मंडणगड (प्रतिनिधी) : जमीन मालकाने दिलेल्या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करून जमिनी परस्पर आपल्या नावे करून घेत, मालकाकडे खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरोधात मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीप सुनील दरिपकर व सुनील दत्तात्रय दरिपकर (दोघेही रा. घनसोली, मुंबई) अशी आरोपींची नावे असून, १७ एप्रिल रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथील महेश चामरिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १४ जुलै २०१४ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत मंडणगड तालुक्यातील बामणघर येथे जमीन खरेदी व्यवहारादरम्यान हा प्रकार घडला. आरोपींपैकी एक जण फिर्यादीकडे सुमारे १५ वर्षे फॅक्टरी मॅनेजर म्हणून कार्यरत होता, तर दुसरा गेल्या चार वर्षांपासून दापोली परिसरात जमीन खरेदी व्यवहार पाहत होता. विश्वास संपादन केल्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीस कुलमुखत्यारपत्र दिले होते.
मात्र या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करत आरोपींनी फिर्यादी यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या जमिनी त्यांच्या नावावर न करता स्वतःच्या व इतर नातेवाईकांच्या नावे करून घेतल्याचा आरोप आहे. याबाबत विचारणा केल्यावर आरोपींनी फिर्यादीकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागून न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी फिर्यादी यांनी मंडणगड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमारे ४१ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीच्या ५२ एकर जमिनीची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.















