konkandhara.com

15 मई 2026

konkandhara 2026 05 15T185933.636

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यू व इतर किटकजन्य आजारांवर नियंत्रणासाठी वर्षभर विविध जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याबाबत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून एडिस डासाच्या मादीच्या चाव्यामुळे त्याचा प्रसार होतो. डेंग्यूसह इतर किटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे. साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण असल्याने “आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस” ही संकल्पना प्रभावीपणे राबविल्यास डासांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातूनच किटकजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असेही त्यांनी नमूद केले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात २०२३ मध्ये डेंग्यूचे २३९ रुग्ण, २०२४ मध्ये २५६ रुग्ण, तर २०२५ मध्ये ४२ रुग्ण आढळले होते. मात्र आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे २०२६ मध्ये जानेवारीपासून आजपर्यंत केवळ ३ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू प्रतिबंधासाठी ग्रामपंचायतींनी परिसर स्वच्छ ठेवणे, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, कायमस्वरूपी पाणीसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडणे, पाणी साठवणुकीची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून स्वच्छ करणे, तसेच प्लास्टिक, टायर व भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे, अशा उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तुंबलेली गटारे वाहती करणे, डबकी बुजविणे, शौचालयांच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे आणि गावपातळीवर जनजागृती करणे यावरही भर देण्यात आला आहे. याशिवाय, पाणी शुद्धीकरणासाठी योग्य प्रमाणात टीसीएल पावडरचा वापर करणे, पाणी उकळून व गाळून पिणे, तसेच टायर व भंगार व्यावसायिकांनी परिसरात पावसाचे पाणी साचू न देण्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात तयार होणाऱ्या डबक्यांमध्ये आळीनाशकांचा वापर किंवा गप्पी मासे सोडण्याच्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करून टायर, फुटकी भांडी आणि प्लास्टिक साहित्याची विल्हेवाट लावणे, तसेच शासकीय इमारती, दवाखाने, एसटी डेपो आणि रेल्वे स्थानक परिसरात डासोत्पत्ती स्थाने आहेत का याची नियमित तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. नागरिकांनी सहकार्य करून या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत राबवल्यास डास व आळी घनता कमी होऊन किटकजन्य आजारांचा उद्रेक टाळता येईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार Read More »

konkandhara 2026 05 15T184316.152

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण सावंत : सावंतवाडी शहराच्या आरोग्य आणि पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी आज वरिष्ठ पातळीवर महत्त्वपूर्ण बैठका आणि प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या (AIIA) प्रस्तावित ओपीडीसाठी (OPD) जागेची निश्चिती करण्यासह शहरातील प्रलंबित पाणी योजना व इतर विकासकामांचा आमदार श्री दीपक भाई केसरकर आणि नगराध्यक्षा सौ.श्रद्धा राजे भोंसले यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. ​आयुर्वेद संस्थानची ओपीडी लवकरच सुरू होणार​अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी आज मंत्री दीपक भाई केसरकर, आयुर्वेद संस्थानचे डायरेक्टर, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ श्रद्धा राजे भोसले, सभापती आणि सर्व नगरसेवकांनी मिळून विविध जागांची पाहणी केली. या संयुक्त पाहणीत योग्य जागेची निश्चिती करण्यात येईल, आवश्यक प्रशासकीय सोपस्कर पूर्ण करून लवकरच ही ओपीडी रुग्णांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या ओपीडीमुळे सावंतवाडी व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आयुर्वेदिक उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.​पाईपलाईनच्या संथ कामावरून कंत्राटदार आणि कन्सल्टंटला थेट ताकीद ​शहरात सुरू असलेल्या नवीन पाईपलाईनच्या कामाचा आढावा घेताना आमदार दीपक भाई केसरकर आणि नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काम वेळेत पूर्ण न झाल्याने दीपक भाई केसरकर यांनी कंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टर) आणि सल्लागार (कन्सल्टंट) यांना चांगलेच धारेवर धरले. लोकांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत हे काम लवकरात लवकर आणि नियमित वेळेत पूर्ण करण्याचे कडक आदेश त्यांनी दिले.​​सर्व प्रलंबित प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण करा.. शहरातील पाणी योजनेव्यतिरिक्त सुरू असलेल्या सर्व नवीन विकासकामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. शहरातील एकही विकासकाम संथ गतीने चालणार नाही, ते दर्जेदार आणि वेळेतच पूर्ण झाले पाहिजेत अशा सूचना केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.​या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्याप्रसंगी आणि बैठकी दरम्यान नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सर्व सभापती, नगरसेवक तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि अभियंता उपस्थित होते.

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी Read More »

konkandhara 2026 05 15T183539.576

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना तब्बल २० हजार पेक्षा जास्त दाखले द्यावे लागणे याचे प्रशासनाने आत्मचिंतन करावे. प्रशासन लोकांना सेवा देण्यास कमी पडत होते हेच या आकडेवारीवरून दिसून येते. दाखल्यांचा आकडा ज्यावेळी शून्यावर येईल तेव्हाच आपण गतिमान प्रशासन म्हणू अशा कडक शब्दात पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाची कानउघडणी केली. दरम्यान भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरे किंवा कार्यक्रम घेण्याची वेळ येणार नाही असे आश्वासन देखील राणे यांनी उपस्थित नागरिकांना दिले.छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, कुडाळ प्रांत ऐश्वर्या काळुसे , तहसीलदार सचिन पाटील, नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, नागरिकांना विविध प्रकारचे दाखले वाटप करणारा कार्यक्रम हा समाधान देणारा आहे.प्रशासन पारदर्शक असावे, नागरिकांना फार कमी वेळेत दाखले मिळावे व नागरिक समाधानी होऊन घरी परतावा हा उद्देश समोर ठेऊन समाधान शिबिर सुरू केले आहे. प्रशासनामध्ये आत्मविश्वास वाढविणारे हे शिबिर आहे. दाखला हा नागरिकांच्या जीवनात परिवर्तन आणू शकतो. विविध लाभ मिळवून देऊ शकतो. प्रशासनाचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी प्रयत्न केले. लोकाभिमुख कारभार असावा म्हणून काम केले. परंतु चालू शिबिरामध्ये २१ हजार २०१ दाखले नागरिकांना देणे हे भूषणावह नाही. कारण एवढ्या लोकांना लाभापासून वंचित ठेवले गेले म्हणून प्रशासनाने या गोष्टीचे आत्मचिंतन करावे. सध्याचा कारभार हा गतिमान पद्धतीने सुरू आहे. प्रत्येक आव्हानाला तोंड देणे,प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे या बाबींमुळे भविष्यात पेंडिंग दाखल्याची आकडेवारी ही शून्य असेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाची माहिती दिली. गेल्या तीन महिन्यांपासून हे अभियान आपल्या जिल्ह्यात सुरू आहे. या माध्यमातून नागरिकांना अकरा महसुली सेवा देण्यात आल्या आहेत.

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन Read More »

konkandhara 2026 05 15T182722.335

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील पहिल्या पाच क्रमांकात रोहा तालुकास्तरीय कृषी मेळावा आज शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात होत असल्याचे समाधान आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही कृषी विभागाचा आढावा घेतला, योजनांवर चर्चा केली. त्यात महिला व बाल विकास विभागाकडून ३ टक्के निधी महिला शेतकऱ्यांसाठी राखून ठेवत जिल्हा नियोजनाकडे वर्ग केला. निधीचा योग्य लाभ अहिल्यानगरमधील प्रगतशील महिला शेतकऱ्यांनी घेतला याचा मनस्वी आनंद आहे. असाच लाभ रायगड जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी घ्यावा. तसे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्यात असे सांगत आता रासायनिक खतांचा वापर कमी करणे गरजेचे आहे, शाश्वत, नैसर्गिक शेती करा, कृषी मेळावा उत्स्फूर्त प्रतिसादात झाले. हे खूपच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन ना अदिती तटकरे यांनी केले. त्या रोहा येथे आयोजित कृषी मेळाव्यात बोलत होत्या. पंचायत समिती रोहा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळावा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, कृषी सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती उर्वशी वाडकर, निधी जाधव, सुमित काते, सभापती विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलूस्कर, अध्यक्ष विनोद पाशिलकर, गटनेते किसन मोरे, पंचायत समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी खरीप पिके व विविध योजनांचा आढावा घेत उपस्थित शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. उपसभापती संजय मांडलूस्कर यांनी आम्ही पंचायत समितीच्या प्रशासकीय माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक योजना कार्यान्वित करू, शेतकऱ्यांपर्यंत पोहचवू यासाठी कटीबद्ध आहोत असे अभिवचन मांडलूस्कर यांनी दिले. कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी यापुढे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रभावी योजना राबविण्याचा आमचा संकल्प आहे, योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात हयगय होणार नाही, शेतकऱ्यांच्या जीवनात अधिक सुख समृद्धी येईल असे पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना आश्वासित केले. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी नितीन पिंपळे, भिकू सुटे, रोशन कापसे, अदिती थिटे, संज्योत पडवळ, किरण बारटक्के, अमित गायकवाड, मेघेश भगत, दगडू बामुगडे, दिपाली जाधव, शिवाजी मुटके, तुकाराम भगत यांसह बिजामृत शेतकरी उत्पादन कंपनी, ग्रोवेल शेतकरी उत्पादक, विवेकानंद रिसर्च, युवा कृषी उद्योग, संथाय प्रकल्प, दीपक फाऊंडेशन आदी शेतकरी उत्पादक संस्थांचा सन्मान ना अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. मनोगतात तटकरे पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील सफेद कांद्याला जीआय मानांकन मिळाले, आता रिठा सुपारी व वाल पिकालाही जीआय मानांकन मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहोत. शासन पूर्णतः राज्यात झाडे लावण्याची प्रभावी मोहीम आखत आहे, यासाठी लागणारी झाडे परराज्यातून न मागवता स्थानिक शेतकऱ्यांकडून घ्यावीत, त्यात फळ झाडांचा समावेश असावा, कृषी विभाग अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना अधिक सकस झाडे द्यावीत, त्यातून रोजगारही वाढेल असे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत ना तटकरे यांनी कृषी मिळावा नियोजनाचे कौतुक केले. सन्मानार्थी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन जयेश भोईर यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी रणजीत लवटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी महादेव करे, कृषी अधिकारी रणजीत लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजित कृषी मेळाव्याला तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे Read More »