संजय पिळणकर
सावंतवाडी : प्रशासनातील अधिकारी सामाजिक जाणीव ठेवून काम करत असतील, तर समाजसेवेचे सुंदर उदाहरण घडते, याचा प्रत्यय सावंतवाडीत आला आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या नव्या रुग्णवाहिकेचे रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी आरटीओ अधिकारी पराग मातोंडकर यांनी पुढाकार घेत केवळ एका दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण केली.
विशेष म्हणजे, या नोंदणी प्रक्रियेसाठी लागणारा खर्चही त्यांनी स्वतःच्या खिशातून उचलत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली. “या कामासाठी कोणतीही फी घेणार नाही, ही जबाबदारी मी स्वतः पार पाडतो,” असे सांगत त्यांनी कार्याला गती दिली.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे अपघातग्रस्त व गरजू रुग्णांना तातडीची मदत देण्यासाठी ओळखले जाते. त्यांच्या या कार्याला प्रशासनाचा असा हातभार लागणे, ही निश्चितच प्रेरणादायी बाब ठरली आहे. या कार्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मातोंडकर यांच्या कामाची चर्चा रंगली आहे.
या उपक्रमात कार्यालयातील कर्मचारी बाबू तळेकर यांनीही तत्परतेने सहकार्य करत कागदपत्रांची पूर्तता वेळेत पूर्ण केली. प्रशासन आणि सामाजिक संस्थेच्या समन्वयातून उभा राहिलेला हा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.















