konkandhara.com

Editorial

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, बहादूरशेख नाका येथील घटनेनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; तपास डीवायएसपी बेले यांच्याकडे

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या कथित गैरकारभाराविरोधात सुरू होणाऱ्या उपोषणादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, या घटनेप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका फिर्यादीवरून वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि साहित्य चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसऱ्या फिर्यादीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले हे करीत आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बहादूरशेख नाका, चिपळूण येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या गैरकारभाराविरोधात रुपेश सुरेश पवार (रा. खेड) हे उपोषणास बसणार होते. या उपोषणाचे वृत्तांकन करण्यासाठी दूरदर्शनचे पत्रकार दीपक दिलीप भागवत हे कॅमेरामन रुपेश साळुंखे यांच्यासह घटनास्थळी गेले होते. त्यावेळी १० ते १५ जणांच्या जमावाने त्यांना अडवून “तू कसला पत्रकार, तू कसले शूटिंग करतो?” असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तक्रारीनुसार, संबंधितांनी हाताच्या थपडा, लाथाबुक्यांनी मारहाण केली, तसेच फिर्यादी दीपक भागवत यांच्या साईड बॅगमधील आयडी कार्ड व इतर साहित्य चोरीस गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पत्रकार दीपक दिलीप भागवत (रा. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी १० ते १५ जणांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ चे कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस नोंदीनुसार हा गुन्हा दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३६ वा. दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेप्रकरणी दुसरी फिर्याद अभिषेक चंद्रकांत मोहिते यांनी दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीतील नेमके आरोप आणि त्यामागील कारणांचा तपशील पोलीस तपासातून पुढे येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. या संपूर्ण घटनेत एकीकडे पत्रकारावर हल्ला आणि वृत्तांकनात अडथळा आणल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे, तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण केवळ स्थानिक वादापुरते मर्यादित राहिलेले नाही. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांचे स्वरूप आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा तणाव या तिन्ही अंगांनी ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले हे करीत असून, या प्रकरणात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष, व्हिडिओ चित्रीकरण आणि संबंधित व्यक्तींची विधाने यांच्या आधारे तपास पुढे नेला जाणार आहे. दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यामुळे या घटनेचे नेमके सत्य आणि जबाबदारी कोणाची, हे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, बहादूरशेख नाका येथील घटनेनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; तपास डीवायएसपी बेले यांच्याकडे Read More »

रत्नागिरी वनविभागाचा राज्यात डंका; विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाईंसह तिघांना सुवर्ण पदक

रत्नागिरी वनविभागाचा राज्यात डंका; विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाईंसह तिघांना सुवर्ण पदक

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण, दि. २५ : वनसंपत्तीचे प्रभावी संरक्षण, वनव्यवस्थापन आणि वनसेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मानाच्या राज्यस्तरीय पदकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने ठसा उमटवला आहे. महसूल व वन विभागाने दि. २५ मार्च २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, रत्नागिरी येथे कार्यरत विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा शोभा नरेंद्र देसाई यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रतिष्ठेचे सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. श्रीमती देसाई यांच्या या सन्मानामुळे रत्नागिरी वनविभागात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या राज्यस्तरीय गौरवात केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच नव्हे, तर मैदानी पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला आहे. रत्नागिरी वनवृत्तातील वनपाल श्री. सुरेश आत्माराम उपारे आणि श्री. रामदास दत्तात्रय खोत यांनाही त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे. तसेच वनसंरक्षणाच्या कामात मोलाची भूमिका बजावणाऱ्या एका वनरक्षकास रजत पदक जाहीर करण्यात आले आहे. या पदकांसाठी निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर पद्धतीने राबविण्यात आली. अपर मुख्य सचिव (वने) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल, तांत्रिक कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष कामगिरीची सखोल छाननी करून अंतिम निवड केली. महाराष्ट्र शासनाने सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे राज्यातील एकूण ५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही पदके जाहीर केली आहेत. वन/वन्यजीव संरक्षण, व्यवस्थापन, वनविस्तार आदी सहा विविध कार्यप्रकारांमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील या मानकरी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या या यशाची नोंद सेवापुस्तकात घेण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. या सन्मानामुळे वनसेवेत कार्यरत इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

रत्नागिरी वनविभागाचा राज्यात डंका; विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाईंसह तिघांना सुवर्ण पदक Read More »

chiplun-balanatya-training-camp-akhil-bharatiya-natya-parishad

चिपळूणमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीने यावर्षी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराचे हे सलग तिसरे वर्ष आहे. दि. १७ ते २६ एप्रिल या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर होणार असून, त्यानंतर दि. २७ एप्रिल रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांच्या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखेचे दोन वर्षांपूर्वी पुनर्जीवन झाल्यानंतर शाखेच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळाली आहे. बालनाट्य शिबिर, कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांची कार्यशाळा, महिलांच्या गायनाचा ‘स्वर तरंग’, ‘आनंदयात्री पुल’ अशा एक-दोन नव्हे तर एकूण २८ कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दरवर्षी बालनाट्य शिबिर आयोजित करण्याची परंपराही जपली जात आहे.या शिबिराच्या पहिल्या वर्षी सुरेश गायधनी, तर दुसऱ्या वर्षी अभिजीत झुंजारराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. यंदा पुण्यातील प्रा. रश्मी नंदकुमार देव या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रा. रश्मी देव या एमईएसओ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे येथे नाट्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एम.ए. फिलॉसॉफी, एम.ए. इंडोलॉजी, एम.ए. नाट्यशास्त्र, तसेच हेरिटेज मॅनेजमेंट डिप्लोमा आणि सर्टिफाइड योगा इन्स्ट्रक्टर अशी शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे.त्या गेली २० वर्षे मराठी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमी, तसेच मीडिया क्षेत्रात अभिनेत्री, दिग्दर्शिका, माहितीपट निर्माती आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. देशाची कला, इतिहास आणि संस्कृती लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘गाभारा’ या संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी अनेक व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांत भूमिका साकारल्या असून, ३५ हून अधिक माहितीपटांची संकल्पना, दिग्दर्शन आणि संकलन केले आहे. शिबिरातून तयार करण्यात आलेले बालनाट्य इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सादर करण्यात येणार आहे. वय वर्षे ७ ते १७ या वयोगटातील विद्यार्थी या शिबिरात सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या खजिनदार ॲड. विभावरी रजपूत (७७९६७२९५८७), दिलीप आंब्रे ( 8291089302) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.

चिपळूणमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन Read More »

रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापतींची नावे जाहीर; सस्पेन्स संपला

रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापतींची नावे जाहीर; सस्पेन्स अखेर संपला

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या विषय समिती सभापतीपदांच्या निवडीचा सस्पेन्स अखेर संपला असून, पालकमंत्री उदय सामंत यांनी पाच महत्त्वाच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली असून, सर्व नियुक्त्या सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या निवडीची प्रक्रिया बुधवार, दि. २५ मार्च रोजी पार पडणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. जिल्हा परिषदेच्या कामकाजात विषय समित्यांचे महत्त्व अधोरेखित मानले जाते. विविध योजनांची अंमलबजावणी, विभागनिहाय नियोजन आणि निर्णयप्रक्रियेत सभापतींची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.जाहीर करण्यात आलेल्या नावांनुसार, विलास चाळके यांची उपाध्यक्ष (बांधकाम व आरोग्य) म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच मयुरी मिलिंद शिर्के (महिला व बालकल्याण), महेश राघू नाटेकर (कृषी व पशुसंवर्धन), अॅड. सुयोग नंदकुमार कांबळे (समाजकल्याण) आणि नंदकुमार नारायण मुरकर (अर्थ व शिक्षण) यांची सभापतीपदी निवड निश्चित करण्यात आली आहे. पक्षांतर्गत शिस्त राखत सर्वांना संधी मिळावी या उद्देशाने ‘सव्वा वर्षांचा’ कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार ही नाव निश्चिती करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. आगामी काळात ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही जबाबदारी नव्याने निवड झालेल्या सभापतींवर असणार आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापतींची नावे जाहीर; सस्पेन्स अखेर संपला Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण तालुक्यातील जलजीवन मिशनच्या अडचणींबाबत आमदार शेखर निकम यांची मंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील विविध अडचणींबाबत आमदार शेखर निकम यांनी पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी मंगळवारी मुंबईत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी मंत्री पाटील यांनी प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक त्या सूचना दिल्या.राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्यातही कामे सुरू आहेत. मात्र, अनेक तांत्रिक अडचणी, अपुरी साधनसामग्री आणि ठेकेदारांची रखडलेली बिले यामुळे कामांच्या गतीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सावर्डे, सावर्डे खुर्द व कासारवाडी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी एकूण २८ हजार मीटर अतिरिक्त पाईपलाईन आवश्यक आहे. त्यापैकी १५ हजार मीटर काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित १३ हजार मीटर पाईप उपलब्ध नसल्याने योजना अपूर्ण आहे. हे पाईप ठाणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप कार्यवाही झालेली नाही.तसेच ओवळी-कळकवणे-वालोटी योजनेत मुख्य स्त्रोत व पाणी आरक्षण मंजूर असूनही जोडणी व इतर कामे प्रलंबित आहेत. यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश देण्याची मागणी निकम यांनी केली.बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. चौकट :योजना मार्गी लावण्यासाठी तातडीचे निर्णय आवश्यक – निकमकोकणातील डोंगराळ व दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी येत आहेत. डिसेंबर २०२६ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे निकम यांनी नमूद केले. जिल्ह्यातील ३७८ योजनांपैकी केवळ ४९ योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून ७५ ते १०० टक्के प्रगतीतील योजनांना प्राधान्याने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सुमारे ९३ कोटी रुपयांची ठेकेदारांची प्रलंबित बिले तातडीने देऊन कामांना गती द्यावी, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले.

चिपळूण तालुक्यातील जलजीवन मिशनच्या अडचणींबाबत आमदार शेखर निकम यांची मंत्र्यांकडे मागणी Read More »

dadar-ratnagiri-passenger-train-mns-warning-stop-trains

दादर-रत्नागिरी पॅसेंजर १५ दिवसांत सुरू करा; अन्यथा ट्रेन रोखण्याचा मनसेचा इशारा

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५ ते २० दिवसांत ही मागणी मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या रोखण्याचा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पूर्वी दादर ते रत्नागिरी अशी धावणारी ही पॅसेंजर ट्रेन सध्या फक्त दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने कोणतेही ठोस कारण न देता हा निर्णय घेतल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवा स्थानकापर्यंत जाऊन ट्रेन पकडावी लागत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, हे मनसेला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास “मनसे स्टाईल” आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कोकण रेल्वेसाठी स्थानिकांनी जमीन दिली, मात्र आज त्याच कोकणवासीयांची गैरसोय होत असल्याची खंत व्यक्त करत, हा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी मनसेने केली आहे.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर १५ दिवसांत सुरू करा; अन्यथा ट्रेन रोखण्याचा मनसेचा इशारा Read More »

konkandhara 20 2

काविळतळी येथे नगरसेवक संदीप भिसे यांच्या पुढाकारातून पाणपोईचे उद्घाटन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नगरसेवक संदीप भिसे यांच्या पुढाकारातून शहरातील काविळतळी येथे पाणपोई सुरू करण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन नुकतेच पार पडले. यावेळी दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, सर्वसामान्यांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे ही अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. संदीप भिसे यांनी घेतलेली ही पुढाकार अनुकरणीय असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा, सहकार्य आणि आपुलकीची भावना अधिक दृढ होते. पाणपोईसारख्या उपक्रमातूनही मोठा सामाजिक संदेश दिला जातो, असेही त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, नगरसेवक संदीप भिसे आगामी काळातही याच सामाजिक बांधिलकीतून काम करत राहतील. या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष शशिकांत मोदी, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, शहराध्यक्ष रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, हर्षाली पवार, अर्बन बँक संचालक रत्नदीप देवळेकर, तसेच अभिनव भुरण, सपना भिसे, कुणाल आंबेकर, शक्तीकुमार चव्हाण, प्रवीण भिसे, सचिन शिंदे, अमोल भिसे, वेद सुर्वे, यश खंडजोडे, सुरेश भिसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पाणपोईमुळे परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे.

काविळतळी येथे नगरसेवक संदीप भिसे यांच्या पुढाकारातून पाणपोईचे उद्घाटन Read More »

रत्नागिरीत 114 ग्रामपंचायतींतील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिलला निवडणूक

114 ग्रामपंचायतींतील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिलला निवडणूक

रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांमुळे संबंधित ग्रामपंचायतींतील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत संबंधित ग्रामपंचायत हद्दीत आचारसंहिता लागू राहणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी दिली.

114 ग्रामपंचायतींतील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिलला निवडणूक Read More »

डिझेल दरवाढीने मच्छिमार अडचणीत; केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी – नितेश राणे

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी केंद्रीय मंत्री, पंचायती राज तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह जी यांच्या कडे सविस्तर पत्र पाठवून केली आहे. राज्यातील 136 मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या सुमारे 7,550 यांत्रिक मासेमारी नौकांसाठी डिझेल कोटा मंजूर असला तरी प्रत्यक्षात वाढत्या दरांमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांमुळे डिझेल दरात झालेली वाढ ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.सहकारी संस्थांना ‘बल्क कन्झ्युमर’ म्हणून वर्गीकृत केल्याने मच्छीमारांना किरकोळ दरांपेक्षा जास्त दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांपेक्षा मच्छीमारांवर अधिक आर्थिक भार पडत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.वाढत्या इंधन खर्चाचा भार सहकारी संस्थांना सहन करणे कठीण जात असून, हा खर्च अखेरीस वैयक्तिक मच्छीमारांवर टाकला जात आहे. परिणामी अनेक मच्छीमारांना मासेमारीच्या फेऱ्या कमी कराव्या लागत असून, याचा थेट परिणाम मासळी उत्पादन आणि उत्पन्नावर होत आहे. या परिस्थितीमुळे मच्छीमार, मजूर, मासळी विक्रेते आणि संबंधित व्यवसायांवर अवलंबून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या उपजीविकेला धोका निर्माण झाला आहे. मत्स्यव्यवसाय हा अन्नसुरक्षा आणि निर्यातीसाठी महत्त्वाचा क्षेत्र असतानाही, शेतीप्रमाणे इंधन अनुदान किंवा संरक्षण यंत्रणा उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये मच्छीमार सहकारी संस्थांचे पुनर्वर्गीकरण करून किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून देणे, लक्षित डिझेल अनुदान किंवा थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना लागू करणे, तसेच मत्स्यव्यवसायाला इंधन संरक्षण योजनांमध्ये समाविष्ट करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, मत्स्यव्यवसायासाठी इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याचीही मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष दिल्यास महाराष्ट्रातील मच्छीमारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, Read More »

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी अनिरुद्ध शेखर निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. माजी खासदार, शिक्षण महर्षी तथा सहकार महर्षी गोविंदराव निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून नर्सरीपासून नर्सिंग, आयटीआय ते अभियांत्रिकी अशा विविध शाखांमध्ये संस्थेने उल्लेखनीय विस्तार साधला आहे. गोविंदराव निकम आणि अनुराधाताई निकम यांनी संस्थेची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून शेखर निकम यांनी जबाबदारी सांभाळत संस्थेचा विकास पुढे नेला. सध्या ते आमदार म्हणून कार्यरत आहेत. आता नव्या पिढीकडे नेतृत्वाची धुरा सोपवित अनिरुद्ध निकम यांच्या रूपाने संस्थेला नवे नेतृत्व मिळाले आहे. अनिरुद्ध निकम यांनी कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण ऑस्ट्रेलियातून पूर्ण केले असून ते उच्चशिक्षित आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी नवी जबाबदारी स्वीकारल्याने संस्थेच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नियुक्तीबद्दल अनिरुद्ध निकम यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष Read More »