वेंगुर्ला | प्रतिनिधी : संजय पिळणकर
वेंगुर्ला : बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह दिनांक ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आदेशानुसार या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामागील उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे, समतेची भावना दृढ करणे आणि महान समाजसुधारकांच्या विचारांचे आत्मसात करण्यासाठी प्रेरणा देणे हे होते.
या सप्ताहांतर्गत ९ एप्रिल २०२६ रोजी महाडचा चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तसेच संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. एस. एस. भिसे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी चवदार तळे सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत शोषित, वंचित व मागास समाजासाठी तो कसा क्रांतिकारक ठरला यावर सखोल प्रकाश टाकला. तसेच संत गाडगेबाबांच्या ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजप्रबोधन कार्याचा विस्तृत आढावा घेतला.
या कार्यक्रमात विद्यार्थी सहभागही लक्षणीय होता. बी. ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कुमारी स्वरा गंगावणे हिने आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाचे महत्त्व स्पष्ट केले. या सत्याग्रहामुळे सर्व समाजघटकांसाठी पाण्याचा हक्क खुला झाला आणि सामाजिक समानतेचा मार्ग अधिक दृढ झाला, असे तीने सांगितले. तसेच संत गाडगेबाबांच्या स्वच्छता व समाजप्रबोधन कार्याबद्दलही तिने आपले विचार प्रभावीपणे मांडले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, सामाजिक जाणीव वाढवावी आणि समतेची भावना रुजवावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हराळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विवेक चव्हाण यांनी केले.
दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. आर. के. हराळे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक विचारांचा सखोल आढावा घेतला. त्यांनी स्त्री-शिक्षण, शेतकरी व दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य, तसेच समाजातील अन्यायकारक प्रथांविरोधातील त्यांचा लढा यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डी. जी. शितोळे यांनी महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी दिलेला संघर्ष, बालविवाह व सती प्रथेसारख्या अनिष्ट रूढींविरोधातील त्यांचा लढा आणि “सर्व मानव समान आहेत” हा त्यांनी दिलेला संदेश यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेक चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एस. एस. भिसे यांनी केले.
१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रा. डी. जी. शितोळे, डॉ. एस. जी. चुकेवाड आणि डॉ. शिवकन्या तोडकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. या सर्व वक्त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक कार्याचा सखोल आढावा घेतला.
डॉ. एस. जी. चुकेवाड यांनी आपल्या मनोगतात डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक धोरणांवर प्रकाश टाकत समाजाला दिलेल्या विविध अधिकारांविषयी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. शिवकन्या तोडकर यांनी संविधानातील स्त्रियांच्या हक्कांसाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या प्रयत्नांवर आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यात त्यांच्या योगदानावर विशेष भर दिला. तर प्रा. डी. जी. शितोळे यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या डॉ. आंबेडकर यांच्या मूलमंत्राचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी हा संदेश जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ. आंबेडकर यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड आणि विवेकशून्य विचारसरणीला दिलेला विरोध स्पष्ट केला. त्यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा स्वीकार करून भारतीय समाजाला नवा दिशा दिला, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी या विचारांचा अंगीकार करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवावे, असे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेक चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. आर. के. हराळे यांनी केले. संपूर्ण सप्ताहात विविध व्याख्याने, विद्यार्थी मनोगते आणि विचारप्रवर्तक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता, न्याय आणि बंधुत्व यांचे मूल्य रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.















