चिपळूण : आज गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चिपळूण शहराला अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली, तर व्यापाऱ्यांचीही धावपळ झाली. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
याचबरोबर आंबा बागायतदारांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हाताशी आलेले आंब्याचे पीक या पावसामुळे नुकसानग्रस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. जवळपास एक तास हा अवकाळी पाऊस जोरदारपणे बरसत होता. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, मुरादपूर भोईवाडी येथे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याची घटना घडली आहे. पहिल्याच पावसात अशी बिकट अवस्था निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.















