konkandhara.com

24 अप्रैल 2026

konkandhara 72 2

चिपळूणमध्ये युवा शक्ती जागर यात्रेचे जोरदार स्वागत

चिपळूण : भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त आज चिपळूण शहरात त्यांचे आगमन झाले. शहरातील बहादूरशेख नाका येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाडिक यांनी अभिवादन केले. यावेळी भाजपा व युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर उक्ताड (ता. चिपळूण) येथे यात्रेचे आगमन झाले असता भाजपाचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे काम करू, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास भाजपाचे नेते वैभव खेडेकर, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, शहर सरचिटणीस सारिका भावे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार, शहराध्यक्ष शुभम पिसे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शितल रानडे, शहराध्यक्ष रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिपळूणमध्ये युवा शक्ती जागर यात्रेचे जोरदार स्वागत Read More »

konkandhara 71 2

मातोश्रीवर दोडामार्गच्या शिवसैनिकांची दमदार हजेरी; उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार!

दोडामार्ग : भूषण सावंत : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मातोश्रीवरील महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकीत दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी ठोस उपस्थिती दर्शवली. या बैठकीदरम्यान दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, मणेरी विभागप्रमुख भिवा गवस आणि संघटक विजय जाधव यांनी पक्षप्रमुखांची सदिच्छा भेट घेतली. मातोश्रीवर झालेल्या या भेटीत पक्षसंघटना अधिक बळकट करण्यावर सखोल चर्चा झाली. दोडामार्ग तालुक्यातील संघटनात्मक घडामोडी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आगामी राजकीय रणनीती यावर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत, संघटन विस्तारासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. या भेटीमुळे दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पक्षाच्या विचारसरणीला अधिक बळ देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, संघटनात्मक पातळीवर मोठे बदल आणि मजबुती येण्याचे संकेत मिळत आहेत. दोडामार्गच्या भूमीतून शिवसेनेचा झेंडा अधिक उंच फडकवण्याचा निर्धार यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मातोश्रीवर दोडामार्गच्या शिवसैनिकांची दमदार हजेरी; उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार! Read More »

konkandhara 70 3

देवरुख न.प.तील मुख्य रस्त्याचे काम रखडले; शहर भाजपकडून प्रशासनाला निवेदन

देवरुख (प्रतिनिधी):देवरुख शहरातील चोरपऱ्या बाजारपेठ ते मुस्लिम मोहल्ला मशीद या मुख्य रस्त्याचे काम अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष आपल्या पक्षाचे असतानाही शहर भाजपकडून नगराध्यक्ष व प्रशासनाला निवेदन देण्याची वेळ आल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली आहे. या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून आमदार शेखर निकम यांनी 30 ऑक्टोबर रोजी हा रस्ता मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच या कामासाठी सुमारे 65 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. नगरपंचायत निवडणुकीत जनतेने महायुतीला पुन्हा सत्तेवर बसवले असले तरी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत नव्या पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित गांभीर्य दिसत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असूनही पावसाळा तोंडावर आला तरी काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी देवरुख शहरतर्फे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवा सुविधा योजनेतून 17 एप्रिल रोजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये व आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र ना भूमिपूजन झाले, ना प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. खराब रस्त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून संबंधितांनी तात्काळ अडचणी दूर करून काम सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष, नगरसेवक व ठेकेदार यांच्याशी संयुक्त चर्चा करून रस्ता काम सुरू करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी भाजप शिष्टमंडळाला दिल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली. सदर निवेदन नगराध्यक्षा मृणाल शेट्ये व मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, संदीप वेलवणकर, शंकर मालप, संजय राजवाडे, राजाराम पंडित, अभिषेक निमकर, मानसी निमकर, हर्षद लिमये, चैतन्य बांडागळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

देवरुख न.प.तील मुख्य रस्त्याचे काम रखडले; शहर भाजपकडून प्रशासनाला निवेदन Read More »

konkandhara 69 2

वेसुर्ले ग्रामदैवत श्री देव चपोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळाभक्ती, संस्कृती आणि ‘अकल्पित’ नाटकाचा अप्रतिम संगम

लांजा, प्रतिनिधी : लांजा तालुक्यातील वेसुर्ले गावचे ग्रामदैवत श्री देव चपोबा मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा येत्या २८ व २९ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दोन दिवसीय या सोहळ्यानिमित्त संपूर्ण गाव भक्तीमय आणि सांस्कृतिक वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, २८ एप्रिल रोजी सकाळी लहान मुलांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत श्री गणेश वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ, कुर्णे यांची सुमधुर भजनसेवा रंगणार असून भाविकांना भक्तिरसाचा आनंद लुटता येणार आहे. रात्री ९ वाजता लहान मुलांचे नृत्य सादरीकरण होणार असून त्यानंतर लकी ड्रॉ व बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. दुसऱ्या दिवशी, २९ एप्रिल रोजी सकाळी मूर्ती अभिषेक व सत्यनारायण पूजा होईल. दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ५ वाजता महिलांचा हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५.३० ते ६.३० मान्यवरांचा स्वागत समारंभ, तर ७.३० ते ८.३० या वेळेत पालखी प्रदक्षिणा (भोवत्या) होणार आहेत. रात्री १०.३० वाजता सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे ‘अकल्पित’ हे हृदयस्पर्शी दोन अंकी नाटक. हरीश सामंत लिखित आणि राजू मांडवकर दिग्दर्शित या नाटकात सुरज चव्हाण, दत्ताराम चव्हाण, राजन सुर्वे, सुरेंद्र चव्हाण आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कु. साक्षी कदम यांचा दमदार अभिनय रसिकांना अनुभवता येणार आहे. गावप्रमुख, सर्व मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून तयारीसाठी ग्रामस्थांनी मोठी मेहनत घेतली आहे. या भक्तिमय आणि मनोरंजनमय सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वेसुर्ले ग्रामदैवत श्री देव चपोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळाभक्ती, संस्कृती आणि ‘अकल्पित’ नाटकाचा अप्रतिम संगम Read More »

konkandhara 68 2

अवकाळी वादळाचा तडाखा; डेरवणमध्ये शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान

चिपळूण /प्रतिनिधी : गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसाने डेरवण परिसराला जोरदार तडाखा बसला. या वादळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. वादळासोबत आलेल्या प्रचंड वाऱ्यामुळे घरावरील कौलारू पत्रे सुमारे २० ते २५ फूट अंतरावर उडून रस्त्यावर पडली. त्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

अवकाळी वादळाचा तडाखा; डेरवणमध्ये शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान Read More »

konkandhara 67 2

चिपळूण वन विभागाचे कलादालन आता ‘निसर्गसेवक कै. निलेश बापट कलादालन’

आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश; विविध संस्थांची मागणी चिपळूण, प्रतिनिधी : चिपळूण येथील वन विभाग संकुलात उभारण्यात आलेल्या कला दालनास ‘निसर्गसेवक कै. निलेश विलास बापट कलादालन’ असे नाव देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. विविध सामाजिक संस्थांनी याबाबत आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी केली होती. आमदार निकम यांनी शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महसूल व वन विभागाने ही मान्यता दिली. रत्नागिरी जिल्हा वन विभागाच्या वतीने जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून चिपळूण येथील वन विभाग संकुलात आकर्षक व अभ्यासपूर्ण कलादालन उभारण्यात आले आहे. या कलादालनाची संकल्पना, आराखडा आणि मूळ मांडणी तत्कालीन मानद वन्यजीव रक्षक स्वर्गीय निलेश विलास बापट यांची होती. स्व. बापट यांनी निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव आणि जैवविविधता संरक्षणासाठी आयुष्य वाहिले होते. ‘सह्याद्री निसर्गमित्र’, ‘ग्लोबल चिपळूण’ आणि ‘आरोही’ या संस्थांच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच विविध अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. जनजागृती कार्यक्रम, विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षण आणि वन्यजीव बचाव मोहिमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. अर्थ फाउंडेशन, ग्लोबल चिपळूण टुरिझम, रंजिता फाउंडेशन, नवकोकण एज्युकेशन सोसायटी, सह्याद्री निसर्गमित्र, नगरसेवक निहार कोवळे आणि परिवर्तन संस्था यांनी या कलादालनास स्व. बापट यांचे नाव देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर वन विभागाने प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाने त्यास मंजुरी दिली असून विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांचीही या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. या निर्णयाबद्दल चिपळूणवासीयांनी समाधान व्यक्त केले असून विविध संस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले आहेत.  

चिपळूण वन विभागाचे कलादालन आता ‘निसर्गसेवक कै. निलेश बापट कलादालन’ Read More »

Copy of Copy of Web Banner 1 1

बंगाल मधील मतदान लोकशाहीचा हुंकार की व्यवस्थेच्या क्रूरतेविरुद्धचा एल्गार?

पश्चिम बंगालच्या राजकीय रणांगणात २३ एप्रिल रोजी जे घडले, ते केवळ मतदानाचे आकडे नव्हते, तर तो प्रस्थापित व्यवस्थेच्या तोंडावर मारलेला एक सणसणीत चपराक होता. सायंकाळी सात वाजेपर्यंत ९१.४ टक्के मतदानाचा आकडा गाठणे, हे केवळ असामान्य नाही, तर ते लोकशाहीच्या इतिहासातील एक अभूतपूर्व वादळ आहे. ज्या राज्याला मतदानापूर्वी छावणीचे स्वरूप देण्यात आले, जिथे पावलापावलावर बंदूकधारी जवान तैनात होते आणि जिथे मतदारांना ‘एसआयआर’ (SIR) सारख्या क्लिष्ट आणि अपमानजनक प्रक्रियेतून जावे लागले, तिथे जनतेने घराबाहेर पडून दिलेला हा प्रतिसाद नेमका कोणाविरुद्ध आहे? हा प्रश्न आज संपूर्ण देशाला पडला आहे. १५२ जागांवर ९१ टक्क्यांहून अधिक मतदान होणे ही काही साधी गोष्ट नाही. हा आकडा सांगतोय की, बंगालचा मतदार संतापलेला होता आणि तो आपला हा संताप मतपेटीतून व्यक्त करण्यासाठी व्याकुळ झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून बंगालच्या मतदाराला ज्या अपमानित अवस्थेतून जावे लागले, त्याची कल्पनाही करवत नाही. एसआईआरच्या नावाखाली मतदारांची ज्या प्रकारे अडवणूक करण्यात आली, त्यामुळे सामान्य माणूस स्वतःला असुरक्षित आणि हतबल समजू लागला होता. सरकारी अधिकाऱ्यांच्या मर्जीवर तुमचे नागरिकत्व आणि मतदानाचा अधिकार अवलंबून असणे, हा या देशातील सर्वात मोठा लोकशाहीचा पराभव होता. सुमारे १ कोटी मतदारांची नावे कापली गेली, तर अंतिम यादीत २७ लाख लोक केवळ वेळेवर सुनावणी न झाल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले. येथील काही सामान्य नागरिकाची व्यथा पाहिली, तर अंगावर काटा येतो. २००२ च्या मतदार यादीत स्वतःचे, आईचे आणि वडिलांचे नाव असूनही, सर्व पुरावे देऊनही केवळ प्रशासकीय ढिसाळपणामुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या दिरंगाईमुळे त्यांना मतदानापासून रोखले गेले. ज्यांच्या नावावर कोणताही आक्षेप नव्हता, अशा २७ लाख लोकांचे अधिकार हिरावून घेणाऱ्या या व्यवस्थेला बंगालच्या मतदारांनी आपल्या मतदानाच्या टक्केवारीने उत्तर दिले आहे. शमशेरगंज विधानसभेचे उदाहरण तर डोळे उघडणारे आहे. ज्या मतदारसंघात ९१ हजारहून अधिक मतदारांची नावे कापली गेली, तिथे ९५ टक्क्यांहून अधिक मतदान होणे, हा जागतिक चमत्कार म्हणावा लागेल की व्यवस्थेविरुद्धचा तीव्र उद्रेक? एकीकडे मतदारांच्या नावांच्या स्पेलिंगमधील चुका काढायच्या, तर दुसरीकडे आई-वडिलांच्या वयातील अंतराचे मुद्दे उपस्थित करून मतदानाचा हक्क नाकारायचा, ही कसली लोकशाही? अपील करणाऱ्या १४ लाख लोकांपैकी केवळ १३६ लोकांची नावे यादीत समाविष्ट करणे, हे या व्यवस्थेचे ‘कौशल्य’ आहे की ‘क्रूरता’? सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवस आधी आदेश देऊनही प्रशासनाने ज्या गतीने पाय खेचले, त्यामुळे आज लाखो लोक स्वतःच्या आवडत्या उमेदवाराला मत देऊ शकले नाहीत. हे केवळ त्या मतदारांचे अपयश नाही, तर त्यांच्या शेजाऱ्यांचे, नातेवाइकांचे आणि संपूर्ण समाजाचे अपयश आहे ज्यांनी हे उघड्या डोळ्यांनी पाहिले. मतदानाची ही लाट केवळ बंगालपुरती मर्यादित नाही. तामिळनाडूमध्येही दुपारपर्यंत जेवढे मतदान झाले, त्याने मागील सर्व विक्रम मोडीत काढले. हे स्पष्ट संकेत आहेत की, लोकशाहीतील मतदार आता केवळ प्रेक्षक उरलेला नाही. सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत असतील, रिकाम्या बूथचे व्हिडिओ शेअर करत असतील, पण सत्य हे आहे की मतदार घराबाहेर पडला आहे. गृहमंत्र्यांचे कोलकात्यातील वॉर रूममध्ये जाणे आणि तृणमूलचा सूर्य मावळत असल्याचा दावा करणे, हे बिहारच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर उत्साहवर्धक वाटत असले तरी, बंगालची परिस्थिती वेगळी आहे. अमित शहा आजही घुसखोरांना बाहेर काढण्याच्या गोष्टी करत आहेत, पण एसआईआरच्या नावाखाली ज्या लाखो भारतीय नागरिकांना छळले गेले, त्याचे उत्तर कोण देणार?विशेष म्हणजे, सत्तेत येताच ‘सातवा वेतन आयोग’ लागू करण्याचे आणि महिलांच्या खात्यात वर्षाला ३६ हजार रुपये जमा करण्याचे जे आश्वासन दिले जात आहे, त्याची विश्वासार्हता दिल्लीच्या अनुभवावरून तपासावी लागेल. दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी ८ मार्च २०२५ पर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र, आज १४ महिने उलटूनही दिल्लीतील महिलांच्या हाती काहीही लागलेले नाही. जेव्हा मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारले जाते, तेव्हा ‘प्राधान्यक्रम बदलले आहेत’ असे उत्तर मिळते. सत्तेसाठी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष कृती यात असलेली ही दरी मतदारांच्या लक्षात येत नाही, असे समजणे ही मोठी चूक ठरेल. बंगालला २४०० केंद्रीय तुकड्यांच्या पहाऱ्यात ठेवून जणू काही युद्धक्षेत्रच बनवले गेले. देशातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी जेवढे जवान तैनात केले जातात, त्याच्या निम्म्याहून अधिक जवान केवळ एका राज्यासाठी वापरणे, ही कोणती लोकशाहीची पद्धत आहे? मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात केवळ ओळखपत्र असलेल्यांनाच प्रवेश देणे, हे मतदारांच्या सुरक्षेसाठी होते की त्यांना घाबरवण्यासाठी? पण बंगालचा मतदार डगमगला नाही. उलट, त्याने प्रत्येक अडथळा पार करून मतदान केंद्रापर्यंत धाव घेतली. आजचा हा ९१.४ टक्के मतदानाचा आकडा ही केवळ एक सांख्यिकी माहिती नाही, तर तो एक हुंकार आहे. हा हुंकार त्या अधिकाऱ्यांविरुद्ध आहे जे लोकांच्या हक्कांवर डल्ला मारत होते, हा हुंकार त्या व्यवस्थेविरुद्ध आहे जी सामान्य माणसाला रांगेत उभे करून त्याचा अपमान करत होती. बंगालच्या मातीने नेहमीच देशाला नवी दिशा दाखवली आहे. एसआईआरच्या नावाखाली चाललेल्या या छळाचा अंत करण्यासाठी मतदारांनी जे पाऊल उचलले आहे, त्याचे परिणाम ४ मे रोजी बॉक्स उघडल्यावर दिसतीलच. पण तोपर्यंत एका गोष्टीची खात्री पटली आहे की, लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न कितीही झाला, तरी सामान्य माणूस जेव्हा जागा होतो, तेव्हा तो कोणत्याही छावणीला किंवा जटिल प्रक्रियेला जुमानत नाही. बंगालने आज तेच सिद्ध केले आहे. या आक्रमक मतदानाने हे स्पष्ट केले आहे की, लोकशाहीत नागरिक हाच खरा ‘मालक’ आहे आणि त्याला गृहीत धरणे ही कोणत्याही सत्तेची मोठी चूक ठरेल.

बंगाल मधील मतदान लोकशाहीचा हुंकार की व्यवस्थेच्या क्रूरतेविरुद्धचा एल्गार? Read More »

konkandhara 66 2

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वेत्येत विनामोबदला जागा देतो : जितेंद्र गावकर

सावंतवाडी | प्रतिनिधी : संजय पिळणकर सावंतवाडी : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे हॉस्पिटल सावंतवाडीऐवजी वेत्ये येथे हलविण्याची मागणी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर गोव्यात हलविण्याची वेळ येत असून, यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. जागेअभावी सावंतवाडीत हॉस्पिटल शक्य नसल्यास ते वेत्ये येथे हलवावे. त्यासाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून देण्याची तयारी जितेंद्र गावकर यांनी दर्शविली आहे. यासंदर्भात निर्णय घेताना पाठपुरावा करणारे आमदार दीपक केसरकर यांच्या संमतीने लवकरात लवकर ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी केली आहे.

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वेत्येत विनामोबदला जागा देतो : जितेंद्र गावकर Read More »

konkandhara 31 2

मित्राने केला विश्वासघात ! विश्वासने दिलेल्या २ अंगठीपैकी एक विकली एक ठेवली गहाण तक्रारीवरून गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी मित्राने विश्वासाने दिलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्यांपैकी एक अंगठी विकून तसेच एक अंगठी फायनान्स कंपनीत गहाण ठेवून त्याचे तब्बल 1 लाख 55 हजार रुपये लाटेल. याप्रकरणी संशयित मित्राविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 29 मार्च रोजी सकाळी 11 ते 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा.कालावधीत शहरातील आरोग्य मंदिर व मारुती मंदिर येथे परिसरात घडली आहे.प्रथम जयेश खानविलकर (23,मुळ रा.राजीवडा सध्या रा.शांतीनगर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मित्राचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रसाद रविंद्र पोकळे (25,रा.मारुती मंदिर,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तकार दिली आहे. त्यानुसार, हे दोघेही मित्र आहेत. 29 मार्च 2026 रोजी प्रसाद पोकळेने त्याच्या वडिलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या त्याचा मित्र प्रथम खानविलकर याच्याकडे अधिकचे सोने घालून काम करुन आणण्यासाठी विश्वासाने दिल्या होत्या. परंतू प्रथम खानविलकरने त्यातील एक अंगठी सोनाराला विकली. तसेच दूसरी अंगठी ही मुथ्थूट फायनान्स कंपनीत गहाण ठेवून कर्ज घेतले. अशाप्रकारे दोन्ही अंगठ्यांवर त्याने एकूण 1 लाख 55 हजार रुपये घेउन स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. दरम्यान, 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वा.सुमारास प्रसादने प्रथमकडे दोन्ही अंगठ्यांची मागणी केली. तेव्हा प्रथमने त्याला मी तुला कोणतेही पैसे देणार नाही, ना अंगठ्या देणार. जास्त त्रास दिलास तर तुझे हातपाय तोडून तुला संपवून टाकेन अशी धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत

मित्राने केला विश्वासघात ! विश्वासने दिलेल्या २ अंगठीपैकी एक विकली एक ठेवली गहाण तक्रारीवरून गुन्हा दाखल Read More »

konkandhara 30 2

टिके-भातडेवाडी येथील तरुणाने आजारपणाला कंटाळून गळफास घेत केली आत्महत्या

रत्नागिरी : प्रतिनिधीतालुक्यातील टिके-भातडेवाडी येथील तरुणाने आजारपणाला कंटाळून व दारुच्या नशेत राहत्या घरी गळफास घ्ोत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार एप्रिल रोजी रात्री 9 ते बुधवार एप्रिल रोजी सकाळी 6.45 वा.कालावधीत घडली आहे.मंगेश तुकाराम कांबळे (41, रा.टिके भातडेवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश हा आजारी होता तसेच, त्याला दारुचेही व्यसन होते. या दोन्ही कारणांमुळे त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टिके-भातडेवाडी येथील तरुणाने आजारपणाला कंटाळून गळफास घेत केली आत्महत्या Read More »