संगमेश्वर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथे पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनवरून सुरू असलेल्या जुन्या वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सात संशयितांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर भागोजी येडगे (वय ५५, रा. कुटगिरी येडगेवाडी, सध्या रा. नवी मुंबई) आणि आरोपी हे एकाच वाडीतील रहिवासी असून, त्यांच्यात पाण्याच्या पाइपलाईन तोडण्याच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू होता.
१७ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता या जुन्या वादाच्या रागातून संशयितांनी फिर्यादीला गाठले. यावेळी सुरेश बाबू येडगे व पांडुरंग बाबू येडगे यांनी लाकडी काठीने मानेवर व पाठीत मारहाण केली. तसेच सुरेश धोंडीबा येडगे, तुकाराम विठ्ठल येडगे, जनार्दन धोंडीबा येडगे व इतर दोन-तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.
मारहाणीच्या वेळी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर शंकर येडगे यांच्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी संशयितांविरोधात बीएनएस कलम १८९ (२), १९०, १९१(२), ११८(१), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस. एस. कोलगे करत आहेत.















