konkandhara.com

कोकणची बातमी

konkandhara 99

कोल्हापूरहून रत्नागिरीत येणारा गुटखा पकडला; ६ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : शहर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका इसमावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी सापळा रचला. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास रत्नागिरी शहरात धडक कारवाई करत संशयित इको गाडी अडवली. या वाहनाची झडती घेतली असता त्यात ३ लाख २७ हजार ९०४ रुपयांचा गुटखा आणि पान मसाला आढळून आला. पोलिसांनी या मालासह ३ लाख ५० हजार रुपये किमतीची इको गाडी, असा एकूण ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी शरद गणपती भंडारे (रा. सरुड, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलीस कर्मचारी राहुल जाधव, रणजित जाधव आणि शरद जाधव यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.

कोल्हापूरहून रत्नागिरीत येणारा गुटखा पकडला; ६ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त Read More »

ChatGPT Image Apr 28 2026 12 08 39 AM

पैसे दिले नाही म्हणून मारहाण करत वडिलांना दुसर्या मजल्यावरून पाडले खाली

कुवारबाव येथील घटना; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल रत्नागिरी : प्रतिनिधीशहरातील कुवारबाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली. खर्चासाठी मागितलेले पैसे दिले नाहीत या रागातून मुलाने आपल्या वडिलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या झटापटीत वडील पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रणय मनोज सणस (2१, रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे धक्काबुक्की करणाऱ्या मुलाचे नाव आहे. ही घटना शनिवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास कुवारबाव येथील संगम हॉटेलच्या मागील पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घडली. फिर्यादी मनोज प्रभाकर सणस (५३, रा. वाई, सातारा, सध्या रा. कुवारबांव) हे कुकिंगचा व्यवसाय करतात. शनिवारी सायंकाळी ते व मुलगा प्रणय सणस हे कुवारबांव येथील संगम हॉटेलच्या मागील एका पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बसले होते. त्यावेळी मुलगा प्रणय याने वडिलांकडे खर्चासाठी २००० रुपयांची मागणी केली. वडिलांनी “माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, मी फक्त २०० रुपये देऊ शकतो” असे सांगितले. आपल्या मागणीपेक्षा कमी पैसे मिळत असल्याचा राग आल्याने प्रणयचा संयम सुटला. पैसे देण्यास नकार दिल्याने प्रणयने वडिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तो त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याने केलेल्या धक्काबुक्कीमुळे मनोज सणस यांचा तोल गेला आणि ते पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर पडले. या भीषण अपघातात त्यांच्या शरिराला गंभीर दुखापत झाली. दुसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर जखमी मनोज सणस रात्रभर तिथेच पडून होते. दुसऱ्या दिवशी रविवार २६ एप्रिल रोजी यांनी आपले मित्र दीपक घाटगे यांना बोलावून घेतले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांनी मनोज सणस यांचा जबाब नोंदवून घेतला. अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार पी. के. पाटील करत आहेत.

पैसे दिले नाही म्हणून मारहाण करत वडिलांना दुसर्या मजल्यावरून पाडले खाली Read More »

konkandhara 97

श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.समाजात मानवतेची भावना जपणारे असे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री दत्त मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास प्रचंड उष्मा असूनही रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ४० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन तोरसे (पेडणे) गावच्या माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रार्थना मोटे,उद्योजक प्रभाकर मोटे,बांदा सरपंच प्रियांका नाईक,उपसरपंच रत्नाकर आगलावे,तोरसे जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य रमेश सावळ,दत्तप्रसाद कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुशांत पांगम,उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ भाऊ वाळके,बांबोळी रक्तपेढीचे डॉ.पास्कल तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने संपन्न झाले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो,असे सांगितले.तरुणांनी रक्तदानास पुढाकार घ्यावा,महिलांनीही निर्भयपणे सहभाग घ्यावा,असे आवाहनही करण्यात आले.शिबिर यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश केसरकर,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे निलेश मोरजकर,अक्षय मयेकर,राजेश विरनोडकर,दर्पण आळवे,शुभम साळगावकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.रक्तदात्यांची नोंदणी,मार्गदर्शन,व्यवस्था आणि नियोजन यासाठी स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी केले,तर आभार रामचंद्र उर्फ भाऊ वाळके यांनी मानले.विशेष म्हणजे या शिबिरात महिलांनी देखील उत्स्फूर्त रक्तदान करून सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिला.

श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

konkandhara 96

जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, भुवनेश्वर (रोहा)चा ३१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

कोलाड दिनांक २७ एप्रिल (शरद जाधव) रोहा तालुक्यातील जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, भुवनेश्वर (रोहा) यांचा ३१ वा वर्धापनदिन पतसंस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन पांडुरंग सरफळे (रावसाहेब) होते. यावेळी उपाध्यक्ष शंकरराव भगत, सचिव सुहास खरीवले तसेच संचालक मनोहर मेहेतर, संदीप सरफळे, दीपक जाधव, जगदीश दामाणी, हेमंत राणे, महेश बामुगडे, सौ. सुलभा पवार, विनायक पवार, व्यवस्थापिका बंदिनी धनावडे, निता शिंगृत, विश्वास खेरटकर, किरण शिंगृत, रुपेश लोखंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष पांडुरंग सरफळे यांच्या हस्ते भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सचिव सुहास खरीवले यांनी उपस्थित पदाधिकारी व संचालकांचे स्वागत केले. यावेळी दीपक जाधव, महेश बामुगडे, उपाध्यक्ष शंकरराव भगत व सचिव सुहास खरीवले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संस्था गेली ३१ वर्षे पारदर्शक व कुटुंबवत्सल पद्धतीने कार्यरत असून सभासदांच्या आर्थिक गरजांसाठी सातत्याने कर्जपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेक सभासद कुटुंबांची आर्थिक उन्नती होऊन त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. या यशामागे सर्व संचालक, सभासद, कर्जदार व ठेविदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.अध्यक्ष पांडुरंग सरफळे यांच्या कार्यकर्तृत्व, कल्पकता, संकल्पना व दूरदृष्टीमुळे रोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी संस्थेचे स्वतःच्या जागेत भव्य कार्यालय उभे राहिले असून संस्थेचा कारभार दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे. सहकाराची भावना व सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर अशक्य वाटणारी गोष्टही साध्य होऊ शकते, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. सहकारी पतसंस्थेच्या म.स.अधिनियम १९६० व नियम १९६१ व नियामक मंडळाच्या सुचना यानुसार कामकाज केले जाते.नियामक मंडळाच्या नियमावलीचे पालन करूनच संस्थेचा कारभार चालविला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी बंदिनी धनावडे व निता शिंगृत यांचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याच कार्यक्रमात निता शिंगृत यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.भविष्यातही पतसंस्थेचा कारभार पारदर्शक ठेवत ग्राहकांचे हित जपणे व आर्थिक प्रगती साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार संचालक मंडळाने व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी सचिवांनी उपस्थितांचे आभार मानले.

जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, भुवनेश्वर (रोहा)चा ३१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा Read More »

konkandhara 95

भातसई येथे श्री महादाई देवी व धावीर महाराज मूर्तींच्या वर्धापन   दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनरोहा

(वार्ताहर):रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र भातसई येथे श्री महादाई देवी व धावीर महाराज मूर्तींच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन   श्री महादाई देवी व धावीर महाराज देवस्थान, मंदिराजवळ करण्यात आले आहे.या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा, अभिषेक, हरिपाठ, कीर्तन व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.०० ते ९.०० वाजता काकडा याने होणार असून, त्यानंतर ९.०० ते १०.०० अभिषेक, तसेच सकाळी ११.०० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे.सायंकाळी ६.०० ते ७.०० हरिपाठ आयोजित करण्यात आला असून, विविध पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर रात्री ७.०० ते ८.०० महाप्रसाद व रात्री ९.०० ते ११.०० कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.या कीर्तनासाठी ह.भ.प. विक्रांत महाराज पोंडकर यांची उपस्थिती लाभणार असून, जोग महाराज वारकरी संस्था, देवाची आळंदी यांचा सहभाग असणार आहे. तसेच अनेक मान्यवर कीर्तनकार व गायक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.हा सोहळा ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व युवक मंडळ भातसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

भातसई येथे श्री महादाई देवी व धावीर महाराज मूर्तींच्या वर्धापन   दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनरोहा Read More »

konkandhara 94

कोलाड पोलिसांकडून भंगार माफीयांना कायदेशीर सूचना,सुरक्षिततेचे पालन करा अन्यथा कारवाई अटळ

(भंगार व्यावसायिकांचा विषय गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात गेल्याची चर्चा) कोलाड २७एप्रिल (शरद जाधव) रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात भंगार माफीयांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे.या विरोधात स्थानिक नागरिकांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.प्रशासनाने भंगार माफीयांना बोलावून नोटीसा बजावल्या आहेत.कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षिततेचे पालन करा,अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारने यांनी नोटिसांद्वारे दिला आहे.मुंबई गोवा महामार्गावर तळवली गाव ते भिरा फाटा,वरसगाव,पुगाव,पुई,कोलाड,येथे भंगार व्यवसायिकांनी जागा भाड्याने घेऊन भंगार व्यवसायाची मोठमोठी दुकाने थाटली आहेत.या भंगार व्यवसायामुळे परिसराला अक्षरश: बकालपणा प्राप्त झाला आहे. या परिसरात चोऱ्या देखील खूप वाढल्या आहेत. स्थानीनिकांनी आवाज उठवताच पोलिसांनी तातडीचे पावले उचलीत भंगार व्यावसायिकांना कायदेशीर नोटिसा दिल्या आहेत.प्रत्येक भंगार अड्ड्यावर माणसे किती असतात त्यांचा आधार कार्ड सर्व माहिती पोलिसांना कळवा असा इशारा दिला आहे.भंगार विक्रेते परप्रांतीय आहेत.ते कुणाच्या मर्जीत राहत नाहीत.काही महिन्यापूर्वी खांब येथील स्थानिक व्यापाऱ्यांचा माल भंगार विक्रेत्याच्या गाडीतून चोरीला गेला.त्याचा जाब विचारला असता व्यापाऱ्यास मारहाण झाली.यावरून प्रचंड मस्तावलेले भंगार व्यावसायिक दिसून आले आहेत.त्यामुळे पोलिसांनी नोटीस देण्याचे काम जरी केले असले,तरी हे भंगार धंदे कायमस्वरूपी बंद व्हावे याकरता ज्या हद्दीत हे धंदे आहेत.ती ग्रामपंचायत काय कारवाई करते? याकडे लक्ष लागले आहे.सदर विषय हा रोहा गटविकास अधिकारी त्यांच्या दालनात इथल्या लोकप्रतिनिधींनी नेल्याचे समजते.त्यामुळे कायमस्वरूपी हे धंदे बंद होतात का ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोलाड पोलिसांकडून भंगार माफीयांना कायदेशीर सूचना,सुरक्षिततेचे पालन करा अन्यथा कारवाई अटळ Read More »

konkandhara 93 1

सावंतवाडीत २९ एप्रिलला जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबाराचे रणशिंग ; “आरोग्य व्यवस्थेचा हिशोब द्या!”

दोडामार्ग : भूषण सावंत : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटींना थेट भिडण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, सावंतवाडी, अभिमन्यू फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबार आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे प्रशासनाच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित होणार असून, आरोग्य व्यवस्थेची खरी स्थिती जनतेसमोर उघड होणार आहे. 📅 बुधवार, २९ एप्रिल २०२६⏰ सकाळी १०.०० ते दुपारी १.००📍 स्थळ : बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी नगरपरिषद “सिटीजन चार्टर कुठे हरवले?” — थेट सवाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवांमध्ये असलेली ढिसाळ व्यवस्था, तांत्रिक अडचणी आणि रुग्णांची होणारी परवड याविरोधात हा दरबार म्हणजे एक प्रकारचा जनतेचा आक्रोश ठरणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा सर्व स्तरांवरील सेवांबाबत नागरिकांना आपले प्रश्न, तक्रारी आणि सूचना थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. ⚠️ प्रशासनाला थेट इशारा !आरोग्य विभागाने सिटीजन चार्टरप्रमाणे सेवा देण्यात अपयश आले, तर जनतेचा संताप उफाळून येईल, असा इशारा आयोजकांकडून देण्यात आला आहे. हा दरबार केवळ चर्चा न राहता, ठोस निर्णय आणि जबाबदारी निश्चित करणारा मंच ठरेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 🗣️ “पीडितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा” जिल्ह्यातील पीडित, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या तक्रारींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा घडवून आणण्यासाठी हा दरबार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 📞 तालुकानिहाय संपर्क व्यवस्था सज्ज या उपक्रमासाठी तालुकानिहाय प्रतिनिधी आणि संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले असून, नागरिकांनी आपल्या समस्या आधीच नोंदवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे. 💥 “जनतेचा दरबार, प्रशासनाचा हिशोब !” सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर थेट बोट ठेवणारा हा दरबार आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार की सुधारण्याची संधी, हे येणारा काळच ठरवेल. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे — आता जनतेचा आवाज दाबला जाणार नाही !

सावंतवाडीत २९ एप्रिलला जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबाराचे रणशिंग ; “आरोग्य व्यवस्थेचा हिशोब द्या!” Read More »

konkandhara 92 1

दोडामार्गात ‘गो-सन्मान’ चा प्रचंड उठाव ! तहसीलदारांना निवेदन देत गोप्रेमींचा एल्गार

दोडामार्ग : भूषण सावंत: “चला दोडामार्ग…”च्या घोषणांनी तालुका दणाणून गेला आणि आज सोमवारी गो-सन्मान आह्वान अभियानांतर्गत भव्य मोर्चा उत्साहात पार पडला. पिंपळेश्वर बाजारपेठेतून निघालेला हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला, जिथे प्रतिनिधीमंडळाने तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने गोप्रेमी, नागरिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. गो-सन्मानासाठी ठाम भूमिका या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारपर्यंत ठोस संदेश पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. देशभर एकाच वेळी तालुकास्तरावर निवेदने देण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून दोडामार्गातही ही लढाई उभी राहिली. “गोमातेचा सन्मान हा केवळ भावनेचा विषय नसून राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे,” असा जोरदार सूर आंदोलनकर्त्यांनी लावला. मुख्य मागण्या स्पष्ट आणि आक्रमक सादर करण्यात आलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या ठळकपणे मांडण्यात आल्या— गोमातेला “राष्ट्रमाता” म्हणून घोषित करणे गोसेवेसाठी संपूर्ण देशात एकसमान केंद्रीय कायदा लागू करणे भारतात गोहत्येवर पूर्णतः बंदी घालणे 📜 शासनासमोर १० ठोस उपाययोजना फक्त घोषणांवर न थांबता, शासनाने तातडीने अंमलबजावणी कराव्यात अशा विविध उपाययोजनाही मांडण्यात आल्या— गोशाळांना नियमित अनुदान व व्यवस्थापनासाठी धोरण आखणे गोमूत्र, शेण यावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य व गोआधारित शेतीला चालना रासायनिक शेतीवर नियंत्रण आणून सेंद्रिय पर्यायांना प्राधान्य गोवंश संवर्धनासाठी संशोधन केंद्रे स्थापन करणे दुग्धव्यवसाय व गोपालनाला बाजारपेठीय पाठबळ देणे सार्वजनिक कार्यक्रमांत गोदुग्ध व संबंधित उत्पादनांचा वापर वाढवणे चारागाह जमीन व गोचर भूमीचे संरक्षण गोवंशाशी संबंधित उद्योगांना विशेष सवलती बैलाधारित शेतीसाठी विशेष आर्थिक मदत 👥 मोठ्या संख्येने गोप्रेमींची उपस्थिती मोर्चात तरुण, शेतकरी, महिला व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. दोडामार्गातील हा मोर्चा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न ठरता, गो-सन्मानासाठी सुरू झालेल्या व्यापक जनआंदोलनाची ठोस नांदी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता या मागण्यांवर शासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोडामार्गात ‘गो-सन्मान’ चा प्रचंड उठाव ! तहसीलदारांना निवेदन देत गोप्रेमींचा एल्गार Read More »

konkandhara 91 1

दोडामार्गात पाणीटंचाईग्रस्त नागरिकांनी थेट संपर्क साधा – बाबुराव धुरींचे आवाहन

दोडामार्ग : भूषण सावंत : तालुक्यात नळपाणी योजना बंद पडलेल्या, विहिरी-आड कोरड्या पडलेल्या आणि नैसर्गिक स्रोत आटल्यामुळे महिला-भगिनींचे हाल होत असतील तर या गंभीर परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आक्रमक भूमिका घेत नागरिकांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. धुरी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, “ज्या गावांत, वाड्यांत पाणीटंचाई आहे, टँकर येत नाहीत किंवा नळांना पाणी येत नाही, त्या नागरिकांनी तात्काळ संपर्क साधावा. तुमचे प्रश्न शासन दरबारी ठामपणे मांडून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” धुरी यांनी पुढे सांगितले की, “गेल्या ३५ वर्षांपासून मी जनतेची सेवा करत आहे. पद असो वा नसो, लोकांचे प्रश्न सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे. तालुक्यातील एकही नागरिक पाण्यावाचून त्रस्त राहणार नाही, यासाठी प्रशासनावर दबाव आणणार.” तसेच, ज्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे, त्या ठिकाणची सविस्तर माहिती—गावाचे नाव, किती दिवसांपासून टंचाई आहे, किती कुटुंबांना फटका बसतोय—ही माहिती नागरिकांनी त्वरित कळवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुरी यांचे शिवसैनिक पथक तहसीलदार व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तातडीने टँकर सुरू करणे व कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची जोरदार मागणी करणार आहे. पाणीटंचाईचा प्रश्न आता तापला असून, प्रशासनाने तात्काळ जागे न झाल्यास जनतेचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही !

दोडामार्गात पाणीटंचाईग्रस्त नागरिकांनी थेट संपर्क साधा – बाबुराव धुरींचे आवाहन Read More »

konkandhara 90 1

दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू

चंद्रशेखर जोशी दापोली : डोंबिवली येथून पर्यटनासाठी आलेल्या एका २३ वर्षीय पर्यटकाचा अचानक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथील निनाद विजय ठाकुरदेसाई हे त्यांच्या कुटुंबियांसह २४ एप्रिल रोजी दापोली येथे पर्यटनासाठी आले होते. त्यांनी दापोली तालुक्यातील वळणे येथील एका रिसॉर्टमध्ये रूम घेतली होती. ठाकुरदेसाई कुटुंबियांनी समुद्रावर जाऊन तेथील आनंद लुटला होता. आज सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा २३ वर्षीय मुलगा श्रवण यास अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड करत आहेत. श्रवण याचे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण झाले होते. तो गुजरात येथील एका हॉटेलमध्ये शेफचे काम करत होता.

दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू Read More »