konkandhara.com

23 अप्रैल 2026

konkandhara 28 1

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचा राजकीय डाव : भास्कर जाधव

चिपळूण: नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या माध्यमातून केंद्र सरकार देशात राजकीय अजेंडा राबवत असून, मोठ्या राज्यांतील खासदारांची संख्या वाढवून पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला. विरोधकांचा महिला आरक्षणाला विरोध नसून केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला आरक्षणाच्या विषयावर पत्रकार, विविध राजकीय पदाधिकारी तसेच समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी शिक्षक पतपेढीच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जाधव म्हणाले, केंद्र सरकारने १६ ते १८ एप्रिलदरम्यान तीन कायदे मंजूर करण्यासाठी विशेष अधिवेशन घेतले होते. मात्र विरोधात २४८ खासदारांनी मतदान केल्याने ती विधेयके फेटाळण्यात आली. नारीशक्ती वंदन विधेयक हे प्रत्यक्षात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी नसून, त्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या पाच दिवसीय अधिवेशनात महिला आरक्षणाच्या बाजूने ४५२ मते पडली होती, तर विरोधात केवळ दोन मते होती. त्यामुळे विरोधक महिला आरक्षणाच्या विरोधात असल्याचा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक पुन्हा पुढे आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदारांची संख्या ५४३ वरून ८५० करण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मतदारसंघ निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नसून तो निवडणूक आयोगाचा आहे. मात्र स्वायत्त संस्थांवर सरकारचा प्रभाव वाढल्याचाही आरोप त्यांनी केला. ठरावीक मोठ्या राज्यांना खूश ठेवून त्यांच्या बळावर पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात समाजात जनजागृती करण्याची गरज असल्याचेही जाधव यांनी नमूद केले.

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचा राजकीय डाव : भास्कर जाधव Read More »

konkandhara 25 1

उंच उडी स्पर्धेत साईश भटचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक ; सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

दोडामार्ग : भूषण सावंत : उंच उडी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत साईश सूर्यकांत भट याने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल साटेली-भेडशी पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर यांच्या हस्ते त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. दीक्षा गवस, भाजप बूथ अध्यक्ष कुणाल घाडी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुचिता भट, विजया घाडी, माजी सरपंच प्रकाश गवस, शाळेचे मुख्याध्यापक नाईक सर, पांडुरंग भट, आशाताई, तन्वी गवस, तसेच शिक्षक श्री भोसले सर, श्री नवगिरे सर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साईश भटच्या या यशामुळे शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढला असून, उपस्थित मान्यवरांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भवितव्याची कामना व्यक्त केली.

उंच उडी स्पर्धेत साईश भटचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक ; सत्कार सोहळा उत्साहात संपन्न Read More »

konkandhara 24 1

१३ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी; १ लाख रुपये दंड

चिपळूण विशेष न्यायालयाचा निकाल; जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांचा निर्णय चिपळूण : चिपळूण तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी वैभव सुरेश पालशेतकर (वय ३७, रा. चिपळूण) याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी दिला. न्यायालयीन माहितीनुसार, मार्च २०१९ मध्ये हे प्रकरण घडले होते. घटनेनंतर आरोपीने पीडितेला धमकी दिल्यामुळे ती भीतीच्या वातावरणात राहिली होती. त्यामुळे काही काळ ही बाब उघड झाली नव्हती. काही महिन्यांनंतर मुलीच्या प्रकृतीत बदल जाणवल्याने कुटुंबीयांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. पुढे पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. सुरुवातीला मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या या प्रकरणाचा गुन्हा चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण चिपळूण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. चिपळूण पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेष सरकारी अभियोक्ता अनुपमा ठाकूर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडत आरोपीविरुद्ध ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर केले. सादर पुरावे, साक्षी आणि तपासातील कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. त्यानंतर आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडाची रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी केला होता. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक चव्हाण यांनी काम पाहिले. या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणांत कठोर संदेश गेला असून

१३ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी; १ लाख रुपये दंड Read More »

konkandhara 23 1

लाडक्या बहिणींची गैरसोय खपवून घेणार नाही!चिपळूण युवासेना आक्रमक

चिपळूण : कळमुंडी गावातील “माझी लाडकी बहीण योजना” लाभार्थी महिलांना गेल्या सहा महिन्यांपासून पोस्ट ऑफिसमधून पैसे मिळत नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत युवासेना तालुका प्रमुख श्री. प्रितम नंदकुमार वंजारे यांनी आज मार्गताम्हाणे पोस्ट ऑफिसला निवेदन देत तात्काळ तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी केली. महिलांची गैरसोय त्वरित दूर करावी, अन्यथा युवासेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.

लाडक्या बहिणींची गैरसोय खपवून घेणार नाही!चिपळूण युवासेना आक्रमक Read More »

konkandhara 13 2

चिपळूणला अवकाळी पावसाचा तडाखा; मुरादपूर भोईवाडीत फांद्या कोसळल्या

चिपळूण : आज गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चिपळूण शहराला अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली, तर व्यापाऱ्यांचीही धावपळ झाली. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. याचबरोबर आंबा बागायतदारांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हाताशी आलेले आंब्याचे पीक या पावसामुळे नुकसानग्रस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. जवळपास एक तास हा अवकाळी पाऊस जोरदारपणे बरसत होता. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुरादपूर भोईवाडी येथे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याची घटना घडली आहे. पहिल्याच पावसात अशी बिकट अवस्था निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

चिपळूणला अवकाळी पावसाचा तडाखा; मुरादपूर भोईवाडीत फांद्या कोसळल्या Read More »

konkandhara 12 2

दशावतार कलेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकावणारा युवा कलाकार कृष्णा लाड सन्मानित

सावंतवाडी | प्रतिनिधी : संजय पिळणकर सावंतवाडी, ता. २३ : सिंधुदुर्गच्या समृद्ध दशावतार कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे अभ्यासू युवा कलाकार कृष्णा उर्फ साहिल शंकर लाड यांना “राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद गोवा-महाराष्ट्र राज्य २०२६” या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान पणजी येथील कला व संस्कृती भवन येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, गोवा आमदार रॉडॉल्फो फर्नांडिस, निवृत्त प्राध्यापक उल्हास प्रभू देसाई तसेच प्रसिद्ध मराठी अभिनेते अभय खडपकर यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. साहिल लाड गेली १४ वर्षे दशावतार कलेत सातत्याने कार्यरत असून त्यांच्या कलाप्रवासाची सुरुवात शालेय जीवनात, इयत्ता चौथीत असतानाच झाली. लहानपणी आई-वडिलांनी आवर्जून नाटक पाहायला नेल्याने त्यांच्या मनावर या कलेचे संस्कार झाले. त्यामुळेच ते आपल्या आई-वडिलांना आपले पहिले गुरू मानतात. आजवर त्यांनी सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ (मुंबई), खानोलकर दशावतार नाट्य मंडळ (खानोली), बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ (दोडामार्ग), मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ (मोचेमाड) तसेच रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ (हुमरस) अशा विविध नामांकित नाट्यमंडळांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या ते जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस-दांडेली (सावंतवाडी) येथे कार्यरत आहेत. या क्षेत्रात कार्य करताना त्यांना शंकर पिळणकर, गोविंद मराठे, विनोद घोणे, शंकर मेस्त्री, गणपत मांजरेकर, विलास गावस, गौरव शिर्के, दादा राणे, सिद्धार्थ मेस्त्री, ज्ञानेश्वर नाईक आणि नारायण आशियेकर यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पंढरी घाटकर, चारुदास मांजरेकर, प्रथमेश मेस्त्री आणि रमेश शिरोडकर यांच्या भूमिकांना आदर्श मानून व प्रेरणा घेत त्यांनी आपली अभिनय शैली अधिक परिपक्व केली. या राष्ट्रीय सन्मानाचे संपूर्ण श्रेय त्यांनी ज्येष्ठ कलाकार दादा राणे यांना दिले असून, त्यांच्या या यशामुळे हुमरस गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशाने दशावतार कलेला नवी उंची मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दशावतार कलेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकावणारा युवा कलाकार कृष्णा लाड सन्मानित Read More »

konkandhara 10 1

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा

वेंगुर्ला | प्रतिनिधी : संजय पिळणकर वेंगुर्ला : बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह दिनांक ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आदेशानुसार या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामागील उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे, समतेची भावना दृढ करणे आणि महान समाजसुधारकांच्या विचारांचे आत्मसात करण्यासाठी प्रेरणा देणे हे होते. या सप्ताहांतर्गत ९ एप्रिल २०२६ रोजी महाडचा चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तसेच संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. एस. एस. भिसे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी चवदार तळे सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत शोषित, वंचित व मागास समाजासाठी तो कसा क्रांतिकारक ठरला यावर सखोल प्रकाश टाकला. तसेच संत गाडगेबाबांच्या ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजप्रबोधन कार्याचा विस्तृत आढावा घेतला. या कार्यक्रमात विद्यार्थी सहभागही लक्षणीय होता. बी. ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कुमारी स्वरा गंगावणे हिने आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाचे महत्त्व स्पष्ट केले. या सत्याग्रहामुळे सर्व समाजघटकांसाठी पाण्याचा हक्क खुला झाला आणि सामाजिक समानतेचा मार्ग अधिक दृढ झाला, असे तीने सांगितले. तसेच संत गाडगेबाबांच्या स्वच्छता व समाजप्रबोधन कार्याबद्दलही तिने आपले विचार प्रभावीपणे मांडले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, सामाजिक जाणीव वाढवावी आणि समतेची भावना रुजवावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हराळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विवेक चव्हाण यांनी केले. दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. आर. के. हराळे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक विचारांचा सखोल आढावा घेतला. त्यांनी स्त्री-शिक्षण, शेतकरी व दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य, तसेच समाजातील अन्यायकारक प्रथांविरोधातील त्यांचा लढा यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्रा. डी. जी. शितोळे यांनी महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी दिलेला संघर्ष, बालविवाह व सती प्रथेसारख्या अनिष्ट रूढींविरोधातील त्यांचा लढा आणि “सर्व मानव समान आहेत” हा त्यांनी दिलेला संदेश यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेक चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एस. एस. भिसे यांनी केले. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रा. डी. जी. शितोळे, डॉ. एस. जी. चुकेवाड आणि डॉ. शिवकन्या तोडकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. या सर्व वक्त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक कार्याचा सखोल आढावा घेतला. डॉ. एस. जी. चुकेवाड यांनी आपल्या मनोगतात डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक धोरणांवर प्रकाश टाकत समाजाला दिलेल्या विविध अधिकारांविषयी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. शिवकन्या तोडकर यांनी संविधानातील स्त्रियांच्या हक्कांसाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या प्रयत्नांवर आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यात त्यांच्या योगदानावर विशेष भर दिला. तर प्रा. डी. जी. शितोळे यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या डॉ. आंबेडकर यांच्या मूलमंत्राचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी हा संदेश जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ. आंबेडकर यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड आणि विवेकशून्य विचारसरणीला दिलेला विरोध स्पष्ट केला. त्यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा स्वीकार करून भारतीय समाजाला नवा दिशा दिला, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी या विचारांचा अंगीकार करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवावे, असे त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेक चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. आर. के. हराळे यांनी केले. संपूर्ण सप्ताहात विविध व्याख्याने, विद्यार्थी मनोगते आणि विचारप्रवर्तक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता, न्याय आणि बंधुत्व यांचे मूल्य रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा Read More »

konkandhara 9 2

दशावतार हे आपल्या कोकणचे वैभव : सुनील मयेकर

वेगुर्ला | प्रतिनिधी : संजय पिळणकर वेगुर्ला : खानोली येथे पौराणिक नाट्य महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा मालगुंड या नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल उर्फ बंधू मयेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचा मानबिंदू असलेल्या दशावतार नाट्यकलेचा गौरव करत, “दशावतार हे कोकणचे वैभव आहे,” असे मत व्यक्त केले. दशावतार ही कोकणची खरी ओळख असून, या कलेच्या जतनासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. “दशावतार ही केवळ नाट्यकला नसून ती आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे,” असे ते म्हणाले. उद्घाटन कार्यक्रमात बुवा भालचंद्र केळुसकर, बाळू देसाई, शासकीय लेखापरीक्षक धर्णे, शरद चव्हाण, सदानंद मेस्त्री, सिध्देश्वर प्रभु, संतोष सनगरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी दशावतारातील पारंपरिक वेशभूषा, रंगभूषा आणि सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. खानोलीतील हा नाट्य महोत्सव आठवडाभर चालणार असून, विविध पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. या महोत्सवात स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवामुळे लोककलेला नवे व्यासपीठ मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, रसिक प्रेक्षकांकडून महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या सुनिल मयेकर यांचा खानोली ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ, बुके आणि मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.

दशावतार हे आपल्या कोकणचे वैभव : सुनील मयेकर Read More »

WhatsApp Image 2026 04 22 at 6.26.58 PM

भास्कर जाधव यांच्या शिलेदाराने केले आमदार शेखर निकम यांचे कौतुक!

पालिकेच्या कौन्सिल सभेत पवन तलावावर हेलिकॉप्टर न उतरवण्याची मागणी चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पवन तलाव मैदानाच्या संवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते भास्कर जाधव यांचे शिलेदार विकी नरळकर यांनी आमदार शेखर निकम यांच्या पवान तलावासाठीच्या विकासासाठी केलेल्या कामाचे कौतुक करत मैदानावर हेलिकॉप्टर उतरवू नये, असा ठराव करण्याची मागणी केली.चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथील तालीम हॉलमध्ये पार पडली. या सभेत विकी नरळकर यांनी पवन तलाव मैदानाच्या विकासाचा मुद्दा मांडत आमदार शेखर निकम यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, पवन तलाव मैदानाच्या विकासासाठी आमदार निकम यांनी मोठे योगदान दिले असून त्यांच्या माध्यमातून शासनाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रातील अधिसूचित विशिष्ठ नागरी सेवा व सुविधा पुरवणे योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून मैदानावर विविध विकास कामे सुरू आहेत.श्री. नरळकर यांनी पुढे सांगितले की, या मैदानावर टर्फ विकेट तयार करण्यात आली असून लेदर बॉलच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. तसेच येत्या काळात कॉमेंट्री बॉक्स उभारण्यात येणार असून त्यासाठीच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटही पूर्ण झाले आहे. मैदानावर लाईट पोल उभारण्याचाही प्रस्ताव आमदार निकम यांनी दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.या पार्श्वभूमीवर, मैदानाचा दर्जा टिकवण्यासाठी येथे हेलिकॉप्टर उतरवू नयेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. ‌‘हेलिकॉप्टर उतरल्यास मैदानाचे नुकसान होते, स्पर्धांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे याठिकाणी हेलिपॅड न ठेवता अन्यत्र व्यवस्था करावी,‌’ असा आग्रह त्यांनी धरला. यावर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट करत सांगितले की, पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून त्यांनी पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश दिले आहेत. गोवळकोट येथील मैदान, डीबीजे कॉलेज मैदान, तसेच शिवाजीनगर बस स्थानक परिसर अशा तीन जागांचा विचार सुरू असून येत्या महिन्याभरात हेलिपॅडसाठी जागा निश्चित केली जाईल. त्यानंतर पवन तलाव मैदानावर हेलिकॉप्टर न उतरवण्याचा ठराव करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेदरम्यान विकी नरळकर यांनीही समाधान व्यक्त करत तातडीने पर्यायी जागा निश्चित करण्याची मागणी केली. त्यांनी यापूर्वी पर्यटन महोत्सवाच्या वेळी पवन तलाव मैदानावर अनेक हेलिकॉप्टर उतरल्याची आठवण करून देत, ‌‘मैदानाचे नुकसान टाळण्यासाठी विलंब न करता तातडीने निर्णय घ्यावा,‌’ असे ठामपणे सांगितले. त्यांच्या या मागणीचे सर्वांनी कौतुक केले. स्वागतार्ह निर्णय- दशरथ दाभोळकर या संदर्भात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विकी नरळकर यांनी सभेत मांडलेल्या मुद्द्याचे स्वागत केले. ‌‘मैदानावर हेलिकॉप्टर उतरल्यामुळे सामने रद्द करावे लागतात आणि मैदानाची हानी होते. त्यामुळे नगर पालिकेने तातडीने पर्यायी हेलिपॅडची व्यवस्था करावी,‌’ असे त्यांनी सांगितले. त्यांनी या निर्णयाबाबत समाधानही व्यक्त केले.

भास्कर जाधव यांच्या शिलेदाराने केले आमदार शेखर निकम यांचे कौतुक! Read More »

Copy of Copy of Web Banner 7

२३ हजार कोटींची उलाढाल, तरीही कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा ‘सुपारी’ धोक्यात !

कोकणच्या लाल मातीतील आंबा आणि काजू हे पिक जगप्रसिद्ध आहे. या प्रसिद्धीच्या छायेत सुपारी हे पिक मात्र फारसे लक्षात येत नाही. कोकणच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेले हे पिक आता हवामान बदल आणि सरकारच्या सापत्न वागणुकीमुळे मोठ्या अडचणीत आले आहे. वर्षाकाठी २३ हजार ७५० कोटी रुपयांची प्रचंड उलाढाल करणारा हा बागायती उद्योग आज मरणासन्न अवस्थेत असताना, शासनदरबारी होणारी त्याची उपेक्षा म्हणजे कोकणी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर हापूस आंबा आणि काजूचे गर येतात, पण या पिकांच्या अनिश्चिततेमुळे कोकणी शेतकऱ्याने ज्या पिकाला आपला ‘हवामान-रोधक आधार’ मानले होते, ती सुपारी आज स्वतःच अस्तित्वाच्या लढाईत अडकली आहे. गेल्या दशकभरात हवामान बदलाचे जे चक्रव्यूह तयार झाले आहे, त्यात सुपारीची बागायती अक्षरशः होरपळून निघाली असून, शासनाचे डोळे अद्याप उघडायला तयार नाहीत.एकेकाळी सुपारी हे आंबा-काजूच्या तुलनेत हमखास उत्पन्न देणारे आणि सुरक्षित पीक मानले जात असे. मात्र, मागील पाच-सहा वर्षांत निसर्गाचे रूप पूर्णतः पालटले आहे. उन्हाळ्यातील असह्य तापमान वाढ आणि पावसाळ्यातील सात-सात महिने चालणारा अतिवृष्टीचा कहर यामुळे सुपारीवर ‘कोळेरोग’ आणि रस शोषणाऱ्या बुरशीने भीषण आक्रमण केले आहे. २०२५-२६ च्या हंगामात पावसाने जो धुमाकूळ घातला, त्याने बागायतदारांचे कंबरडेच मोडले. सात महिने सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणी करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य झाले आणि जी काही फवारणी केली गेली, ती पावसाने क्षणात धुवून नेली. याचा परिणाम असा झाला की, सुपारी परिपक्व होण्याआधीच झाडावरून गळून पडली आणि बागांमध्ये तब्बल ८० टक्के फळगळती झाली. जेव्हा उत्पादनात ८० टक्के घट होते, तेव्हा त्याला केवळ ‘नुकसान’ म्हणत नाहीत, तर ती एक मोठी ‘कृषी आपत्ती’ असते. तरीही, शासनाच्या महसूल विभागाला आणि कृषी खात्याला याचे गांभीर्य का समजत नाही, हाच खरा संतापजनक मुद्दा आहे. आंबा-काजूच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी धावणारे प्रशासन सुपारीच्या बागांकडे पाहतही नाही, ही वस्तुस्थिती वेदनादायी आहे. बाजारपेठेतील दरांचा विचार केला तर चित्र अत्यंत फसवे आणि क्रूर थट्टा करणारे वाटते. गेल्या पाच वर्षांतील दरांकडे नजर टाकली तर एक आभासी सुबत्ता दिसते. २०२१ मध्ये जो दर २५० ते ३०० रुपये होता, तो २०२२ मध्ये ३५० वर गेला, २०२४ मध्ये ४०० रुपयांचा टप्पा ओलांडला आणि आज २०२६ मध्ये तो ५०० ते ६०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. वरवर पाहता हा दर समाधानकारक वाटत असला तरी, शेतकऱ्याच्या हातात काहीच उरत नाहीये, कारण मुळात झाडाला सुपारीच शिल्लक राहिलेली नाही. ८० टक्के फळगळती झाल्यावर ६०० रुपये दराचा उपयोग काय? शून्याला कितीही मोठ्या दराने गुणले तरी उत्तर शून्यच येते, हे साधे गणित सरकारला कळत नाही की त्यांना ते समजून घ्यायचे नाही? मजुरीचे वाढलेले दर आणि औषधांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे ‘कॉस्ट ऑफ प्रोडक्शन’ प्रचंड वाढला आहे. सुपारीच्या उंच झाडावर चढून फवारणी करणारे कुशल ‘चढाई’ मजूर आज दुर्मिळ झाले आहेत आणि जे आहेत त्यांची मजुरी शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर गेली आहे. अशा वेळी या क्षेत्राला यांत्रिकतेची जोड देण्यासाठी किंवा मजुरीवर सवलत देण्यासाठी शासनाने कोणते पाऊल उचलले? कोकण विभागातील सुपारी क्षेत्राची व्याप्ती पाहिली तर डोळे विस्फारतात. सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर ही लागवड विस्तारलेली असून, उत्पादन पावणेपाच लाख मेट्रिक टन इतके आहे. तरीही कोकणाची स्वतःची गरज ७ लाख मेट्रिक टन आहे. आपली गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला आजही कर्नाटक आणि दक्षिण भारतातून सुपारी मागवावी लागते. जर कोकणात २३ हजार कोटींची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असेल, तर या पिकाला हवामान आधारित विमा योजनेत आणि नुकसान भरपाईच्या मापदंडात प्राधान्याने स्थान का मिळत नाही? आंबा-काजूला फटका बसला की सरकारी तिजोरीची दारे उघडतात, पण सुपारीच्या वाटेला फक्त ‘उपेक्षा’ येते.संकट फक्त निसर्गाचेच नाही, तर मानवनिर्मित चुकांचेही आहे. जंगलतोडीमुळे अन्नाच्या शोधात असलेल्या माकडांनी आता थेट मानवी वस्त्यांमधील सुपारीच्या बागांवर आक्रमण सुरू केले आहे. लाल तोंडाची माकडे सुपारीच्या सालातील रस खाऊन फळांची नासाडी करत आहेत. एका बाजूला अस्मानी संकट आणि दुसऱ्या बाजूला वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, अशा दुहेरी कात्रीत कोकणी बागायतदार अडकला आहे. यावर वनविभागाकडे ना कोणती ठोस योजना आहे, ना शेतकऱ्याला वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद. तसेच, जागतिक स्तरावर ‘WHO’ ने सुपारीला ‘कॅन्सरजन्य’ श्रेणीत ठेवल्याने निर्यातीवर टांगती तलवार आहे. यावर भारतीय संशोधन संस्थांनी आणि सरकारने आक्रमकपणे आपली बाजू मांडणे गरजेचे आहे. इंडोनेशिया आणि म्यानमारमधून होणाऱ्या स्वस्त आयातीमुळे स्थानिक बागायतदारांच्या सुपारीच्या दर्जेदार जातींना स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आयातीवर कडक निर्बंध लादणे अपेक्षित असताना, त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. सुपारीची बागायत करणे म्हणजे ७ ते १० वर्षांची कठोर तपश्चर्या असते. एका झाडाचे आयुष्य ५० वर्षे असते, म्हणजेच एकदा बागायत उद्ध्वस्त झाली की शेतकऱ्याच्या दोन पिढ्यांचे आर्थिक मरण होते. सध्या बाजारात दुय्यम प्रतीच्या मालाचे प्रमाण वाढले असून, दर्जेदार उत्पादनात घट झाली आहे. कोकणचा शेतकरी आज केवळ पावसावर अवलंबून नाही, तर तो सरकारी धोरणांच्या दुष्काळाने अधिक होरपळत आहे. जर शासनाने त्वरित सुपारी पिकाचा समावेश नैसर्गिक आपत्तीच्या मदत निकषांमध्ये केला नाही, तर येत्या काळात कोकणातून ही सुपारीची झाडे नामशेष होतील. केवळ ‘बागायती विकसित करा’ अशा पोकळ घोषणांच्या गाजरांनी आता काम होणार नाही. शासनाने हे लक्षात ठेवावे की, कोकणचा शेतकरी सोशिक आहे, पण तो लाचार नाही. जर सुपारीच्या उत्पादनातील ही ५० टक्क्यांहून अधिकची घट सरकारला दिसत नसेल, तर येत्या काळात बागायतदार आपल्या संतापाची ‘फवारणी’ सरकारवर केल्याशिवाय राहणार नाहीत. आता उपेक्षा नको, तर ठोस कृती आराखडा हवा आहे!

२३ हजार कोटींची उलाढाल, तरीही कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा ‘सुपारी’ धोक्यात ! Read More »