▪️जे. डी. पराडकर 9890086086
सध्या सर्वत्र आंब्याचा हंगाम सुरू आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आंबे पिकू लागले की हमखास मान्सून पूर्व सरी कोसळू लागतात. या सरींबरोबरच वादळी वारे वाहत असल्याने तयार झालेले आंबे पडून मोठं नुकसानही होतं. गेली काही वर्षे हे प्रकार सातत्याने घडत आहेत. याचा शेवट दरवर्षी आंबा आणि काजू यांचे नुकसान होण्यामध्येच परिवर्तित होत आहे. असं असलं तरी खवय्ये मंडळी आंब्याची चव चाखण्यासाठी दर्जेदार आणि चविष्ट हापूस मिळवण्याचा प्रयत्न करतात. आंब्याच्या जातीनुसार त्याच्या विविध चवी असल्या तरीही झाड पिका आंबा , आढीतला आंबा आणि पडीचा आंबा या तीन प्रकारातील प्रत्येक आंब्याची चव ही निरनिराळी असते. यातील पडीच्या आंब्याची चव ज्यांनी चाखली असेल , त्यांना आजही त्याच्या मधुरतेने आणि आंबट गोड पणामुळे ' केवळ अप्रतिम ' आणि ' भन्नाट ' असंच म्हणावसं वाटेल.
आंबा फणसाची आठवण होताच माझं मन अलगद बालपणात शिरून आमच्या आंबेडखुर्दच्या घरी पोहोचते. आमच्या बागेत निरनिराळ्या चवीची ३२ प्रकारची आंब्याची झाड होती. याच्या जोडीला २२ प्रकारचे आणि एकापेक्षा एक भन्नाट चवीचे फणसही होते. एप्रिल महिन्यात परीक्षा संपन्न झाल्या की, त्याच दिवशी आम्ही आंबेडखुर्दच्या घरी धाव घ्यायचो. खरंतर त्याआधी आमचं मन गावी पोहोचलेलं असे. एकापाठोपाठ एक तयार होणारे आंबे आणि दररोज कामगारांकडून काढल्या जाणाऱ्या आंब्याच्या राशी पाहून मन तृप्त व्हायचं. आंब्या फणसाच्या चवीचं वर्णन करायला माझी शब्द संपदा देखील कमी पडेल , अशा चवीचे आंबे फणस आमच्या बागेमध्ये होते. चार ते पाच कामगार बागेतल्या विविध झाडांवर चढून दिवसभर आंबे काढण्याचं काम करत. खरं तर त्यावेळी हापूस पेक्षा रायवळ आंब्यालाच अधिक मागणी असायची. आमच्या बागेतल्या इवल्याशा बिटक्या चवीने इतक्या मधुर होत्या की, त्या नेण्यासाठी ठिकठिकाणी खवय्ये पायपीट करत आमच्या घरी येत असत. दिवसभर आम्ही देखील कामगारांच्या पाठून बागेतून फिरत असायचो. यामुळे दिवसभर विविध चवीच्या बीटक्या आणि झाड पिके आंबे मनसोक्त खायला मिळत असत. कामगारांनी काढलेल्या आंब्याच्या ' शिकाळ्या ' उतरवून घेतल्यानंतर बाई माणसं येऊन सर्व आंबे घरात घेऊन जात असत.
आमची काकू या सर्व आंब्यांची उस्तवारी करायची. आंब्यांची आढी घालण्याचे काम आमच्या काकूकडे असे. आंब्यांच्या प्रत्येक जातीची आढी वेगवेगळी घालावी लागे. जमिनीवर तळामध्ये पेंढे पसरून त्यावर सर्व आंबे व्यवस्थित लावून झाल्यावर परत पेंढा पसरला जायचा. सर्वात वर गोणपाटं घालून ठेवली जात असत. साधारण पाच-सहा दिवसानंतर या आढीतील आंबे खाण्यायोग्य व्हायचे. आम्ही सर्व भावंड एक एक छोटी परडी भरुन आंबे घेऊन खायला बसायचो. आढीतील आंब्याची चव ही अगदी पक्की मधुर लागते. पूर्णपणे जून झालेला आंबा आढीमध्ये खऱ्या अर्थाने परिपक्व होतो. याची चव खरोखरच अवर्णनीय असते. कामगार आंबे काढत असताना काही झाड पिके आंबे मिळत असत. अशा झाड पिक्या आंब्याची चव देखील भन्नाटच असते. प्रत्येक झाडावर असे पाच दहा तरी झाड पिके आंबे मिळत असत. आंब्याच्या या हंगामा आमचं जेवण कमी आणि आंबे खाणंच अधिक व्हायचं.
आमच्या गावच्या घरासमोर शेजारच्या मधुअप्पांची तीन जुनी हापूस आंब्याची कलम दरवर्षी थोडेफार तरी आंबे देत असत. आमच्या बागेतील हापूस आंब्याची झाड जशी उंचच उंच होती तशीच घरासमोरची मधुअप्पांची जवळजवळ असणारी तीनही हापुस आंब्याची झाड खूपच उंच होती. अशा उंच झाडावर चढणारी कामगार देखील ठराविकच होते. दुपारच्या वेळी भोजनात असणारा मुबलक आमरस खाऊन डोळ्यावर झोपेचा अंमल आल्यानंतर आम्ही अंगणात मांडवाखाली पथारी पसरायचो. नैसर्गिक वारा आणि आमरसाचा अंमल यामुळे लगेचच डोळा लागायचा. अशावेळी अंगणाच्या समोर असणाऱ्या मधुअप्पांच्या हापूसच्या झाडावरील तयार झालेला आंबा वाऱ्याबरोबर जमिनीवर पडला की, त्या आवाजाने आम्हाला जाग यायची. ज्याला आधी जाग यायची, तो धावत जाऊन झाडाखाली पडलेला पडीचा आंबा घेऊन यायचा. खरंतर त्यावेळी आम्ही मधुअप्पांना न सांगताच असे पडलेले आंबे आणायचो. त्यावेळी झाडावर इतके आंबे असत की , झाडाखाली पडलेल्या आंब्यांकडे पाहायला कोणाला वेळच नसे. या पडीच्या आंब्याच्या चवीचे वर्णन काय, किती आणि कसे करावे ? हेच मला समजत नाही. पडीचे हे आंबे उंचावरून खाली पडल्याने कोठेतरी ठेचकळले जायचे. असा आंबा स्वच्छ धुऊन तो सालीसकट खाण्यात देखील खरी मज्जा होती. या आंब्याची आंबट गोड चव ही अन्य कोणत्याही प्रकारच्या आंब्याला येत नाही, हेच या पडीच्या आंब्याच्या चवीचे खास वैशिष्ट्य आहे. पडीचा आंबा सालीसकट खाल्ला तर , या सालीची चव त्यातील मधुरतेच्या गरात मिसळल्यानंतर तयार होणारी एक वेगळीच वर्णन करण्या पलीकडची असते. घरात आढीतील शेकडो आंबे पिकलेले असताना आम्ही मात्र या पडीच्या आंब्याच्या प्रेमात पडायचो.
दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळामुळे सध्या आम्ही जेथे मुक्कामी आहोत तेथील तीन हापुस कलमांवरील तयार आंबे जमिनीवर पडले. हे पडीचे आंबे पाहून माझे मन अलगद बालपणात शिरले आणि थेट आमच्या गावी आंबेडखुर्दला पोहोचले. त्यावेळी चाखलेली पडीच्या आंब्याची आंबट गोड चव परत एकदा आठवली. किती रम्य दिवस होते ते ? त्या आठवणीने अंतकरण जड झालं. पडीचा आंबा म्हणजे काही जणांना तो दुर्लक्षित करावासा वाटेल. मात्र या पडीच्या आंब्याच्या चवीत बाल दोस्तांचे अक्षरशः विश्व सामावलेले असते. हा आंबा मी तर नेहमीच सालीसकट खायचो. पडीचा आंबा हा आढीतील आंब्याच्या चवीला टक्कर देणारा असला तरीही झाड पिक्या आंब्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणूनच आंब्याचे हे विविध गुणधर्म त्याला सर्वोच्च स्थानावर बसवून ठेवण्यास कारणीभूत ठरले आहेत. अजूनही ज्यांनी कधीही पडिच्या आंब्याची चव चाखली नसेल, त्यांनी ती जरूर चाखावी आणि त्यातील मधुरतेची खात्री करावी .


















