दोडामार्ग : भूषण सावंत : तालुक्यात नळपाणी योजना बंद पडलेल्या, विहिरी-आड कोरड्या पडलेल्या आणि नैसर्गिक स्रोत आटल्यामुळे महिला-भगिनींचे हाल होत असतील तर या गंभीर परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आक्रमक भूमिका घेत नागरिकांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
धुरी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, “ज्या गावांत, वाड्यांत पाणीटंचाई आहे, टँकर येत नाहीत किंवा नळांना पाणी येत नाही, त्या नागरिकांनी तात्काळ संपर्क साधावा. तुमचे प्रश्न शासन दरबारी ठामपणे मांडून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
धुरी यांनी पुढे सांगितले की, “गेल्या ३५ वर्षांपासून मी जनतेची सेवा करत आहे. पद असो वा नसो, लोकांचे प्रश्न सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे. तालुक्यातील एकही नागरिक पाण्यावाचून त्रस्त राहणार नाही, यासाठी प्रशासनावर दबाव आणणार.”
तसेच, ज्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे, त्या ठिकाणची सविस्तर माहिती—गावाचे नाव, किती दिवसांपासून टंचाई आहे, किती कुटुंबांना फटका बसतोय—ही माहिती नागरिकांनी त्वरित कळवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुरी यांचे शिवसैनिक पथक तहसीलदार व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तातडीने टँकर सुरू करणे व कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची जोरदार मागणी करणार आहे.
पाणीटंचाईचा प्रश्न आता तापला असून, प्रशासनाने तात्काळ जागे न झाल्यास जनतेचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही !















