konkandhara.com

18 अप्रैल 2026

konkandhara 50

व्हॉइस ऑफ मीडिया सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची निवड

​दोडामार्ग : भूषण सावंत : ९८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या जागतिक पत्रकार संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर, संघटनेच्या कार्याला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तालुकास्तरावर कार्यकारिणी विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ​या सभेचा मुख्य उद्देश गावपातळीवरील पत्रकारांना संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र आणणे हा होता. पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्या कामातील अडचणी समजून घेऊन त्या प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी तालुकास्तरावर सक्रिय टीम असणे आवश्यक आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यश माधव यांची तरुण, तडफदार आणि धडाकेबाज पत्रकार म्हणून असलेली ओळख संघटनेसाठी मोलाची ठरेल, या उद्देशाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माधव यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव संघटित होतील आणि संघटना अधिक बलशाली होईल, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ​या निवडीप्रसंगी जिल्हाध्यक्ष भूषण सावंत, शैलेश मयेकर, विष्णू धावडे, कार्याध्यक्ष संजय पिळणकर, मिलिंद धुरी व भूषण देसाई, सरचिटणीस अमित पालव, खजिनदार आनंद कांडरकर, उपाध्यक्ष जय भोसले, सुयोग पंडित व राजा दळवी, जनसंपर्क आणि प्रसिद्धीप्रमुख दीपक पटेकर, संघटक नयनेश गावडे, कार्यवाहक विजय सावंत आणि सदस्य रणजीत जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर यश माधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

व्हॉइस ऑफ मीडिया सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची निवड Read More »

khanoli-dashavatari-natya-mahotsav-vengurla

खानोलीत रंगणार पौराणिक नाट्य महोत्सव

दिनांक २१ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत संपन्न होणार वेंगुर्ला : प्रतिनिधीVengurla तालुक्यातील खानोली गावच्या वतीने श्री देव रवळनाथ रंगमंचावर दशावतार कलाक्षेत्रातील आघाडीच्या नाट्य मंडळांचा पौराणिक नाट्य महोत्सव २१ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. कोकणची पारंपरिक लोककला असलेल्या दशावताराचा वारसा जपत कलेला नवे व्यासपीठ देणारा हा महोत्सव २१ एप्रिल रोजी उद्घाटनाने सुरू होणार आहे. या महोत्सवात सागरेश्वर दशावतार नाट्य मंडळ आवेरे, दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग, आजगांवकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, मोचेमाडकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड, चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ आरवली आणि समारोपाच्या दिवशी खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ खानोली सादरीकरण करणार आहेत. या निमित्ताने भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या समारोपीय दिवशी भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व विशाल प्रभाकर परब, रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिलजी (बंधू साहेब) मयेकर यांच्यासह सौ. वेदिका विशाल परब, राकेश धर्णे, प्रसन्ना (बाळू) देसाई, राजन गिरप, सुहास गवंडळकर, अवी (दत्ताराम) दुतोंडकर, विजय नाईक, भालचंद्र केळुसकर, जेष्ठ रंगकर्मी संतोष रेडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पौराणिक नाट्य महोत्सवासाठी नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानोली गावचे सरपंच सुभाष खानोलकर आणि ग्रामस्थांनी केले आहे.

खानोलीत रंगणार पौराणिक नाट्य महोत्सव Read More »

दापोलीत विनापरवाना दारू वाहतूक उघड; २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

देशी दारू व बिअरची वाहतूक; २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

दापोली: विनापरवाना देशी दारू व बिअरची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाविरोधात दापोली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. या कारवाईत देशी दारू, बिअरचे बॉक्स तसेच वाहन असा एकूण २ लाख ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास दापोली बसस्थानकाजवळील चौकात वाहतूक कोंडी झाल्याने पोलिस पथक वाहतुकीचे नियमन करत होते. यावेळी मारुती इको (क्र. एमएच ०८ आर ८६३६) हे वाहन संशयास्पदरीत्या जाताना दिसले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारू व बिअरचे बॉक्स आढळून आले. चालक ऋतिक संतोष लांबे याच्याकडे मद्य बाळगण्याचा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाहन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तपासणीदरम्यान २६,८८० रुपये किमतीच्या जीएम संत्रा देशी दारूच्या १८० मिलीच्या ३३६ बाटल्या, ८,००० रुपये किमतीच्या ९० मिलीच्या २०० बाटल्या, ७,२०० रुपये किमतीचे टुबोर्ग बिअरचे ४८ टीन, ९,६०० रुपये किमतीच्या ६५० मिलीच्या टुबोर्ग बिअरच्या ४८ बाटल्या, ७,०२० रुपये किमतीच्या किंगफिशर बिअरच्या ३६ बाटल्या, ३,६०० रुपये किमतीचे किंगफिशर बिअरचे २४ टीन, ६,४८० रुपये किमतीचे लंडन पिल्सनर बिअरचे ४८ टीन, ११,८८० रुपये किमतीच्या लंडन पिल्सनर बिअरच्या ७२ बाटल्या तसेच सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण २ लाख ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दापोली पोलिस करत आहेत.

देशी दारू व बिअरची वाहतूक; २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त Read More »

गुहागर-चिपळूण मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

दुचाकी – व्हॅन अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

गुहागर : गुहागर-चिपळूण मार्गावरील चिखली येथील स्वामी समर्थ मठाजवळ टाटा मॅजिक मायक्रोव्हॅन आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १६) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ओम संतोष शितप (वय २०, रा. पवारसाखरी) आणि प्रतीक रमेश भुवड (वय २५) हे दोघे मित्र दुचाकीवरून (एमएच ०८ बीएच ८८३०) चिपळूणकडे जात होते. त्याचवेळी मळण येथील टाटा मॅजिक मायक्रोव्हॅन (एमएच १२ एचव्ही ५१९५) स्वामी समर्थ मठाजवळ प्रवाशाला सोडून श्रृंगारतळीच्या दिशेने परत जात असताना दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ओम शितप याचा जागीच मृत्यू झाला, तर प्रतीक भुवड गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत, पोलिस उपनिरीक्षक भोपाळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दुचाकी – व्हॅन अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी Read More »

konkandhara 46

राजापूर पं. स. च्या सभेत बॉक्साईट उत्खननाला विरोध

राजापूर : तालुक्यातील सागवे, नाणार आणि कुंभवडे परिसरात प्रस्तावित बॉक्साईट उत्खननाला तीव्र विरोध दर्शवत पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, असा एकमुखी ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला. या उत्खननामुळे परिसरातील आंबा बागायती तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती सदस्यांनी व्यक्त केली. किसान सभागृहात झालेल्या बैठकीला सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, गटविकास अधिकारी एस. जी. म्हेत्रे, पंचायत समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेत पाणीटंचाई, शेतकरी नुकसानभरपाई पंचनामे, जीर्ण वीज खांब बदलणे, पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांवरील झाडांची छाटणी, एसटी कर्मचाऱ्यांसाठी सुविधा तसेच तालुका कृषी कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी हलविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय, राजापूर येथील शासकीय विश्रामगृहाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत त्याबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती उपसभापती अभिजित गुरव यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुक्यातील २० ग्रामपंचायतींची निवड झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

राजापूर पं. स. च्या सभेत बॉक्साईट उत्खननाला विरोध Read More »

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई; नगरपरिषद सतर्क

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटवले

चिपळूण: येथील बाजारपेठेतील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी जोरदार कारवाई केली. रस्त्यालगतच्या गटारांवर दुकानातील माल रचून तसेच फेरीवाल्यांनी तेथेच दुकाने थाटल्याने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठेतील मुख्य रस्त्यालगत दुकानातील साहित्य व अन्य माल रचल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. नगरपरिषद ते पानगल्ली दरम्यान अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले होते. गटारांवर फळे, कांदे, बटाटे, प्लास्टिक साहित्य, चप्पल आदींची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच ग्रामीण भागातील महिला रस्त्यावरच भाजी व फळ विक्री करत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. काही ठिकाणी तर गटाराबाहेर थेट रस्त्यावरच माल मांडण्यात येत होता. याबाबत सातत्याने तक्रारी होत असल्याने मुख्याधिकारी संजय जाधव यांनी याची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नगरपरिषदेच्या बांधकाम विभागासह अतिक्रमण हटाव पथकाने संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान गटारांवर व रस्त्यालगत असलेला माल हटविण्यात आला. यापुढे गटारांवर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद ते पानगल्ली दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली असून, पुढे संपूर्ण बाजारपेठेत दररोज अशी कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख संदेश टोपरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटवले Read More »

टँकरमधून गॅस चोरी प्रकरणातील आरोपी ४ वर्षांनी अटकेत; पोलिसांची कारवाई

टँकरमधून गॅस चोरणाऱ्या आरोपीला ४ वर्षांनी अटक

रत्नागिरी: रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकातील गुन्ह्यातील एका फरार आरोपीला तब्बल चार वर्षांनी अटक करण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. बुधाराम रामलाल (वय ४२, रा. हिम्मतनगर, चंदनपुरा, ता. लोहावर, जि. जोधपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला बुधवारी रात्री पनवेल येथून ताब्यात घेण्यात आले. रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात सन २०२२ मध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३८१, ३७९, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू होता. पुढील तपासासाठी हे प्रकरण रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आले. पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. रत्नागिरी पोलिस दलाने विकसित केलेल्या एआय-आधारित ‘रेडस् ॲप’च्या मदतीने आरोपीचे चित्र पुनर्निर्मित करण्यात आले. या चित्राच्या आधारे प्रथम मुंद्रा (गुजरात) येथे शोध घेण्यात आला. मात्र आरोपी मुंबईत आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मुंबईत धाव घेतली. पनवेल येथील कळंबोली सर्कल परिसरातून बुधवारी रात्री आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलिस फौजदार बाळू जाधवर, हेडकॉन्स्टेबल विनायक राजवैद्य, बाळू पालकर आणि रमीज शेख यांच्या पथकाने केली.

टँकरमधून गॅस चोरणाऱ्या आरोपीला ४ वर्षांनी अटक Read More »

रत्नदुर्ग किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या चौघांना पोलिसांकडून ताब्यात

रत्नदुर्ग किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ला परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चौघांना रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली असून, पुढेही अशा कारवाया नियमित सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून किल्ले रत्नदुर्ग तसेच भगवती बंदर पेठ परिसरात सायंकाळी मद्यपींचा वावर वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे सहलीसाठी येणाऱ्या कुटुंबियांना व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई केली. छाप्यामध्ये काही तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत धिंगाणा घालताना आढळले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक सिद्धी सावंत, उपनिरीक्षक सागर वाळुंजकर तसेच हेडकॉन्स्टेबल पंकज पडेलकर, प्रवीण पाटील, कुशल हातिसकर आणि रोहन गमरे यांनी केली.

रत्नदुर्ग किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात Read More »

govindraoji-nikam-agriculture-college-gold-medal-achievement

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाची विद्यापीठात सुवर्ण भरारी

मांडकी-पालवण (चिपळूण)डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे पार पडलेल्या ४४ व्या पदवीदान समारंभात गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवणच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्णपदके पटकावली. कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित या महाविद्यालयातील कु. साक्षी सुभाष थोरात हिने बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमात विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल तिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या जिद्दीचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. तसेच २०१८-२२ या शैक्षणिक वर्षातील कु. समीक्षा सुरेश बोने हिने कृषी जैवतंत्रज्ञान या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. याच कालावधीतील कु. वैष्णवी पाटील हिने पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर स्तरावर सुवर्णपदक पटकावले. या तिन्ही विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम व चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. या यशामागे संस्थेचे संस्थापक कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे, प्राचार्य डॉ. संकेत कदम, डॉ. शमिका चोरगे आणि सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या यशाबद्दल सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनींचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाची विद्यापीठात सुवर्ण भरारी Read More »

लोकशाहीचे परिसीमन आणि संघराज्यात्मक समतोल : एक गंभीर मंथन

लोकशाहीचे परिसीमन आणि संघराज्यात्मक समतोल: एक गंभीर मंथन

भारतीय लोकशाहीच्या प्रवासात आज एका नव्या आणि अत्यंत संवेदनशील टप्प्यावर आपण येऊन ठेपलो आहोत. संसदेतील जागांची संख्या वाढवणे आणि त्याद्वारे लोकशाहीचे सक्षमीकरण करणे हा वरकरणी तांत्रिक वाटणारा विषय असला, तरी त्याच्या मुळाशी भारताच्या संघराज्यात्मक रचनेचे भवितव्य दडलेले आहे. संविधानातील १३१ व्या दुरुस्ती विधेयकाच्या प्रस्तावाने सध्या देशात एक वैचारिक मंथन सुरू झाले असून, त्याचे पडसाद विशेषतः दक्षिण भारतात उमटत आहेत. लोकसंख्येच्या आधारावर संसदेतील जागांचे पुनर्वितरण करणे ही लोकशाहीतील ‘एक व्यक्ती, एक मत’ या तत्त्वाची पूर्तता वाटत असली, तरी व्यावहारिक पातळीवर हे तत्त्व भारताच्या विविधतेसाठी आणि प्रगतीसाठी एक अघोषित दंड ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.स्वातंत्र्योत्तर काळात भारताने जेव्हा नियोजनाचा मार्ग स्वीकारला, तेव्हा वाढती लोकसंख्या हे विकासातील सर्वात मोठे आव्हान मानले गेले होते. १९७० च्या दशकात केंद्र सरकारने सर्व राज्यांना लोकसंख्या नियंत्रणासाठी कडक पावले उचलण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दक्षिण भारतातील राज्यांनी—विशेषतः तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणावर भर देऊन आपली लोकसंख्या यशस्वीपणे मर्यादित केली. ही राज्यांची एक ऐतिहासिक कामगिरी होती, जिचा फायदा संपूर्ण देशाला झाला. मात्र, आज जेव्हा संसदेतील जागा वाढवण्याची चर्चा सुरू आहे, तेव्हा याच लोकसंख्या नियंत्रणाला राज्यांच्या राजकीय प्रभावातील घटीचे कारण बनवले जात आहे. हा विरोधाभास लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी घातक आहे. ज्या राज्यांनी राष्ट्रीय धोरणांचे प्रामाणिकपणे पालन केले, त्यांना संसदेतील त्यांचे प्रतिनिधित्व कमी करून शिक्षा दिली जाणे, हे कोणत्या न्यायात बसते, हा आजचा कळीचा प्रश्न आहे. परिसीमनाच्या सध्याच्या प्रस्तावानुसार, उत्तर भारतातील राज्यांमध्ये जिथे लोकसंख्या वाढीचा वेग अधिक राहिला आहे त्या राज्यांमध्ये संसदेतील जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याउलट, दक्षिण भारतातील राज्यांच्या जागांमध्ये होणारी वाढ ही अतिशय नगण्य असेल. यामुळे लोकसभेतील राजकीय शक्तीचे केंद्र पूर्णपणे उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, केवळ हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यांच्या जोरावर एखादा पक्ष केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करू शकेल. जर असे झाले, तर दक्षिण भारत, ईशान्य भारत आणि अन्य लहान राज्यांचा आवाज राष्ट्रीय राजकारणात दुय्यम ठरेल. लोकशाहीमध्ये केवळ संख्याबळ महत्त्वाचे नसते, तर सर्व घटकांचा समावेशक सहभाग अनिवार्य असतो. जर ठराविक भौगोलिक क्षेत्राचे वर्चस्व निर्माण झाले, तर ते संघराज्याच्या मूळ संकल्पनेला तडा देणारे ठरेल. या प्रश्नाचा दुसरा पैलू आर्थिक वितरणाशी संबंधित आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत दक्षिण भारतातील राज्यांचे योगदान मोलाचे आहे. ही राज्ये केंद्राला मोठ्या प्रमाणात कर (GST) देतात, परंतु त्या बदल्यात त्यांना मिळणारा वाटा हा त्यांच्या योगदानाच्या तुलनेत खूपच कमी असतो. उदाहरणार्थ, काही उत्तरेकडील राज्ये केंद्राला एक रुपया कर देतात तेव्हा त्यांना त्या बदल्यात सहा ते सात रुपये परत मिळतात, तर दक्षिणेकडील राज्यांना त्यांच्या एक रुपयाच्या बदल्यात केवळ २५ ते ३० पैसे मिळतात. ही आर्थिक विषमता आधीच अस्तित्वात असताना, आता जर त्यांचे राजकीय प्रतिनिधित्वही कमी झाले, तर भविष्यात त्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण कोण करणार? राजकीय शक्ती कमी झाली की धोरणनिर्मितीमध्ये राज्यांचा प्रभाव कमी होतो आणि पर्यायाने संसाधनांचे वाटपही एकांगी होण्याची भीती असते. परिसीमनाच्या या प्रक्रियेत ‘जेरीमँडरिंग’ सारख्या संकल्पनांची चर्चा होणे स्वाभाविक आहे. राजकीय फायद्यासाठी मतदारसंघांच्या सीमांची आखणी करणे, हे लोकशाहीसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. जर ही प्रक्रिया पारदर्शक नसेल आणि केवळ लोकसंख्येच्या आकड्यांवर आधारित असेल, तर ती एका मोठ्या वर्गाला मुख्य प्रवाहातून बाहेर फेकणारी ठरू शकते. लोकशाहीमध्ये केवळ डोकी मोजणे पुरेसे नसते, तर त्या डोक्यांमधील विचार, त्यांच्या आकांक्षा आणि त्यांनी दिलेले योगदान यांचाही विचार होणे आवश्यक असते. दक्षिण भारताने केवळ लोकसंख्याच नियंत्रित केली नाही, तर माहिती तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्र आणि कौशल्याच्या जोरावर देशाला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले. उत्तर भारतातील अनेक तरुणांना दक्षिणेतील शहरांनी रोजगार दिला, तिथे त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या. अशा प्रकारे देशाच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या प्रदेशाला राजकीयदृष्ट्या कमकुवत करणे, ही कृतघ्नता ठरेल. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केवळ लोकसंख्या हा एकमेव निकष न ठेवता, एक संमिश्र मॉडेल स्वीकारण्याची गरज आहे. लोकसभेतील निम्म्या जागा लोकसंख्येच्या आधारावर वाढवल्या गेल्या, तरी उरलेल्या निम्म्या जागा राज्यांचा विकास, साक्षरता दर, आरोग्य सुविधांमधील प्रगती आणि आर्थिक योगदान या निकषांवर आधारित असाव्यात. यामुळे प्रगती करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या अधिक आहे, तिथल्या मतदारांनाही पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल. लोकशाहीचा अर्थ केवळ बहुसंख्याकांचे शासन असा नसून, तो अल्पसंख्याक आणि प्रगत विचारांच्या घटकांच्या संरक्षणाशीही निगडित आहे. संसदेतील जागांची पुनर्रचना करताना उत्तर आणि दक्षिण असा संघर्ष निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे ही केंद्र सरकारची आणि सर्व राजकीय पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे.संविधानातील दुरुस्ती ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून ती एक सामाजिक करार आहे. १९७१ च्या जनगणनेनुसार जागा गोठवण्याचा निर्णय घेण्यामागे एक दूरदृष्टी होती, ती म्हणजे राज्यांमध्ये लोकसंख्या वाढवण्याची स्पर्धा लागू नये. आता ती मर्यादा संपत असताना, नवीन निकष लावताना सर्व राज्यांना विश्वासात घेणे अनिवार्य आहे. विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न केवळ राजकीय विरोधासाठी नसून, ते देशाच्या अखंडतेशी जोडलेले आहेत. भारताची विविधता ही आपली शक्ती आहे, ती आपली कमजोरी बनता कामा नये. जर एका विशिष्ट भागाला असे वाटू लागले की त्यांच्या प्रगतीमुळेच त्यांना राजकीयदृष्ट्या डावलले जात आहे, तर तो असंतोष देशाच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतो. शेवटी, संसद हे देशाचे प्रतिबिंब असते. या प्रतिबिंबात देशाचा प्रत्येक कोपरा स्पष्टपणे आणि प्रभावीपणे दिसायला हवा. उत्तर भारताच्या लोकसंख्येचा आदर करतानाच दक्षिण भारताच्या गुणवत्तेचा आणि शिस्तीचा अपमान होणार नाही, असा मध्यममार्ग काढणे हीच काळाची गरज आहे. केवळ निवडणुकीतील विजयाचे गणित मांडण्यापेक्षा, ‘राष्ट्र’ म्हणून आपण एकत्रितपणे कसे पुढे जाऊ शकतो, याचा विचार होणे अपेक्षित आहे. लोकशाहीच्या या महान मंदिरात प्रत्येक राज्याचा आवाज तितक्याच सन्मानाने घुमला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीचे संवर्धन होईल. सीमांकन हे राज्यांच्या विभाजनाचे नव्हे, तर विकासाच्या समान संधीचे साधन बनायला हवे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि व्यापक राष्ट्रीय दृष्टीकोन यांची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा, आकड्यांच्या या खेळात लोकशाहीचा मूळ आत्मा हरवून जाण्याची भीती नाकारता येत नाही.

लोकशाहीचे परिसीमन आणि संघराज्यात्मक समतोल: एक गंभीर मंथन Read More »