मांडकी-पालवण (चिपळूण)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे पार पडलेल्या ४४ व्या पदवीदान समारंभात गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवणच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्णपदके पटकावली.
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित या महाविद्यालयातील कु. साक्षी सुभाष थोरात हिने बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमात विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल तिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या जिद्दीचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
तसेच २०१८-२२ या शैक्षणिक वर्षातील कु. समीक्षा सुरेश बोने हिने कृषी जैवतंत्रज्ञान या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. याच कालावधीतील कु. वैष्णवी पाटील हिने पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर स्तरावर सुवर्णपदक पटकावले. या तिन्ही विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम व चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
या यशामागे संस्थेचे संस्थापक कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे, प्राचार्य डॉ. संकेत कदम, डॉ. शमिका चोरगे आणि सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
या यशाबद्दल सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनींचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.















