konkandhara.com

क्राईम

संगमेश्वरमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कारवाई | हातभट्टीवर पोलिसांचा छापा

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांसह हातभट्टीवर पोलिसांची कारवाई

संगमेश्वर (प्रतिनिधी) : देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी अवैध दारू विक्री व सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया केल्या. पहाटे सुमारे १:३० वाजता कांजिवरा ते रत्नागिरी रोडवरील ओजी बिअरशॉपीसमोर सिमेंटच्या बाकावर बसून विनापरवाना बिअर पिणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अभिजीत अनंत जाधव (वय ३०) व नईम मुनवर पटेल (वय २४) अशी त्यांची नावे असून, त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०५ वाजता देवरुख खालची आळी येथील मच्छीमार्केटच्या पाठीमागे, गणेश घाटाजवळील नदीकिनारी पोलिसांनी हातभट्टीवर कारवाई केली. यावेळी निलेश बाळकृष्ण निवळकर (वय ३९) हा गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्याकडून ८ लिटर गावठी दारू व अन्य साहित्य असा एकूण ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या कारवायांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांसह हातभट्टीवर पोलिसांची कारवाई Read More »

RAIDS Appमुळे ४ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद; रत्नागिरी पोलिसांची कारवाई

‘RAIDS App’च्या मदतीने ४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक

रत्नागिरी : प्रतिनिधीरत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित “RAIDS App”च्या सहाय्याने तब्बल चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने १५ डिसेंबर २०२५ रोजी “RAIDS App” विकसित केले असून या अॅपच्या माध्यमातून गुन्हे तपासात आधुनिक तांत्रिक मदत मिळत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या सहाय्याने फरार आरोपी तसेच हरवलेल्या व्यक्तींचे फोटो अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीने (रेकन्स्ट्रक्ट) पुनर्निर्मित करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्तींची ओळख पटवणे आणि मागोवा घेणे अधिक सोपे व जलद झाले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९६/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल असलेला बुधाराम रामलाल राठोड (वय ४२, मूळ रा. हिम्मत नगर, ग्रामपंचायत चंदनगुडा, ता. लोहार, जि. जोधपूर, राजस्थान) हा आरोपी चार वर्षांपासून फरार होता. तो गुजरात राज्यातील सुरत येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी “RAIDS App”च्या मदतीने त्याचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी मुंबई येथे आल्याची खात्री पटताच १५ एप्रिल २०२६ रोजी पनवेल येथील कळंबोली परिसरातून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. टी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने केली. पथकात पोलीस अंमलदार वासुदेव जाधव, विनायक राठोड, बाबू पाळकर व रामजी शेख यांचा समावेश होता.

‘RAIDS App’च्या मदतीने ४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक Read More »

चिपळूण बसस्थानक दागिने चोरीचा उलगडा; आरोपी महिला अटकेत

चिपळूण बसस्थानकातील १४.६१ लाखांच्या दागिने चोरीचा उलगडा; आरोपी महिला खंडाळ्यातून अटक

चिपळूण : येथील भोगाळे मध्यवर्ती बसस्थानकावर घडलेल्या तब्बल १४.६१ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिने चोरीप्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी मंगल उर्फ शोभा अंकुश साठे (६०, रा. खंडाळा, जि. सातारा) हिला चोरीच्या सर्व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.या संदर्भात वैष्णवी विश्वनाथ शिंदे (४७, रा. कावीळतळी, चिपळूण) यांनी ११ एप्रिल २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आपल्या मुलीसह तिवरे गावी नातेवाईकांच्या लग्नासाठी जात असताना दुपारी सुमारे ३:२० वाजता बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधून ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये गंठण, सोनसाखळ्या, हार, कर्णफुले आणि बांगड्यांचा समावेश होता. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला संशयास्पदरीत्या ऑटो रिक्षातून पसार होताना दिसून आली. त्यानुसार रिक्षाचालकाचा शोध घेण्यात आला. चौकशीत संबंधित महिलेने फरशी तिथ्यावर उतरल्याचे आणि त्याच्या मोबाईलवरून एका व्यक्तीला कॉल केल्याचे समोर आले. त्या कॉलच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली आणि हा कॉल सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील भाटघर येथील एका व्यक्तीला केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डीबी पथकाने थेट खंडाळा येथे जाऊन तपास केला. संबंधित व्यक्तीच्या मदतीने आरोपी महिलेच्या घराचा शोध घेण्यात आला.पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली असता चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आले. आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिली असून फिर्यादी महिलेनेही दागिने ओळखले आहेत. या प्रकरणाचा अवघ्या चार दिवसांत उलगडा करून आरोपीसह मुद्देमाल जप्त करण्यात आल्यामुळे चिपळूण पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चिपळूण बसस्थानकातील १४.६१ लाखांच्या दागिने चोरीचा उलगडा; आरोपी महिला खंडाळ्यातून अटक Read More »

रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन लंपास; दुचाकीवरून चोरट्यांचा पळ

रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची चेन लांबवली

रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील हिंदू कॉलनी परिसरातून गुरुवारी सकाळी 8.15 वा.सुमारास एका युवकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरुन पोबारा केला. सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात याबाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. सकाळच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हिंदू कॉलनी येथील रहिवासी कांचन जैन हे गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास परिसरात असताना दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आले. यावेळी चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. जैन यांना काही समजण्यापूर्वीच दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनवर झडप घातली आणि ती हिसकावून घेतली. चेन हातात लागताच चोरट्यांनी आपल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून वेगाने पलायन केले.चोरीसाठी वापरलेली दुचाकी काळ्या रंगाची असून दोन्ही आरोपी सडपातळ बांध्याचे होते. यातील एकाने तोंडाला रुमाल बांधला होता, तर एक जण उंचीने जास्त होता. हे दोन्ही चोरटे तरुण असून ते एकमेकांशी मराठी भाषेत संवाद साधत होते, असे वर्णन समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या वर्णनाचे तरुण कुठेही संशयास्पदरीत्या दिसून आल्यास किंवा या घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची चेन लांबवली Read More »

आंबा घाटात चालकाची लूट; देवरूख पोलिसांनी ५ आरोपींना अटक

आंबा घाटात म्हैस वाहतूक करणाऱ्या चालकाची लूट; देवरूख पोलिसांकडून पाच जणांना बेड्या

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात दख्खननजीक बुधवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. बांबावडेकडे बोलेरोमधून म्हैस घेऊन जाणाऱ्या चालकाला आठ जणांच्या टोळीने अडवून त्याच्याकडील २५ हजार रुपये लुटून पोबारा केला. मात्र, देवरूख पोलिसांनी या घटनेचा अत्यंत वेगाने तपास करत ५ आरोपींना तातडीने ताब्यात घेतले असून, उर्वरित ३ जणांचा कसून शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बोलेरो चालक आंबा घाटमार्गे बांबावडेच्या दिशेने म्हैस घेऊन जात होता. गाडी दख्खन परिसराजवळ आली असता, दबा धरून बसलेल्या ८ जणांच्या टोळीने वाहन अडवले. चालकाला धमकावत या टोळीने त्याच्याकडील २५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. घाटातील या धाडसी लुटीच्या बातमीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच लांजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तपासाची चक्रे फिरवली. साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, देवरूखचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर व प्रशांत साळुंखे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत ५ संशयितांना ताब्यात घेऊन या लुटीचा पर्दाफाश केला. या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य ३ आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. “फरार आरोपींची ओळख पटली असून लवकरच त्यांनाही गजाआड केले जाईल,” असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. पोलिसांच्या या जलद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आंबा घाटात म्हैस वाहतूक करणाऱ्या चालकाची लूट; देवरूख पोलिसांकडून पाच जणांना बेड्या Read More »

रत्नागिरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दोन घरांतून ३८ हजारांची रोकड लंपास

रत्नागिरीत दिवसाढवळ्या दोन घरे फोडली; ३८ हजारांची रोकड लंपास

रत्नागिरी : प्रतिनिधीतालुक्यातील तरवळ मायंगडेवाडी येथ्ाील दोन घरे फोडून रोख 38 हजार रुपये लांबवले. घरफोडीची ही घटना रविवार 5 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली आहे.आदित्य देवचंद कांबळे (26,रा.बालाजी अपार्टमेंट कारवांचीवाडी फाटा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात विरेश प्रकाश मायंगडे (29),प्रज्योत रविंद्र मायंगडे (23,दोन्ही रा.तरवळ मायंगडेवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, संशयिताने विरेश मायंगडे यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाच्या ड्रॉव्हरमधील रोख 33 हजार रुपये चोरुन नेले. तर प्रज्योत मायंगडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून घरातील भिंतीमध्ये असलेल्या उघड्या कपाटातील छोट्या पाकिटात ठेवलेले रोख 5 हजार रुपये लांबवले. दरम्यान, या घरफोड्या करुन पळून जात असताना संशयित आदित्य कांबळेला विरेश मायंगडे आणि सर्वेश मायंगडे यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना धक्काबुक्की करुन पळ काढला.

रत्नागिरीत दिवसाढवळ्या दोन घरे फोडली; ३८ हजारांची रोकड लंपास Read More »

रत्नागिरीत क्रेडिट कार्ड इन्शुरन्सच्या नावाखाली ८८ हजारांची फसवणूक

रत्नागिरीत ‘क्रेडिट कार्ड इन्शुरन्स’च्या नावाखाली तरुणाला ८८ हजारांचा गंडा

रत्नागिरी : प्रतिनिधीएसबीआय क्रेडिट कार्डचे इन्शूरन्स डिॲक्टिवेट करण्याची प्रोसेस सांगण्याच्या नावाखाली अज्ञाताने तरुणाचे तब्बल 88 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 12 फेब्रुवारी 2026 रोज्ाी दुपारी 12.30 ते 1.11 वा.कालावधीत टिआरपी येथील यामाहा शोरुममध्ये घडली आहे. प्रसाद रघूनाथ यादव (31,रा.सौम्या रेसिडेन्सी श्रीरामनगर नाचणे,रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात सोमवार 6 एप्रिल रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 12 फेब्रुवारी रोजी प्रसाद यादव हे टिआरपी येथील यामाहा शोरुममध्ये नोकरी निमित्त असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने एसबीआय क्रेडिट कार्ड नावाने फोन केला. त्यानंतर त्याने फिर्यादीला एसबीआय क्रेडिट कार्डवर इन्शूरन्सबाबत विचारणा करुन त्याचा इन्शूरन्स डिॲक्टिवेट करण्याची फोसेस सांगण्यास सुरुवात केली. हे संभाषण होत असताना त्या अज्ञाताने फिर्यादीच्या व्हॉटसॲपवर लिंक पाठवून त्याव्दारे फिर्यादीची वैयक्तिक माहिती भरुन घेतली. त्यानंतर फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवरुन 87 हजार 642 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

रत्नागिरीत ‘क्रेडिट कार्ड इन्शुरन्स’च्या नावाखाली तरुणाला ८८ हजारांचा गंडा Read More »

रत्नागिरीत महिला विक्रेत्याची ४० हजारांची रोकड लंपास; पोलिस तपास सुरू

विक्रेत्याची 40 हजारांची रोकड लंपास ; पोलिसांकडून तपासाला वेग

रत्नागिरी : प्रतिनिधीशहरातील विठ्ठल मंदिर परिसरात मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी सायंकाळी चोरीची घटना घडली. ग्राहकाचा वेश धारण करून आलेल्या महिला चोरट्यांच्या टोळीने एका महिला विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून तिची 40 हजार रुपयांची रोकड असलेली पर्स अत्यंत चलाखीने लंपास केली. या प्रकारामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शुक्रवार 3 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास विठ्ठल मंदिर परिसरात घडली. काही संशयित महिला बाजारपेठेत खरेदीचा बहाणा करत फिरत होत्या.त्यांनी केळी विकणाऱ्या एका महिलेकडे जात केळीचा दर विचारला. विक्रेत्याने 80 रुपये डझन असा दर सांगताच, या महिलांनी जाणीवपूर्वक भावतोल करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यातील एक महिला विक्रेत्याचे लक्ष विचलित करत असतानाच, इतर महिलांनी आजूबाजूला गर्दीचा बनाव केला. याच संधीचा फायदा घेत टोळीतील एका मुलीने विक्रेत्याच्या शेजारी ठेवलेली पर्स लंपास केली.पर्स गायब झाल्याचे लक्षात येताच विक्रेत्याने आरडाओरड केली, मात्र गर्दीचा फायदा घेत ही टोळी तेथून पसार झाली होती. चोरी गेलेल्या पर्समध्ये विक्रेत्याने पिग्मी खात्यातून काढलेली 40 हजार रुपयांची रोकड होती. धक्कादायक बाब म्हणजे याच सुमारास परिसरातील दुसऱ्या एका फळ विक्रेत्या महिलेकडूनही एका महिलेने एक किलो काजूगर लंपास केल्याचे समोर आले आहे. या सलग घटनांमुळे ही टोळी बाजारपेठेत वेगवेगळ्या ठिकाणी सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास यंत्रणा राबवली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. बाजारपेठेत पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी आता जोर धरत असून अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विक्रेत्याची 40 हजारांची रोकड लंपास ; पोलिसांकडून तपासाला वेग Read More »

देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत अटकेत

देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत जेरबंद

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट परिसरात गाडी अडवून चाकूचा धाक दाखवत चालकाकडून २५ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना देवरुख पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली. या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) हे बोलेरो गाडीतून वेतोशी (ता. रत्नागिरी) येथून शिराळा (जि. सांगली) येथे म्हैस घेऊन जात असताना आंबा घाटातील दख्खन परिसरात दोन गाड्यांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना खाली उतरवून मारहाण, शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवले. त्यानंतर साखरपा येथील गंद्रे पेट्रोलपंपाजवळ नेऊन फिर्यादीला अर्ध्या वाटेत सोडून आरोपींनी पळ काढला. यावेळी आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी करत गाडीतील २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी साखरपा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच देवरुख पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून पाच आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.या गुन्ह्यात फरहान रशीद मुल्ला (४२), प्रथमेश सचिन भाटकर (२४), सर्वेश सुभाष किर (२२), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६) व भूषण बिपेंद्र सावंत (२६, सर्व रा. रत्नागिरी) यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत जेरबंद Read More »

चोरीची इको कार २४ तासांत शोधली; दापोली-शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई

चोरीची इको कार अवघ्या २४ तासांत शोधली; दापोली व शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई

प्रतिनिधी : कोकणधारा दापोली : येथील व्यापारी अनिल मोरे यांची चोरीला गेलेली चारचाकी इको कार शोधून काढण्यात दापोली आणि शिरगाव पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ मार्च रोजी दोन अज्ञात इसमांनी अनिल मोरे यांची इको कार चोरून नेली होती. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शोधमोहीम सुरू केली होती.दरम्यान, गुहागर-विजापूर मार्गावरील पोफळी तांबे कॅन्टीन परिसरात एक चारचाकी गाडी संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे अलोरे-शिरगाव पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती दापोली पोलिसांना दिली. घटनेची खातरजमा करण्यासाठी दापोली पोलिसांनी फिर्यादी अनिल मोरे यांना सोबत घेऊन शिरगाव पोलिस ठाणे गाठले. तेथे उभी असलेली गाडी आपलीच असल्याची खात्री मोरे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी रीतसर पंचनामा करून सदर वाहन त्यांच्या ताब्यात सुपूर्द केले. प्राथमिक माहितीनुसार, गुहागर-विजापूर मार्गावरील एका वळणावर ही गाडी सोडून चोरटे पसार झाले होते. चोरीची घटना घडल्यानंतर केवळ एका दिवसात तपासाची दिशा निश्चित करून वाहन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. आपली गाडी सुखरूप परत मिळाल्याने व्यापारी अनिल मोरे यांनी दापोली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, वाहन हस्तगत करण्यात यश आले असले तरी ही चोरी करणारे दोन अज्ञात इसम कोण होते आणि त्यांच्या मागचा नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.

चोरीची इको कार अवघ्या २४ तासांत शोधली; दापोली व शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई Read More »