konkandhara.com

कोकणची बातमी

konkandhara 26

शिमगोत्सवातील वादातून चाकू हल्ला; रत्नागिरीत व्यक्ती गंभीर जखमी

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा रत्नागिरी, ७ मार्च : शिमगोत्सवातील किरकोळ वादाचा राग मनात धरून तिघांनी मिळून एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (७ मार्च) सकाळी सुमारे ११ वाजता मिरकरवाडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ घडली. या हल्ल्यात जयेंद्र दत्ताराम नार्वेकर (५५, रा. भाटिमिऱ्या, रत्नागिरी) गंभीर जखमी झाले आहेत. जखमी नार्वेकर यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी शशांक सावंत, संजू आणि रुपेश सावंत उर्फ छोटा भाई (तिघेही रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (१ मार्च) रात्री सुमारे १० वाजता शिमगोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी पालखी येणार असल्याने भाटिमिऱ्या येथील दत्त मंदिराजवळ रस्त्यावर मंडप उभारणे आणि रांगोळी काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी तीन मुली दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीचा धक्का मंडपाचे काम करणाऱ्या फिर्यादींच्या भाचा विरेंद्र किरला याला लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्या वादादरम्यान एका मुलीने “मी सडामिऱ्या गावातील लोकांना बोलावते,” अशी धमकी दिली. काही वेळाने शशांक सावंत, संजू आणि अन्य काहीजण तेथे आले आणि वादाचे रूपांतर गंभीर वादात झाले. मात्र, त्या वेळी जयेंद्र नार्वेकर, रुपेश कमलाकर सावंत, मनोज सावंत, परेश सावंत व इतर प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. दरम्यान, शनिवारी (७ मार्च) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जयेंद्र नार्वेकर हे आपल्या एमएच-०८-बीएफ-२३२३ क्रमांकाच्या दुचाकीवरून मिरकरवाडा जेटी येथे बोटीचे काम पाहण्यासाठी जात होते. ते जेटीच्या पहिल्या गेटजवळ आले असता संशयित शशांक सावंत आणि संजू यांनी दुचाकी त्यांच्या समोर आडवी लावून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दोघांनीही चाकूने त्यांच्या पाठीवर, हातावर व खांद्यावर सपासप वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर नार्वेकर खाली कोसळले. त्याच वेळी रुपेश सावंत उर्फ छोटा भाई दुचाकीवरून घटनास्थळी आला आणि त्यानेही चाकूने त्यांच्या पाठीवर वार केले. परिसरात गर्दी वाढू लागल्याने तिघेही संशयित तेथून पसार झाले. जखमी अवस्थेत नार्वेकर यांनी तेथे उपस्थित असलेल्या एका दुचाकीस्वाराला आपल्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याची विनंती केली. दरम्यान, त्यांच्या ओळखीचे राहुल नावाचे व्यक्तीही तेथे आल्याने दोघांनी मिळून नार्वेकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामूनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

शिमगोत्सवातील वादातून चाकू हल्ला; रत्नागिरीत व्यक्ती गंभीर जखमी Read More »

दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे शेती व बागायती परिसरात अचानक आग लागली. नगरपंचायत व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे शेती व बागायती परिसरात अचानक आग लागली. नगरपंचायत व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

दोडामार्ग / भूषण सावंत दोडामार्ग : तालुक्यातील सासोली गावातील शेती व बागायती परिसरात अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती सोसायटी अध्यक्ष मनोज गवस यांनी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांना दिली. माहिती मिळताच संतोष नानचे यांनी तत्काळ कसई-दोडामार्ग नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर नगरपंचायत प्रशासन व अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी पोहोचला. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले. घटनास्थळी ग्रामस्थांनीही मदत करत आग विझविण्यासाठी सहकार्य केले. वेळीच मिळालेल्या माहितीमुळे आणि अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. यावेळी सासोली ग्रामस्थांनी नगरसेवक संतोष नानचे तसेच कसई-दोडामार्ग नगरपंचायत प्रशासन व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.  

दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे शेती व बागायती परिसरात अचानक आग लागली. नगरपंचायत व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. Read More »

अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा मुंबई : मालवणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ७ मार्च २०२६ रोजी प्रभादेवी, मुंबई येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (रविंद्र नाट्यगृह) येथे आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला महिला दशावतार मंडळ सुरू करून गेली पंधरा वर्षे कला क्षेत्रासोबतच सामाजिक कार्य करत महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अक्षता कांबळी यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. त्यांच्या या कार्याची नोंद महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, कोकण विभाग अध्यक्षा सुनीता गणगे आणि मुंबई–पुणे विभाग प्रमुख लक्ष्मण मानकर यांनी घेतली. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अक्षता कांबळी या पहिल्या मानकरी ठरल्या. या पुरस्कारामध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाची शाल, सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक आणि भेटवस्तू देण्यात आल्या. दरम्यान, अक्षता कांबळी यांना शासनाचा जिल्हास्तरीय ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ देखील जाहीर झाला असून या दुहेरी सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पुरस्कारांसाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.  

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार Read More »

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा देवरुख : इस्राईल तसेच अमेरिका–इराणदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई वाहतूक बंद झाल्याने दुबईमध्ये अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील नागरिक अखेर सुखरूप मायदेशी परतले आहेत. यात देवरुख येथील जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांच्यासह एकूण १३ जणांचा समावेश आहे. हे सर्व जण गुरुवारी (ता. ५) सकाळी हैद्राबाद व बेंगळुरू विमानतळावर पोहोचले. त्यानंतर विविध वाहनांनी ते आपल्या गावी परतले.मायदेशी परतलेल्या नागरिकांमध्ये सुरेश सप्रे, ज्योती सप्रे, नगरसेविका श्रद्धा इंदुलकर, जितेंद्र निमकर, कृतुजा निमकर, अभिषेक निमकर, मानसी निमकर, साखरप्यातील संदेश (बापू) शेट्ये, सोनम शेट्ये यांच्यासह अन्य चार जणांचा समावेश आहे. तसेच चिपळूण येथील सनी व रुची जागुष्टे हेही चिपळूणला सुखरूप परतले आहेत. दुबईत विमानसेवा बंद झाल्याने या सर्वांना काही दिवस हॉटेलमध्ये थांबावे लागले होते. नंतर दुबई प्रशासन आणि केंद्र सरकारने विमानसेवेची व्यवस्था केल्यानंतर बुधवारी (ता. ४) एक जण मुंबईत, तर सहा जण हैद्राबाद आणि सहा जण बेंगळुरू येथे विमानाने दाखल झाले. यानंतर गुरुवारी ते सर्वजण आपल्या गावी परतले असून त्यांच्या आगमनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश Read More »

mahila-din-arohi-cyber-surakshit-nari-program-chiplun

महिला दिनानिमित्त चिपळूणमध्ये ‘आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी’ कार्यक्रम

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेसह डिजिटल सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन – WDW महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने “आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून महिलांनी ऑनलाइन फसवणूक, आर्थिक गुन्हे तसेच सोशल मीडियाशी संबंधित धोके याबाबत सजग राहणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महिलांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात सायबर सुरक्षा जनजागृतीपर व्याख्यान, सायबर तज्ज्ञ, पोलीस अधिकारी, डॉक्टर, वकील आणि पत्रकार यांच्या सहभागातून पॅनेल डिस्कशन होणार आहे. तसेच IMA WDW महाराष्ट्र महिला डॉक्टर हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याशिवाय समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना “आरोही नारी गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमात “छावा” हे विशेष आकर्षण तसेच ‘डिजिटल जागर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचाही समावेश आहे. हा कार्यक्रम दि. १२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मार्कंडी (चिपळूण) येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महिला दिनानिमित्त चिपळूणमध्ये ‘आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी’ कार्यक्रम Read More »

रत्नागिरीत ३०० आसनक्षमतेचे मिनी थिएटर; उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरीत ३०० आसनक्षमतेचे सुसज्ज मिनी थिएटर; पालकमंत्री उदय सामंत यांच्या आज हस्ते उद्घाटन

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा रत्नागिरी : रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शहराची वाढती सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन तसेच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत सुसज्ज मिनी थिएटर उभारण्यात आले आहे. या मिनी थिएटरचे उद्घाटन ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अरिहंत मॉल येथील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.या नव्या नाट्यगृहामुळे रत्नागिरीतील सांस्कृतिक चळवळीला नवी चालना मिळणार असून स्थानिक कलाकारांना विविध कार्यक्रम सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या मिनी थिएटरची एकूण आसन क्षमता ३०० असून लघु नाट्यप्रयोग, नाट्यछटा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने तसेच विविध कलात्मक उपक्रमांसाठी हे नाट्यगृह उपयुक्त ठरणार आहे.रत्नागिरी जिल्ह्याला कला व संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे या परंपरेला अधिक बळ मिळणार असून या मिनी थिएटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, कलाकार व रंगकर्मींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरीत ३०० आसनक्षमतेचे सुसज्ज मिनी थिएटर; पालकमंत्री उदय सामंत यांच्या आज हस्ते उद्घाटन Read More »

mahad fire

महाडमध्ये दोन ठिकाणी आगीच्या घटना; लाखोंचं नुकसान

महाड | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर: महाड शहर आणि नडगाव गावाच्या परिसरात रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही आगीत मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शहरातील एका डायग्नोस्टिक लॅबला आणि नडगाव येथील भंगार गोदामाला आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. रोहिदास नगरमधील लॅब जळून खाक महाड शहरातील रोहिदास नगर परिसरात प्रगती विराज दळवी यांच्या मालकीच्या ‘आयकॉन डायग्नोसिस लॅब’ला रविवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. दरवाजा तोडून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती रहिवासी विराज दळवी यांनी दिली. या आगीत लॅबमधील महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फर्निचर, संगणक तसेच एक्स-रे मशिनरी जळून खाक झाली. प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत तपास सुरू आहे. नडगावमध्ये भंगार गोदामाला आग दुसरी घटना रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास नडगाव गावाजवळ घडली. येथील कलाम यांच्या मालकीच्या भंगार गोदामाला आग लागली. आगीमुळे गोदामातील मोठ्या प्रमाणात साहित्य जळून गेले. गोदामाच्या शेजारी असलेल्या पॅलेट तयार करणाऱ्या एका लघुउद्योगालाही या आगीचा फटका बसला. लाकडी भुसा व इतर साहित्य जळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती व्यवसायिक शाम सुरेश गुडेकर यांनी दिली. भंगार गोदामाचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाची तत्पर कारवाई दोन्ही घटनांमध्ये अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या दोन्ही घटनांबाबत तपास सुरू असून आग लागण्याचे कारण शोधले जात आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर महाड शहरात अल्पावधीत दोन आगीच्या घटना घडल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. व्यापारी आणि नागरिकांनी अग्निसुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. एक्स-रे लॅब आणि भंगार गोदाम या दोन्ही ठिकाणी झालेल्या नुकसानीमुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला असून प्रशासनाकडून मदत व तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाडमध्ये दोन ठिकाणी आगीच्या घटना; लाखोंचं नुकसान Read More »

महाडमध्ये रिक्षा पलटी; २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

महाडमध्ये भीषण रिक्षा अपघात; २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

दिनेश चाफळकर, महाड महाड | १२ फेब्रुवारी २०२६:महाड तालुक्यातील दहिवड गावाच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात २५ वर्षीय सुजित सुधीर सकपाळ याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्यासह चार जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे महाड परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुजित सकपाळ हा आपल्या मित्र-मैत्रिणींसह महाड एमआयडीसी परिसरात फिरून परत येत होता. तो स्वतः ऑटो रिक्षा चालवत होता. दहिवड गावाजवळ रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा पलटी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात इतका गंभीर होता की रिक्षा रस्त्याच्या कडेला उलटली. जखमींवर उपचार सुरू या अपघातात समृद्धी सुधीर धायळकर, अनिकेत शशिकांत धायळकर, रोहिणी हिरामण धायळकर आणि अंतरा शशिकांत धायळकर हे जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत सर्व जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती सुजित सकपाळ याला मृत घोषित केले. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलिसांकडून गुन्हा नोंद या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. सुरक्षित वाहनचालना गरजेची या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना वेगमर्यादा पाळण्याचे आणि रस्त्यावरील परिस्थितीकडे लक्ष देऊन वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक नागरिकांनीही या मार्गावर वाहतूक सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. या दुर्दैवी अपघातामुळे सकपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाडमध्ये भीषण रिक्षा अपघात; २५ वर्षीय युवकाचा मृत्यू Read More »

mahad election

महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ताब्यात

महाड | कोंकणधारा डेस्क:महाड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही गटांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले, तर पंचायत समितीच्या दहा पैकी नऊ जागांवर या गटाने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी पराभव मान्य करत मतमोजणी केंद्रातून निघून जाणे पसंत केले. जिल्हा परिषद गटांचे निकाल महाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांमध्ये खालील उमेदवार विजयी ठरले— या निकालांमुळे जिल्हा परिषदेवर शिवसेना शिंदे गटाची पकड अधिक मजबूत झाली आहे. पंचायत समितीवर नऊ जागांवर विजय पंचायत समितीच्या गणांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या खालील उमेदवारांनी विजय मिळवला याशिवाय सवाने पंचायत समिती गणातील अनिल जाधव हे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. दरम्यान, बिरवाडी पंचायत समिती गणात मयूर पुंडलिक जाधव यांनी विजय मिळवत राष्ट्रवादी–भाजप आघाडीचे एकमेव खाते उघडले आहे. चुरशीच्या लढतीत निर्णायक विजय या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या लढतींपैकी नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गट महत्त्वाचा ठरला. येथे राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास भरत गोगावले यांनी तब्बल पाच हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांचा दारुण पराभव केला. त्याचप्रमाणे करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेल्या निलेश ताठरे यांनी सतत चर्चेत असलेले सोमनाथ ओझर्डे यांचा पराभव करत विजय संपादन केला. निवडणूक जिल्हा परिषदेची, गुलाल विधानसभेचा महाड नगरपालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युती करत ताकद लावली होती. मात्र, मजबूत जनसंपर्क असलेल्या मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा महाड–पोलादपूर तालुक्यावर आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले. नगरपालिका निवडणुकीनंतर दोन गटांत झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांचा हा विजय प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. मात्र मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर महाडमध्ये विधानसभा निवडणुकीप्रमाणे गुलाल उधळण्यात आला. राष्ट्रवादी बॅकफूटवर; ठाकरे गटाची मते स्थिर या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, त्याचा पहिला फटका महाड नगरपालिकेत बसल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही त्यांच्या कुटुंबाची राजकीय ताकद कमी झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मते तुलनेने स्थिर असल्याचे चित्र दिसत असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय मतदारांना पसंत न पडल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. निष्कर्ष महाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालामुळे महाड–पोलादपूर पट्ट्यातील आगामी स्थानिक व विधानसभा राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लेखक : कोंकणधारा डेस्क

महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ताब्यात Read More »

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान पोलादपूर | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात यंदा ‘दुबार मतदार’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. तालुक्यातील २५ ते ३० टक्के मतदार ग्रामीण भागात वास्तव्यास असताना सुमारे ७० टक्के मतदार हे चाकरमानी असल्याने, त्यांना मतदानासाठी गावाकडे आणण्यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांचा खर्च सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे, एवढा खर्च करूनही मतांची खात्री नसल्याने अनेक उमेदवार संभ्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी ने-आण, जेवण-खाणे, निवास आणि कथित आमिष स्वरूपातील खर्च जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांना करावा लागत आहे. परिणामी, यंदा रायगड जिल्हा परिषदेच्या दोन गटांतील सहा उमेदवारांपैकी तुल्यबळ लढतीतील चार उमेदवारांना, तसेच पोलादपूर पंचायत समितीच्या चार गणांतील आठ उमेदवारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागल्याचे दिसून आले. 55.73 टक्के मतदान; शेवटच्या तासांत फारशी वाढ नाही सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पोलादपूर तालुक्यात 55.73 टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसल्याचे प्रशासनाच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 11,163 पुरुष आणि 10,705 महिला, असे एकूण 21,868 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील उमेदवार अजय सलागरे यांनी कापडे बुद्रुक शाळेत सपत्नीक मतदान केले. निलेश कुंभार यांनी वाकण शाळेत मतदान केले. तर लोहारे गटातील उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी उमरठ येथे आणि कृष्णा कदम यांनी ओंबळी येथील प्राथमिक शाळेत मतदान केले. कुठल्या मतदान केंद्रांवर कुणाचे भवितव्य ठरणार? कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गट अंतर्गत माटवण पंचायत समिती गणातील गोवेले, उमरठ, धारवली, कालवली, मोरसडे, बोरघर, आडावळे बुद्रुक, बोरावळे, माटवण, देवळे, वाकण, कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, चांभारगणी बुद्रुक आणि बोरज येथील मतदार साक्षी कांबळेकर विरुद्ध हर्षदा वरवाटकर, तसेच अजय सलागरे विरुद्ध निलेश कुंभार यांचे भवितव्य ठरवणार आहेत. कापडे बुद्रुक पंचायत समिती गणात देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण-१, वाकण-२, नानेघोळ, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक (१ ते ३), रानकडसरी, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर, साखर येथील मतदारांनी अनिल दळवी विरुद्ध अनिल मालुसरे यांच्यासाठी मतदान केले आहे. लोहारे गटात चौरंगी लढत लोहारे जिल्हा परिषद गटात कृष्णा कदम (कमळ), अ. रझाक करबेलकर (हात), चंद्रकांत कळंबे (शिवसेना) आणि कृष्णा कदम (ढोबळी मिरची) अशी चौरंगी लढत असून, कोतवाल गणातील सुरेंद्र चव्हाण विरुद्ध अविनाश शिंदे यांचेही भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.लोहारे पंचायत समिती गणात युगज्ञा दीपक उतेकर विरुद्ध अनिता अनिल भिलारे यांच्यासाठी विविध गावांतील मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रांबाहेर वाहनांची गर्दी तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघाबाहेर लक्झरी बसेस, मोटारकार, जीप आणि खासगी आरामगाड्यांची मोठी गर्दी दिसून आली. सुमारे ७० टक्के मतदार पोलादपूरबाहेरील असल्याने हा खर्च सर्वसामान्य उमेदवारांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा आहे. दुबार मतदार’ प्रश्नावर तोडगा हवा या पार्श्वभूमीवर भविष्यात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील खर्च टाळण्यासाठी पोस्टल मतांचा पर्याय, किंवा आधारकार्डशी मतदार ओळखपत्र जोडून एकाच ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.पोलादपूर तालुक्यातील अनेक मतदार मुंबई व ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असून, काहीजण तिकडील महापालिकांमध्ये नगरसेवकही झाले आहेत. त्यामुळे आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग सक्तीचे केल्यास दुबार मतदारांचा प्रश्न स्पष्ट होऊ शकतो, अशी मागणी पुढे येत आहे. निकाल सोमवारी सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, मतमोजणी सोमवारी होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील ‘दुबार मतदार’ प्रश्नाचा निकालांवर नेमका किती परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान Read More »