konkandhara.com

Editorial

कासारकोळवण पुलास ६.५० कोटींची मंजुरी; ४५ वर्षांची प्रतीक्षा संपली

कासारकोळवण गावासाठी साडेसहा कोटींच्या पुलास मंजुरी; ४०-४५ वर्षांची प्रतीक्षा संपली

सावर्डे : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील कासारकोळवण गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेत आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून सुमारे ६.५० कोटी रुपयांच्या पुलास मंजुरी मिळाली आहे. गेल्या चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. कासारकोळवण गावाच्या दळणवळणासाठी पूल अत्यावश्यक होता. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यामुळे गावाचा संपर्क तुटत असे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी विधिमंडळात प्रश्न मांडत तसेच CRF (Central Road Fund) अंतर्गत निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अखेर पुलाच्या कामास मंजुरी मिळवली. या निर्णयाची माहिती मिळताच कासारकोळवण गावातील ग्रामस्थांनी सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन आमदार निकम यांचे अभिनंदन केले व आभार मानले. यावेळी सरपंच सौ. मानसी करंबेळे, उपसरपंच प्रकाश तोरस्कर, पोलीस पाटील महेंद्र करंबेळे, तंटामुक्ती अध्यक्ष नथुराम करंबेळे, राजाराम तोरस्कर (गुरुजी), सुहास मांगले (माजी ग्रामपंचायत सदस्य), उल्हास मांगले, सोन्या मांगले, बाळकृष्ण तोरस्कर, रोशन कदम, प्रशांत करंबेळे, सदानंद करंबेळे (ग्रामपंचायत सदस्य) तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ग्रामस्थांनी भावना व्यक्त करत हा पूल गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे मनापासून आभार मानले.

कासारकोळवण गावासाठी साडेसहा कोटींच्या पुलास मंजुरी; ४०-४५ वर्षांची प्रतीक्षा संपली Read More »

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सहभागी व्हा – आमदार भास्कर जाधव

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हाआमदार भास्कर जाधव यांचे आवाहन

चिपळूण : ‘माझं गाव आरोग्य संपन्न असले पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी. आरोग्यविषयक तक्रारींवर योग्य उपाय जाणून घेऊन शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती पोहोचली पाहिजे. गाव ते राज्य पातळीपर्यंत सर्वांनी या मोहिमेत मिशन म्हणून सहभागी व्हावे,’ असे आवाहन गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी सकाळी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, संजय कदम, दीप्ती महाडिक, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती बापू आयरे, सदस्य शौकत माखजनकर, विनोद झगडे, तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. अजय सानप व डॉ. ज्योती यादव यांनी आरोग्यविषयक विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. आमदार जाधव यांनी सांगितले की, या मोहिमेत सहभागी होणाऱ्या व उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत, त्यामुळे सर्व गावांनी उत्साहाने सहभाग घ्यावा. तसेच मुलींमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. ही लस अधिकाधिक मुलींनी घ्यावी, यासाठी लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य पर्यवेक्षक आर. के. पवार, नारायण शिंगवा, मनोहर तायडे, विनायक हेगडे, काका चव्हाण, आरोग्य सहाय्यक एस. वाय. जानवलकर आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन इकबाल चौगुले यांनी केले.

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हाआमदार भास्कर जाधव यांचे आवाहन Read More »

लांज्यात टेम्पो-ट्रक भीषण अपघात; चालक ठार, दोघे गंभीर

जात टेम्पो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; एक ठार

प्रतिनिधी – कोकणधारा लांजा : तालुक्यातील वाटुळ-दाभोळे मार्गावर पालू तिठा येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) पहाटे साडेपाचच्या सुमारास आयशर टेम्पो आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो आणि समोरून येणारा ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली.धडक इतकी भीषण होती की आयशर टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. या अपघातात टेम्पो चालक मुजाहिद गफूर मुजावर (वय २६, रा. राजापूर, रानतळे आंबेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका वेळेवर घटनास्थळी न पोहोचल्याने मदतकार्याला उशीर झाला आणि चालकाचा जीव वाचवता आला नाही, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. या अपघातात आयशर टेम्पोमधील आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

जात टेम्पो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; एक ठार Read More »

मुंबई-गोवा महामार्ग कामावर प्रश्नचिन्ह; गडकरींच्या डेडलाईनवर शंका

मुंबई-गोवा महामार्ग: गडकरी साहेब, घोषणांची ‘टोलवाटोलवी’ थांबवा; जमिनीवरची ‘वास्तुस्तीती’ पहा!

मुंबई-गोवा महामार्गाचे काम म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कधीही न संपणारे दुस्वप्न बनले आहे. गेली दीड दशके कोकणवासीय ज्या मार्गाची चातकासारखी वाट पाहत आहेत, त्या मार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सिंधुदुर्गातील कार्यक्रमात ‘महिन्याभरात काम पूर्ण होईल’ अशी घोषणा केली. मंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा म्हटलं, तर कोकणी माणसाच्या पदरात आजवर केवळ आश्वासनांचे तुकडेच पडले आहेत. गडकरींच्या या नव्या डेडलाईनमध्ये आणि जमिनीवरील वास्तवात इतकी मोठी दरी आहे की, आता ही घोषणा म्हणजे निव्वळ काहीतरी आश्वासन द्यायचे म्हणून मारलेली ‘फेक’ तर नाही ना, अशी शंका येते. कागदावरचा वेग आणि वास्तवातला कामातील संथपणा पाहता, हा महामार्ग पूर्ण व्हायला अजून किमान चार ते सहा महिने लागतील, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. जर पावसाळ्यापूर्वी ही कामे आटोपली नाहीत, तर कोकणी माणसाचा प्रवास पुन्हा एकदा चिखलातून, खड्ड्यातून आणि मृत्यूच्या सावटातूनच होणार, यात तीळमात्र शंका उरलेली नाही. सरकारला कोकणच्या जनतेच्या संयमाची परीक्षा घ्यायची सवयच लागली आहे, पण आता हा संयम सुटत चालला आहे. संगमेश्वरपासून पळस्पेपर्यंतचा प्रवास म्हणजे आजही अडथळ्यांची शर्यतच आहे. चिपळूण, खेड, नागोठणे, कोलाड आणि संगमेश्वर येथील उड्डाणपुलांची अवस्था पाहिल्यावर सरकारला जाब विचारायची इच्छा होते की, नेमकी कसली डेडलाईन तुम्ही जाहीर करताय? चिपळूणमधील उड्डाणपुलाची मुदत ३१ मे २०२६ पर्यंत आहे, तर मग महिनाभरात मार्ग पूर्ण होण्याच्या गमजा कशासाठी? संगमेश्वरच्या पुलाची एक बाजू उघडी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. कोलाड आणि नागोठणे येथील पुलांची कामे अजूनही रखडलेलीच आहेत. नागोठणे येथील पुलाची मुदत एप्रिल २०२६ असताना मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या आधारावर महिनाभराचा दावा केला? हा केवळ तांत्रिक विसंगतीचा मुद्दा नाही, तर हा जनतेच्या विश्वासाशी केलेला खेळ आहे. खेडच्या उड्डाणपुलाचे काम तर इतक्या संथगतीने सुरू आहे की, त्याला नेमकी डेडलाईन काय, हे सांगायलाही प्रशासनाकडे शब्द उरलेले नाहीत. परशुराम घाटातील परिस्थिती तर अजूनही भीषण आहे. तेथे एका बाजूने वाहतूक सुरू करून आपण काय साध्य केले? संरक्षक भिंतीचे काम अद्याप अनिश्चित काळासाठी लटकलेले आहे. यालाच काय ‘गतिमान विकास’ म्हणायचे? महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत बोलायचे तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्ग म्हटल्यावर ज्या सुविधा अभिप्रेत असतात, त्यांचा मागमूसही येथे नाही. पूर्ण झालेल्या पट्ट्यांमध्येही अद्याप वीजपुरवठा नाही. रात्रीच्या वेळी काळोखात चाचपडत प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणेच आहे. दिशादर्शक फलकांचा पत्ता नाही, त्यामुळे नवीन चालकांसाठी हा रस्ता म्हणजे एक भूलभुलैया ठरत आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे महामार्गावर बेकायदेशीरपणे ठेवलेली ‘मिडल ओपनिंग्ज’. स्थानिक राजकीय दबावातून किंवा चुकीच्या नियोजनामुळे ठेवलेली ही ओपनिंग्स म्हणजे मृत्यूचे सापळे बनले आहेत. नियमानुसार स्पीड ब्रेकरची उंची १०० मिमी आणि रुंदी ३.७ मीटर असणे आवश्यक आहे, पण येथे तर ओबडधोबड आणि मनमानी पद्धतीने गतीरोधक उभारले आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग आहे की एखाद्या ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ता, असा प्रश्न पडावा इतका निकृष्ट दर्जा येथे दिसून येतो. कंत्राटदारांवर कोणाचेही नियंत्रण नाही आणि सरकारी यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारने आता एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की, कोकणातील जनता आता या ‘डेडलाईन’च्या खेळाला कंटाळली आहे. काम शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुलीचा विचारही सरकारने करू नये. अर्धवट रस्त्यावर टोल आकारणे म्हणजे जनतेची दिवसाढवळ्या लूट करणे होय. आधी सुरक्षा द्या, आधी रस्ता पूर्ण करा आणि मगच कराच्या गोष्टी करा. या महामार्गासाठी किती वेळा नारळ फोडले गेले, किती वेळा नवीन तारखा दिल्या गेल्या, याची गणती करणे आता कठीण झाले आहे. मागील तीन महिन्यांचा कामाचा वेग पाहिला तर २०२७ उजाडल्याशिवाय हा मार्ग पूर्णत्वास जाईल असे वाटत नाही. मग जनतेची फसवणूक कशासाठी? पावसाळा डोळ्यासमोर असताना जर कामाची गती हीच राहिली, तर पावसाच्या पाण्यात ही कामे पुन्हा वाहून जातील आणि पुढचे वर्षभर पुन्हा ‘नव्याने निविदा’ आणि ‘नव्याने डेडलाईन’चा खेळ सुरू होईल. कोकणचा विकास म्हणजे केवळ पर्यटनाच्या गप्पा मारणे नव्हे, तर कोकणला मुंबईशी जोडणारी ही जीवनवाहिनी सुरक्षित करणे आहे. पण दुर्दैवाने या जीवनवाहिनीचे रूपांतर आता ‘मृत्यूवाहिनी’त झाले आहे. सरकारला जर खरोखरच कोकणची काळजी असेल, तर त्यांनी केवळ घोषणांचा पाऊस न पाडता प्रत्यक्ष कामाची गती वाढवावी. सुरक्षेच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई का होत नाही? बेकायदेशीर गतिरोधकांमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का? हे प्रश्न आज प्रत्येक कोकणी माणसाच्या मनात आहेत. हा प्रश्न केवळ सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्याचा नाही, तर तो विश्वासाचा आहे. ज्या कोकणाने राज्याला आणि देशाला अनेक दिग्गज दिले, त्याच कोकणाच्या हक्काच्या रस्त्याबाबत इतकी उदासीनता का? आता कोकणच्या जनतेने केवळ प्रेक्षक म्हणून राहून चालणार नाही. हा रस्ता आपल्या हक्काचा आहे आणि तो सुरक्षित प्रवास करण्यालायक मिळवणे हा आपला अधिकार आहे. सरकारला आता ठोस जाब विचारण्याची वेळ आली आहे. मंत्र्यांनी जाहीर केलेली डेडलाईन जर पाळली गेली नाही, तर प्रशासनाला रस्त्यावर उतरून जाब विचारला पाहिजे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा सावळा गोंधळ आता थांबलाच पाहिजे. हा केवळ तांत्रिक विलंब नाही, तर हे प्रशासकीय अपयश आहे. जो मार्ग तासाभरात पूर्ण व्हायला हवा, तिथे तासनतास अडकून पडणे ही कोकणची नियती असू शकत नाही. सरकारने आपल्या भाषेत ‘अमृत काळ’ आणण्याच्या गप्पा माराव्यात, पण प्रत्यक्षात कोकणच्या नशिबी हा ‘अडथळ्यांचा काळ’ कधी संपणार, याचे उत्तर द्यावे. केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून कोकणचा माणूस आता शांत बसणार नाही. हा रस्ता पूर्ण होईपर्यंत आणि प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा सुनिश्चित होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील. सरकारला आता शेवटचा इशारा देण्याची वेळ आली आहे—एकतर रस्ता पूर्ण करा, नाहीतर तुमच्या फोल आश्वासनांची गाठ कोकणच्या स्वाभिमानी जनतेशी आहे, हे विसरू नका!

मुंबई-गोवा महामार्ग: गडकरी साहेब, घोषणांची ‘टोलवाटोलवी’ थांबवा; जमिनीवरची ‘वास्तुस्तीती’ पहा! Read More »

डॉ. ज्योती मेटे यांची महिला आयोग अध्यक्षपदी नियुक्तीची शक्यता

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्योती मेटे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता

प्रतिनिधी – कोकणधारा मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू असून, डॉ. ज्योती मेटे यांची लवकरच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील महिलांच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या घटनात्मक पदावर डॉ. मेटे यांची वर्णी लागणार असल्याच्या बातम्या वेगाने पुढे येत आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून लाभलेला प्रदीर्घ अनुभव आणि महिलांच्या प्रश्नांची असलेली सखोल जाण यामुळे त्यांचे नाव या शर्यतीत सर्वात आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही काळापासून महिला आयोगाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. डॉ. ज्योती मेटे यांनी यापूर्वीही प्रशासकीय चौकटीत राहून महिलांच्या हक्कांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्याकडे असलेली समाजातील तळागाळातील घटकांची ओळख आणि दांडगा जनसंपर्क या आगामी जबाबदारीसाठी भक्कम आधार ठरू शकतो. राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही संभाव्य नियुक्ती म्हणजे सत्ताधारी नेत्यांची एक महत्त्वाची राजकीय रणनीती असल्याचेही बोलले जात आहे. राज्य शासनाने त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केल्यास महिला धोरणांच्या अंमलबजावणीला नवी गती मिळण्याची शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीची अधिकृत घोषणा केव्हा होणार, याकडे आता सर्वच राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संस्थांचे लक्ष वेधले गेले आहे.  

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्योती मेटे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता Read More »

पीकविमा योजनेचा भांडाफोड; ‘१ रुपया’ स्कीम की शेतकऱ्यांची हजारो कोटींची फसवणूक?

पीकविमा: एक रुपयाचा ‘इव्हेंट’ आणि शेतकऱ्यांची हजारो कोटींची ‘फसगत’!

महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीत ‘खरीप’ हा केवळ एक हंगाम नसून तो लाखो शेतकऱ्यांच्या जगण्याचा मुख्य आधार आहे. पण दुर्दैवाने, गेल्या काही वर्षांपासून हाच आधार ‘विमा’ नावाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. २०२४ च्या खरीप हंगामामध्ये ‘एक रुपयात पीक विमा’ देण्याची घोषणा सरकारने मोठ्या थाटामाटात केली. जाहिरातींचे ढोल वाजवले गेले, सरकार किती शेतकरी-धार्जिणे आहे याचा उदोउदो झाला. पण आज जेव्हा प्रत्यक्ष नुकसानीची आकडेवारी समोर येते आणि शेतकऱ्यांच्या रिकाम्या हातांकडे पाहिले जाते, तेव्हा हा ‘एक रुपयाचा विमा’ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट होते. पीक कापणी प्रयोगाच्या नावाखाली लादलेला ‘एकमेव निकष’ हा विमा कंपन्यांना वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना बुडवण्यासाठीच रचलेला कट आहे का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. विमा योजनेच्या नावाखाली जो आकड्यांचा खेळ मांडला गेला आहे, तो अत्यंत विदारक आहे. योजनेची आकडेवारी पाहिल्यास डोळे पांढरे होण्याची वेळ येते:राज्यात एकूण पीकविमा धारक शेतकरी ९१ लाख ९५ हजार आहेत. विमा संरक्षित क्षेत्र ५८ लाख ९० हजार हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता ५३६ कोटी रुपये इतका होतो. राज्य सरकारचा विमा हप्ता ९२८ कोटी रुपये इतका होतो. तर केंद्र सरकारचा विमा हप्ता ९२८ कोटी रुपये इतका होतो. विशेष म्हणजे एकूण जमा झालेला विमा हप्ता २,३९३ कोटी रुपये तर एकूण विमा संरक्षित रक्कम ३१,६१० कोटी रुपये इतकी आहे. सुमारे २,४०० कोटी रुपयांचा हप्ता विमा कंपन्यांच्या तिजोरीत जमा झाला आहे. यामध्ये सामान्य शेतकऱ्याच्या हक्काच्या ५३६ कोटी रुपयांचा समावेश आहे. इतकी प्रचंड रक्कम जमा होऊनही, गेल्या पावसाळ्यात सुमारे ८५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असताना, शेतकऱ्यांना विम्यापोटी एक रुपयाही मिळालेला नाही. शेतीतील उभी पिके गेली, जमिनी खरडून गेल्या, काळजाचा तुकडा असलेली माती वाहून गेली, पण विमा कंपन्यांच्या तांत्रिक निकषांच्या जाळ्यात बळीराजाचा हक्क मात्र वाहून गेला. सरकारने या योजनेत केलेले बदल हे पूर्णपणे विमा कंपन्यांच्या पथ्यावर पडणारे आहेत. पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवणे, ही सर्वात मोठी ऐतिहासिक चूक आहे. हवामान बदलत आहे, अवकाळी पावसाचा फेरा वाढला आहे, गारपीट आणि चक्रीवादळे येत आहेत. अशा परिस्थितीत ‘स्थानिक नैसर्गिक आपत्ती’, ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’, ‘कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव’ तसेच ‘काढणीपश्चात नुकसान’ हे निकष योजनेतून वगळलेच कसे जातात? जर एखाद्या गावात अतिवृष्टी झाली आणि अर्धे गाव पाण्याखाली गेले, तर तिथे पीक कापणी प्रयोग कसा शक्य आहे? उभे पीक वाहून गेल्यावर कापणी कशाची करायची? हे साधे तर्कशास्त्र सरकारी बाबूंच्या आणि धोरणकर्त्यांच्या डोक्यात का शिरत नाही? या तांत्रिक त्रुटींमुळेच आज ३१,६१० कोटी रुपयांचे संरक्षण कागदावर असूनही प्रत्यक्षात शेतकऱ्याची झोळी रिकामी आहे. हे निकष बदलण्याऐवजी तेच निकष आगामी हंगामात कायम ठेवण्याच्या हालचाली म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मार्ग मोकळा करणे होय. अधिवेशनांमध्ये सर्वपक्षीय आमदारांनी या योजनेतील त्रुटींवर प्रहार केला. सरकारला स्वतः मान्य करावे लागले की, परिस्थिती गंभीर आहे. म्हणूनच राज्य सरकारला सुमारे ३१ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करावे लागले. जर विमा योजना सक्षम असती, तर सरकारी तिजोरीवर हा ३१ हजार कोटींचा ताण पडला नसता. विमा कंपन्यांनी त्यांचे काम चोख बजावले असते, तर शेतकऱ्याला सरकारच्या मदतीची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागले नसते. आता नव्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. केंद्राने अद्याप निकष निश्चित केलेले नाहीत. दरवर्षी केंद्र सरकार राष्ट्रीय पातळीवर आढावा घेते, पण यंदा दिरंगाई का? निविदा काढणे, कंपन्या निश्चित करणे यासाठी दोन महिन्यांचा अवधी लागतो. मे महिना उजाडला तरीही केंद्राकडून कोणतीही हालचाल नाही, आणि राज्य सरकारचा अर्थ विभाग ‘आर्थिक भाराचे’ कारण सांगून जुन्याच कुचकामी निकषांना रेटत आहे. हा सर्व गोंधळ पाहता, शेतकऱ्याने कोणाकडे आशेने पाहावे? चर्चा अशी आहे की, राज्य सरकारने नुकतेच ३१ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे आणि आता २० ते २५ हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे अर्थ विभागाला असे वाटते की, विमा योजनेत नवीन निकष लावून आणखी आर्थिक भार सोसण्याची राज्याची क्षमता नाही. पण अर्थ विभागाने हे समजून घेतले पाहिजे की, विमा योजना ही शेतकऱ्याचा हक्क आहे, ते दान नाही! विमा हप्ता म्हणून जे २,३९३ कोटी रुपये दिले गेले, त्यातून शेतकऱ्याला परतावा मिळवून देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. जर कंपन्या पैसे देत नसतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणतात की, “आठवडाभरात विमा कंपन्यांकडून भरपाई मिळण्यास सुरुवात होईल.” पण साहेब, हा आठवडा किती महिन्यांपासून सुरू आहे? पीक कापणी प्रयोग संपले, नवीन पेरणीचे वेध लागले, तरीही मागील हंगामाचे पैसे मिळत नसतील, तर आश्वासनांना काय अर्थ उरतो? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी हिताचा निर्णय घेतील, असे सांगून केवळ वेळ मारून नेली जात आहे. शेतकऱ्याला आज शब्दांची नाही, तर खात्यात जमा होणाऱ्या रकमेची गरज आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, पण इथला शेतकरी आज विमा कंपन्यांच्या दारात भिकाऱ्यासारखा उभा आहे. एकीकडे ‘सबका साथ, सबका विकास’च्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे ९२ लाख शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे, हा दुतोंडीपणा आता थांबला पाहिजे. आगामी खरीप हंगामात जर तीच जुनी, त्रुटींनी भरलेली योजना पुन्हा लादली गेली, तर राज्यातील शेतकरी शांत बसणार नाही. सरकारने विमा कंपन्यांचे ‘लाड’ बंद करावेत. पीक कापणी प्रयोगासोबतच वैयक्तिक नुकसान भरपाई, हवामान आधारित नुकसान आणि स्थानिक आपत्तींचे निकष पुन्हा समाविष्ट केल्याशिवाय नवीन योजना लागू करू नये. २,४०० कोटी रुपयांचा हप्ता खाणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्या. अन्यथा, ‘एक रुपयाचा विमा’ हा महाराष्ट्राच्या कृषी इतिहासातील सर्वात मोठा ‘काळा डाग’ म्हणून ओळखला जाईल. बळीराजाला मदतीची नाही, तर न्यायाची गरज आहे. आणि हा न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे. जर ही जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर ‘शेतकरी हिताचे सरकार’ म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार या राज्यकर्त्यांना उरलेला नाही!

पीकविमा: एक रुपयाचा ‘इव्हेंट’ आणि शेतकऱ्यांची हजारो कोटींची ‘फसगत’! Read More »

ओव्हरलोड ट्रकचा कहर; सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर तिहेरी अपघातओव्हरलोड ट्रकचा कहर; सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर तिहेरी अपघात

ओव्हरलोड ट्रकचा कहर! सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर भीषण तिहेरी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

सावंतवाडी : संजय पिळणकरसावंतवाडी–वेंगुर्ला मार्गावरील कोलगाव येथे आज ओव्हरलोड ट्रकने बस आणि डंपरला धडक दिल्याने भीषण तिहेरी अपघात घडला. या अपघातात एसटी बस व डंपरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव–सावंतवाडी ही एसटी बस सावंतवाडी बस स्थानकाच्या दिशेने जात होती. त्याचवेळी एक डंपर माडखोलच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. दरम्यान, वेंगुर्ला बाजूकडून अंदाजे ७०० चिरा दगड भरून येणारा एक ट्रक समोरून आला. सदर ट्रक क्षमतेपेक्षा अधिक ओव्हरलोड असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकने प्रथम एसटी बसला व त्यानंतर डंपरला जोरदार धडक दिली. या धडकेत बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून डंपरच्याही मागील बाजूस हानी पोहोचली आहे. अपघाताची माहिती मिळताच कोलगाव बीटचे हवालदार मनोज राऊत व सुरेश राऊळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सुदैवाने बसमधील प्रवासी, चालक व वाहक थोडक्यात बचावले. दरम्यान, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात होणारी ओव्हरलोड वाहतूक हा गंभीर प्रश्न बनला आहे. प्रशासनाकडून अशा वाहनांवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ओव्हरलोड ट्रकचा कहर! सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर भीषण तिहेरी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली Read More »

माडखोल ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन; अवैध वाळू उपशाविरोधात तीव्र भूमिका

न्याय मिळेपर्यंत माघार नाही! अवैध वाळू उपशाविरोधात माडखोल ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन

सावंतवाडी : संजय पिळणकरतालुक्यातील तेरेखोल नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात माडखोल येथील ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेत आत्मदहन आंदोलन सुरू केले आहे. “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे. माडखोल येथील राजकुमार राऊळ आणि विशाल राऊळ या दोघांनी या आंदोलनाला सुरुवात केली. त्यांच्या मते, नदीपात्रात अनेक दिवसांपासून बेकायदेशीर उत्खनन सुरू असूनही संबंधित यंत्रणा निष्क्रिय आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलिस आणि इतर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, मात्र महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला की, सामान्य नागरिक घरासाठी थोडी माती किंवा दगड आणल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते, पण मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळू उपशावर मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्याय मिळेपर्यंत माघार नाही! अवैध वाळू उपशाविरोधात माडखोल ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन Read More »

‘एकदा पाहावं करून’ नाटक चिपळूण-रत्नागिरीत; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

पुन्हा पुन्हा पहावं असं ‘एकदा पाहावं करून’ नाटक आता चिपळूण-रत्नागिरीत

चिपळूण : मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घालणारं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक आता कोकणात रंगणार आहे. १६ एप्रिल रोजी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात तर १७ एप्रिल रोजी चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात या गाजलेल्या नाटकाचे प्रयोग होणार असून, नाट्यरसिकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी रंगभूमीवर सध्या एक भन्नाट कॉमेडी नाटक प्रेक्षकांच्या चर्चेत आहे, ‘एकदा पाहावं करून’. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली रंगमंचावर आलेलं हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायलाही भाग पाडत आहे. ६ डिसेंबरपासून या नाटकाचा शुभारंभ झाला असून पुणे आणि मुंबईमध्ये त्याचे प्रयोग तुफान गाजत आहेत. सोशल मीडियावरही या नाटकातील प्रसंगांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहेत. आता हे नाटक कोकणातही रंगणार असून १६ एप्रिल रोजी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आणि १७ एप्रिल रोजी चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात त्याचे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे कोकणवासीयांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या नाटकातील प्रमुख कलाकार वैभव मांगले हे देवरूखचे सुपुत्र असून गौरी फणसे महाजन या चिपळूणच्या आहेत, त्यामुळे स्थानिक प्रेक्षकांचा उत्साह अधिक वाढला आहे. हे नाटक नातेसंबंधांमधील गोडवा आणि वास्तवातील बोचरेपणा हलक्याफुलक्या विनोदातून मांडतं. कथानकाच्या केंद्रस्थानी दोन पूर्णपणे भिन्न स्वभावाचे मध्यमवयीन पुरुष आहेत. बाप्पाजी धारसोड, बिनधास्त, पैशातून सत्ता मिळवणारा; आणि बाबनराव बक्रे, भित्रा पण स्वतःला नैतिकतेचा कट्टर पुरस्कर्ता समजणारा वकील. या दोघांच्या जगांची टक्कर होते, तेव्हा निर्माण होतो गैरसमज, गोंधळ आणि हास्याचा धमाल प्रवास.या सगळ्यात ट्विस्ट येतो तो त्यांच्या मुलांच्या प्रेमप्रकरणामुळे. बाबनरावची मुलगी आणि बाप्पाजींचा मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्नाचा निर्णय घेतात. या पार्श्वभूमीवर घडणारे प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात, पण शेवटी एक गंभीर प्रश्नही उभा करतात. माणूस नैतिकतेमुळे ‘चांगला’ असतो की संधी नसल्यामुळे?अभिनयाच्या बाबतीतही हे नाटक तितकंच दमदार आहे. भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील, आनंद इंगळे आणि वैभव मांगले यांसारख्या अनुभवी आणि तरुण कलाकारांचा प्रभावी सहभाग नाटकाला अधिक रंगतदार बनवतो. हास्य, नातेसंबंध आणि वास्तव यांचा सुरेख मिलाफ असलेलं ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक खरंच एकदा पाहायलाच हवं, असं प्रेक्षकांचं मत होताना दिसत आहे.

पुन्हा पुन्हा पहावं असं ‘एकदा पाहावं करून’ नाटक आता चिपळूण-रत्नागिरीत Read More »

दीपक भागवत प्रकरण; स्वप्ना यादव मोबाईल तपासात, CDR अहवालाची प्रतीक्षा

दीपक भागवत मारहाण प्रकरण; स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात; सीडीआर अहवालाकडे लक्ष

चिपळूण : पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणात पोलिसांच्या तपासाला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, चार्जशीट दाखल झाल्यानंतरही तपासाची पूरक प्रक्रिया सुरूच आहे. पत्रकारांनी केलेल्या मागणीनुसार पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याच्या दृष्टीने पोलिसांनी मंगळवारी त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि सर्व बाजूंनी तपास पूर्ण व्हावा, या उद्देशाने संबंधित मोबाईल क्रमांकाचा सीडीआर मिळवण्यासाठी दूरसंचार कंपनीकडे अधिकृत अर्ज करण्यात आला आहे. सीडीआर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा अधिक स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आधीच १० कर्मचाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज, ओळख परेड आणि साक्षीदारांचे जबाब यावर आधारित पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. प्रशांत यादव यांच्या बाबतीत सीडीआर तपासात ते घटनास्थळी नसल्याचे स्पष्ट झाले असताना, स्वप्ना यादव यांच्या संदर्भातील तपासामुळे या प्रकरणातील संभाव्य इतर पैलू समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकारांनी सुरुवातीपासूनच निष्पक्ष आणि सखोल तपासाची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांकडून प्रत्येक तांत्रिक पुराव्याची पडताळणी केली जात असल्याने तपासाबाबत विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रिया काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे. चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होणार असली, तरी पूरक तपासातून समोर येणारी माहितीही खटल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सीडीआर अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.

दीपक भागवत मारहाण प्रकरण; स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात; सीडीआर अहवालाकडे लक्ष Read More »