मंडणगड (प्रतिनिधी) : पालघर ते कुंबळे दरम्यानच्या राज्यमार्गावर १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडे आठ वाजता झालेल्या भीषण अपघातात कल्पेश प्रकाश आदावडे (वय ३५, मूळ रा. चिखलगाव, ता. दापोली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विलास पांडुरंग मोहिते (वय ४८, रा. मंडणगड) हे गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी जखमी विलास मोहिते यांनी मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित दुचाकी (एमएच ०८ एबी ४४२२) चालक कल्पेश आदावडे याला झोपेची डुलकी लागल्याने त्याने वाहनावरचे नियंत्रण गमावले. रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता अतिवेगाने व बेदरकारपणे दुचाकी चालवल्यामुळे वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन खड्ड्यात कोसळले आणि अपघात घडला.
या अपघातात दुचाकीस्वार आदावडे यांचा मृत्यू झाला असून ते स्वतःच्या मृत्यूस तसेच फिर्यादीच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर मंडणगड पोलीस स्थानकात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















