दोडामार्ग : भूषण सावंत: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या दोडामार्ग-वीजघर मार्गावरील रस्ते कामांबाबत आता राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. खोदाई करून अर्धवट सोडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास जनतेचा संताप अनावर होईल, असा थेट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस यांनी दिला आहे.
सध्या काही ठिकाणी रस्त्याचे काम जलद आणि समाधानकारक पद्धतीने सुरू असले, तरी अनेक भागांत खोदाई करून काम रखडल्याचे चित्र दिसत आहे. कोकणात मे अखेरीस पावसाळ्याची सुरुवात होत असल्याने, अपूर्ण रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“अधिकाऱ्यांनी या कामात स्वतः लक्ष घालून ठेकेदारांना तातडीच्या सूचना द्याव्यात. मे अखेरीपर्यंत सर्व खोदाई केलेले रस्ते पूर्णत्वास गेले पाहिजेत. अन्यथा तालुक्यातील जनतेचा उद्रेक अनिवार्य ठरेल,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा गवस यांनी दिला.
दरम्यान, स्थानिक नागरिकांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला असून, रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासन आणि ठेकेदारांनी वेळेत काम पूर्ण न केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















