konkandhara.com

कोकणची बातमी

चिपळूणमध्ये १ ते १० मे दरम्यान बालनाट्य शिबिर | मराठी नाट्य परिषद आयोजन

आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणतर्फे १ ते १० मे दरम्यान बालनाट्य शिबिर

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालनाट्य शिबिराचे तिसरे वर्ष उत्साहात आयोजित करण्यात आले असून, हे शिबिर दि. १ मे ते १० मे या कालावधीत पार पडणार आहे. बालकांमधील अभिनय, वक्तृत्व, संवादकौशल्य, आत्मविश्वास, रंगभूमीची आवड आणि सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मुलांना नाट्याभिनय, संवादफेक, आवाजाचा वापर, देहबोली, रंगमंचावरील वावर, समूह सादरीकरण, व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध कलात्मक व उपयुक्त घटकांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या शिबिरासाठी प्रवेश मर्यादित असल्याने नियमितपणे शिबिरात सहभागी होणाऱ्या मुलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक पालकांनी पुढील दोन दिवसांत आपल्या मुलांची नावनोंदणी करून प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराच्या वेळापत्रकाबाबत माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, दि. १ मे रोजी शिबिराची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ अशी राहणार आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत शिबिराचे सत्र होणार आहे. गेल्या दोन वर्षांत या बालनाट्य शिबिराला चिपळूण व परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अनेक मुलांनी या शिबिरातून रंगभूमी, अभिनय आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आपली कला खुलवली आहे. त्यामुळे यंदाच्या तिसऱ्या वर्षीही या शिबिराबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. बालकांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्यात सांस्कृतिक जाण निर्माण व्हावी आणि रंगभूमीशी त्यांचा जवळचा संबंध निर्माण व्हावा, या उद्देशाने हे शिबिर सातत्याने राबवले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणीसाठी ॲड. विभावरी रजपूत +917796729587 व दिलीप आंब्रे मो. +91 82910 89302 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.

आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणतर्फे १ ते १० मे दरम्यान बालनाट्य शिबिर Read More »

konkandhara 63

सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : खेड तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे सामाईक वाड्यातील वादातून मायलेकासह सुनेवर लोखंडी पाईपने हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अपर्णा जनार्दन शिंदे (वय ५२) या आपल्या मुलासह सामाईक वाड्यात राहत आहेत. ३० मार्च रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता घरदुरुस्तीचे साहित्य ठेवण्याच्या कारणावरून त्यांचा मुलगा करण हा बोलण्यासाठी गेला असता, पुतण्या मयूर मनोहर शिंदे याने जागा देण्यास नकार देत शिवीगाळ सुरू केली. वाद वाढताच अपर्णा शिंदे व त्यांची सून काव्या घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी मयूरची पत्नी मयुरी शिंदे हिने सुनेला पकडून मारहाण केली. त्यानंतर मयूर शिंदे याने घरातून लोखंडी पाईप आणून अपर्णा शिंदे यांच्या हाताच्या मनगटावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. तक्रारीनुसार, मयुरी शिंदे, कलावती मनोहर शिंदे आणि सुप्रिया केतन शिंदे यांनीही फिर्यादींना पकडून ठेवत मारहाणीला साथ दिली. घटनेनंतर जखमींना तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खेड पोलिसांनी मयूर मनोहर शिंदे (३६), मयुरी मयूर शिंदे (२८), कलावती मनोहर शिंदे (५५) आणि सुप्रिया केतन शिंदे (२८) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार अस्मिता साळवी करत असून, पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सामाईक मालमत्तेच्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा Read More »

उन्हवरे फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर

उन्हवरे फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर

प्रतिनिधी : कोकणधारा दापोली: दापोली तालुक्यातील दापोली-खेड मार्गावर वाकवलीजवळ असलेल्या उन्हवरे फाट्याजवळ मंगळवारी पहाटे एका दुचाकीचा भीषण अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी पहाटे सुमारे ३ वाजता नरेश चंद्रकांत रुके (वय ३४, रा. जालगाव बौद्धवाडी, ता. दापोली) आणि त्यांचा मित्र अमित अरुण माने (वय ३५, रा. काळकाई कोंड, ता. दापोली) हे अ‍ॅक्टिव्हा (क्र. MH 08 BF 3766) दुचाकीवरून प्रवास करत होते. उन्हवरे फाट्याजवळ आल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारावर आदळली. हा अपघात अत्यंत भीषण होता. धडकेमुळे दुचाकीचा पुढील व मागील भाग पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला. अपघातानंतर दोघेही रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. दरम्यान, नरेश रुके रात्री घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी सकाळी फोन केला असता पोलिसांनी अपघाताची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर नरेश रुके यांना पहाटे ५:०५ वाजता मृत घोषित केले. गंभीर जखमी अमित माने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार बुरोंडकर करत आहेत.

उन्हवरे फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर Read More »

भोस्ते घाटात भीषण अपघात; कंटेनर दरीत लटकला, दोघे गंभीर

भोस्ते घाटात भीषण अपघात; कंटेनर दरीत लटकला, दोघे गंभीर

प्रतिनिधी : कोकणधारा खेड: भोस्ते घाट येथे मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता एक भीषण अपघात घडला. मुंबईच्या दिशेने शीतपेयांचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या कंटेनर ट्रकचा चालकावरील ताबा सुटल्याने वाहन थेट घाटातील संरक्षक भिंतीवर आदळले. धडक इतकी जबरदस्त होती की संरक्षक भिंत तुटून ट्रकचा पुढील भाग दरीत कोसळण्याच्या स्थितीत हवेत लटकून राहिला. या अपघातात ट्रकच्या केबिनचा पूर्ण चक्काचूर झाला असून, त्यामधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावरील प्रवासी तसेच स्थानिक मदत गटातील प्रसाद गांधी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ट्रक हवेत लटकलेल्या अवस्थेत असल्याने जखमींना बाहेर काढणे अत्यंत धोकादायक होते; मात्र उपस्थितांनी धाडस दाखवत दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त कंटेनरमध्ये थम्सअप कंपनीच्या शीतपेयांचा साठा असल्याचे समोर आले आहे. घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. उशिरापर्यंत अपघातग्रस्त वाहन हटवण्याचे काम सुरू होते.

भोस्ते घाटात भीषण अपघात; कंटेनर दरीत लटकला, दोघे गंभीर Read More »

प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वनअधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार

प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वनअधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वन विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल वन विभागीय अधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या धाडसी व यशस्वी कामगिरीबद्दल सुवर्णपदकाने सन्मानित झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष उमेशशेठ काटकर, उपाध्यक्षा सुमती जांभेकर, सेक्रेटरी संतोष इनामदार, विश्वस्त शर्मिला मोरे, स्मिता सरदेसाई, प्रमोदशेठ लाड, संजय अवटी, सहा सेक्रेटरी धनश्री जोशी, सदस्य संपदा लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच चिपळूण नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांनीही उपस्थित राहून देसाई यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात बोलताना सेक्रेटरी संतोष इनामदार यांनी प्रभात रोड फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेतला. सन 2000 पासून नारायण तलाव संवर्धन, परिसरातील मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण तसेच आपत्ती काळात मदत अशा विविध उपक्रमांद्वारे फाउंडेशनने समाजात भरीव योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. गिरीजा देसाई यांनी वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि जनजागृती या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी ठाणे वन विभागात कार्यरत असताना 30 हून अधिक बिबट्यांची सुखरूप सुटका केली, तसेच 200 हून अधिक वन्यप्राण्यांचे प्राण वाचवले. अवैध तस्करीविरोधात कारवाई करत 50 हून अधिक वाहने जप्त करण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. वन्यप्राण्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाययोजना करणे, झाडे लावणे व ती जगविणे, तसेच जनजागृती मोहीम राबविणे या बाबींमध्ये त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या कार्यामुळे वन विभागाचे कामकाज अधिक प्रभावी व सुबक झाले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी गिरीजा देसाई यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार करताना अभिमान वाटत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वनअधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार Read More »

bhaskar-jadhav-fuel-shortage-criticism-government-chiplun

इंधन तुटवड्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप;भास्कर जाधव यांचा सरकारवर निशाणा

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : राज्यात इंधन तुटवड्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते, असा इशारा देतात, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगतात. या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. “जर राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, तर मग केरोसिन वितरणाचा निर्णय का घेण्यात आला?” असा सवाल उपस्थित करत जाधव यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच अफवा पसरवण्याच्या बाबतीत भाजपचा कुणीच हात धरू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. इंधन पुरवठा, संभाव्य संकटाची चर्चा आणि सरकारच्या निर्णयांमुळे सध्या राज्यात चर्चांना उधाण आले असून, या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे

इंधन तुटवड्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप;भास्कर जाधव यांचा सरकारवर निशाणा Read More »

किरण सामंत यांची शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी आमदार किरण सामंत यांची नियुक्ती

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजापूर–लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत (भैय्या सामंत) यांची शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कोकणातील पक्ष संघटना अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क, विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्य या बाबींमुळे किरण सामंत यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पक्षाची ताकद वाढवणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती अधिक प्रभावीपणे राबवणे ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणात शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी आमदार किरण सामंत यांची नियुक्ती Read More »

गावाच्या विश्वासाला उतराई व्हा : बबन बांडागळे | मुरादपूरमध्ये मंगेश बांडागळे यांचा सत्कार

गावाच्या विश्वासाला उतराई व्हा, विकासाची नवी दिशा द्या : बबन बांडागळे, मुरादपूरमध्ये पं. स. सदस्य मंगेश बांडागळे यांचा सत्कार; कांचन बोरे हिचाही गौरव

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख : “गावाने दाखवलेला विश्वास हा केवळ सन्मान नसून मोठी जबाबदारी आहे. त्या विश्वासाला उतराई होत विकासाची नवी दिशा देणे, हेच खरे नेतृत्वाचे लक्षण आहे,” असे प्रतिपादन शिक्षक नेते बबन बांडागळे यांनी केले. देवरुख लगतच्या मुरादपूर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश बांडागळे हे पंचायत समिती निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल श्री सोमेश्वर ग्रामविकास मंडळ, मुरादपूर यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी महाराष्ट्र सुरक्षा दलात नियुक्ती झाल्याबद्दल कांचन बोरे हिचाही सन्मान करण्यात आला. मुरादपूर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात फौजदार गणेश बांडागळे, रवींद्र बांडागळे, रवींद्र बांडागळे गुरुजी, सरपंच दीक्षा बांडागळे, माजी उपसरपंच नंदकिशोर बांडागळे, माजी सरपंच अनिल बांडागळे, मुजीब साटविलकर, वासुदेव नार्वेकर, स्वरा बांडागळे, दत्ताराम चोगुले, शशिकांत कापदुले, गायत्री बांडागळे, श्रीकृष्णा बांडागळे, रमेश बांडागळे, महेश बांडागळे, ग्रामसेविका तृप्ती कुलकर्णी, खैरून फकीर, तसेच मुरादपूरच्या पहिल्या सरपंच सुप्रिया चौगुले, राजेंद्र महाडिक, नितीन बांडागळे, अजित बांडागळे, वामन बांडागळे, सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम चौगुले यांनी करताना या सत्कारामागील भावना व्यक्त केल्या. “गावातील एक तरुण आज तेरा गावांचे म्हणजेच हातिव पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करत आहे, ही अभिमानाची बाब आहे. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकास कामांमुळे लोकांचा विश्वास संपादन झाला आणि त्याच जोरावर मंगेश बांडागळे विजयी झाले,” असे ते म्हणाले. तसेच कांचन बोरे हिने महाराष्ट्र सुरक्षा दलात स्थान मिळवून गावाचे नाव उज्वल केल्याचे त्यांनी नमूद केले. दिनेश साबळे यांनी निवडणूक काळातील आठवणी सांगताना मंगेश बांडागळे यांच्या अथक परिश्रमांचा उल्लेख केला. “तेरा गावांतून मिळालेला प्रतिसाद आणि आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे हेच त्यांच्या विजयाचे मुख्य कारण ठरले,” असे त्यांनी सांगितले. रवींद्र बांडागळे गुरुजी यांनी पक्षभेद विसरून गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला. “आपल्या गावातील तरुण पुढे जात असेल तर त्याला साथ देणे ही आपली जबाबदारी आहे. संपूर्ण मुरादपूर गाव त्यांच्या पाठीशी उभे राहिले, हेच त्यांच्या यशाचे खरे बळ आहे,” असे ते म्हणाले. सरपंच दीक्षा बांडागळे यांनीही शुभेच्छा देत भविष्यातील कार्यासाठी विश्वास व्यक्त केला. गौरवमूर्ती कांचन बोरे हिने आपल्या मनोगतात भावना व्यक्त करताना सांगितले, “पोलीस दलात जाण्याचे स्वप्न होते, मात्र महाराष्ट्र सुरक्षा दलातील वर्दी मिळाल्याचे समाधान आहे. आजचे यश पाहण्यासाठी वडील हवे होते,” असे सांगताना तिचा आवाज दाटून आला. सत्कारमूर्ती मंगेश बांडागळे यांनी आपल्या मनोगतात गावकऱ्यांचे आभार मानत सांगितले की, “संपूर्ण गाव, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीय यांनी माझ्या विजयासाठी मेहनत घेतली. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर आणि केलेल्या कामांवर विश्वास ठेवून जनतेने मला विजयी केले. हा विश्वास मी कधीच विसरणार नाही.” पुढे ते म्हणाले की, “मुरादपूर ग्रामपंचायत परिसराच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे दहा लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला असून पंचायत समिती सदस्य म्हणून माझे पहिले काम गावासाठीच आहे. तेरा गावांत काम करत असतानाही मुरादपूरकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही.” पत्रकार योगेश बांडागळे यांनी मंगेश बांडागळे हे विषय समजून घेतात, अभ्यास करतात, त्यामुळे निश्चितच पहिल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्याचे दर्शन घडले. गावाने सरपंच केले, पंचायत समिती निवडणुकीत गाव पाठीशी ठामपणे उभा राहिला, हे कधीही विसरू नका, अशी सूचना त्यांनी केली. अध्यक्षीय भाषणात बबन बांडागळे यांनी मंगेश बांडागळे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, “ग्रामपंचायतीत दहा वर्षे काम केल्यामुळे त्यांना प्रशासनाची चांगली जाण आहे. आता पंचायत समितीच्या माध्यमातून अधिक व्यापक स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी ही संधी साधत विकासाची गती वाढवावी,” असा सल्ला त्यांनी दिला. तसेच भविष्यातही ते राजकीय क्षेत्रात यशाची नवी उंची गाठतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांडागळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र बांडागळे यांनी केले.

गावाच्या विश्वासाला उतराई व्हा, विकासाची नवी दिशा द्या : बबन बांडागळे, मुरादपूरमध्ये पं. स. सदस्य मंगेश बांडागळे यांचा सत्कार; कांचन बोरे हिचाही गौरव Read More »

रायगडमध्ये NCP बॅनर वाद: अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचे फोटो

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचेच फोटो

प्रतिनिधी : कोकणधारा रोहे: रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरून पक्षातील प्रमुख नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात लावलेल्या बॅनरवर मात्र खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचेच फोटो झळकले. हा कार्यक्रम नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे स्वतः उपस्थित होते. तरीही पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांचे फोटो बॅनरवर नसल्याने विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांच्यावर यापूर्वीही राष्ट्रवादी पक्षात फूट पाडल्याचे आरोप झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर रायगडमधील या बॅनर प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.या घटनेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “दादांचा पक्ष ताब्यात घेण्याचे तटकरेंचे मनसुबे आता उघड झाले आहेत. त्याची सुरुवात रायगडमधून होत आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “हिम्मत असेल तर प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत वेगळा पक्ष काढा किंवा भाजपमध्ये जा,” असा टोला देखील त्यांनी लगावला. या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचेच फोटो Read More »

राजापुरात पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाई

राजापुरात पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाईमुख्य जलवाहिनीवरील बेकायदेशीर पाच पंप जप्त; कारवाई सुरूच राहणार : सौरभ खडपे

प्रतिनिधी : कोकणधारा राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या पंप बसवून करण्यात येणाऱ्या पाणीचोरीविरोधात राजापूर नगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेत धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले पाच पंप जप्त करण्यात आले असून, भविष्यातही अशी मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी दिली. शहरामध्ये जलवाहिन्यांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या पंप बसवून पाणीचोरी होत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नगरपालिकेने कठोर भूमिका घेतली असून, पाणीचोरी करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता.त्या अनुषंगाने, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने शहरात सर्वेक्षण मोहीम हाती घेतली. या सर्वेक्षणादरम्यान मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले पाच पंप आढळून आले, ते तात्काळ जप्त करण्यात आले. अशा प्रकारची धडक कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असा इशाराही श्री. खडपे यांनी दिला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे जलसाठ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, आगामी काळात शहराला पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेऊन नगर पालिकेने आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर विंधन विहिरी, पारंपरिक विहिरी तसेच तळी यांची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, उन्हाळ्यात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही श्री. खडपे यांनी स्पष्ट केले.

राजापुरात पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाईमुख्य जलवाहिनीवरील बेकायदेशीर पाच पंप जप्त; कारवाई सुरूच राहणार : सौरभ खडपे Read More »