प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर
सावंतवाडी : भूषण सावंत : सावंतवाडी शहराच्या आरोग्य आणि पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी आज वरिष्ठ पातळीवर महत्त्वपूर्ण बैठका आणि प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या (AIIA) प्रस्तावित ओपीडीसाठी (OPD) जागेची निश्चिती करण्यासह शहरातील प्रलंबित पाणी योजना व इतर विकासकामांचा आमदार श्री दीपक भाई केसरकर आणि नगराध्यक्षा सौ.श्रद्धा राजे भोंसले यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.
आयुर्वेद संस्थानची ओपीडी लवकरच सुरू होणार
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी आज मंत्री दीपक भाई केसरकर, आयुर्वेद संस्थानचे डायरेक्टर, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ श्रद्धा राजे भोसले, सभापती आणि सर्व नगरसेवकांनी मिळून विविध जागांची पाहणी केली. या संयुक्त पाहणीत योग्य जागेची निश्चिती करण्यात येईल, आवश्यक प्रशासकीय सोपस्कर पूर्ण करून लवकरच ही ओपीडी रुग्णांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या ओपीडीमुळे सावंतवाडी व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आयुर्वेदिक उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.
पाईपलाईनच्या संथ कामावरून कंत्राटदार आणि कन्सल्टंटला थेट ताकीद
शहरात सुरू असलेल्या नवीन पाईपलाईनच्या कामाचा आढावा घेताना आमदार दीपक भाई केसरकर आणि नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काम वेळेत पूर्ण न झाल्याने दीपक भाई केसरकर यांनी कंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टर) आणि सल्लागार (कन्सल्टंट) यांना चांगलेच धारेवर धरले. लोकांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत हे काम लवकरात लवकर आणि नियमित वेळेत पूर्ण करण्याचे कडक आदेश त्यांनी दिले.
सर्व प्रलंबित प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण करा..
शहरातील पाणी योजनेव्यतिरिक्त सुरू असलेल्या सर्व नवीन विकासकामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. शहरातील एकही विकासकाम संथ गतीने चालणार नाही, ते दर्जेदार आणि वेळेतच पूर्ण झाले पाहिजेत अशा सूचना केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्याप्रसंगी आणि बैठकी दरम्यान नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सर्व सभापती, नगरसेवक तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि अभियंता उपस्थित होते.















