konkandhara.com

20 अप्रैल 2026

सावंतवाडी पंचायत समितीची केंद्र शाळा सातोसे येथे बैठक; शिक्षक भरती व पटसंख्या वाढीवर चर्चा

सावंतवाडी : प्रतिनिधी (संजय पिळणकर) सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणे आणि शाळांची पटसंख्या वाढवणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी दी २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.ही सभा केंद्र शाळा सातोसे येथे पार पडणार आहे. पंचायत समिती सावंतवाडीच्या दिनांक २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये पंचायत समिती सदस्य उदय पारीपत्ये यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते.यामध्ये प्रामुख्याने सावंतवाडी गटातील जिल्हा परिषद शाळांमधील पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरणे आणि महाराष्ट्र-गोवा सीमाभागातील शाळांची कमी होत असलेली पटसंख्या वाढवण्यासाठी उपाययोजना करणे,या विषयांचा समावेश होता.​याच विषयांचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील कार्यवाही निश्चित करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती सावंतवाडी) यांनी ही बैठक बोलावली आहे. या सभेला पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.तसेच सातोसे केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव,तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच यांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी सविता परब यांनी केले आहे. सीमाभागातील शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने या सभेकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

सावंतवाडी पंचायत समितीची केंद्र शाळा सातोसे येथे बैठक; शिक्षक भरती व पटसंख्या वाढीवर चर्चा Read More »

EditorialWebdesk

निकृष्ट रस्ता कामाविरोधात उसप येथे ग्रामस्थांचे उपोषण

दोडामार्ग : भूषण सावंत: पिकुळे तिठा ते उसप या मुख्य रस्त्याच्या कामात झालेल्या दिरंगाईसोबतच अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात उसप येथील ग्रामस्थांनी आज, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी तीव्र आंदोलन छेडत उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. सदर रस्ता हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, कामाचा दर्जा खालावलेला असल्याने तसेच काम वेळेत पूर्ण होत नसल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या उपोषणात खालील ग्रामस्थ सहभागी झाले आहेत श्री. देवू बाळू गवस, सुरेश विष्णू गवस, शंकर बाळाराम नाईक, रामा गोविंद धुरी, विठोबा नारायण नाईक, सखाराम नाईक, महादेव सुतार, विजय गवस, प्रकाश मोरजकर, वैभव विष्णू गवस, सुनील गवस, मनीष गवस, शैलेश गवस, अमोल मोरजकर, दिनेश नाईक, सुनील गवस सहभागी झाले आहेत.ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, रस्ता कामाची तात्काळ चौकशी करून दर्जेदार काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. या उपोषणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

निकृष्ट रस्ता कामाविरोधात उसप येथे ग्रामस्थांचे उपोषण Read More »

पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली; धक्कादायक घटना

पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ पसरली होती. सुदैवाने, रेल्वे पोलिस आणि संबंधित यंत्रणेने तत्परता दाखवत तात्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांच्या वेगवान कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लिफ्टच्या देखभालीबाबत आणि तांत्रिक तपासणीबाबत अधिक काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.  

पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली; धक्कादायक घटना Read More »

ईएमआयचा फास आणि कॉर्पोरेट गुलामगिरी: स्वप्नांची कत्तल थांबणार कधी?

ईएमआयचा फास आणि स्वप्नांची कत्तल: कॉर्पोरेट गुलामगिरीचा नवा चेहरा!

आजच्या तथाकथित आधुनिक भारतात गुलामी संपली आहे असे आपल्याला वाटते, पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. १८ व्या शतकातील गुलामी शस्त्रांच्या धाकाने होती, तर २१ व्या शतकातील ही ‘कॉर्पोरेट गुलामी’ ईएमआयच्या साखळदंडांनी जखडलेली आहे. गॅलप नावाच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचे आकडे आपल्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. जगातील ७७ टक्के लोक आपल्या कामात आनंदी नाहीत आणि भारतात तर ही परिस्थिती अधिकच भयानक आहे. १० पैकी ८ ते ९ लोक दररोज सकाळी अशा ठिकाणी कामाला जातात जिथे त्यांचे मन लागत नाही. हे कसले जीवन आहे? हे तर जिवंतपणी शांत झालेला मुडदा होण्यासारखे आहे. सर्वात धोकादायक गोष्ट ही नाही की आपण गरीब आहोत, तर सर्वात धोकादायक गोष्ट ही आहे की आपल्या स्वप्नांचा मृत्यू झाला आहे. आपल्या देशात करिअरच्या नावाखाली एक मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. पालकांच्या डोक्यात फक्त दोनच शब्द फिरत असतात – इंजिनिअर किंवा डॉक्टर. १६ व्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या गळ्याला या स्पर्धेचा फास लावला जातो. कोटासारख्या शहरांमध्ये तीन-चार लाख रुपये भरून मुलांवर ७०-७० तास अभ्यासाचा दबाव टाकला जातो. हा दबाव फक्त शिक्षणाचा नसतो, तर तो भविष्यातील ‘गुंतवणुकीच्या परताव्याचा’ असतो. मुलगा २२ वर्षांचा होतो तोवर त्याच्या डोक्यावर १० लाखांचे शैक्षणिक कर्ज असते. हे कर्ज फेडण्यासाठी तो २५ हजारांच्या नोकरीत स्वतःला गाडून घेतो. एकदा का ही चक्राकार गती सुरू झाली की, मग नवी दुचाकी, महागडा फोन, कार आणि मग २० वर्षांचा होम लोनचा ईएमआय! हे आहेत ते ‘सोन्याचे पिंजरे’ ज्यात आपली तरुण पिढी कैद झाली आहे. आजचे ‘काम हेच जीवन आहे’ हे मानणारे कल्चर तर या त्रासदायक कामाचे उदात्तीकरण करत आहे. रात्री ११ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसणे म्हणजे ‘डेडिकेशन’ आणि सुट्टीच्या दिवशीही काम करणे म्हणजे ‘ग्रोथ माइंडसेट’ अशी नवी व्याख्या तयार केली जात आहे. ७० तास काम करण्याचे सल्ले देणारे हे भांडवलदार विसरतात की, या दबावामुळे २६ वर्षांच्या तरुणांना हार्ट अटॅक येत नसून ‘पॅनिक अटॅक’ येत आहेत. ही केवळ नोकरी नाही, तर हे पद्धतशीरपणे चालवले जाणारे मानसिक शोषण आहे. शाळांपासून कॉलेजपर्यंत केवळ ‘आज्ञाधारक’ राहण्याचे शिक्षण दिले जाते, ‘संशोधक’ किंवा ‘कलाकार’ होण्याचे नाही. १२ हजार करिअरच्या संधी असताना एका सरासरी भारतीय विद्यार्थ्याला केवळ १०-१५ पर्यायांचीच माहिती असते. हे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचे सर्वात मोठे अपयश आहे. पण या व्यवस्थेला दोष देऊन आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. ‘पॅशन शोधा’ असे सांगणारे व्हिडिओ आपल्याला अधिक गोंधळात टाकतात. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, पॅशन हा काही जमिनीखाली दडलेला खजिना नाही जो एकदा सापडला की आयुष्य सेट होईल. पॅशन हे एका रोपट्यासारखे आहे, जे अनुभवाच्या खताने आणि मेहनतीने फुलवावे लागते. कोणत्याही नवीन कामात प्रवीण होण्यासाठी फक्त २० तास लागतात. दररोज ४५ मिनिटे जर आपण एखाद्या नवीन गोष्टीसाठी दिली, तर एका महिन्यात आपल्याला समजते की ते काम आपल्यासाठी आहे की नाही. रॉजर फेडरर किंवा महेंद्रसिंह धोनी हे काही पहिल्या दिवसापासून चॅम्पियन नव्हते; त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक खेळ खेळून पाहिले आणि नंतर स्वतःचे क्षेत्र निवडले.यश मिळवण्यासाठी केवळ आयक्यू (IQ) किंवा टॅलेंटची गरज नसते, तर ‘ग्रिट’ (Grit) म्हणजे चिकाटीची गरज असते. जर आपण आपल्या कामात इतके मग्न होऊ शकलो की आपल्याला वेळेचे, भुकेचे आणि फोनचे भान राहणार नाही, तर त्याला ‘फ्लो स्टेट’ (Flow State) म्हणतात. ही अवस्था ज्याला प्राप्त झाली, तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. जपानमधील ‘इकिगाई’ (Ikigai) ही संकल्पना आपल्याला हेच शिकवते. जे तुम्हाला आवडते, ज्यात तुम्ही निष्णात आहात, ज्याची जगाला गरज आहे आणि ज्यातून तुम्हाला पैसे मिळतात – या चार गोष्टींचा संगम म्हणजे इकिगाई! अर्थात जगण्याचे प्रयोजन! पण हा संगम अर्थात प्रयोजन शोधण्यासाठी घरात बसून चालणार नाही, तर आपल्याला ‘एक्सप्लोर, एंगेज आणि एक्सेल’ या सूत्राचा वापर करावा लागेल. ज्या देशाला आपण ‘तरुणांचा देश’ म्हणतो, त्या देशातील तरुण जर केवळ भीतीपोटी आणि फोमोमुळे (FOMO) घाणेरड्या नोकऱ्यांमध्ये अडकून पडले, तर देश नावीन्यपूर्ण शोध कसा लावणार? करिअर बदलण्यासाठी कोणतेही वय उशिरा नसते. वय ३४ असो वा ४४, जर तुम्हाला तुमची ‘आतली हाक’ ऐकू येत असेल, तर ती दाबू नका. ती अस्वस्थता जिवंत ठेवा. ईएमआयचा पिंजरा तोडण्यासाठी लगेच नोकरी सोडण्याची गरज नाही, पण एक ‘एक्झिट प्लॅन’ तयार करण्याची आणि आपला ‘साईड पॅशन प्रोजेक्ट’ सुरू करण्याची हीच खरी वेळ आहे. लक्षात ठेवा, आपण केवळ आपल्या पोटासाठी जगत नाही आहोत, तर आपण या देशाचे भविष्य आहोत. उद्या जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा आपण ‘जिवंत मढे’ म्हणून ओळखले जाऊ नये, तर आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणारे ‘योद्धे’ म्हणून ओळखले जावे, हीच काळाची गरज आहे.

ईएमआयचा फास आणि स्वप्नांची कत्तल: कॉर्पोरेट गुलामगिरीचा नवा चेहरा! Read More »

आरोंदा येथील अमित निवजेकर ३ जिल्ह्यांतून तडीपार; दोन वर्षांसाठी आदेश

आरोंदा येथील अमित निवजेकरला ३ जिल्ह्यांतून केले तडीपार

सावंतवाडी : प्रतिनिधी (संजय पिळणकर)Sawantwadi उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या कारवाईनुसार सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१ वर्षे, रा. आरोंदा) यास कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश मंजूर करण्यात आला आहे. सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी संबंधित इसमाला नोटीस बजावली. त्यानंतर दोन पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली त्यास गोवा राज्यातील त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षितरित्या सोडण्यात आले. तसेच तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात हजर करून तडीपार आदेशाची औपचारिक बजावणी करण्यात आली. निवजेकर याच्यावर मारामारीचे एकूण सहा गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध नॉन-कॉग्निजेबल (एनसी) स्वरूपाच्या नोंदीही आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आरोंदा येथील अमित निवजेकरला ३ जिल्ह्यांतून केले तडीपार Read More »

चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम चषक स्पर्धा; इलेव्हन फायटर एडी विजेता

चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम चषक स्पर्धेत रत्नागिरीच्या संघांचे वर्चस्व; इलेव्हन फायटर एडी विजेता

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार शेखर निकम चषक राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीतील संघांनी वर्चस्व गाजवले. इलेव्हन फायटर एडी, रत्नागिरी संघाने विजेतेपद पटकावले, तर आरडीसीए संघ उपविजेता ठरला. साहिल मतदार याला ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरविण्यात आले. चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानावर सलग सहा दिवस ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेचे उद्घाटन रणजीपटू सुनील मोरे यांच्या हस्ते आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झाले होते. एकूण आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात इलेव्हन फायटर एडी संघाने आरडीसीए संघासमोर 189 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, हे आव्हान पेलण्यात अपयशी ठरत आरडीसीए संघ सर्वबाद झाला आणि एडी संघाने विजेतेपद मिळवले. एडी संघाचा विश्वास कुंभार याला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, तर चिपळूण स्टार क्लबच्या विराज कोलते याला उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार मिळाला. कोलतेने चार डावांत 53.25 च्या सरासरीने 213 धावा केल्या. आरडीसीए संघाचा पार्थ गांधी पाच डावांत 12 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाज ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांना क्रिकेट विश्वातील नामवंत फिरकीपटू राजेश पवार, आमदार शेखर निकम आणि असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला चिपळूण नगर परिषदेचे बांधकाम सभापती कपिल शिर्के, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथ खताते, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, नगरसेवक विकी नरळकर, माजी नगरसेविका अदिती देशपांडे, दिशा दाभोळकर, राणी महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंच गोट्या भोसले, रवींद्र कनगुटकर, समालोचक बाबल्या जाधव, इब्राहिम सरगुरोह, प्रशिक्षक उदय काणेकर, तसेच स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेणारे भाऊ देवरुखकर आणि गुणलेखक यांचा सन्मान करण्यात आला. चिपळूणमध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण’चे अध्यक्ष सुनील साळवी व त्यांच्या सहकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे सचिव राजेश सुतार, दादा लकडे, सुयोग चव्हाण, योगेश बांडागळे, सचिन कुलकर्णी, सुनील रेडीज, साहिल कदम, विनीत देवधर, संदेश गोरीवले आदींनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, बक्षीस वितरणावेळी बोलताना क्रिकेटपटू राजेश पवार यांनी चिपळूणमध्ये मुंबई-पुण्याच्या धर्तीवर दर्जेदार स्पर्धा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उत्तम सुविधा उपलब्ध होत असून भविष्यात येथील खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम चषक स्पर्धेत रत्नागिरीच्या संघांचे वर्चस्व; इलेव्हन फायटर एडी विजेता Read More »

तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती; राकेश बापट उपविजेता

संगमेश्वरच्या साखरपा गावची तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती; राकेश बापट उपविजेता

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची तन्वी कोलते हिने ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6चे विजेतेपद पटकावले आहे. 19 एप्रिल रोजी उत्साहात पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये तिने दमदार कामगिरी करत महाट्रॉफीवर आपले नाव कोरले. अभिनेता राकेश बापट याने उपविजेतेपद मिळवले. जानेवारी 2026 मध्ये कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या या सिझनने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अभिनेता रितेश देशमुख यांच्या सूत्रसंचालनाखालील या पर्वाला मोठी लोकप्रियता लाभली. विशेषतः ‘भाऊचा धक्का’ या भागाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंतिम फेरीत पोहोचलेल्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियन यांचा समावेश होता. तन्वीला ‘तिकीट टू फिनाले’ मिळाल्यामुळे ती थेट अंतिम फेरीत पोहोचली होती. 100 दिवसांच्या या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी विविध टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. शेवटच्या टप्प्यात तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या मतांच्या जोरावर आणि सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीमुळे तन्वीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संगमेश्वरच्या साखरपा गावची तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती; राकेश बापट उपविजेता Read More »

एसटी-दुचाकी भीषण अपघात; सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

एसटी-दुचाकी भीषण अपघात; सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

बांदा दोडामार्ग मार्गावर हेदुस येथे दुर्दैवी घटना दोडामार्ग : प्रतिनिधीDodamarg तालुक्यातील हेदुस परिसरात एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप तुकाराम हळणकर (वय ६८, रा. कुडासे-वानोसरी) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते भारतीय नौदलातून सुमारे २० वर्षांपूर्वी सेवानीवृत्त झाले होते. अपघाताच्या वेळी ते आपल्या दुचाकीवरून जात असताना पणजीहून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की हळणकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बस चालक राहुलसिंह पांडुरंग हालके (वय ३७) आणि वाहक सुधीर अशोक लोखंडे हे बसमध्ये होते. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, दोडामार्ग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

एसटी-दुचाकी भीषण अपघात; सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू Read More »

पालघरच्या विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प अपूर्ण – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पालघरच्या विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प अपूर्ण : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पालघर, दि. १९ (जिमाका) : भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करताना समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे अत्यावश्यक आहे. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी डहाणू येथे केले. राज्यपालपदाची सूत्रे मार्च 2026 मध्ये स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच पालघर जिल्हा दौरा होता. अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती या शुभ मुहूर्तावर डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी फिरते दवाखाने व रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडूलाल सोनी, डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘सर्वे भवन्तु निरामयः’ या मंत्राने भाषणाची सुरुवात करत राज्यपालांनी सांगितले की, आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्याच मर्यादित न राहता दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पालघर सारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात रोजगार, आरोग्य व पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक विकास आराखडा तयार केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या विचारांचा उल्लेख करत ‘अंत्योदय’ संकल्पनेवर भर देत त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले. वनबंधू ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या वेळी लाडूलाल सोनी यांनी प्रास्ताविकात ट्रस्टच्या आरोग्य प्रकल्पांची माहिती दिली. तर डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रशासकीय व सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागाचा विकास साधता येतो, असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील आरोग्य स्थिती व शासकीय योजनांची माहिती देत प्रशासन राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली अधिक वेगाने काम करेल, अशी ग्वाही दिली.

पालघरच्या विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प अपूर्ण : राज्यपाल जिष्णु देव वर्मा Read More »

सरंद येथे बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा उत्साहात; आमदार शेखर निकम उपस्थित

सरंद येथे बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा उत्साहात

संगमेश्वर : तालुक्यातील मौजे सरंद येथे बहुजन विकास मंडळ, मुंबई व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध विहाराच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडलेले भूमिपूजन होय. यावेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले, “बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून समाजाला दिशा देणारे केंद्र आहे. येथे विचारांची देवाणघेवाण, शिक्षण आणि सामाजिक एकात्मता वाढीस लागेल. अशा उपक्रमांमुळे गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल. आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रगतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे.” कार्यक्रमाला दीपक जाधव, जि. प. सदस्य सुशील भायजे, प्रिया सुर्वे, संजय कदम, नाना कांगणे, शेखर उकर्डे, सोनाली जाधव, तुकाराम मेस्त्री, उमेश पवार, नंदन भागवत, अक्षय चव्हाण, गोपाळ जाधव, महेंद्र जाधव, राजेश जाधव, विवेक जाधव, महेंद्र अमर जाधव, तुकाराम जाधव, नवनाथ जाधव, अंजली जाधव, रश्मी जाधव, जगदीश जाधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वातावरणाला चालना मिळून विकासाची नवी दिशा निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सरंद येथे बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा उत्साहात Read More »