konkandhara.com

कोकणची बातमी

kuvarbav-slum-rehabilitation-verification-uday-samant

कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्रता पडताळणीला गती देण्याचे निर्देशपालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा आढावा बैठकीत भर

रत्नागिरी, दि. 18 (जिमाका): कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी पात्र लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करून पुढील कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. कुवारबाव ग्रामपंचायत सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी, पंचायत समिती उपसभापती गजानन धनावडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ तसेच ग्रामपंचायत प्रशासक श्रीमती तळेकर आदी उपस्थित होते. कुवारबाव येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे गरीब नागरिकांना सुरक्षित घरे उपलब्ध होऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, पात्रता निकषांबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासनाच्या निर्णयानुसारच प्रक्रिया राबवली जाईल. तसेच झोपडपट्टीतील मुलांसाठी शिक्षण, खेळ, अंगणवाडी व बालवाडी यांसारख्या सुविधा एकाच परिसरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा राज्यातील आदर्श प्रकल्प ठरेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्रता पडताळणीला गती देण्याचे निर्देशपालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा आढावा बैठकीत भर Read More »

konkandhara 50

व्हॉइस ऑफ मीडिया सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची निवड

​दोडामार्ग : भूषण सावंत : ९८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या जागतिक पत्रकार संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर, संघटनेच्या कार्याला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तालुकास्तरावर कार्यकारिणी विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ​या सभेचा मुख्य उद्देश गावपातळीवरील पत्रकारांना संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र आणणे हा होता. पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्या कामातील अडचणी समजून घेऊन त्या प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी तालुकास्तरावर सक्रिय टीम असणे आवश्यक आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यश माधव यांची तरुण, तडफदार आणि धडाकेबाज पत्रकार म्हणून असलेली ओळख संघटनेसाठी मोलाची ठरेल, या उद्देशाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माधव यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव संघटित होतील आणि संघटना अधिक बलशाली होईल, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ​या निवडीप्रसंगी जिल्हाध्यक्ष भूषण सावंत, शैलेश मयेकर, विष्णू धावडे, कार्याध्यक्ष संजय पिळणकर, मिलिंद धुरी व भूषण देसाई, सरचिटणीस अमित पालव, खजिनदार आनंद कांडरकर, उपाध्यक्ष जय भोसले, सुयोग पंडित व राजा दळवी, जनसंपर्क आणि प्रसिद्धीप्रमुख दीपक पटेकर, संघटक नयनेश गावडे, कार्यवाहक विजय सावंत आणि सदस्य रणजीत जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर यश माधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

व्हॉइस ऑफ मीडिया सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची निवड Read More »

khanoli-dashavatari-natya-mahotsav-vengurla

खानोलीत रंगणार पौराणिक नाट्य महोत्सव

दिनांक २१ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत संपन्न होणार वेंगुर्ला : प्रतिनिधीVengurla तालुक्यातील खानोली गावच्या वतीने श्री देव रवळनाथ रंगमंचावर दशावतार कलाक्षेत्रातील आघाडीच्या नाट्य मंडळांचा पौराणिक नाट्य महोत्सव २१ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. कोकणची पारंपरिक लोककला असलेल्या दशावताराचा वारसा जपत कलेला नवे व्यासपीठ देणारा हा महोत्सव २१ एप्रिल रोजी उद्घाटनाने सुरू होणार आहे. या महोत्सवात सागरेश्वर दशावतार नाट्य मंडळ आवेरे, दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग, आजगांवकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, मोचेमाडकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड, चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ आरवली आणि समारोपाच्या दिवशी खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ खानोली सादरीकरण करणार आहेत. या निमित्ताने भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या समारोपीय दिवशी भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व विशाल प्रभाकर परब, रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिलजी (बंधू साहेब) मयेकर यांच्यासह सौ. वेदिका विशाल परब, राकेश धर्णे, प्रसन्ना (बाळू) देसाई, राजन गिरप, सुहास गवंडळकर, अवी (दत्ताराम) दुतोंडकर, विजय नाईक, भालचंद्र केळुसकर, जेष्ठ रंगकर्मी संतोष रेडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पौराणिक नाट्य महोत्सवासाठी नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानोली गावचे सरपंच सुभाष खानोलकर आणि ग्रामस्थांनी केले आहे.

खानोलीत रंगणार पौराणिक नाट्य महोत्सव Read More »

दापोलीत विनापरवाना दारू वाहतूक उघड; २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

देशी दारू व बिअरची वाहतूक; २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

दापोली: विनापरवाना देशी दारू व बिअरची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाविरोधात दापोली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. या कारवाईत देशी दारू, बिअरचे बॉक्स तसेच वाहन असा एकूण २ लाख ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास दापोली बसस्थानकाजवळील चौकात वाहतूक कोंडी झाल्याने पोलिस पथक वाहतुकीचे नियमन करत होते. यावेळी मारुती इको (क्र. एमएच ०८ आर ८६३६) हे वाहन संशयास्पदरीत्या जाताना दिसले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारू व बिअरचे बॉक्स आढळून आले. चालक ऋतिक संतोष लांबे याच्याकडे मद्य बाळगण्याचा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाहन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तपासणीदरम्यान २६,८८० रुपये किमतीच्या जीएम संत्रा देशी दारूच्या १८० मिलीच्या ३३६ बाटल्या, ८,००० रुपये किमतीच्या ९० मिलीच्या २०० बाटल्या, ७,२०० रुपये किमतीचे टुबोर्ग बिअरचे ४८ टीन, ९,६०० रुपये किमतीच्या ६५० मिलीच्या टुबोर्ग बिअरच्या ४८ बाटल्या, ७,०२० रुपये किमतीच्या किंगफिशर बिअरच्या ३६ बाटल्या, ३,६०० रुपये किमतीचे किंगफिशर बिअरचे २४ टीन, ६,४८० रुपये किमतीचे लंडन पिल्सनर बिअरचे ४८ टीन, ११,८८० रुपये किमतीच्या लंडन पिल्सनर बिअरच्या ७२ बाटल्या तसेच सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण २ लाख ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दापोली पोलिस करत आहेत.

देशी दारू व बिअरची वाहतूक; २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त Read More »

गुहागर-चिपळूण मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

दुचाकी – व्हॅन अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

गुहागर : गुहागर-चिपळूण मार्गावरील चिखली येथील स्वामी समर्थ मठाजवळ टाटा मॅजिक मायक्रोव्हॅन आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १६) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ओम संतोष शितप (वय २०, रा. पवारसाखरी) आणि प्रतीक रमेश भुवड (वय २५) हे दोघे मित्र दुचाकीवरून (एमएच ०८ बीएच ८८३०) चिपळूणकडे जात होते. त्याचवेळी मळण येथील टाटा मॅजिक मायक्रोव्हॅन (एमएच १२ एचव्ही ५१९५) स्वामी समर्थ मठाजवळ प्रवाशाला सोडून श्रृंगारतळीच्या दिशेने परत जात असताना दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ओम शितप याचा जागीच मृत्यू झाला, तर प्रतीक भुवड गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत, पोलिस उपनिरीक्षक भोपाळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दुचाकी – व्हॅन अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी Read More »

konkandhara 46

राजापूर पं. स. च्या सभेत बॉक्साईट उत्खननाला विरोध

राजापूर : तालुक्यातील सागवे, नाणार आणि कुंभवडे परिसरात प्रस्तावित बॉक्साईट उत्खननाला तीव्र विरोध दर्शवत पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, असा एकमुखी ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला. या उत्खननामुळे परिसरातील आंबा बागायती तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती सदस्यांनी व्यक्त केली. किसान सभागृहात झालेल्या बैठकीला सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, गटविकास अधिकारी एस. जी. म्हेत्रे, पंचायत समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेत पाणीटंचाई, शेतकरी नुकसानभरपाई पंचनामे, जीर्ण वीज खांब बदलणे, पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांवरील झाडांची छाटणी, एसटी कर्मचाऱ्यांसाठी सुविधा तसेच तालुका कृषी कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी हलविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय, राजापूर येथील शासकीय विश्रामगृहाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत त्याबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती उपसभापती अभिजित गुरव यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुक्यातील २० ग्रामपंचायतींची निवड झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

राजापूर पं. स. च्या सभेत बॉक्साईट उत्खननाला विरोध Read More »

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई; नगरपरिषद सतर्क

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटवले

चिपळूण: येथील बाजारपेठेतील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी जोरदार कारवाई केली. रस्त्यालगतच्या गटारांवर दुकानातील माल रचून तसेच फेरीवाल्यांनी तेथेच दुकाने थाटल्याने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठेतील मुख्य रस्त्यालगत दुकानातील साहित्य व अन्य माल रचल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. नगरपरिषद ते पानगल्ली दरम्यान अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले होते. गटारांवर फळे, कांदे, बटाटे, प्लास्टिक साहित्य, चप्पल आदींची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच ग्रामीण भागातील महिला रस्त्यावरच भाजी व फळ विक्री करत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. काही ठिकाणी तर गटाराबाहेर थेट रस्त्यावरच माल मांडण्यात येत होता. याबाबत सातत्याने तक्रारी होत असल्याने मुख्याधिकारी संजय जाधव यांनी याची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नगरपरिषदेच्या बांधकाम विभागासह अतिक्रमण हटाव पथकाने संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान गटारांवर व रस्त्यालगत असलेला माल हटविण्यात आला. यापुढे गटारांवर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद ते पानगल्ली दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली असून, पुढे संपूर्ण बाजारपेठेत दररोज अशी कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख संदेश टोपरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटवले Read More »

टँकरमधून गॅस चोरी प्रकरणातील आरोपी ४ वर्षांनी अटकेत; पोलिसांची कारवाई

टँकरमधून गॅस चोरणाऱ्या आरोपीला ४ वर्षांनी अटक

रत्नागिरी: रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकातील गुन्ह्यातील एका फरार आरोपीला तब्बल चार वर्षांनी अटक करण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. बुधाराम रामलाल (वय ४२, रा. हिम्मतनगर, चंदनपुरा, ता. लोहावर, जि. जोधपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला बुधवारी रात्री पनवेल येथून ताब्यात घेण्यात आले. रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात सन २०२२ मध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३८१, ३७९, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू होता. पुढील तपासासाठी हे प्रकरण रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आले. पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. रत्नागिरी पोलिस दलाने विकसित केलेल्या एआय-आधारित ‘रेडस् ॲप’च्या मदतीने आरोपीचे चित्र पुनर्निर्मित करण्यात आले. या चित्राच्या आधारे प्रथम मुंद्रा (गुजरात) येथे शोध घेण्यात आला. मात्र आरोपी मुंबईत आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मुंबईत धाव घेतली. पनवेल येथील कळंबोली सर्कल परिसरातून बुधवारी रात्री आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलिस फौजदार बाळू जाधवर, हेडकॉन्स्टेबल विनायक राजवैद्य, बाळू पालकर आणि रमीज शेख यांच्या पथकाने केली.

टँकरमधून गॅस चोरणाऱ्या आरोपीला ४ वर्षांनी अटक Read More »

रत्नदुर्ग किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या चौघांना पोलिसांकडून ताब्यात

रत्नदुर्ग किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ला परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चौघांना रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली असून, पुढेही अशा कारवाया नियमित सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून किल्ले रत्नदुर्ग तसेच भगवती बंदर पेठ परिसरात सायंकाळी मद्यपींचा वावर वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे सहलीसाठी येणाऱ्या कुटुंबियांना व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई केली. छाप्यामध्ये काही तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत धिंगाणा घालताना आढळले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक सिद्धी सावंत, उपनिरीक्षक सागर वाळुंजकर तसेच हेडकॉन्स्टेबल पंकज पडेलकर, प्रवीण पाटील, कुशल हातिसकर आणि रोहन गमरे यांनी केली.

रत्नदुर्ग किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात Read More »

govindraoji-nikam-agriculture-college-gold-medal-achievement

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाची विद्यापीठात सुवर्ण भरारी

मांडकी-पालवण (चिपळूण)डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे पार पडलेल्या ४४ व्या पदवीदान समारंभात गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवणच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्णपदके पटकावली. कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित या महाविद्यालयातील कु. साक्षी सुभाष थोरात हिने बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमात विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल तिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या जिद्दीचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. तसेच २०१८-२२ या शैक्षणिक वर्षातील कु. समीक्षा सुरेश बोने हिने कृषी जैवतंत्रज्ञान या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. याच कालावधीतील कु. वैष्णवी पाटील हिने पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर स्तरावर सुवर्णपदक पटकावले. या तिन्ही विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम व चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. या यशामागे संस्थेचे संस्थापक कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे, प्राचार्य डॉ. संकेत कदम, डॉ. शमिका चोरगे आणि सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या यशाबद्दल सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनींचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाची विद्यापीठात सुवर्ण भरारी Read More »