. म्हणूनच, हेक्टरी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, ही मागणी आता तीव्र होत आहे. केवळ घोषणा न होता, जमिनीवर प्रत्यक्ष पंचनामे होऊन बागायतदाराला आधार देण्याची हीच खरी वेळ आहे. जर बागायतदार या संकटातून सावरला नाही, तर कोकणची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. शेवटी, हा केवळ एका पिकाचा प्रश्न नाही, तर तो एका संस्कृतीचा आणि अर्थकारणाचा भाग आहे. हवामान बदलाचे संकट रोखणे आपल्या हातात नसले, तरी त्यावर मात करण्यासाठी नवीन कृषी तंत्रज्ञान, बुरशीनाशकांचे संशोधन आणि भेसळ रोखण्यासाठी कडक सरकारी यंत्रणा उभारणे नक्कीच शक्य आहे. शासनस्तरावरून राज्याच्या सीमांवर कडक तपासणी होणे आणि स्थानिक पातळीवर भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. यंदाचा आंबा हंगाम कदाचित लवकर आटपेल, पण त्यातून निर्माण झालेली दाहकता भविष्यातील नियोजनासाठी डोळे उघडणारी ठरली पाहिजे. ग्राहकांनीही सजग होऊन क्यूआर कोड आणि अस्सल उत्पादकांकडूनच खरेदी करण्यावर भर दिला, तरच या ‘फळांच्या राजा’चा मान आणि बागायतदाराचा सन्मान टिकून राहील. अन्यथा, हापूसची गोडी फक्त आठवणीतच उरेल, अशी भीती वाटत आहे.

हापूसचा आक्रसलेला हंगाम आणि बागायतदारांची सत्त्वपरीक्षा Read More »