konkandhara.com

Editorial

konkandhara 88 1

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनाथ नारायण वाकडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो परिसरातील एका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २० आणि २१ एप्रिल रोजी आडिवरे-रुंडे येथील काजू बाग परिसरात काम सुरू असताना आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. तसेच घटनेबाबत कुणाला सांगितल्यास धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रार मिळताच नाटे (सागरी) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. शनिवारी रात्री आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास नाटे पोलीस करीत आहेत. दरम्यान, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत Read More »

konkandhara 87 1

दीड वर्ष टपाल न वाटणारा वेळणेश्वरचा पोस्टमन बडतर्फ; घरातून दोन पोती टपाल जप्त

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेली दीड वर्षे नागरिकांचे टपाल वितरित न करणाऱ्या पोस्टमन करण थोरात याला बडतर्फ करण्यात आले आहे. त्याच्या घरातून तब्बल दोन पोती टपाल सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात बीड येथील करण थोरात हा पोस्टमन म्हणून कार्यरत होता. नागरिकांच्या मोबाईलवर टपालाबाबत ट्रॅकिंग संदेश येत होते, मात्र प्रत्यक्षात टपाल घरी पोहोचत नसल्याने ग्रामस्थांनी पोस्ट कार्यालयात तक्रारी करण्यास सुरुवात केली. पोस्ट कार्यालयात नव्याने रुजू झालेले पोस्टमास्तर प्रसाद दिवाडकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनी करण थोरात याच्याकडे विचारणा केली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता तेथे दोन पोती भरून टपाल आढळले. या टपालांमध्ये बँकांच्या लिलाव नोटिसा, पासबुक, चेकबुक, आधार कार्ड, एटीएम कार्ड, एलआयसी प्रमाणपत्रे, तलाठी कार्यालयासाठी २०२४ सालातील पत्रे, मुंबई विद्यापीठाची पत्रे, महाविद्यालयीन पत्रव्यवहार तसेच मोजणी नोटिसांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार शुक्रवारी, २४ एप्रिल रोजी उघडकीस आला. तालुका पोस्टमास्तर हिमांशू जोशी यांनीही या घटनेची पाहणी केली आहे. दरम्यान, टपाल वेळेत न मिळाल्याने अनेक नागरिकांचे आर्थिक व प्रशासकीय नुकसान झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. मोजणी नोटीस उशिरा मिळाल्याने काहींना दोन ते तीन वेळा शुल्क भरावे लागले, तर बँकेच्या लिलाव नोटिसा न मिळाल्याने काहींच्या दागिन्यांचे लिलाव झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आधार व पॅन कार्ड न मिळाल्यानेही अनेकांची कामे रखडली असून नुकसानभरपाई कोण देणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

दीड वर्ष टपाल न वाटणारा वेळणेश्वरचा पोस्टमन बडतर्फ; घरातून दोन पोती टपाल जप्त Read More »

konkandhara 86 1

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणा उघड; मृतदेह तीन तास अंधारात

खेड : तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनिक निष्क्रियतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील जनरेटर सुरू न झाल्याने पोस्टमार्टमसाठी आणलेला मृतदेह तब्बल तीन तास अंधारात पडून राहिल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी रात्री तळवट पाली येथून मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला होता. त्याचवेळी वीजपुरवठा खंडित झाला. रुग्णालयात दोन जनरेटर असतानाही एक बंद अवस्थेत होता, तर दुसऱ्यासाठी डिझेल उपलब्ध नसल्याने तोही सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे संपूर्ण रुग्णालय अंधारात बुडाले. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्याचवेळी आपत्कालीन शस्त्रक्रिया किंवा प्रसूतीची वेळ आली असती, तर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, अशी भीती व्यक्त होत आहे. घटनेनंतर नागरिक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. ‘उपजिल्हा रुग्णालय’ हे केवळ नावापुरतेच उरले आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणा उघड; मृतदेह तीन तास अंधारात Read More »

konkandhara 85 1

चिपळूण-दिवा दरम्यान उन्हाळी विशेष मेमू गाड्या; १ मेपासून सेवा सुरू

चिपळूण : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवासी गर्दीला दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे चिपळूण ते दिवा दरम्यान विशेष मेमू अनारक्षित गाड्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्या १ मे २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी धावतील. गाडी क्रमांक ०११६० चिपळूण-दिवा मेमू विशेष दुपारी ३.३० वाजता चिपळूण येथून सुटून त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता दिवा येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५९ दिवा-चिपळूण मेमू विशेष रात्री ११.२५ वाजता दिवा येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. या गाड्यांना अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे-वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पांचनंद आणि निळजे या स्थानकांवर थांबा असेल.

चिपळूण-दिवा दरम्यान उन्हाळी विशेष मेमू गाड्या; १ मेपासून सेवा सुरू Read More »

konkandhara 84 1

सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श : आरटीओ अधिकारी पराग मातोंडकरांनी स्वतःच्या खर्चाने केले रुग्णवाहिकेचे रजिस्ट्रेशन

संजय पिळणकर सावंतवाडी : प्रशासनातील अधिकारी सामाजिक जाणीव ठेवून काम करत असतील, तर समाजसेवेचे सुंदर उदाहरण घडते, याचा प्रत्यय सावंतवाडीत आला आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या नव्या रुग्णवाहिकेचे रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी आरटीओ अधिकारी पराग मातोंडकर यांनी पुढाकार घेत केवळ एका दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण केली. विशेष म्हणजे, या नोंदणी प्रक्रियेसाठी लागणारा खर्चही त्यांनी स्वतःच्या खिशातून उचलत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली. “या कामासाठी कोणतीही फी घेणार नाही, ही जबाबदारी मी स्वतः पार पाडतो,” असे सांगत त्यांनी कार्याला गती दिली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे अपघातग्रस्त व गरजू रुग्णांना तातडीची मदत देण्यासाठी ओळखले जाते. त्यांच्या या कार्याला प्रशासनाचा असा हातभार लागणे, ही निश्चितच प्रेरणादायी बाब ठरली आहे. या कार्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मातोंडकर यांच्या कामाची चर्चा रंगली आहे. या उपक्रमात कार्यालयातील कर्मचारी बाबू तळेकर यांनीही तत्परतेने सहकार्य करत कागदपत्रांची पूर्तता वेळेत पूर्ण केली. प्रशासन आणि सामाजिक संस्थेच्या समन्वयातून उभा राहिलेला हा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श : आरटीओ अधिकारी पराग मातोंडकरांनी स्वतःच्या खर्चाने केले रुग्णवाहिकेचे रजिस्ट्रेशन Read More »

konkandhara 83 1

पावसाआधी रस्ते पूर्ण करा, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ ! संजय गवस यांचा थेट इशारा

दोडामार्ग : भूषण सावंत: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या दोडामार्ग-वीजघर मार्गावरील रस्ते कामांबाबत आता राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. खोदाई करून अर्धवट सोडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास जनतेचा संताप अनावर होईल, असा थेट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस यांनी दिला आहे. सध्या काही ठिकाणी रस्त्याचे काम जलद आणि समाधानकारक पद्धतीने सुरू असले, तरी अनेक भागांत खोदाई करून काम रखडल्याचे चित्र दिसत आहे. कोकणात मे अखेरीस पावसाळ्याची सुरुवात होत असल्याने, अपूर्ण रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. “अधिकाऱ्यांनी या कामात स्वतः लक्ष घालून ठेकेदारांना तातडीच्या सूचना द्याव्यात. मे अखेरीपर्यंत सर्व खोदाई केलेले रस्ते पूर्णत्वास गेले पाहिजेत. अन्यथा तालुक्यातील जनतेचा उद्रेक अनिवार्य ठरेल,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा गवस यांनी दिला. दरम्यान, स्थानिक नागरिकांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला असून, रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासन आणि ठेकेदारांनी वेळेत काम पूर्ण न केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पावसाआधी रस्ते पूर्ण करा, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ ! संजय गवस यांचा थेट इशारा Read More »

konkandhara 82 1

दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले !

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची जोरदार रणनीती बैठक; “पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार” दोडामार्ग | भूषण सावंत :दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून, शिवसेनेने आता थेट रणशिंग फुंकले आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा ठाम निर्धार करण्यात आला. या बैठकीत आमदार राणे यांनी पदाधिकाऱ्यांना थेट मार्गदर्शन करत निवडणुकीसाठी आक्रमक रणनीती आखण्याचे आदेश दिले. प्रत्येक प्रभागातील कामांचे काटेकोर नियोजन, जनसंपर्क वाढवणे आणि तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचणे यावर विशेष भर देण्यात आला. “आता कोणतीही ढिलाई चालणार नाही, विजय हाच एकमेव लक्ष्य आहे,” असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला. तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आमदार निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बळकटी, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आणि बूथ स्तरावर मजबूत यंत्रणा उभी करण्यावर सखोल चर्चा झाली. या प्रसंगी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. संघटना विस्तार, नव्या कार्यकर्त्यांची जोडणी आणि गावागावांत पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्या. बैठकीत जिल्हा प्रमुख संजू परब, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, गोपाळ गवस, जिल्हा परिषद सदस्या सौ. तळवणेकर, तालुका प्रमुख तथा उपसभापती गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सदस्या सौ. सायली निबाळकर, स्नेहा गवस, सरपंच संघटना अध्यक्ष अनिल शेटकर आदी मान्यवर उपस्थित होते. 👉 या निर्णायक बैठकीनंतर दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना जोरदार ताकद दाखवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले ! Read More »

konkandhara 81 1

टीमवर्क आणि देशभक्तीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. अनिल काकोडकर

चतुरंग विद्यार्थी संमेलनात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन चिपळूण : देशहिताच्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गोपनीयता हीच सर्वात मोठी ताकद असते. अणुचाचणीसारख्या मोहिमांमध्ये सहभागी होताना व्यक्तींचे व्यक्तिगत मोठेपण, पद, अहंकार हे सर्व गळून पडते आणि देशभक्ती हेच एकमेव ध्येय उरते. जेव्हा ध्येय स्पष्ट असते, तेव्हा छोटे-मोठे मतभेद, वाद आणि अडथळे आपोआप बाजूला पडतात; अन्यथा अशा प्रकारची ऐतिहासिक कामगिरी शक्यच झाली नसती, असे ठाम प्रतिपादन पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘कोकण अभ्यासवर्ग विद्यार्थी संमेलन’ शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे उत्साहात सुरू आहे. या संमेलनाच्या पहिल्याच दिवशी डॉ. अनिल काकोडकर यांची विशेष मुलाखत ज्ञानप्रबोधिनीचे आदित्य शिंदे यांनी घेतली. ‘पोखरण अणुचाचणी’ या विषयावर केंद्रित या संवादातून विद्यार्थ्यांना विज्ञान, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्व यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. भारताच्या अणुचाचण्यांबाबत सविस्तर बोलताना डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले की, अणुचाचणी करणे म्हणजे केवळ वैज्ञानिक प्रयोग नव्हे, तर अत्यंत संवेदनशील, उच्चस्तरीय आणि बहुआयामी आव्हानांचा सामना करणारी राष्ट्रीय मोहीम असते. पोखरण अणुचाचणी दरम्यान काम करताना प्रत्येक टप्प्यावर अचूकता, गोपनीयता आणि समन्वय यांचा कस लागला. विशेषतः अमेरिकन गुप्तहेर उपग्रहांचे सतत लक्ष भारतावर असल्यामुळे काम अधिकच कठीण झाले होते. उपग्रह ठराविक वेळेला त्या परिसरावरून जात असत. त्यामुळे त्या वेळेत कोणताही संशय येऊ नये, यासाठी परिसरातील सर्व हालचाली पूर्णपणे ‘नॉर्मल’ ठेवाव्या लागत. एक दिवस आधी जशी परिस्थिती होती, तशीच दुसऱ्या दिवशीही दिसावी यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात येत असे. राजस्थानमधील प्रचंड उष्णतेत, सुमारे ५१ अंश सेल्सिअस तापमानात, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी काम केले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिस्त, संयम आणि राष्ट्रनिष्ठा यांच्या बळावर ही मोहीम यशस्वी झाली, असे त्यांनी नमूद केले. देशाच्या विकासासाठी अणुऊर्जा अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वीज निर्मिती, औद्योगिक प्रगती आणि तंत्रज्ञान विकासासाठी अणुक्षमता असणे ही काळाची गरज आहे. आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानात स्वयंपूर्णता आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. संवादादरम्यान डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबतचा एक प्रेरणादायी अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र प्रकल्प सुरू असताना ते पाहणीसाठी गेले असता, त्यांना वाटले की प्रकल्पप्रमुख म्हणून कलाम सहज ओळखू येतील. मात्र ते इतर सहकाऱ्यांमध्ये पूर्णपणे मिसळून काम करत होते. शेवटी माझ्या सहकाऱ्याला विचारल्यावरच कलाम कोण आहेत, हे लक्षात आले. यावरून त्यांनी एक महत्त्वाचा धडा अधोरेखित केला, खरा नेता तोच, जो स्वतःला वेगळा दाखवत नाही, तर टीमचा एक भाग बनतो. अशा नेतृत्वातूनच मोठ्या मोहिमा यशस्वी होतात. तरुण पिढीला मार्गदर्शन करताना डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये समतोल राखणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. ‘वर्क फ्रॉम होऊ शकते, तर वर्क फ्रॉम व्हिलेज का नाही?’ असा विचारप्रवर्तक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ग्रामीण भागातही संधी निर्माण केल्यास शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल आणि गावांचा विकास वेगाने होईल, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला चिपळूण नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी विशाल भोसले, दैनिक ‘सागर’च्या संपादिका शुभदा जोशी, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर , विचारवंत डॉ. सागर देशपांडे, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या संमेलनाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निबंध कानिटकर यांनी प्रभावीपणे केले. छाया: सचिन शेठ

टीमवर्क आणि देशभक्तीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. अनिल काकोडकर Read More »

konkandhara 81 1

विद्यार्थ्यांनी आत्मशोधातूनच यशाचा मार्ग शोधावा : अविनाश धर्माधिकारी

चतुरंग प्रतिष्ठानच्या कोकण अभ्यास वर्ग विद्यार्थी संमेलनाचा उत्साहात शुभारंभ चिपळूण : ‘तुला काय येतं यावर जीवनाची इमारत उभी कर; तुला काय येत नाही, याचा विचार करण्यात आयुष्य वाया घालवू नकोस. प्रत्येक व्यक्तीची बुद्धी, क्षमता आणि आवड वेगळी असते. त्या क्षमतेचा शोध घेऊन त्याचे प्रकटीकरण करणे, हीच खरी शिक्षणाची व्याख्या आहे,’असे विचार माजी सनदी अधिकारी व ‘चाणक्य मंडळ परिवार’चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. चतुरंग प्रतिष्ठानच्या कोकण अभ्यास वर्गाच्या दोन दिवसीय विद्यार्थी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन उपस्थित होते. तसेच पुण्यातील मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या नामांकित श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके, वक्ते मंदार ओक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. वामन कुलकर्णी यांनी सादर केलेल्या सरस्वती स्तवनाने वातावरण भारावून गेले. गोडबोले गुरुजी यांच्या प्रतिमेचे व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. युनायटेड इंग्लिश स्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी मान्यवरांचे अत्तरकुपी देऊन स्वागत केले. प्रास्ताविक इंद्रायणी दीक्षित यांनी केले. त्यांनी चतुरंग प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी संस्थेने केलेल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला. तसेच या दोन दिवसीय विद्यार्थी संमेलनात विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्रे आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. यानंतर मंदार ओक यांनी चतुरंगच्या स्मरणिकेविषयी माहिती देताना सांगितले की, या स्मरणिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला वाव देण्यात आला असून विविध विषयांवर दर्जेदार लेखांचा समावेश आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात अविनाश धर्माधिकारी यांनी शिक्षण या विषयावर सखोल विचार मांडले. ते म्हणाले, ‘शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती आत्मसात करणे नव्हे, तर स्वतःच्या अंतरंगात डोकावून स्वतःला ओळखणे होय. आपण कोण आहोत, आपल्यात कोणत्या क्षमता आहेत, आपण समाजासाठी काय करू शकतो, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण.’ ते पुढे म्हणाले की, ‘भारतीय संस्कृतीने संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची भावना दिली आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना केवळ विचार नाही, तर जीवनपद्धती आहे. प्रत्येकाने अंत:करणातून भारताच्या आणि जगाच्या कल्याणाचा विचार करून जगणे, हीच खरी भारतीय संस्कृती आहे.’ त्यांच्या या विचारांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमाला चिपळूण नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी विशाल भोसले, दैनिक ‘सागर’च्या संपादिका शुभदा जोशी, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर , विचारवंत डॉ. सागर देशपांडे, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या संमेलनाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निबंध कानिटकर यांनी प्रभावीपणे केले.

विद्यार्थ्यांनी आत्मशोधातूनच यशाचा मार्ग शोधावा : अविनाश धर्माधिकारी Read More »

konkandhara 80 1

साखरपा-देवरुख मार्गावर भीषण अपघात;चौदा चाकी ट्रक डोंगराला धडकला, चालक जखमी

संगमेश्वर : तालुक्यातील साखरपा-देवरुख मार्गावर आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. चालकाचा ताबा सुटल्याने चौदा चाकी ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराच्या कपारीत जाऊन जोरात धडकला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून ग्रामस्थ व पोलिसांच्या तत्पर मदतीमुळे त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत विठ्ठल शिंगटे (वय ४६) हे रिकाम्या ट्रकने (क्र. यूपी ३५ एटी १२९२) देवरुखकडून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. साखरपा-देवरुख रस्त्यावर कोंडगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आले असता अचानक ट्रकवरील त्यांचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर आदळला. धडक इतकी जोरदार होती की, ट्रक चालक केबिनमध्येच अडकून पडला. अपघाताची माहिती मिळताच देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहायक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, स्थानिक पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे तसेच पारस साखरे, अंकुश सुर्वे, साहिल चव्हाण व मुरलीधर पांचाळ या ग्रामस्थांनी बचाव कार्यात मोलाची मदत केली. रवी इन्फ्रा कंपनीच्या हायड्रा मशीनच्या साहाय्याने ट्रकचे पत्रे बाजूला करून चालकाला बाहेर काढण्यात आले. जखमी चालक हनुमंत शिंगटे यांना तातडीने साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

साखरपा-देवरुख मार्गावर भीषण अपघात;चौदा चाकी ट्रक डोंगराला धडकला, चालक जखमी Read More »