गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेली दीड वर्षे नागरिकांचे टपाल वितरित न करणाऱ्या पोस्टमन करण थोरात याला बडतर्फ करण्यात आले आहे. त्याच्या घरातून तब्बल दोन पोती टपाल सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात बीड येथील करण थोरात हा पोस्टमन म्हणून कार्यरत होता. नागरिकांच्या मोबाईलवर टपालाबाबत ट्रॅकिंग संदेश येत होते, मात्र प्रत्यक्षात टपाल घरी पोहोचत नसल्याने ग्रामस्थांनी पोस्ट कार्यालयात तक्रारी करण्यास सुरुवात केली.
पोस्ट कार्यालयात नव्याने रुजू झालेले पोस्टमास्तर प्रसाद दिवाडकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनी करण थोरात याच्याकडे विचारणा केली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता तेथे दोन पोती भरून टपाल आढळले.
या टपालांमध्ये बँकांच्या लिलाव नोटिसा, पासबुक, चेकबुक, आधार कार्ड, एटीएम कार्ड, एलआयसी प्रमाणपत्रे, तलाठी कार्यालयासाठी २०२४ सालातील पत्रे, मुंबई विद्यापीठाची पत्रे, महाविद्यालयीन पत्रव्यवहार तसेच मोजणी नोटिसांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार शुक्रवारी, २४ एप्रिल रोजी उघडकीस आला. तालुका पोस्टमास्तर हिमांशू जोशी यांनीही या घटनेची पाहणी केली आहे.
दरम्यान, टपाल वेळेत न मिळाल्याने अनेक नागरिकांचे आर्थिक व प्रशासकीय नुकसान झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. मोजणी नोटीस उशिरा मिळाल्याने काहींना दोन ते तीन वेळा शुल्क भरावे लागले, तर बँकेच्या लिलाव नोटिसा न मिळाल्याने काहींच्या दागिन्यांचे लिलाव झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आधार व पॅन कार्ड न मिळाल्यानेही अनेकांची कामे रखडली असून नुकसानभरपाई कोण देणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.















