konkandhara.com

कोकणची बातमी

konkandhara 9

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी : शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरण २०२५ अंतर्गत घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पात्र लाभार्थ्यांना स्थानिक वापरासाठी कमाल 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण टप्पा 1 व 2), पी.एम. जनमन आवास, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत तसेच मोदी आवास योजना या योजनांतील लाभार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. महसूल व वन विभागाच्या 30 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार, लिलावात न गेलेल्या वाळू गटांमधून तसेच अवैध उत्खनन प्रकरणांमध्ये जप्त केलेली वाळू रॉयल्टी न आकारता उपलब्ध करून दिली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर तहसिलदारांकडून ऑनलाईन वाळू पासेस जारी करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.हे पास ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्फत 15 दिवसांच्या आत लाभार्थ्यांना घरपोच देण्यात येतील. पास मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत वाळू उचलणे बंधनकारक असून, अन्यथा पास रद्द होईल. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास ऑफलाईन पासेस देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरकुल बांधकामाचा खर्च कमी होऊन ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत Read More »

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे १० एप्रिल रोजी आपल्या वयाच्या ७५ व्या वर्षात, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या विशेष दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यास उत्साहात सुरुवात केली आहे. या औचित्याने आज सकाळी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी चरणी खा. राणे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. श्री सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ आणि आमदार श्री. निलेश राणे मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत श्री देव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी आणि ७५ विडे यांची आकर्षक आरास मांडून श्रद्धापूर्वक अर्पण केली.या धार्मिक कार्यक्रमाला भाजपचे आणि राणे समर्थक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अशोक वाडेकर, नित्यानंद दळवी, शिवाजी कारेकर, अमोल देसाई, निखिल शेट्ये, अभिलाश पिलणकर, सोहम पिलणकर, विशाल कांबळे, राजू झगडे, नरेश बनसोडे आणि अमृत गोरे यांचा समावेश होता.खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात पुढील काही दिवस विविध विधायक उपक्रम राबवले जाणार आहेत.

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास Read More »

संगमेश्वरला समर स्पेशल गाड्यांचा थांबा नाही; प्रवाशांची नाराजी

संगमेश्वरला समर स्पेशल गाड्यांचा थांबा नाही; प्रवाशांत नाराजी, रिकाम्या सीट्स असूनही दुर्लक्ष, कोकण रेल्वेकडे तातडीची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशनला समर स्पेशल गाड्यांचा थांबा न दिल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः 06013 / 06014 (थिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – थिरुवनंतपुरम सेंट्रल) या गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा नसल्याने स्थानिक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गाड्यांना माणगाव, रोहा, मडगाव तसेच इतर अनेक स्थानकांवर थांबे देण्यात आलेले असताना संगमेश्वरकडे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. संगमेश्वर हे कोकणातील एक महत्त्वाचे प्रवासी केंद्र असून येथून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. विशेष म्हणजे, हे स्थानक वार्षिक सुमारे सहा कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न देणारे असूनही येथे थांबा न देणे आश्चर्यकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.दरम्यान, या समर स्पेशल गाड्यांमध्ये अनेक वेळा शेकडो सीट्स रिक्त राहत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे संगमेश्वर येथे थांबा दिल्यास प्रवाशांची सोय होण्याबरोबरच रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर “निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर” या फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला अधिकृत पत्र देत तात्काळ थांबा देण्याची मागणी केली आहे. तसेच, स्थानिक नागरिकांकडूनही या मागणीला मोठा पाठिंबा मिळत असून, संगमेश्वरला लवकरात लवकर समर स्पेशल गाड्यांचा थांबा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

संगमेश्वरला समर स्पेशल गाड्यांचा थांबा नाही; प्रवाशांत नाराजी, रिकाम्या सीट्स असूनही दुर्लक्ष, कोकण रेल्वेकडे तातडीची मागणी Read More »

डॉ. अनिल पटेल यांचा फिरता दवाखाना चिपळूणमध्ये; मोफत आरोग्य सेवा

यवतमाळचे समाजरत्न डॉ. अनिल पटेल यांचा फिरता दवाखाना सोमवारी चिपळूणकरांच्या सेवेसाठी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : आजच्या बाजारू व्यवस्थेमध्येही सेवाभाव जपणारे काही अवलिया डॉक्टर समाजात कार्यरत आहेत. स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून ग्रामीण, गरीब आणि दुर्लक्षित रुग्णांपर्यंत पोहोचून मोफत आरोग्यसेवा देणारे असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे यवतमाळचे समाजरत्न डॉ. अनिल पटेल. नाक, कान व घसा तज्ज्ञ असलेले डॉ. पटेल येत्या १३ एप्रिल २०२६ रोजी आपल्या फिरत्या आरोग्य रथासह प्रथमच चिपळूणमध्ये येत असून, चिपळूणकरांना त्यांच्या सेवाभावी कार्याचा लाभ घेण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे. डॉ. अनिल पटेल हे गेली ५० वर्षे नाक, कान व घसा तज्ज्ञ म्हणून कार्यरत असून, गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून ते विविध भागांत मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून ग्रामीण रुग्णांची सेवा करत आहेत. स्वतःचा व्यवसाय आणि वैद्यकीय सेवा सांभाळत त्यांनी समाजसेवेचा एक वेगळाच आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या सेवाकार्याचा वारसा त्यांना त्यांच्या आजोबांकडून लाभला. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचे आजोबा घोड्यावरून गावोगाव फिरून रुग्णांपर्यंत सेवा पोहोचवत असत. त्याच सेवाभावाची परंपरा पुढे नेत डॉ. पटेल यांनीही आपले संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेला वाहिले आहे. सोलापूर येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशात किंवा मोठ्या शहरात स्थायिक होण्याऐवजी छोट्या गावांमध्ये व ग्रामीण भागात सेवा देण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. काही वर्षांनंतर आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी पद्मश्री डॉ. कोल्हे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत मोफत आरोग्य शिबिरे सुरू केली. याच काळात डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. अभय बंग यांच्यासारख्या समाजाभिमुख वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबत त्यांनी कार्याची सुरुवात केली आणि पुढे हे सेवाकार्य देशभर विस्तारले.डॉ. पटेल यांनी सुरुवातीच्या काळात एसटी बसने प्रवास करून, नंतर स्वतःच्या स्कूटरने, आणि पुढे स्वतःच्या वाहनातून रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला. आज त्यांच्या या सेवाकार्याने मोठे रूप धारण केले असून, त्यांनी काश्मीरपासून आसामपर्यंत तसेच भारतातील सुमारे १२ ते १३ राज्यांमध्ये अशा स्वरूपाची आरोग्य शिबिरे घेतली आहेत. ग्रामीण व कष्टकरी जनतेला सोयीस्कर व्हावे म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी रात्रीची शिबिरेही आयोजित केली आहेत. त्यांच्या फिरत्या दवाखान्यात नाक, कान व घसा संबंधित तपासण्या, औषधोपचार तसेच काही शस्त्रक्रियाही केल्या जातात. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक रुग्णांना शहरात न जाता त्यांच्या गावाजवळच उपचार मिळतात. विशेष म्हणजे, वयाच्या ७४ व्या वर्षीदेखील डॉ. पटेल हे अविरतपणे हे कार्य करत असून, त्यांची ही जिद्द आणि सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या सेवाकार्यात त्यांचे सुपुत्रही सहभागी असून, ते स्वतःही नाक, कान व घसा तज्ज्ञ आहेत. वडिलांच्या सामाजिक कार्याला ते सक्रियपणे हातभार लावत आहेत. त्यामुळे ही सेवा केवळ वैद्यकीय कार्य न राहता एक सामाजिक चळवळ बनली आहे.डॉ. अनिल पटेल यांचा आरोग्य रथ ८ एप्रिल रोजी यवतमाळहून प्रस्थान करून लातूर, मिरज, कोल्हापूर येथे आरोग्य सेवा देत १३ एप्रिल रोजी चिपळूणमध्ये पोहोचणार आहे. चिपळूणमध्ये सकाळी वडनाका येथील सरकारी दवाखान्यात, तर दुपारी लाईफ केअर रुग्णालयात ते रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. त्यानंतर १४ एप्रिल रोजी सातारा येथे त्यांचे पुढील शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अशा सेवाभावी, अनुभवी आणि समाजाभिमुख डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांच्या सेवांचा लाभ घेण्याची ही दुर्मिळ संधी असून, चिपळूणकरांनी या उपक्रमाचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन सजग स्वास्थ्य क्लिनिकच्या डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण येथे किंवा ०२३५५-२६०२०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

यवतमाळचे समाजरत्न डॉ. अनिल पटेल यांचा फिरता दवाखाना सोमवारी चिपळूणकरांच्या सेवेसाठी Read More »

रणजीपटू सुनील मोरे चिपळूणमध्ये; राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

रणजीपटू सुनील मोरे चिपळूणमधील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी रविवारी उपस्थित राहणार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : येथे दि. १२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास मुंबईचे माजी रणजीपटू आणि निवड समिती सदस्य श्री. सुनील मोरे प्रमुख उपस्थिती लावणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष प्रतिष्ठा लाभणार आहे. क्रिकेट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, दमदार फलंदाजी आणि मुंबई क्रिकेटमधील भक्कम कारकीर्द यामुळे सुनील मोरे हे नाव राज्यातील क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचे ठरणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून त्यांची उपस्थिती ही आयोजकांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. १९९२ ते १९९६ या कालावधीत सुनील मोरे यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे सलामीवीर म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. त्या काळात मुंबई संघात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, अमोल मुझुमदार यांसारखे दिग्गज फलंदाज होते. अशा बलाढ्य फलंदाजी फळीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणे हीच त्यांच्या गुणवत्तेची साक्ष मानली जाते.मोरे यांनी २५ प्रथम श्रेणी सामन्यांत ४४ च्या सरासरीने तब्बल १५०३ धावा केल्या होत्या. सलामीवीर म्हणून त्यांनी संघाला अनेकदा भक्कम सुरुवात करून दिली. त्यांची तंत्रशुद्ध फलंदाजी, संयमी खेळ आणि दीर्घ डाव उभारण्याची क्षमता यामुळे ते मुंबई क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळखले जात होते. मुंबईतील स्थानिक क्रिकेटमध्येही सुनील मोरे यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. त्यांनी नॅशनल क्रिकेट क्लब आणि दादर युनियन स्पोर्टिंग क्लब या प्रतिष्ठित संघांकडून टाइम्स शिल्ड आणि कांगा लीग सारख्या नामांकित स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. मुंबईतील स्पर्धात्मक क्रिकेट संस्कृतीत सातत्याने चांगली कामगिरी करत त्यांनी आपली फलंदाजी सिद्ध केली. देशांतर्गत क्रिकेटबरोबरच सुनील मोरे यांनी इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये सॉमरसेट संघाकडूनही सहभाग घेतला होता. परदेशातील क्रिकेट संस्कृती, खेळपट्ट्या आणि स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीला अधिक समृद्ध करणारा ठरला. विशेष म्हणजे, १९९० च्या दशकात चिपळूणमध्ये झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतही सुनील मोरे यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे चिपळूणशी त्यांचा जुना क्रिकेटीय संबंध असून, अनेक वर्षांनंतर ते पुन्हा एकदा या क्रिकेटभूमीवर येत असल्याने स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तरुण खेळाडूंना प्रेरणादायी संधीराज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तरुण खेळाडूंना सुनील मोरे यांच्यासारख्या अनुभवी आणि उच्चस्तरीय क्रिकेट खेळाडूला प्रत्यक्ष पाहण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेण्याची मोठी संधी मिळणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेचा दर्जा उंचावण्यास नक्कीच मदत होणार आहे. आयोजकांनी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आणली असून, या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील संघ सहभागी होणार आहेत. उद्घाटन सोहळा आणि त्यानंतरचे सामने क्रिकेटप्रेमींसाठी मोठे आकर्षण ठरणार आहेत.

रणजीपटू सुनील मोरे चिपळूणमधील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी रविवारी उपस्थित राहणार Read More »

chiplun-census-2027-training-digital-census-india

चिपळूणमध्ये ‘जनगणना २०२७’ फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास प्रारंभ, देशातील पहिली डिजिटल जनगणना; मोबाईल ॲप व पोर्टलद्वारे होणार माहिती संकलन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : देशातील सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असलेल्या ‘जनगणना २०२७’च्या पूर्वतयारीला वेग आला असून, त्याअंतर्गत चिपळूण पंचायत समितीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात फील्ड ट्रेनर्ससाठी आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास सोमवारी प्रारंभ झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे आणि राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे हे मास्टर ट्रेनर म्हणून उपस्थित होते. तसेच जनगणना समन्वय अधिकारी संजीव गावकर, सहाय्यक महसूल अधिकारी संभाजी ढेंबरे आणि तांत्रिक सहाय्यक अमोल करंडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यंदाच्या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान फील्ड ट्रेनर्सना मोबाईल ॲपचा वापर, माहिती नोंदणी प्रक्रिया, नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या ३३ प्रश्नांची अचूक हाताळणी, तसेच CMMS पोर्टलद्वारे माहिती संकलन आणि नियंत्रण याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले जात आहे. ‘जनगणना २०२७’ ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा ‘घरयादी व घरगणना’ तर दुसरा टप्पा ‘लोकसंख्या गणना’ असा असेल. यासाठी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना ‘स्वगणनेची’ (Self-Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षकांची प्रगणक (Enumerators) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या तयार करण्यात येत असलेले फील्ड ट्रेनर्स पुढे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळे आगामी जनगणना अधिक अचूक, जलद आणि प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. यंदाच्या जनगणनेत प्रथमच जातनिहाय माहिती संकलित केली जाणार असून, डिजिटल माध्यमामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक विश्वासार्ह, वेगवान आणि पारदर्शक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चिपळूणमध्ये ‘जनगणना २०२७’ फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास प्रारंभ, देशातील पहिली डिजिटल जनगणना; मोबाईल ॲप व पोर्टलद्वारे होणार माहिती संकलन Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

दारूवरून झालेल्या भांडणात मित्राचा मृत्यू; एकाला अटक

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख पोलिसांचा जलद तपास, आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडीदेवरुख | प्रतिनिधी: दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मित्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी देवरुख पोलिसांनी जलद तपास करून एका संशयिताला अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी आशिष शांताराम भावके (वय २७, रा. घोगाव, ता. कराड, जि. सातारा) असून, मृत व्यक्ती सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा. साईकडे, ता. पाटण, जि. सातारा) आहे. दोघेही एकमेकांचे मित्र तसेच नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष भावके आणि सुधीर यादव हे दोघे ३१ मार्च २०२६ रोजी आशिषच्या एमएच ५० / एन ४६४२ क्रमांकाच्या इर्टिगा कारने रत्नागिरीकडे गेले होते. रत्नागिरीतील आरेवारे परिसरात त्यांनी मद्यपान करून जेवण केले. त्यानंतर रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास ते परत घरी निघाले. यावेळी सुधीर यादव याने पुन्हा दारू पिण्याची मागणी केली. मात्र, त्या ठिकाणी दारू मिळणार नसल्याचे आशिष भावके याने सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या सुधीर यादव याने आरोपीच्या कारच्या बॉनेटवर चढून बसत पुढील काच फोडली आणि वाहनाचे नुकसान केले. याचा राग आल्याने आरोपी आशिष भावके याने, सुधीर यादव हा गाडीच्या बॉनेटवर असतानाच कार सुरू केली. त्यामुळे सुधीर यादव खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून बरगडी, कंबर, पोट आणि शरीराच्या डाव्या बाजूस दुखापती झाल्या. मात्र, जखमी अवस्थेत असतानाही आरोपीने त्याला घटनास्थळीच सोडून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी जखमी सुधीर यादव याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात प्रथम अकस्मात मृत्यू नोंद (अ.मृ.) क्र. १२/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सखोल चौकशीनंतर आरोपीविरुद्ध देवरुख पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्र. ४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणातील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद अनंत वाघाटे (वय ५७), देवरुख पोलीस ठाणे हे आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

दारूवरून झालेल्या भांडणात मित्राचा मृत्यू; एकाला अटक Read More »

महेश काळे यांची मैफल ऐनवेळी रद्द; रत्नागिरीत प्रेक्षकांचा संताप

महेश काळे यांची मैफल ऐनवेळी रद्द; रत्नागिरीतील प्रेक्षकांमध्ये संताप

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : लोकप्रिय गायक महेश काळे यांच्या गायन मैफिलीचा रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडांगणावर होणारा कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाल्याने प्रेक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कार्यक्रम रद्द झाल्याची पूर्वसूचना न दिल्यामुळे बाहेरून आलेल्या रसिकांचा मोठा हिरमोड झाला. रविवारी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार होता. मात्र, कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती अनेक प्रेक्षकांना रत्नागिरीत आल्यानंतरच मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी आपली फसवणूक झाल्याची भावना व्यक्त केली आहे. या कार्यक्रमासाठी तिकीट विक्री स्थानिक पातळीवर तसेच ‘बुक माय शो’द्वारे करण्यात आली होती. कोल्हापूरसह विविध ठिकाणांहून रसिक प्रेक्षक कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी तिकीटे खरेदी केली होती; परंतु कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. पुण्याचे गंधार जोग आणि दिवेश बापट यांच्या ‘एकदंत थिएटर’ व ‘ताल इंटरटेनमेंट’तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती पाच दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. तसेच ‘बुक माय शो’लाही याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, तरीही आदल्या दिवशीपर्यंत तिकीट विक्री सुरू असल्याने गोंधळ उडाला. या कार्यक्रमासाठी ५०० ते ३५०० रुपये दरम्यान तिकीट दर ठेवण्यात आले होते. तिकीटांचे पैसे जमा झाल्यानंतरही कार्यक्रम रद्द झाल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान, कार्यक्रम रद्द करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.कार्यक्रमासाठी आवश्यक तयारी, परवानग्या किंवा व्यवस्था करण्यात आल्याचेही दिसून आले नाही. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फसवणूक व मनस्तापाबाबत अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

महेश काळे यांची मैफल ऐनवेळी रद्द; रत्नागिरीतील प्रेक्षकांमध्ये संताप Read More »

रत्नागिरीत एलईडी मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका जप्त

रत्नागिरीत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त

रत्नागिरी: प्रतिनिधी मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्त घालत असताना मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत एल.ई.डी. (LED) लाईट लावून मासेमारी करणाऱ्या नौकेवर मोठी कारवाई केली आहे. दि. ३ एप्रिल २०२६ च्या रात्री सुरू झालेल्या या मोहिमेत ४ एप्रिल रोजी पहाटे २.१७ वाजेच्या सुमारास ही नौका पकडण्यात आली. मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी तथा जयगडचे परवाना अधिकारी श्रीम. स्मितल कांबळे या आपल्या पथकासह नियमित गस्तीवर होत्या. यावेळी मिऱ्या-काळबादेवी समोर समुद्रात साधारण १०.८३ सागरी मैल (NM) अंतरावर ‘भराडी प्रसन्न’ (नोंदणी क्रमांक: IND-MH-04-MM-3723) ही नौका संशयास्पदरीत्या नांगरून उभी असल्याचे आढळले. या नौकेचे मालक श्री. कैलास उल्हास कुबल (रा. राजवाडी, भगवती बंदर, रत्नागिरी) असून, नौकेकडे राज्याच्या जलधि क्षेत्रासाठी मासेमारी परवाना आहे. मात्र, ही नौका अनधिकृतपणे एल.ई.डी. लाईट लावून मासेमारी करण्याच्या उद्देशाने उभी असल्याचे निष्पन्न झाले.कठोर कायदेशीर पावलेकारवाईदरम्यान नौकेवर तांडेलसह ५ खलाशी मिळून आले. पथकाने नौकेवरील एल.ई.डी. लाईट आणि जनरेटरसह संपूर्ण नौका जप्त केली असून पुढील कार्यवाहीपर्यंत ती मिरकरवाडा बंदरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) अध्यादेश, २०२१ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.यांनी बजावली भूमिकासदर मोहीम मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. यामध्ये अंमलबजावणी अधिकारी श्रीम. स्मितल कांबळे यांच्यासह सुरक्षा रक्षक श्री. सुजन पोवार, सागरी सुरक्षा रक्षक श्री. अमोल पिलणकर, श्री. अनिकेत पवार आणि श्री. भूषण करमरकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी या कारवाईचा सविस्तर अहवाल (प्रतिवेदन) दाखल केला आहे. यानंतर आता या प्रकरणाची रीतसर सुनावणी अभिनिर्णय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या न्यायालयात पार पडणार आहे. बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने उचललेल्या या पावलामुळे अवैध मच्छीमारांचे धाबे दणाणले आहेत.

रत्नागिरीत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त Read More »

चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

प्रतिनिधी : कोकणधारा कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता. ३) कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांचा सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दरवर्षी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांचा गौरव केला जातो. याच पार्श्वभूमीवर यंदाचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार सौ. स्वप्ना यादव यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथील आनंद भवन, सायबर कॉलेज येथे दिमाखदार वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूरचे खासदार धनंजयराव महाडिक यांच्या हस्ते झाले, तर समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सोहळ्याला कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या राजश्रीताई पाटील, भागिरथी महिला पतसंस्थेच्या चेअरमन अरुंधती महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुरेखा लवांडे, सहसचिव सौ. भारतीताई मुथ्था, संचालिका सौ. निलिमा बावणे, ॲड. अंजलीताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. स्वप्ना यादव यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केलेल्या प्रभावी आणि जबाबदार कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे चिपळूणसह संपूर्ण सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सौ. स्वप्ना यादव यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल Read More »