सावंतवाडी : प्रतिनिधी (संजय पिळणकर)
सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणे आणि शाळांची पटसंख्या वाढवणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी दी २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.ही सभा केंद्र शाळा सातोसे येथे पार पडणार आहे.
पंचायत समिती सावंतवाडीच्या दिनांक २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये पंचायत समिती सदस्य उदय पारीपत्ये यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते.यामध्ये प्रामुख्याने सावंतवाडी गटातील जिल्हा परिषद शाळांमधील पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरणे आणि महाराष्ट्र-गोवा सीमाभागातील शाळांची कमी होत असलेली पटसंख्या वाढवण्यासाठी उपाययोजना करणे,या विषयांचा समावेश होता.
याच विषयांचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील कार्यवाही निश्चित करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती सावंतवाडी) यांनी ही बैठक बोलावली आहे.
या सभेला पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.तसेच सातोसे केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव,तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच यांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी सविता परब यांनी केले आहे.
सीमाभागातील शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने या सभेकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.














