चिपळूण /प्रतिनिधी : गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसाने डेरवण परिसराला जोरदार तडाखा बसला. या वादळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान झाले.
वादळासोबत आलेल्या प्रचंड वाऱ्यामुळे घरावरील कौलारू पत्रे सुमारे २० ते २५ फूट अंतरावर उडून रस्त्यावर पडली. त्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.















