konkandhara.com

Editorial

वेंगुर्लेतील आंतरराज्य व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; राज्यस्तरीय खेळाडू घडतील – प्रितेश राऊळ

वेंगुर्लेतील आंतरराज्य हॉलीबॉल स्पर्धेतून राज्यस्तरीय खेळाडू निर्माण होतील : प्रितेश राऊळ

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद संजय पिळणकर | वेंगुर्ले :भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस वेंगुर्लेसह संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. वेंगुर्ले तालुक्यात व्हॉलीबॉल स्पर्धेसह दशावतारी नाट्य महोत्सव, कबड्डी स्पर्धा, आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. या आंतरराज्य हॉलीबॉल स्पर्धेतून राज्यस्तरीय खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी व्यक्त केला. खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त “संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा आणि जय मानसीश्वर संघ यांच्या वतीने भव्य खुली आंतरराज्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेश सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ बोलत होते. या कार्यक्रमाला प्रसन्ना (बाळू) देसाई, विष्णू उर्फ पप्पू परब, शरद चव्हाण, वसंत तांडेल, नगराध्यक्ष राजन गिरप, आकांक्षा परब, शितल आंगचेकर, रिया केरकर, गौरी माईणकर, यशवंत उर्फ दाजी परब, सचिन शेटये, प्राचार्य धनराज गोस्वामी, प्रा. जे.वाय. नाईक, प्रा. बी.जी. गायकवाड, अनंत केळूसकर, जयंत मोंडकर, प्रणव वायंगणकर, भूषण आंगचेकर, मनोहर तांडेल, कौस्तुभ वायंगणकर, सॅमसंग फर्नांडिस, तुषार साळगांवकर, भूषण सारंग, हेमंत तुळसकर, संदीप शेटये, नामदेव सरमळकर, पंच हेमंत गावडे, राधाकृष्ण उर्फ दादा पेडणेकर, अमित हर्डीकर, दाजी नाईक, महेंद्र मातोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा येथील अनेक संघ सहभागी झाले आहेत. नगराध्यक्ष राजन गिरप यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वेंगुर्ले येथे अनेक वर्षांपासून हॉलीबॉल खेळला जात असून अशा स्पर्धांमुळे खेळाला नवी ऊर्जा मिळते. स्पर्धेचे नियोजन नेहमीप्रमाणे उत्कृष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत तांडेल यांनी केले, स्वागत प्रणव वायंगणकर यांनी केले तर आभार प्रसन्ना (बाळू) देसाई यांनी मानले. स्पर्धेचे नियोजन युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले असून, संपूर्ण वेंगुर्ले शहरात झेंडे आणि बॅनर्स लावून उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

वेंगुर्लेतील आंतरराज्य हॉलीबॉल स्पर्धेतून राज्यस्तरीय खेळाडू निर्माण होतील : प्रितेश राऊळ Read More »

ओंकार भोजनेचा ‘सालबर्डी’ चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित; वेगळ्या भूमिकेत झळकणार

ओंकार भोजनेचा नवा चित्रपट! सालबर्डी १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार

प्रतिनिधी – कोकणधारा चिपळूण: कोकणातील चिपळूणचा सुपुत्र आणि आपल्या खास विनोदी शैलीसाठी ओळखला जाणारा अभिनेता ओंकार भोजने आता नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, येत्या १७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ओंकारच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ओंकार भोजनेने आपल्या अफलातून कॉमिक टायमिंग आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. आपल्या विनोदी शैलीतून घराघरात पोहोचलेल्या ओंकारने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, आता तो प्रेक्षकांसमोर एका वेगळ्याच रूपात दिसणार आहे. या नव्या चित्रपटामध्ये ओंकार भोजने अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगळ्या भूमिकेत झळकणार असून, त्याच्या अभिनयाची नवी झलक पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ओंकार यावेळी अधिक गंभीर, प्रभावी आणि आशयघन भूमिकेतून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटाची कथा सामाजिक वास्तवाला भिडणारी असून, ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित आहे. मानवी नातेसंबंध, स्थानिक प्रश्न आणि समाजातील बदलत्या परिस्थितीचा वेध घेणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातील विविध निसर्गरम्य ठिकाणी पूर्ण झाले असून, त्यामध्ये कोकणातील काही सुंदर लोकेशन्सचाही समावेश आहे. त्यामुळे चित्रपटाला वास्तववादीपणा आणि दृश्यात्मक आकर्षण लाभणार आहे. चित्रपटातील इतर कलाकारांची फळीही दमदार असून, लवकरच त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. संगीत आणि पार्श्वसंगीतही कथेला साजेसे असणार असल्याचे सांगितले जात आहे. ओंकार भोजनेचा हा आगामी चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून त्याच्या वेगळ्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ओंकार भोजनेचा नवा चित्रपट! सालबर्डी १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार Read More »

रत्नागिरीत आंबा व्यावसायिकाची आत्महत्या; कर्जाच्या ताणातून टोकाचे पाऊल

रत्नागिरीत आंबा व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती

रत्नागिरी : प्रतिनिधी आंबा व्यापारी आणि ‘हापूस ॲग्रो’चे संचालक रुपेश प्रकाश उर्फ बाब्या नागवेकर (५०, रा. तोणदे) यांनी सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. कर्जाचा ताण आणि सावकारी जाचामधून हे टोकाचे पाऊल उचलले गेल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवार सकाळी १०.३० च्या सुमारास रुपेश नागवेकर यांच्या पत्नी सौ. प्राची नागवेकर या मुलाला घेऊन बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर साधारण ११ वाजता त्यांच्या घरात कामासाठी आलेल्या महिलेला रुपेश नागवेकर हे घराच्या अंगणातील खुर्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हे भीषण दृश्य पाहून त्या महिलेने आरडाओरड केली, त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रुपेश नागवेकर यांनी शेती संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. गोळी हनुवटीतून थेट डोक्यात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नागवेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, रुपेश नागवेकर यांच्यावर कर्जाचा मोठा ताण होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांना पैशांसाठी सतत फोन येत होते, अशी माहिती समोर येत आहे. माझा भाऊ कर्जाच्या प्रचंड ताणाखाली होता. त्याला गेल्या काही दिवसांपासून कोणाकोणाचे फोन आले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीडीआर (CDR) काढून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी मृतक रुपेश नागवेकर यांचे भाऊ दीपक उर्फ बंधू नागवेकर यांनी केली आहे

रत्नागिरीत आंबा व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती Read More »

konkandhara 10

पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरण’चिपळूण नगरी’च्या १० जणांविरुद्ध दोषारोपपत्र,

१८ दिवसांत तपास पूर्ण; न्यायालयात दोषारोपपत्र दाखलयादव पती-पत्नीचाही जबाब; पत्रकारांचे उपोषण तात्पुरते स्थगित चिपळूण : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणात पोलिसांनी जलद गतीने तपास पूर्ण करत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. अवघ्या १८ ते १९ दिवसांत तपास पूर्ण करून सोमवारी (दि. १३ एप्रिल) चिपळूण येथील न्यायदंडाधिकारी वर्ग-१ न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले. या प्रकरणात चिपळूण नागरी पतसंस्थेच्या १० कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे. या घटनेनंतर पत्रकार संघटनांनी तीव्र भूमिका घेत निषेध आंदोलनाचा इशारा दिला होता. विशेषतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम ४०० लागू करून पुढील कार्यवाही सुरू केल्याने पत्रकारांनी जाहीर केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. ओळख परेड, पुरावे आणि जबाब नोंदणीतपासादरम्यान फिर्यादी दीपक भागवत यांच्या उपस्थितीत संशयित आरोपींची दोनवेळा ओळख परेड घेण्यात आली. तसेच भागवत यांच्या पुरवणी जबाबानुसार प्रशांत यादव आणि पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचेही जबाब नोंदवण्यात आले. प्रशांत यादव यांचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्यात आला असता, घटनेच्या वेळी ते संगमेश्वर येथे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. पत्रकारांच्या मागणीनुसार स्वप्ना यादव यांचाही सीडीआर तपासण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचेमारहाणीच्या घटनेच्या ठिकाणचे शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून ते चार्जशीटसोबत न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या फुटेजमुळे घटनाक्रम स्पष्ट करण्यात पोलिसांना मदत झाली असल्याचे सांगण्यात आले. चिपळूण नागरी पतसंस्थेतील एका अधिकाऱ्याला बोलावून त्याच्याकडून व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दहाजणांची ओळख पटवण्यात आल, असेही त्यांनी सांगितले दहा कर्मचाऱ्यांवर दोषारोपपत्रया प्रकरणात संदीप गणू घुले (मालघर, वाजेवाडी), मंगेश मनोहर महाडिक (मुंडेतर्फे चिपळूण, शिर्केवाडी), सचिन रमेश डेरवणकर (बीजघर, सुतारवाडी, ता. खेड), सौरभ नरेंद्र सुर्वे (बिरमणी वरचीवाडी, ता. खेड), रोहित सुरेश खांबे (मांडकी खांबेवाडी), संकेत दत्ताराम कदम (पेढांबे भराडेवाडी), अभिषेक चंद्रकांत मोहिते (मार्कंडी, चिपळूण), चैतन्य रामचंद्र कदम (खेर्डी, शिवाजीनगर), विनोद लक्ष्मण खेतले (मुंडे, खोतवाडी), प्रशांत आत्माराम पवार (पवारआळी चिपळूण) अशा एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गंभीर कलमांचा समावेशया प्रकरणात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) यांसह विविध कलमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ‘महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था अधिनियम २०१७’ अंतर्गतही कलमे लावण्यात आली आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. पत्रकार व नागरिकांमध्ये समाधानाची भावनाचार्जशीट दाखल झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पत्रकारांनी तपास अधिकारी प्रकाश बेले यांची भेट घेत तपासाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. अल्पावधीत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे पत्रकार व नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. आता हे प्रकरण पुढील न्यायप्रक्रियेसाठी न्यायालयात गेल्याने सर्वांचे लक्ष सुनावणीकडे लागले असून, आरोपींना योग्य शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरण’चिपळूण नगरी’च्या १० जणांविरुद्ध दोषारोपपत्र, Read More »

२१ कोटींच्या निधीतून तीन पूल; चिपळूण–संगमेश्वरच्या विकासाला गती

२१ कोटींच्या निधीतून तीन पूल; चिपळूण–संगमेश्वरच्या विकासाला गती

चिपळूण : चिपळूण–संगमेश्वर मतदार संघातील दळणवळणाच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, केंद्रीय मार्ग निधी (CRF) अंतर्गत तीन पुलांच्या बांधकामासाठी एकूण २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळाल्याचे सांगितले जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण येथील रा.मा. १६६ वांझोळे–कासार कोळवण–बोंड्ये ते रा.मा. १७४ या मार्गावरील बावनदीवरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पुलाच्या बांधकामासाठी ६.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले येथील प्र.जि.मा. ४६ ते हेदली-अणदेरी-कारभाटले प्र.जि.मा. ४७ या मार्गावर कि.मी. ०/९०० येथे शास्त्री नदीवर ७२ मीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामासाठी ६.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलामुळे परिसरातील गावांमधील अंतर कमी होऊन नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच चिपळूण तालुक्यातील दळवटणे येथील खांदाट–दळवटणे–मोरवणे मार्गावरील प्र.जि.मा. २७ कि.मी. १/०० येथील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे स्थानिकांसाठी सुरक्षित आणि अखंड वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. या तिन्ही कामांसाठी स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागण्यांचा विचार करून आमदार Shekhar Nikam यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच अधिवेशनात वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून या कामांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

२१ कोटींच्या निधीतून तीन पूल; चिपळूण–संगमेश्वरच्या विकासाला गती Read More »

bhargavram-parshuram-devsthan-president-jeevan-relekar-election

संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानच्या अध्यक्षपदी ॲड. जीवन रेळेकर यांची बिनविरोध निवड

चिपळूण : संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानच्या विश्वस्त समितीच्या अध्यक्षपदी ॲड. जीवन काशिनाथ रेळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मा. जिल्हा न्यायाधीश, रत्नागिरी यांच्या ६ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशानुसार नव्या विश्वस्त समितीची नेमणूक करण्यात आली होती. या समितीत ॲड. संजेश मधुसूदन देसाई, अभय नारायण सहस्रबुद्धे, डॉ. प्रशांत दत्तात्रय पटवर्धन, धनंजय सुधाकर चितळे, प्रशांत निशिकांत जोशी आणि संदीप सदाशिव थत्ते यांचा समावेश आहे. दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या विश्वस्तांमधून ॲड. जीवन रेळेकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व विश्वस्त तसेच देवस्थानच्या कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानच्या अध्यक्षपदी ॲड. जीवन रेळेकर यांची बिनविरोध निवड Read More »

पवन तलाव मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जा; डे-नाईट स्पर्धांसाठी सुविधा उभारणार – शेखर निकम

पवन तलाव मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा संकल्प; डे-नाईट स्पर्धांसाठी विशेष सुविधा उभारणार

आमदार शेखर निकम यांची ग्वाही; राज्यस्तरीय आमदार चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन चिपळूण : शहरातील ऐतिहासिक पवन तलाव मैदान हे खऱ्या अर्थाने चिपळूण शहराचा दागिना असून या मैदानाचा सर्वांगीण विकास करून ते अधिक सुसज्ज करण्यावर आगामी तीन वर्षांत विशेष भर दिला जाणार आहे. तसेच येथे डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करता याव्यात यासाठी आधुनिक प्रकाशयोजना उभारण्याबाबत तांत्रिक बाबींचा अभ्यास केला जाणार असून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान उभे करण्याचा मानस असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शहरातील पवन तलाव मैदानावर आयोजित ‘आमदार चषक’ भव्य सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे लेदर बॉल क्रिकेटला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सलग तीन वर्षे राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. प्रशिक्षक उदय काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट खेळाडू घडत असून स्पर्धांमधूनही खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे. आज चिपळूणमधील खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवत आहेत. पुढील वर्षी डे-नाईट सीजन बॉल स्पर्धा घेण्यासाठी मैदानावर वीज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली. यावेळी रणजीपटू सुनील मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, चिपळूणमध्ये उत्कृष्ट पद्धतीने मैदान तयार झाले असून आमदार शेखर निकम चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनला सिझन बॉल क्रिकेटसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या सुविधांचा खेळाडूंनी फायदा घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला क्रिकेटमधील नामवंत प्रशिक्षक सचिन कोळी, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथशेठ खताते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, सभापती सूर्यकांत घेतले, शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख प्राजक्ता टकले, नगरसेवक संजय गोताड, डॉ. अभिजीत सावंत, रियाज खेरटकर, दिनू माटे, सचिन भोसले, सम्राट भोसले आदींसह असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव राजेश सुतार, समालोचक सचिन कुलकर्णी, सुनील रेडीज, योगेश बांडागळे, सुयोग चव्हाण, विनीत देवधर, संदेश गोरिवले, पंच गोट्या भोसले, उदय काणेकर, दादा लकडे, साहिल कदम, प्रसाद सागवेकर, सलीम पालोजी, बाबल्या जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले. दरम्यान, ‘आमदार चषक’ राज्यस्तरीय सीजन बॉल क्रिकेट स्पर्धेचा समारोप १९ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली.

पवन तलाव मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा संकल्प; डे-नाईट स्पर्धांसाठी विशेष सुविधा उभारणार Read More »

जगबुडी पुलावर कंटेनरचा भीषण अपघात; 200 फूट खोल नदीत पडण्यापासून बचाव

जगबुडी पुलावर कंटेनरचा भीषण अपघात; मोठी दुर्घटना टळली

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर रविवारी (दि. १२ एप्रिल २०२६) सकाळी सुमारे ७ वाजता भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने दुभाजक तोडत थेट दोन पुलांच्या मधोमध जाऊन अडकला. अपघातावेळी कंटेनरचा अर्धा भाग हवेत लटकत नदीच्या दिशेने झुकलेला होता. त्यामुळे तो सुमारे २०० फूट खोल जगबुडी नदीत कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या प्रयत्नानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने अडकलेला कंटेनर सुरक्षित बाहेर काढण्यात आला. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, कंटेनर बाहेर काढण्याचे काम सुरू असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक लेन सुमारे दीड तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. विशेष म्हणजे, जगबुडी पुलावर याच आठवड्यातील हा दुसरा भीषण अपघात असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या पुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांकडून येथे तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

जगबुडी पुलावर कंटेनरचा भीषण अपघात; मोठी दुर्घटना टळली Read More »

रत्नागिरीत भाजप कार्यकर्ता संमेलन उत्साहात; SIR मार्गदर्शनावर भर

रत्नागिरीत भाजप कार्यकर्ता संमेलन उत्साहात संपन्न

रत्नागिरी: रत्नागिरी तालुका दक्षिण येथे भारतीय जनता पार्टीतर्फे SIR मार्गदर्शन व सक्रिय कार्यकर्ता संमेलन जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष दादा दळी यांनी भूषवले. निवडणूक आयोगाकडून सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्लोकनाच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या BLO 2 कार्यकर्त्यांनी आपल्या बूथवर कोणत्या पद्धतीने प्रभावी काम करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन दादा दळी यांनी केले. तसेच 6 एप्रिल रोजी साजऱ्या झालेल्या भाजप स्थापना दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा आढावा घेत, संघटन विस्तार आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना दिशा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष राजेश पाथरे यांनी केले, तर प्रास्ताविक अवधूत कळंबटे यांनी मांडले. यावेळी माजी महिला आघाडी अध्यक्षा ऐश्वर्या जठार यांनीही मार्गदर्शन केले. या संमेलनाला सुशांत पाटकर, महेश खानविलकर, अनघा साळवी, भाई जठार, चिराग खटकुळ, संतोष बोरकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरीत भाजप कार्यकर्ता संमेलन उत्साहात संपन्न Read More »

वेंगुर्ल्यात १२ एप्रिलला ‘विशाल सकल हिंदू संमेलन’; संस्कृती आणि एकतेचा भव्य उत्सव

वेंगुर्ल्यात दी १२ एप्रिल रोजी ‘विशाल सकल हिंदू संमेलन’ची जय्यत तयारी — संस्कृती, एकता आणि परंपरेचा भव्य उत्सव!

संजय पिळणकर | वेंगुर्ले :सनातन हिंदू धर्म, भारतीय संस्कृती आणि समाजातील ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले येथे रविवार दि. १२ एप्रिल रोजी “विशाल सकल हिंदू संमेलन” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून धर्म, संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत देश, धर्म आणि संस्कृतीसमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर हे संमेलन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. 📍 स्थळ व वेळ:वेंगुर्ले येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे🕓 सायंकाळी ४ ते ७ या वेळेत कार्यक्रम पार पडणार आहे. 🎤 प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:श्री. विवेक जोशी (प्रवचनकार, गोवा)डॉ. वसुंधरा मोरे (आंतरराष्ट्रीय योग गुरु)ह.भ.प. श्री. सावळाराम कुलकर्णी बुवा (प्रमुख अतिथी) संमेलनातील विशेष आकर्षणे:पारंपरिक समई नृत्य👉 जोशपूर्ण पोवाडा सादरीकरणरंगतदार शेतकरी नृत्य👉 इतिहासकालीन शस्त्रे व पुस्तकांचे भव्य प्रदर्शन या सर्वांमुळे संमेलनाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक रंगत लाभणार आहे. सर्व नागरिकांनी कुटुंबियांसह उपस्थित राहून या भव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

वेंगुर्ल्यात दी १२ एप्रिल रोजी ‘विशाल सकल हिंदू संमेलन’ची जय्यत तयारी — संस्कृती, एकता आणि परंपरेचा भव्य उत्सव! Read More »