konkandhara.com

Editorial

पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी अटकेची मागणी; १४ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा

पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा १४ एप्रिलपासून बेमुदत उपोषण, चिपळूणमधील पत्रकारांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा १४ एप्रिल २०२६ पासून चिपळूणमधील पत्रकार बेमुदत उपोषण आंदोलन छेडतील, असा इशारा देत पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, २५ मार्च २०२६ रोजी शहरातील बहादूरशेख नाका येथे भरदिवसा वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी नियोजनपूर्वक जीवघेणा हल्ला केला. या घटनेची चित्रफीत उपलब्ध असून हल्लेखोर स्पष्टपणे ओळखू येत असतानाही, घटनेला आठ दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे पत्रकारांनी नमूद केले आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले हे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित वेगाने तपास व कारवाई होत नसल्यामुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी मागणी केली की, या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून गुन्ह्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी. अन्यथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, १४ एप्रिल रोजी, चिपळूणमधील पत्रकार लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करतील. हे उपोषण चिपळूण येथील मा. प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकारांनी निवेदनात म्हटले आहे की, संविधान रचणाऱ्या महामानवाच्या जयंतीदिनी न्यायासाठी उपोषण करण्याची वेळ पत्रकारांवर येणे हे अत्यंत दुर्दैवी असून, पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी चिपळूणमधील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा १४ एप्रिलपासून बेमुदत उपोषण, चिपळूणमधील पत्रकारांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध : आमदार शेखर निकम | विघ्नसंतोषींना यश नाही

राष्ट्रवादी काँग्रेस परिवार एकसंध; विघ्नसंतोषी प्रवृत्तींना यश मिळणार नाही : आमदार शेखर निकमप्रतिनिधी

प्रतिनिधी: योगेश बांडागळे चिपळूण : आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराने सर्व आव्हानांचा एकजुटीने सामना केला असून, विभाजनानंतरही पक्ष पुन्हा एकदा ताकदीने उभा राहिल्याचा विश्वास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार निकम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या प्रवासात प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी परिवारातील सर्व सदस्यांनी अत्यंत खंबीर भूमिका बजावली. पक्षावर आलेल्या विविध राजकीय संकटांनाही कार्यकर्त्यांनी न डगमगता तोंड दिले आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. ते पुढे म्हणाले की, आदरणीय अजितदादा पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी परिवाराच्या भावना लक्षात घेत आदरणीय श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार दुःखातून सावरत असतानाच काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी या परिवारात मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र अशा प्रवृत्तींना कधीही यश मिळणार नसल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार निकम यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे स्पष्ट केले की, आदरणीय अजितदादांच्या आशीर्वादाने, सुनेत्रावहिनी पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आजही एकसंध आहे आणि यापुढेही तसाच राहणार आहे. पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकदिलाने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करत राहतील, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, आदरणीय अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी परिवार शेवटपर्यंत लढत राहील, असा निर्धारही आमदार शेखर निकम यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस परिवार एकसंध; विघ्नसंतोषी प्रवृत्तींना यश मिळणार नाही : आमदार शेखर निकमप्रतिनिधी Read More »

सचिन जोशी यांची उमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट | चिपळूण

उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव सचिन जोशी यांचीउमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे स्वीय सचिव सचिन जोशी यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान शिवसेना चिपळूण शहर प्रमुख उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान शिवसेनेच्या संघटनात्मक घडामोडी, विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) अभियान, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणे आणि मतदार संपर्क अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख राजेश मोरे, तसेच विपुल कदम, अनिल नवगणे, स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. सचिन जोशी यांच्या या भेटीमुळे चिपळूणमधील शिवसेना संघटनात्मक हालचालींना अधिक वेग मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव सचिन जोशी यांचीउमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट Read More »

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त, मनोज शिंदे हकालपट्टी

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त,मनोजकुमार शिंदे यांची हकालपट्टी

प्रतिनिधी : कोकणधारा रोहा (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत रोहा तालुका कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करण्यात आली असून, माजी तालुका प्रमुख व माजी उपजिल्हाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहा नगरपालिका निवडणुकीदरम्यान पक्षाच्या अधिकृत धोरणांविरुद्ध जाऊन विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा संशय मनोजकुमार शिंदे यांच्यावर व्यक्त करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश मिळाले असले, तरी मागील नगरपालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. या अपयशामागे पक्षविरोधी वर्तणूक कारणीभूत ठरल्याचा ठपका पक्षाने ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली रोहा येथे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत तालुक्यातील राजकीय घडामोडी, संघटनात्मक स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीचा आढावा घेण्यात आला.कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर मनोजकुमार शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर, केवळ व्यक्तीवर कारवाई करून न थांबता संपूर्ण रोहा तालुका कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णयही बैठकीत जाहीर करण्यात आला. पक्ष संघटना नव्याने उभारण्यासाठी लवकरच निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्त्यांची नवीन फळी जाहीर केली जाईल, असे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मनोजकुमार शिंदे यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता, मात्र आता त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई झाल्याने रोहा तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राजा केणी यांचे वक्तव्य“पक्षामध्ये शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी पक्षविरोधी काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई करणे संघटनेच्या हिताचे आहे. लवकरच रोहा तालुक्यात नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल.”— राजा केणी, जिल्हाप्रमुख, शिवसेना (रायगड)

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त,मनोजकुमार शिंदे यांची हकालपट्टी Read More »

पाचलमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरण; १०९४ गॅस कार्ड्स जप्त

पाचलमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरण उघड; १०९४ गॅस कार्ड्स जप्त

प्रतिनिधी : कोकणधारा पाचल (वार्ताहर) : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजापूर पुरवठा विभागाने बुधवारी संबंधित सर्व्हिस सेंटरवर धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १०९४ ग्राहकांची गॅस पुस्तिका (कार्ड) आणि एक कमर्शियल सिलिंडर जप्त करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती तहसीलदार विकास गंबरे यांनी दिली असून पुढील चौकशीसाठी प्रकरण जिल्हा पुरवठा विभागाकडे सोपवण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सर्व्हिस सेंटरकडून ग्राहकांकडून गॅस कार्ड्स जमा करून घेतली जात होती. या कार्ड्सच्या आधारे सिलिंडर बुक करून प्रत्यक्षात ग्राहकांना गॅस न देता तेच सिलिंडर जादा दराने विक्री केल्याचा संशय आहे. काही ग्राहकांच्या नावावर सिलिंडरची उचल दाखवली गेली, मात्र त्यांना गॅस मिळाला नसल्याने हा प्रकार उघड झाला. १ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता पुरवठा विभागाने छापा टाकून झाडाझडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गॅस पुस्तिका आणि एक कमर्शियल सिलिंडर आढळून आला. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व्हिस सेंटरच्या संचालकांनी ग्राहक स्वतःहून कार्ड्स ठेवून जात असल्याचे सांगितले असले, तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्ड्स सापडल्याने प्रशासनाने संशय व्यक्त केला आहे. या कारवाईत पुरवठा निरीक्षक निलेश लाड, मंडल अधिकारी पूनम गावित, तलाठी नरके, शशिकांत कांबळे, लिपिक विक्रम पाटील, ग्रामवसूल अधिकारी कृष्णा गोरड, कोतवाल अमित चिले व पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे सहभागी झाले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.

पाचलमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरण उघड; १०९४ गॅस कार्ड्स जप्त Read More »

‘चमत्कार’ दाव्यावरून वाद; रितू तावडे यांचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

घसा बरा झाल्याच्या ‘चमत्कार’ दाव्यावरून वाद; रितू तावडे यांचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनींच्या आशीर्वादामुळे घशाचा त्रास दूर झाल्याचा दावा केल्यानंतर राज्यात वादंग निर्माण झाला आहे. अंधश्रद्धेविरोधातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानावरून सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली असून, त्यांनीही ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी महावीर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना तावडे यांनी सांगितले की, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून त्यांना घशाचा त्रास होता. औषधोपचार करूनही फरक पडत नव्हता. मात्र जैनमुनी नम्रमुनी महाराज यांच्या आशीर्वादानंतर आपला आवाज सुधारला असून, हा “चमत्कार” असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान केल्याचा आरोप होत आहे. या वक्तव्यानंतर विविध स्तरांतून टीका झाली. संजय राऊत यांच्यासह अनेकांनी तावडे यांच्यावर निशाणा साधला. यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेत तावडे यांनी टीकाकारांना उत्तर दिले. “ट्रोल करणाऱ्यांच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुमच्या घरात आया-बहिणी आहेत की नाहीत?” असा सवाल करत त्यांनी टीकाकारांवर संताप व्यक्त केला. बोरीवली येथे आयोजित कार्यक्रमात आपण केवळ आदरभाव व्यक्त केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. तावडे पुढे म्हणाल्या की, नम्रमुनी महाराजांनी त्यांना ‘ओम’चा उच्चार करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी त्याचा नियमित सराव केल्यानंतर आवाजात सुधारणा झाली. “यात कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलेले नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच आपण स्वामी समर्थ आणि साईबाबा यांचे भक्त असल्याचे सांगत, नम्रमुनी महाराजांप्रतीही श्रद्धा असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे अंधश्रद्धा विरुद्ध श्रद्धा या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वाद पेटला आहे.

घसा बरा झाल्याच्या ‘चमत्कार’ दाव्यावरून वाद; रितू तावडे यांचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर Read More »

विलीनीकरणाचा विषय संपला : विकास लवांडे; सुनील तटकरेंवर दुतोंडीपणाचा आरोप

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय;सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा: विकास लवांडे

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राज्यात सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवार गटाने ठाम भूमिका घेत या विषयाला पूर्णविराम दिला आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी स्पष्ट केले की, विलीनीकरणाचा मुद्दा त्यांच्या पातळीवरून पूर्णपणे संपला असून आगामी निवडणुका पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे संभ्रम अधिक वाढला. 16 फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेबाबत माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र, 31 मार्च रोजी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चर्चेबाबत माहिती असल्याचे सांगत, विलीनीकरण झाल्यास त्याचे स्वागतच केले जाईल, असे मत व्यक्त केले. या बदलत्या भूमिकेवर टीका करत लवांडे यांनी तटकरे यांच्यावर दुतोंडीपणाचा आरोप केला. “सुनील तटकरे हे खोटे बोलतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांच्या वक्तव्यांमध्ये सातत्य नाही,” असे ते म्हणाले. “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा,” अशी म्हण उद्धृत करत त्यांनी तटकरेंवर टोला लगावला. लवांडे यांनी पुढे सांगितले की, पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी यापूर्वीच विलीनीकरणाच्या शक्यतांना नकार दिला आहे. त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत म्हटले की, कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये. “पक्ष स्वतंत्रपणे संघटन मजबूत करत पुढील निवडणुकांना सामोरे जाणार आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही वेळोवेळी विलीनीकरणाच्या चर्चांना फेटाळल्याचे अधोरेखित केले. या चर्चांना काही जण स्वार्थी राजकारणाच्या हेतूने हवा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील मतभेद अधोरेखित झाले आहेत. एकीकडे विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असताना, दुसरीकडे शरद पवार गटाने स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्धार पुन्हा स्पष्ट केल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय;सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा: विकास लवांडे Read More »

आंबा-काजू उत्पादकांचे नेतृत्व राजू शेट्टी करणार | शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

आंबा-काजू उत्पादकांचे नेतृत्व राजू शेट्टी करणार

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची आर्थिक मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या बैठकीत आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी एकदिलाने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. औषध फवारणी, खते, मजुरी आणि वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, लाखो रुपयांचा खर्च होत असताना केवळ २२ हजार रुपयांची मदत अपुरी ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एका आंबा बागेचा वार्षिक खर्च पाहता ही रक्कम फवारणीच्या एका टप्प्यासाठीही पुरेशी नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली. वारंवार होणाऱ्या नैसर्गिक नुकसानीमुळे कोकणातील शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. अशा परिस्थितीत सरकारची मदत ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची टीका करण्यात आली. तसेच पीकविमा कंपन्यांकडून होत असलेल्या अन्यायकारक वागणुकीबाबत आणि कर्जमाफीतील कठोर अटींबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. दरम्यान, ४ एप्रिल रोजी देवगड येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. या बैठकीस माजी आमदार बाळा माने, सुशांत नाईक, राजेंद्र गड्यान्नावर, विनायक कदम, प्रकाश साळवी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

आंबा-काजू उत्पादकांचे नेतृत्व राजू शेट्टी करणार Read More »

वणव्यात होरपळून ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

वणव्यात होरपळून ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरातील घटना; चार-पाच दिवसांपासून होत्या बेपत्ता

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. जंगलात लागलेल्या वणव्यात होरपळून तारामती तुकाराम वाघे (वय ७०) यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तारामती वाघे या मागील चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्या काही अंशी मानसिक आजाराने त्रस्त होत्या. त्यामुळे त्या अनेकदा घरातून निघून जात असत आणि काही वेळाने पुन्हा घरी परतत असत. यामुळे सुरुवातीला कुटुंबीयांनाही त्या पुन्हा परत येतील, अशी अपेक्षा होती. दरम्यान, गाणे परिसरातील जंगलात चार दिवसांपूर्वी मोठा वनवा लागला होता. त्यानंतर एका व्यक्तीने जंगलातून लाकडाची फाटी आणण्यासाठी जंगलात गेल्यानंतर त्याला जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळील साडीवरून तो मृतदेह तारामती वाघे यांचाच असल्याची ओळख पटली.या घटनेची माहिती तत्काळ अलोरे-शिरगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, जंगलात लागलेल्या वणव्याच्या तीव्रतेमुळे तारामती वाघे या होरपळून मृत्यूमुखी पडल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे जंगल परिसरात लागणाऱ्या वणव्यांच्या वाढत्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वणव्यांच्या घटना वाढत असल्याने जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासन आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

वणव्यात होरपळून ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरातील घटना; चार-पाच दिवसांपासून होत्या बेपत्ता Read More »

चिपळूणमध्ये १ ते १० मे दरम्यान बालनाट्य शिबिर | मराठी नाट्य परिषद आयोजन

आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणतर्फे १ ते १० मे दरम्यान बालनाट्य शिबिर

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालनाट्य शिबिराचे तिसरे वर्ष उत्साहात आयोजित करण्यात आले असून, हे शिबिर दि. १ मे ते १० मे या कालावधीत पार पडणार आहे. बालकांमधील अभिनय, वक्तृत्व, संवादकौशल्य, आत्मविश्वास, रंगभूमीची आवड आणि सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मुलांना नाट्याभिनय, संवादफेक, आवाजाचा वापर, देहबोली, रंगमंचावरील वावर, समूह सादरीकरण, व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध कलात्मक व उपयुक्त घटकांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या शिबिरासाठी प्रवेश मर्यादित असल्याने नियमितपणे शिबिरात सहभागी होणाऱ्या मुलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक पालकांनी पुढील दोन दिवसांत आपल्या मुलांची नावनोंदणी करून प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराच्या वेळापत्रकाबाबत माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, दि. १ मे रोजी शिबिराची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ अशी राहणार आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत शिबिराचे सत्र होणार आहे. गेल्या दोन वर्षांत या बालनाट्य शिबिराला चिपळूण व परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अनेक मुलांनी या शिबिरातून रंगभूमी, अभिनय आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आपली कला खुलवली आहे. त्यामुळे यंदाच्या तिसऱ्या वर्षीही या शिबिराबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. बालकांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्यात सांस्कृतिक जाण निर्माण व्हावी आणि रंगभूमीशी त्यांचा जवळचा संबंध निर्माण व्हावा, या उद्देशाने हे शिबिर सातत्याने राबवले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणीसाठी ॲड. विभावरी रजपूत +917796729587 व दिलीप आंब्रे मो. +91 82910 89302 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.

आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणतर्फे १ ते १० मे दरम्यान बालनाट्य शिबिर Read More »