konkandhara.com

Editorial

konkandhara 46

राजापूर पं. स. च्या सभेत बॉक्साईट उत्खननाला विरोध

राजापूर : तालुक्यातील सागवे, नाणार आणि कुंभवडे परिसरात प्रस्तावित बॉक्साईट उत्खननाला तीव्र विरोध दर्शवत पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, असा एकमुखी ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला. या उत्खननामुळे परिसरातील आंबा बागायती तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती सदस्यांनी व्यक्त केली. किसान सभागृहात झालेल्या बैठकीला सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, गटविकास अधिकारी एस. जी. म्हेत्रे, पंचायत समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेत पाणीटंचाई, शेतकरी नुकसानभरपाई पंचनामे, जीर्ण वीज खांब बदलणे, पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांवरील झाडांची छाटणी, एसटी कर्मचाऱ्यांसाठी सुविधा तसेच तालुका कृषी कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी हलविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय, राजापूर येथील शासकीय विश्रामगृहाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत त्याबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती उपसभापती अभिजित गुरव यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुक्यातील २० ग्रामपंचायतींची निवड झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

राजापूर पं. स. च्या सभेत बॉक्साईट उत्खननाला विरोध Read More »

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई; नगरपरिषद सतर्क

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटवले

चिपळूण: येथील बाजारपेठेतील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी जोरदार कारवाई केली. रस्त्यालगतच्या गटारांवर दुकानातील माल रचून तसेच फेरीवाल्यांनी तेथेच दुकाने थाटल्याने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठेतील मुख्य रस्त्यालगत दुकानातील साहित्य व अन्य माल रचल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. नगरपरिषद ते पानगल्ली दरम्यान अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले होते. गटारांवर फळे, कांदे, बटाटे, प्लास्टिक साहित्य, चप्पल आदींची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच ग्रामीण भागातील महिला रस्त्यावरच भाजी व फळ विक्री करत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. काही ठिकाणी तर गटाराबाहेर थेट रस्त्यावरच माल मांडण्यात येत होता. याबाबत सातत्याने तक्रारी होत असल्याने मुख्याधिकारी संजय जाधव यांनी याची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नगरपरिषदेच्या बांधकाम विभागासह अतिक्रमण हटाव पथकाने संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान गटारांवर व रस्त्यालगत असलेला माल हटविण्यात आला. यापुढे गटारांवर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद ते पानगल्ली दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली असून, पुढे संपूर्ण बाजारपेठेत दररोज अशी कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख संदेश टोपरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटवले Read More »

टँकरमधून गॅस चोरी प्रकरणातील आरोपी ४ वर्षांनी अटकेत; पोलिसांची कारवाई

टँकरमधून गॅस चोरणाऱ्या आरोपीला ४ वर्षांनी अटक

रत्नागिरी: रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकातील गुन्ह्यातील एका फरार आरोपीला तब्बल चार वर्षांनी अटक करण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. बुधाराम रामलाल (वय ४२, रा. हिम्मतनगर, चंदनपुरा, ता. लोहावर, जि. जोधपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला बुधवारी रात्री पनवेल येथून ताब्यात घेण्यात आले. रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात सन २०२२ मध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३८१, ३७९, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू होता. पुढील तपासासाठी हे प्रकरण रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आले. पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. रत्नागिरी पोलिस दलाने विकसित केलेल्या एआय-आधारित ‘रेडस् ॲप’च्या मदतीने आरोपीचे चित्र पुनर्निर्मित करण्यात आले. या चित्राच्या आधारे प्रथम मुंद्रा (गुजरात) येथे शोध घेण्यात आला. मात्र आरोपी मुंबईत आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मुंबईत धाव घेतली. पनवेल येथील कळंबोली सर्कल परिसरातून बुधवारी रात्री आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलिस फौजदार बाळू जाधवर, हेडकॉन्स्टेबल विनायक राजवैद्य, बाळू पालकर आणि रमीज शेख यांच्या पथकाने केली.

टँकरमधून गॅस चोरणाऱ्या आरोपीला ४ वर्षांनी अटक Read More »

रत्नदुर्ग किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या चौघांना पोलिसांकडून ताब्यात

रत्नदुर्ग किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ला परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चौघांना रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली असून, पुढेही अशा कारवाया नियमित सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून किल्ले रत्नदुर्ग तसेच भगवती बंदर पेठ परिसरात सायंकाळी मद्यपींचा वावर वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे सहलीसाठी येणाऱ्या कुटुंबियांना व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई केली. छाप्यामध्ये काही तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत धिंगाणा घालताना आढळले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक सिद्धी सावंत, उपनिरीक्षक सागर वाळुंजकर तसेच हेडकॉन्स्टेबल पंकज पडेलकर, प्रवीण पाटील, कुशल हातिसकर आणि रोहन गमरे यांनी केली.

रत्नदुर्ग किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात Read More »

govindraoji-nikam-agriculture-college-gold-medal-achievement

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाची विद्यापीठात सुवर्ण भरारी

मांडकी-पालवण (चिपळूण)डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे पार पडलेल्या ४४ व्या पदवीदान समारंभात गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवणच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्णपदके पटकावली. कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित या महाविद्यालयातील कु. साक्षी सुभाष थोरात हिने बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमात विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल तिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या जिद्दीचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. तसेच २०१८-२२ या शैक्षणिक वर्षातील कु. समीक्षा सुरेश बोने हिने कृषी जैवतंत्रज्ञान या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. याच कालावधीतील कु. वैष्णवी पाटील हिने पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर स्तरावर सुवर्णपदक पटकावले. या तिन्ही विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम व चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. या यशामागे संस्थेचे संस्थापक कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे, प्राचार्य डॉ. संकेत कदम, डॉ. शमिका चोरगे आणि सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या यशाबद्दल सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनींचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाची विद्यापीठात सुवर्ण भरारी Read More »

लोकशाहीचे परिसीमन आणि संघराज्यात्मक समतोल : एक गंभीर मंथन

लोकशाहीचे परिसीमन आणि संघराज्यात्मक समतोल: एक गंभीर मंथन

भारतीय लोकशाहीच्या प्रवासात आज एका नव्या आणि अत्यंत संवेदनशील टप्प्यावर आपण येऊन ठेपलो आहोत. संसदेतील जागांची संख्या वाढवणे आणि त्याद्वारे लोकशाहीचे सक्षमीकरण करणे हा वरकरणी तांत्रिक वाटणारा विषय असला, तरी त्याच्या मुळाशी भारताच्या संघराज्यात्मक रचनेचे भवितव्य दडलेले आहे. संविधानातील १३१ व्या दुरुस्ती विधेयकाच्या प्रस्तावाने सध्या देशात एक वैचारिक मंथन सुरू झाले असून, त्याचे पडसाद विशेषतः दक्षिण भारतात उमटत आहेत. लोकसंख्येच्या आधारावर संसदेतील जागांचे पुनर्वितरण करणे ही लोकशाहीतील ‘एक व्यक्ती, एक मत’ या तत्त्वाची पूर्तता वाटत असली, तरी व्यावहारिक पातळीवर हे तत्त्व भारताच्या विविधतेसाठी आणि प्रगतीसाठी एक अघोषित दंड ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.स्वातंत्र्योत्तर काळात भारताने जेव्हा नियोजनाचा मार्ग स्वीकारला, तेव्हा वाढती लोकसंख्या हे विकासातील सर्वात मोठे आव्हान मानले गेले होते. १९७० च्या दशकात केंद्र सरकारने सर्व राज्यांना लोकसंख्या नियंत्रणासाठी कडक पावले उचलण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दक्षिण भारतातील राज्यांनी—विशेषतः तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणावर भर देऊन आपली लोकसंख्या यशस्वीपणे मर्यादित केली. ही राज्यांची एक ऐतिहासिक कामगिरी होती, जिचा फायदा संपूर्ण देशाला झाला. मात्र, आज जेव्हा संसदेतील जागा वाढवण्याची चर्चा सुरू आहे, तेव्हा याच लोकसंख्या नियंत्रणाला राज्यांच्या राजकीय प्रभावातील घटीचे कारण बनवले जात आहे. हा विरोधाभास लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी घातक आहे. ज्या राज्यांनी राष्ट्रीय धोरणांचे प्रामाणिकपणे पालन केले, त्यांना संसदेतील त्यांचे प्रतिनिधित्व कमी करून शिक्षा दिली जाणे, हे कोणत्या न्यायात बसते, हा आजचा कळीचा प्रश्न आहे. परिसीमनाच्या सध्याच्या प्रस्तावानुसार, उत्तर भारतातील राज्यांमध्ये जिथे लोकसंख्या वाढीचा वेग अधिक राहिला आहे त्या राज्यांमध्ये संसदेतील जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याउलट, दक्षिण भारतातील राज्यांच्या जागांमध्ये होणारी वाढ ही अतिशय नगण्य असेल. यामुळे लोकसभेतील राजकीय शक्तीचे केंद्र पूर्णपणे उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, केवळ हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यांच्या जोरावर एखादा पक्ष केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करू शकेल. जर असे झाले, तर दक्षिण भारत, ईशान्य भारत आणि अन्य लहान राज्यांचा आवाज राष्ट्रीय राजकारणात दुय्यम ठरेल. लोकशाहीमध्ये केवळ संख्याबळ महत्त्वाचे नसते, तर सर्व घटकांचा समावेशक सहभाग अनिवार्य असतो. जर ठराविक भौगोलिक क्षेत्राचे वर्चस्व निर्माण झाले, तर ते संघराज्याच्या मूळ संकल्पनेला तडा देणारे ठरेल. या प्रश्नाचा दुसरा पैलू आर्थिक वितरणाशी संबंधित आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत दक्षिण भारतातील राज्यांचे योगदान मोलाचे आहे. ही राज्ये केंद्राला मोठ्या प्रमाणात कर (GST) देतात, परंतु त्या बदल्यात त्यांना मिळणारा वाटा हा त्यांच्या योगदानाच्या तुलनेत खूपच कमी असतो. उदाहरणार्थ, काही उत्तरेकडील राज्ये केंद्राला एक रुपया कर देतात तेव्हा त्यांना त्या बदल्यात सहा ते सात रुपये परत मिळतात, तर दक्षिणेकडील राज्यांना त्यांच्या एक रुपयाच्या बदल्यात केवळ २५ ते ३० पैसे मिळतात. ही आर्थिक विषमता आधीच अस्तित्वात असताना, आता जर त्यांचे राजकीय प्रतिनिधित्वही कमी झाले, तर भविष्यात त्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण कोण करणार? राजकीय शक्ती कमी झाली की धोरणनिर्मितीमध्ये राज्यांचा प्रभाव कमी होतो आणि पर्यायाने संसाधनांचे वाटपही एकांगी होण्याची भीती असते. परिसीमनाच्या या प्रक्रियेत ‘जेरीमँडरिंग’ सारख्या संकल्पनांची चर्चा होणे स्वाभाविक आहे. राजकीय फायद्यासाठी मतदारसंघांच्या सीमांची आखणी करणे, हे लोकशाहीसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. जर ही प्रक्रिया पारदर्शक नसेल आणि केवळ लोकसंख्येच्या आकड्यांवर आधारित असेल, तर ती एका मोठ्या वर्गाला मुख्य प्रवाहातून बाहेर फेकणारी ठरू शकते. लोकशाहीमध्ये केवळ डोकी मोजणे पुरेसे नसते, तर त्या डोक्यांमधील विचार, त्यांच्या आकांक्षा आणि त्यांनी दिलेले योगदान यांचाही विचार होणे आवश्यक असते. दक्षिण भारताने केवळ लोकसंख्याच नियंत्रित केली नाही, तर माहिती तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्र आणि कौशल्याच्या जोरावर देशाला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले. उत्तर भारतातील अनेक तरुणांना दक्षिणेतील शहरांनी रोजगार दिला, तिथे त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या. अशा प्रकारे देशाच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या प्रदेशाला राजकीयदृष्ट्या कमकुवत करणे, ही कृतघ्नता ठरेल. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केवळ लोकसंख्या हा एकमेव निकष न ठेवता, एक संमिश्र मॉडेल स्वीकारण्याची गरज आहे. लोकसभेतील निम्म्या जागा लोकसंख्येच्या आधारावर वाढवल्या गेल्या, तरी उरलेल्या निम्म्या जागा राज्यांचा विकास, साक्षरता दर, आरोग्य सुविधांमधील प्रगती आणि आर्थिक योगदान या निकषांवर आधारित असाव्यात. यामुळे प्रगती करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या अधिक आहे, तिथल्या मतदारांनाही पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल. लोकशाहीचा अर्थ केवळ बहुसंख्याकांचे शासन असा नसून, तो अल्पसंख्याक आणि प्रगत विचारांच्या घटकांच्या संरक्षणाशीही निगडित आहे. संसदेतील जागांची पुनर्रचना करताना उत्तर आणि दक्षिण असा संघर्ष निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे ही केंद्र सरकारची आणि सर्व राजकीय पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे.संविधानातील दुरुस्ती ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून ती एक सामाजिक करार आहे. १९७१ च्या जनगणनेनुसार जागा गोठवण्याचा निर्णय घेण्यामागे एक दूरदृष्टी होती, ती म्हणजे राज्यांमध्ये लोकसंख्या वाढवण्याची स्पर्धा लागू नये. आता ती मर्यादा संपत असताना, नवीन निकष लावताना सर्व राज्यांना विश्वासात घेणे अनिवार्य आहे. विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न केवळ राजकीय विरोधासाठी नसून, ते देशाच्या अखंडतेशी जोडलेले आहेत. भारताची विविधता ही आपली शक्ती आहे, ती आपली कमजोरी बनता कामा नये. जर एका विशिष्ट भागाला असे वाटू लागले की त्यांच्या प्रगतीमुळेच त्यांना राजकीयदृष्ट्या डावलले जात आहे, तर तो असंतोष देशाच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतो. शेवटी, संसद हे देशाचे प्रतिबिंब असते. या प्रतिबिंबात देशाचा प्रत्येक कोपरा स्पष्टपणे आणि प्रभावीपणे दिसायला हवा. उत्तर भारताच्या लोकसंख्येचा आदर करतानाच दक्षिण भारताच्या गुणवत्तेचा आणि शिस्तीचा अपमान होणार नाही, असा मध्यममार्ग काढणे हीच काळाची गरज आहे. केवळ निवडणुकीतील विजयाचे गणित मांडण्यापेक्षा, ‘राष्ट्र’ म्हणून आपण एकत्रितपणे कसे पुढे जाऊ शकतो, याचा विचार होणे अपेक्षित आहे. लोकशाहीच्या या महान मंदिरात प्रत्येक राज्याचा आवाज तितक्याच सन्मानाने घुमला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीचे संवर्धन होईल. सीमांकन हे राज्यांच्या विभाजनाचे नव्हे, तर विकासाच्या समान संधीचे साधन बनायला हवे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि व्यापक राष्ट्रीय दृष्टीकोन यांची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा, आकड्यांच्या या खेळात लोकशाहीचा मूळ आत्मा हरवून जाण्याची भीती नाकारता येत नाही.

लोकशाहीचे परिसीमन आणि संघराज्यात्मक समतोल: एक गंभीर मंथन Read More »

RAIDS Appमुळे ४ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद; रत्नागिरी पोलिसांची कारवाई

‘RAIDS App’च्या मदतीने ४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक

रत्नागिरी : प्रतिनिधीरत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित “RAIDS App”च्या सहाय्याने तब्बल चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने १५ डिसेंबर २०२५ रोजी “RAIDS App” विकसित केले असून या अॅपच्या माध्यमातून गुन्हे तपासात आधुनिक तांत्रिक मदत मिळत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या सहाय्याने फरार आरोपी तसेच हरवलेल्या व्यक्तींचे फोटो अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीने (रेकन्स्ट्रक्ट) पुनर्निर्मित करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्तींची ओळख पटवणे आणि मागोवा घेणे अधिक सोपे व जलद झाले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९६/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल असलेला बुधाराम रामलाल राठोड (वय ४२, मूळ रा. हिम्मत नगर, ग्रामपंचायत चंदनगुडा, ता. लोहार, जि. जोधपूर, राजस्थान) हा आरोपी चार वर्षांपासून फरार होता. तो गुजरात राज्यातील सुरत येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी “RAIDS App”च्या मदतीने त्याचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी मुंबई येथे आल्याची खात्री पटताच १५ एप्रिल २०२६ रोजी पनवेल येथील कळंबोली परिसरातून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. टी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने केली. पथकात पोलीस अंमलदार वासुदेव जाधव, विनायक राठोड, बाबू पाळकर व रामजी शेख यांचा समावेश होता.

‘RAIDS App’च्या मदतीने ४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक Read More »

प्रवाशांच्या समस्या सुटल्याशिवाय दुपदरीकरणाला विरोध – शौकत मुकादम

प्रवाशांच्या समस्या सोडवल्याशिवाय कोकण रेल्वे दुपदरीकरण होऊ देणार नाही – शौकत मुकादम

चिपळूण : संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग दुपदरी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू असून सुमारे २६३ किलोमीटर मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोकणातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय दुपदरीकरणाचे काम होऊ देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून चिपळूण-दादर पॅसेंजर सुरू करणे, चिपळूण-कराड रेल्वे मार्गाची मागणी तसेच स्थानिक प्रवाशांच्या विविध अडचणी प्रलंबित असल्याचे नमूद केले आहे. मुकादम पुढे म्हणाले की, कोकणातून धावणाऱ्या गाड्यांचा फायदा स्थानिकांपेक्षा परप्रांतीय प्रवाशांना अधिक होत आहे. काही स्थानिकांसाठी सुरू असलेल्या गाड्या बंद करण्यात येत असून सिग्नलच्या कारणांवरून दिशाभूल केली जात आहे. मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नाही तसेच बसायलाही जागा मिळत नसल्याने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गाड्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच चिपळूण जंक्शन येथे सर्व सुपरफास्ट गाड्यांना थांबा देणे आणि दादर-चिपळूण स्वातंत्र्य गाडी सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. कोकण रेल्वेसाठी स्थानिकांनी जमीन दिली असताना त्यांच्याच प्रवासाची गैरसोय होणे अन्यायकारक असल्याचे सांगत, स्थानिकांना रेल्वे भरतीतही न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय दुपदरीकरणाचे काम होऊ देणार नाही, असा ठाम इशारा मुकादम यांनी दिला असून यामुळे कोकण रेल्वेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

प्रवाशांच्या समस्या सोडवल्याशिवाय कोकण रेल्वे दुपदरीकरण होऊ देणार नाही – शौकत मुकादम Read More »

बांधकाम कामगार समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची नियुक्ती

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्थानिक सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव

गुहागर: गुहागर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत स्थानिक सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी आमदार भास्करराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार जाधव यांच्या शिफारशीने उमेश प्रभाकर महाडिक, नदीम युसुफ काकडे, मंगेश कृष्णा माटे, सौ. साक्षी शेखर चव्हाण व सौ. वर्षा राजेंद्र चव्हाण यांची सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. या समितीमार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ कामगारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्य केले जाणार आहे.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्थानिक सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव Read More »

कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात

विद्यार्थ्यांनी विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करावी – सुरेश प्रभू दापोली: दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश प्रभू यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रात विविध आव्हाने असली तरी त्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याच्या माध्यमातून ही क्षमता विकसित केली आहे. पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे १४ टक्के असून उर्वरित ८६ टक्के हिस्सा सेवा व उत्पादन क्षेत्राचा आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी पदवीधरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानामुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत असली तरी त्यामध्येच संधी शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतीमध्ये जितकी संकटे तितक्याच संधी” हा दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यापीठात ६५ टक्के विद्यार्थिनी शिक्षण घेत असून सुवर्णपदक विजेत्यांमध्येही मुलींचा मोठा सहभाग आहे. तसेच विद्यापीठाला ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या समारंभात कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वनशास्त्र, उद्यानविद्या आणि मत्स्यशास्त्र अशा विविध शाखांतील डॉक्टरेट, पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध वर्षांतील सुवर्णपदके व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मकरंद करमरकर यांनी केले.

कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात Read More »