(भंगार व्यावसायिकांचा विषय गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात गेल्याची चर्चा)
कोलाड २७एप्रिल (शरद जाधव)
रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात भंगार माफीयांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे.या विरोधात स्थानिक नागरिकांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.प्रशासनाने भंगार माफीयांना बोलावून नोटीसा बजावल्या आहेत.कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षिततेचे पालन करा,अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारने यांनी नोटिसांद्वारे दिला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर तळवली गाव ते भिरा फाटा,वरसगाव,पुगाव,पुई,कोलाड,येथे भंगार व्यवसायिकांनी जागा भाड्याने घेऊन भंगार व्यवसायाची मोठमोठी दुकाने थाटली आहेत.या भंगार व्यवसायामुळे परिसराला अक्षरश: बकालपणा प्राप्त झाला आहे. या परिसरात चोऱ्या देखील खूप वाढल्या आहेत. स्थानीनिकांनी आवाज उठवताच पोलिसांनी तातडीचे पावले उचलीत भंगार व्यावसायिकांना कायदेशीर नोटिसा दिल्या आहेत.प्रत्येक भंगार अड्ड्यावर माणसे किती असतात त्यांचा आधार कार्ड सर्व माहिती पोलिसांना कळवा असा इशारा दिला आहे.
भंगार विक्रेते परप्रांतीय आहेत.ते कुणाच्या मर्जीत राहत नाहीत.काही महिन्यापूर्वी खांब येथील स्थानिक व्यापाऱ्यांचा माल भंगार विक्रेत्याच्या गाडीतून चोरीला गेला.त्याचा जाब विचारला असता व्यापाऱ्यास मारहाण झाली.यावरून प्रचंड मस्तावलेले भंगार व्यावसायिक दिसून आले आहेत.त्यामुळे पोलिसांनी नोटीस देण्याचे काम जरी केले असले,तरी हे भंगार धंदे कायमस्वरूपी बंद व्हावे याकरता ज्या हद्दीत हे धंदे आहेत.ती ग्रामपंचायत काय कारवाई करते? याकडे लक्ष लागले आहे.सदर विषय हा रोहा गटविकास अधिकारी त्यांच्या दालनात इथल्या लोकप्रतिनिधींनी नेल्याचे समजते.त्यामुळे कायमस्वरूपी हे धंदे बंद होतात का ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















