कोलाड दिनांक २७ एप्रिल (शरद जाधव)
रोहा तालुक्यातील जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, भुवनेश्वर (रोहा) यांचा ३१ वा वर्धापनदिन पतसंस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन पांडुरंग सरफळे (रावसाहेब) होते. यावेळी उपाध्यक्ष शंकरराव भगत, सचिव सुहास खरीवले तसेच संचालक मनोहर मेहेतर, संदीप सरफळे, दीपक जाधव, जगदीश दामाणी, हेमंत राणे, महेश बामुगडे, सौ. सुलभा पवार, विनायक पवार, व्यवस्थापिका बंदिनी धनावडे, निता शिंगृत, विश्वास खेरटकर, किरण शिंगृत, रुपेश लोखंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष पांडुरंग सरफळे यांच्या हस्ते भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सचिव सुहास खरीवले यांनी उपस्थित पदाधिकारी व संचालकांचे स्वागत केले.
यावेळी दीपक जाधव, महेश बामुगडे, उपाध्यक्ष शंकरराव भगत व सचिव सुहास खरीवले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संस्था गेली ३१ वर्षे पारदर्शक व कुटुंबवत्सल पद्धतीने कार्यरत असून सभासदांच्या आर्थिक गरजांसाठी सातत्याने कर्जपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेक सभासद कुटुंबांची आर्थिक उन्नती होऊन त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. या यशामागे सर्व संचालक, सभासद, कर्जदार व ठेविदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
अध्यक्ष पांडुरंग सरफळे यांच्या कार्यकर्तृत्व, कल्पकता, संकल्पना व दूरदृष्टीमुळे रोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी संस्थेचे स्वतःच्या जागेत भव्य कार्यालय उभे राहिले असून संस्थेचा कारभार दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे. सहकाराची भावना व सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर अशक्य वाटणारी गोष्टही साध्य होऊ शकते, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. सहकारी पतसंस्थेच्या म.स.अधिनियम १९६० व नियम १९६१ व नियामक मंडळाच्या सुचना यानुसार कामकाज केले जाते.नियामक मंडळाच्या नियमावलीचे पालन करूनच संस्थेचा कारभार चालविला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी बंदिनी धनावडे व निता शिंगृत यांचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याच कार्यक्रमात निता शिंगृत यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.
भविष्यातही पतसंस्थेचा कारभार पारदर्शक ठेवत ग्राहकांचे हित जपणे व आर्थिक प्रगती साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार संचालक मंडळाने व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सचिवांनी उपस्थितांचे आभार मानले.















